Thursday 25 May 2017

संगीत संशेवकल्लोळला हवा रसिकाश्रय !

खान्देशी मातीतील नाट्य कलावंतांना सोबत घेवून व्यावसायिक रंगभूमिवर भरारी घेण्याचा अलिकडचा दुसरा प्रयत्न संगीत संशेवकल्लोळ या नाटकाने होतो आहे. मुंबई येथील श्री महाल्क्ष्मी प्रॉडक्शन निर्मित हे दोन अंकी फुल्ल टू धमाल नाटक जळगाव येथील स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे उद्या, शनिवार, दि. २७ मेस सायंकाळी ७.३० वाजता भय्यासाहेब गंधे सभागृहात सादर होत आहे. हा नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रयोग रसिकांसाठी विनामूल्य आहे.

जळगावमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात नाट्य, संगीत, नृत्य यात काम करणाऱ्या अनेक संस्था आणि कलावंतांनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेला आहे. अनेक कलावंतांनी आपल्या कलागुणांच्या क्षमता सिद्ध केलेल्या आहेत. वर्षभरापूर्वी परिवर्तन संस्थेने अपूर्णांक हे नाटक व्यावसायिक भरारी घेण्याच्या हेतूने रंगमंचावर आणले. आधेअधुरे या हिंदी नाटकाचा स्वैर व खान्देशी अनुवाद यात आहे. स्त्रीयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आशय नाटकाचा आहे. जळगाव बाहेर अनेक ठिकाणी नाटकाचे प्रयोग झाले. त्यावर महिलांची चर्चासत्रेही रंगली. मुंबईतील प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.

आता व्यावसायिक रंगभूमिवर भरारी घेण्यासाठी संगीत संशेवकल्लोळ येत आहे. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक एम. जे. कॉलेजमधील नाट्यशास्त्र विभाग प्रमुख हेमंत कुळकर्णी आहेत. कुळकर्णी म्हणजे, सतत नाटक जगणारा माणूस. नाटकाचे सूत्रधार व नाटकाला रंगमंचावर आणण्यासाठी व्यावहारिक सहकार्य करणारे दीपक चांदोरकर व सहकारी राजेंद्र पाटणकर आहेत. नाटकातील कलावंत व इतर तांत्रिक बाबी सांभाळणारे सर्वजण खान्देशी आहेत. असा खान्देशीचा पहिला देशी प्रयोग आहे.

जळगाव शहरात सुसज्ज नाट्यगृह नाही. बांधकाम पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेत एक आणि नुतनिकरणाच्या प्रतिक्षेत दुसरे आहे. खुल्या नाट्यगृहासह इतर बंदीस्त सभागृहांमध्ये सोयी-सुविधांचा प्रश्न कायम आहे. ठप्प झालेल्या अशा स्थितीतही व्यावसायिक हेतूने नाटकाची बांधणी करण्याचा कुळकर्णी-चांदोरकर यांचा हा प्रयत्न धाडसाचा म्हणायचा.

जळगावात नाट्यगृह नाही म्हणून इतर व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत नाहीत, हे एक कारण आहे. दुसरे म्हणजे, व्यावसायिक नाटक आणले तरी त्याच्या तिकीट खरेदीला रसिकांचा प्रतिसाद मिळेलच याची शाश्वती नाही. जळगावकर रसिक मोफत, विनामूल्य कार्यक्रमांना गर्दी करीत नाहीत हा ही अलिकडचाच अनुभव आहे. वार्षिक शुल्क घेवून नाटकांच्या प्रदर्शनाचा प्रयोग येथे यशस्वी होत नाही. प्रायोजक लावून नाटक आणले तरी जळगावकर काय करतील हे सांगता येत नाही.

अशाही वातावरणात जळगावमधील नाट्य कलावंताना उभारी देण्यासाठी कुळकर्णी-चांदोरकर व त्यांच्या सोबतच्या सर्व सहकाऱ्यांचा संगीत संशेवकल्लोळ ला रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न यशस्वी व्हायला हवा. जळगावात इतर नाटकांचे प्रयोग होत नाही म्हणून आपणच आपले कलावंत घेवून व्यावसायिक नाटकाची का निर्मिती करु नये ? या प्रश्नाचा मागोवा घेत संगीत संशेवकल्लोळ उभे राहिले आहे. परिवर्नच्या पाठोपाठ हा चांदोरकर प्रतिष्ठानचा स्तुत्य प्रयत्न आहे.

या प्रयोगाविषयी हेमंत कुळकर्णी म्हणतात, आम्ही नाटक उभे केले आहे. अत्यंत कमी गरजांमध्ये कुठेही सहजपणे या नाटकाचा प्रयोग सादर करता येईल. नाटकाचा आशय हा फुल्ल टू धम्माल आहे. संपूर्ण कटुंबाला एकत्र पाहता येईल असे हे नाटक आहे. संगीत संशेवकल्लोळ म्हणजे लंपट राजा, मोहक नर्तकी, संशयी राणी, कारस्थानी प्रधान, राजाचा हितचिंतक शिपाई आणि हुशार शाहिर यांच्यातील व्यंगात्मक जुगलबंदी आहे. या जुगलबंदीला खान्देशी बाज, भाषेची चव व नृत्याचा झटका आहे. शेवटाकडे जाताना नाटक रसिकांना अंतर्मूख करते. आम्ही अगदी प्रामाणिक प्रयत्न करुन परिश्रमाने नाटकाची निर्मिती केली आहे. आता नाटकाला हवा रसिकाश्रय.

या नाटकाच्या तांत्रिक बाबी अशा – संगीत दुष्यंत जोशी, संगीत साथ जुईली कलभंडे, ढोलकी उल्हास ठाकरे, नृत्य सागर सोनवणे, रंगभूषा प्रियांका वाणी, वेशभूषा दीपक भुसारी, ध्वनी संकेत भावेश पाटील, निर्मिती सहाय्य धनंजय धनगर, योगेश बेलदार. कलावंत किरण अडकमोल, दिनेश माळी, बळवंत गायकवाड, विशाल जाधव, आरती गोळीवाले, अपूर्वा कुळकर्णी.

आपण उद्या, शनिवारी (दि. २७ मे) नाटक पाहायला नक्कीच जायला हवे ....

2 comments:

  1. एक स्तुत्य प्रयत्न .. खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  2. सर आपण काहीतरी लिहाल याचीच वाट पहात होतो...उद्या आपणासोबत मी देखील आहे..

    ReplyDelete