Tuesday 2 May 2017

खडसे पक्षाच्या नव्हे, तर प्रवृत्तींच्या विरोधात ...

सत्तेपासून सध्यातरी लांब बसलेले माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मनांतील खंत पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. खडसे म्हणाले, मी मुख्यमंत्री होवू नये म्हणून अनेकांनी उद्योग केले. घाणेरडे राजकारण करीत बिनबुडाच्या आरोपांच्या फैरीही माझ्यावर डागल्या. मात्र, मी मंत्रिपद त्यागल्यानंतर गेल्या वर्षभरात एकही विरोधक माझ्यावर केलेला एकही आरोपल सिद्द करु शकलेला नाही. खडसेंच्या या वक्तव्याची दखल आज जय महाराष्ट्र या चॅनेलवर घेण्यात आली. त्यामुळे त्यांची चर्चा पुन्हा राज्यभर सुरू झाली. अशा वातावरणात खडसेंसारखा तावून सलाखून निघालेला माणूस आता योग्य वेळेची प्रतिक्षा करीत आहे. भविष्यात कोणती वेळ कोणता प्रश्न घेवून येईल यासाठी प्रतिक्षाच करणे योग्य राहील. 

खडसेंनी वरील वक्तव्य हे पाडळसे (ता. यावल) येथे भोरगाव लेवापंचायतचे कुटुंबनायक रमेश पाटील यांच्या समाजाच्या पंचायतीत अर्धशतकी वाटचाल झाल्याचा गौरव करताना केले. तेथे मनातील खंत व्यक्त करताना खडसेंनी आपल्या विरोधातील राजकिय षड्यंत्राविषयी उल्लेख केला. अर्थात, या मागे गेल्या वर्षभरात घडलेल्या बिनबुडाच्या आरोपांच्या घटनांची मालिका आहे. खडसेंवर विरोधी पक्षांच्या राजकिय नेत्यांकडून आरोप झालेले नाहीत. ज्यांनी कोणी आरोप केले, त्यांचे सामाजिक व राजकिय वजन फारसे नाही. खडसेंच्या कथित पीए गजानन पाटील यांनी ३० लाखांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात कोणताही ठोस पुरावा देण्यात आला नाही. गजानन पाटील यांची थेट गावापर्यंत चौकशी करण्यात आली. तेथे त्याचे कुटुंबिय आजही पत्र्यांच्या घरात राहत असल्याचे आढळून आले. अखेर लोकायुक्तांनी या प्रकरणात खडसेंना क्लिन चीट दिली. मात्र, माध्यमांनी या खुलासाविषयी संशयच व्यक्त केला.

खडसेंवर दुसरा आरोप मनिष भंगाळे नावाच्या एका चीटरने केला. हा चीटर स्वतःला हॅकर म्हणवून घेतो. इतर माध्यममेही त्याला हॅकरच म्हणतात. भंगाळे याने पाकिस्तानातील दूरसंचार विभागाची काही टेलिफोन बीले दाखवून खडसेंवर आरोप केला की, खडसे ही मोबाईल फोनद्वारे कुख्यात डॉन दाऊदच्या संपर्कात आहेत. यासाठी त्याने पुरावा म्हणून दाऊदची पत्नी मेहजबीन हिच्या नावाचे टेलिफोन बील सादर केले.

हा आरोप पहिल्या पासून बिनबुडाचा होता. कारण पाकिस्तानात दाऊद जर लपून बसला असेल तर तो बायकोच्या नावाने लॅण्डलाईन फोन घेण्या इतपत मूर्ख नाही. ज्या व्यक्तीच्या नावाने इंटरपोलने रेड अलर्ट जारी केला आहे, तो लॅण्डलाईनचा एवढा बेसावध पुरावा तयार करणे शक्य नाहीच नाही. शिवाय, खडसेही स्वतःच्या मोबाईलवरुन दाऊदला कॉल करणार नाहीत. हे प्रकरण भंगाळेने सुरू केले तेव्हा पासून बोगस होते. मुंबई पोलिसांनी खडसेंच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासून क्लिन चीट दिली होती. मात्र, तेव्हाही माध्यमांनी त्यांच्या दाव्याकडे लक्ष दिले नाही. किंबहुना खडसेंच्या खुलाशावरही संशयच व्यक्त केला गेला.

सध्या भंगाळे हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून खडसेंच्या विरोधात बनावट दस्तावेज तयार केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भंगाळे याचे प्रकरण गंभीर वाटत असल्यामुळे न्यायालय त्याला जामिन द्यायला तयार नाही. या प्रकरणी खडसेंवर आरोपांची धुराळा उठवणाऱ्या आप पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा मेमन व इतर पत्रकार भंगाळेच्या बोगसगिरीवर तोंड उघडायला तयार नाहीत.

खडसेंची संपत्ती व भोसरी येथील भूखंड खरेदीप्रकरणी आरोप करणारे पुणे येथील गावंडे यांची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. भोसरीच्या भूखंड प्रकरणी विशेष चौकशी समिती चौकशी करीत आहे. याच प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल आहे. या दोन्ही ठिकाणी खडसे विरोधात सबळ पुरावा अजूनही दाखल करता आलेला नाही. तरी सुद्धा खडसेंच्या संपत्तीची स्वतंत्र चौकशी करा अशी मागणी करणारी गावंडे यांची स्वतंत्र याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

खडसेंच्या संपत्तीचे विवरण त्यांनी सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दाखल केले आहे. त्यानंतर अंजली दमानिया व इतर छुटपूट विरोधकांनी खडसेंच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात टाकली आहे. तेथेही फारसे ठोस पुरावे विरोधक सादर करु शकलेले नाहीत.

गेली ३३ वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात अभ्यासू, धडाडीचे आणि प्रशासनाकडून काम करुन घेणारे नेते अशी प्रतिमा असलेल्या एकनाथराव खडसे यांना गेल्या वर्षभरात गावंडे, भंगाळे, शर्मा-मेमन, दमानिया आणि इतरांनी बिनबुडाचे आरोप करुन सतत बदनाम केले आहे. खडसेंची अडचण हिच आहे की, त्यांना हे माहित आहे, आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात तथ्य नाही. मात्र, अशा आरोपांसाठी खडसेंनी स्वतः मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या पक्षाने किंवा स्वकियांनी खडसेंवरील आरोपांचा सोक्षमोक्ष सत्त्वर लावणे आवश्यक आहे. परंतु पक्षांतर्गत काही मंडळी मुद्दाम वेळकाढूपणा करीत खडसेंना मंत्री पदापासून लांब ठेवत आहेत. हा सर्व प्रकार आता सामान्य माणसाला लक्षात येतोय. 

अशा वातावरणात खडसे ही आपबीती सांगताना कडवट वक्तव्ये करतात. ती काहीवेळा स्वकियांना अडचणीची वाटतात. कधीकधी ती पक्षाच्या विरोधातील आहेत असे भांडवल केले जाते. मात्र खडसेंनी मांडलेली स्वतःच्या बाजू ही दुसरी बाजुही असू शकते असे माध्यमातील खडसे विरोधक मानत नाहीत. किंबहुना वर्षभरापूर्वी जी मंडळी खडसेंवर बिनबुडाचे आरोप करीत होती, ती सुद्धा आज पुराव्यांच्या संदर्भात काहीही बोलत नाहीत. खरी खंत आहे ती येथे. खडसेंवर भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी आरोप केले नाहीत. युतीत भागिदार असलेल्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी व्यक्तिगत रागातून आरोप केले आहेत. मात्र, शिवसेना नेत्यांनी टोकाचा विरोध केलेला नाही. अशा वातावरणात खडसे म्हणतात त्यानुसार, त्यांनी मुख्यमंत्री होवू नये म्हणूनच त्यांच्या बदनामीचा गनिमीकावा काही बड्या मंडळींनी खेळलेला आहे. तो आता सत्य वाटायला लागला आहे. कारण मला मुख्यमंत्री व्हायचे होते, असे खडसे खुलेपणाने म्हणायचे. त्यांनी ती महत्वाकांक्षा कधीही लपविली नाही. मात्र, खडसेंची ज्यांना भीती होती किंवा खडसे हे नंतर कधीतरी मुख्यमंत्री होवू शकतात अशी भीती असणाऱ्यांनी खडसेंच्या विरोधात षडयंत्र केल्याचा तर्क आता वास्तवात समोर येवू लागला आहे. या संदर्भात लवकरच सविस्तर लेखन केले जाईल.

2 comments:

  1. जलने वाले जलते रहे ।
    नाथाभाऊ आगे बढते रहे ।।

    ReplyDelete