Wednesday, 17 May 2017

वैचारिक दहशतवाद

सत्ता, संपत्ती, अधिकार आणि शोषण अशा चार प्रमुख गोष्टींच्या हव्यासापोटी दहशतवाद किंवा नक्षलवाद बळावतो. या चारही गोष्टी ज्यांना हव्यात ते समुह करुन एकत्र येतात. हे एकत्र येणे प्रथमतः धर्माच्या नावावर असते. त्यानंतर पंथ, वर्ण, समाज, जात, लिंग आणि कार्य अथवा विचारांच्या सामायिकतेतून लोकांना एकत्र आणले जाते. ज्या चार गोष्टींची मागणी करायची त्यासाठी अगोदर लक्षवेधी आक्रोश केला जातो. आक्रोशातून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आंदोलन उभे राहते. आंदोलनाचे मूलतः दोनच प्रकार असतात. पहिला अहिंसक व दुसरा हिंसक.


हिंसक आंदोलनातून अतिरेकी (पूर्वी खलिस्तानची मागणी करणारे), नक्षलवादी (स्वतंत्र बोडो लैण्ड मागणारे) आणि दहशतवादी (काश्मीच्या कथित मुक्तिसाठी घातपात करणारे) निर्माण होतात. तीन शब्द विभीन्न असले तरी हेतू हा सध्याच्या सरकारी व्यवस्था अथवा प्रस्थापितांमधून फुटून निघण्याचा समान असतो. अतिरेकी, नक्षलवादी व दहशतवादी हे प्रस्थापित व्यवस्थेच्या सरकारशी हिंसक लढा देवून नागरिकांच्या जान व मालाचे नुकसान करतात पण प्रस्थापित व्यवस्थेच्या सैन्यदलाशी थेट युध्द करणे टाळतात. अतिरेकी, नक्षलवादी व दहशतवादी यांच्या हिंसक कारवाया हे छुपे युध्द मानले जाते.

अतिरेक, दहशतवाद व नक्षलवादाला आजकाल वैचारिक समर्थन देण्याचा नवा प्रयोग सुरु झाला आहे. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र व हक्क याचा घटनादत्त अधिकार वापरुन हिंसेचे समर्थन करण्याचे प्रयत्न आता दृश्य कला (नाट्य, चित्र, गीत-संगीत, चित्रपट) व साहित्याच्या माध्यमातून होते आहे. मूलतत्ववाद, परंपरावाद, प्रतिगामीत्व या सोबत भाषा, जमीन, वर्ण, जात यांचाही वापर वैचारिक दहशतवादात खुबीने पेरला जातोय. सुधारणावादी, पुरोगामी, समतावादी अशी बिरुदावली वापरुन वैचारिक दहशतवादाची विरुद्ध बाजू फोफावते आहे. विध्वसंक घातपातात मालमत्तेचे नुकसान होवून काही बळी जातात. पण वैचारिक दहशतवादामुळे एक अख्खी पिढी उध्वस्त होताना दिसते.

भारत हा युवकांचा देश आहे. १२० कोटी लोकसंख्येत युवावस्थेतील लोकसंख्या ७० टक्के मानली जाते. यातील ठराविक वयोगटातील लोकसंख्याही अनुकूल  अथवा प्रतिकूल वैचारिक दहशतवादामुळे भ्रमित होत आहे. हेच भारतीय समाजासमोरील अवघड आव्हान आहे. युवकांच्या घटकाला भ्रमित करण्याचे कार्य माध्यमांच्या गती, विस्तार व सहज उपलब्धतेमुळे होत आहे. पारंपरिक माध्यमे जशी वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही यापेक्षा इंटरनेट व्यवस्थेवर आधारित सोशल मीडियामुळे युवापीढी अधिक भ्रमित, गोंधळलेली व साशंक होत आहे. सत्य व असत्याची बेमालूम सरमिसळ होत असल्याने जे दिसते, जे ऐकले व जे वाचले तेच युवावर्गाला सत्य भासू लागले आहे. वैचारिक दहशतवादाने इंद्रियांना बधीर केले आहे ते असे. इंद्रियांकडून संकलित होणाऱ्या माहितीवर समजदारी, सामंजस्य, संयम याची प्रक्रिया करण्याचे काम मेंदू नावाचा प्रोसेसरही नीटपणे करीत नसल्याचे दिसते. या प्रोसेसरला वैचारिक मतभेदांचा विषाणू (व्हायरस) बाधीत करतो आहे.

वैचारिक दुषित मेंदूमुळे हिंसात्मक दहशतवादाची नवी उदाहरणे समोर येत आहेत. प्रतिगामी प्रथा, परंपरा मोडीत काढताना पुरोगामित्त्वाच्या नव्या प्रथा परंपरा निर्माण होत आहेत. विचाराला विचारातून विरोध करताना विचार मांडणारे संपविण्याचे आघोरी हिंसात्मक प्रकार होत आहे.  हिंसेचे हे प्रलयंकारी रुप सामान्य माणसाच्या दारापर्यंत पोहचले आहे. यात सहभाग वाढतोय तो युवापीढीचा आणि बळी जातोय तो सुध्दा युवकांच्या स्वप्नांचा.

वैचारिक दहशतवादात युवापीढी बळी जावू नये यासाठी कुटुंब व्यवस्था सजग व सक्रिय होणे आवश्यक आहे. आपले पाल्य कोणत्या विचारसरणीत अथवा धारेत प्रवाहित होत आहेत याकडे पालकांनी जाणिवपूर्वक लक्ष देणे आवश्यक झाले आहे. सोशल मीडियाचा वापर करताना आपला पाल्य कोणत्या विचारांना समर्थन करतो आहे आणि कोणत्या विचारांना विरोध करतो आहे, हे पालकांनी तपासणे आवश्यक झाले आहे. पाल्यांच्या वैचारिक जडण-घडणची माहिती करुन घेणे हे पालकांचे आद्य कर्तव्य झाले आहे.

रविवार, दि. २१ मे २०१७ रोजी जळगाव शहरात स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळातर्फे दहशतवाद विरोधीदिन हा मूकमोर्चा काढून साजरा होणार आहे. यात सहभागी होवून घातपात स्वरुपातील दहशतवादाला मौनातून उत्तर देणे हे योग्य आहे. पण वैचारिक दहशतवाद मेंदूत बाळगून घराघरात वावरणाऱ्या युवापीढीशी मौखिक संवाद हाच वैचारिक दहशतवादातून मुक्तिसाठी गरजेचा ठरणार आहे. दहशतवाद विरोधातील प्रतिज्ञा घेत असताना मुलामुलींशी घरात मोकळेपणाने बोलण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment