Monday 1 May 2017

मुलांना शिव्या देता आल्या पाहिजेत !

सातवर्षे वयोगटातील मुला मुलींच्या शिबिरात जाण्याचा योग आला. शिबिरार्थींना चित्रकलेचा साधा सोपा प्रकार समजून सांगितला. वेळ होता म्हणून त्यांच्याशी गप्पा केल्या. मुला मुलींना थेट विचारले, तुम्हाला शिव्या देता येतात का ? हा असभ्य प्रश्न अचानक विचारल्याने मुले भांबाळली. एकमेकाकडे पाहू लागली. शिव्या देता येतात का प्रश्नाचे सरळ उत्तर नकाराचे होते. पण, तुम्हाला कोणत्या शिव्या माहित आहे ? या प्रश्नावर मुले म्हणत होती, मूर्ख, नालायक, स्टुपीड, भैताड .... ! मला गंमत वाटत होती. शिव्या म्हणजे अपशब्द उच्चारणे हे मुलांना निषिद्ध वाटत होते मात्र त्यांच्याकडे ५/१० शिव्यांचा साठा नक्कीच होता.

मुलांना पुढचा प्रश्न केला, तुम्हाला विरुद्धार्थी शब्द (अपोझीट) येतात का ? त्यावर मुलांनी होकार दिला. मी विचारले शहाण्याचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मुले म्हणाली, मुर्ख. मी विचारले हुशारचा विरुद्धार्थी शब्द ? मुले म्हणाली, बेअक्कल. मी म्हटले क्लेव्हरचा विरुद्धार्थी शब्द ? मुले म्हणाली, स्टुपीड. ही उत्तरे ऐकून म्हणालो, यात आणि शिव्यांमध्ये काय फरक आहे ? अर्थात मुले गप्प झाली. या विरुद्धार्थी किंवा अपशद्बांतील फरक त्यांना कळेल असे त्यांचे वय नक्कीच नव्हते. पण, आपल्या मुला मुलींना वेळप्रसंगी अभिव्यक्त होण्यासाठी त्यांच्याकडे अपशब्दांचा साठा असला पाहिजे याचा आजच्या पालकांनी गांभिर्याने विचार करायला हवा.

आजची समाज व्यवस्था ही कौटुंबिक, सामाजिक, व्यवसाय-उद्योग-धंदे-नोकरी, स्वयंरोजगार, कला- संस्कृतीशी संबंधित अनेक नव्या प्रश्नांना जन्म देत आहे. माणसाचा वर्ण, जात, धर्म, पंथ, लिंग आदीशी संबंधित अनेक प्रकारच्या विखारी आणि विघातक विचारधारांचे प्रवाह समाजातील एकोपा, एकात्मता आणि एकसंघता मोडीत काढत आहेत. अशा प्रसंगात युवावस्थेतील मुला मुलींचे भाव व कल्पना विश्व उध्वस्त होते किंवा त्यात बाधा येतात. तशाही स्थितीत त्यांना अभिव्यक्त होणे आवश्यक असते. जी मुले बोलू व लिहू शकतात ती समाजातील सर्व प्रकारच्या विचारधारांमध्ये सहजपणे अभिव्यक्त होतात. मात्र जी अबोल आहेत, जी बोलू शकत नाहीत ती मनातल्या मनांत विचारांनी कुंठीत होण्याचे प्रकार वाढताहेत. युवावस्थेतील मुलांमध्ये नैराश्याची (डीप्रेशनची) अवस्था वाढत असल्याचे लक्षात येत आहे. 

बहुतांश पालक पाल्यांविषयी म्हणतात, आमच्या मुलांना दुसऱ्यांशी बोलता येत नाही. काही म्हणतात, आमची मुले भांडू शकत नाहीत. या दोन्हीही अवस्था म्हणजे त्यांची मुले वेळ व काळ प्रसंग पाहून अभिव्यक्त होवू शकत नाही. मुला मुलींनी अभिव्यक्त होणे म्हणजे आपली शारिरीक हालचाल, हावभाव, हातवारे, भाषा, शब्दांचे उच्चारण याचा समयोचित वापर करणे. या अवस्थेसाठी अगदीच समर्पक शब्द म्हणजे उद्भवलेल्या स्थितीत युक्तिवाद, प्रवाद, प्रतिकार करता येणे. आपली बाजू मांडता येणे. 

मानवी आयुष्यात भाषेने युक्तिवाद करावा लागणे ही कायम अवस्था आहे. कोणत्याही अवस्थेत कुटुंबात, समाजात माणसाला सतत युक्तिवाद करावा लागतो. हा युक्तिवाद बचाव, आक्रमक अथवा तटस्थ असतो. तो आनंदाचा, दुःखाचा, रागाचा, द्वेष, मत्सराचा, विनोदाचा असू शकतो. जशी स्थिती निर्माण होईल तशी भाषा वापरता आली पाहिजे. याला अभिव्यक्त होणे म्हटले जाते. समर्पक, विधायक व संयमित भाषा असावी असा प्रयत्न असतोच पण कधी कधी भाषा ही संयमाचे सर्व बांध, मर्यादा सोडणारी असते अथवा असावी लागते. अशावेळी अपशब्द किंवा शिवी ही मौखिक संतापाची वाट मोकळी करुन देते. माणसाच्या मनातील राग व संतापाची वाफ बाहेर काढण्यासाठी शिवी ही प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व सारखी आहे. प्रेशर कुकरमध्ये वाफ प्रमाणाबाहेर तयार झाल्यानंतर तिला गरजेनुसार बाहेर काढण्यासाठी सेफ्टी वॉल काम करतो अगदी तेच काम माणसाच्या तन, मनातील राग, संतापाची वाफ काढण्याचे काम शिवी करते.

शिव्यांचा इतिहास सुस्पष्ट नाही. त्या कधी सुरु झाल्यात याचा उल्लेख नाही. पण रामायणाचा विचार केला तर रामाने सितेचा त्याग केल्याचा प्रसंग लक्षात येतो. एका परिटाने सितेच्या चारित्र्याविषयी अपशब्द वापरले आणि ते राजा रामाला जिव्हारी लागले म्हणून त्याने सितेचा त्याग केला असा प्रसंग आहे. येथे अपशब्दांचा नेमका उल्लेख नसला तरी त्यामागील वाईट अर्थ शिवी प्रकाराकडे जातो.
महाभारतातही अग्रपुजेच्यावेळी श्रीकृष्णासाठी शिशुपालने १०० अपशब्द वापरल्याचा उल्लेख आहे. अर्थात, कृष्णाने शिशूपालचे ते १०० अपराध माफ करुन १०१ व्या शिवीनंतर त्याचा वध केला आहे. द्युत खेळताना पत्नी म्हणून पणाला लावणाऱ्या पांडवांची निर्भत्सना द्रौपदीने केल्याचा उल्लेख आहे. आगतिक द्रौपदीने तेव्हा अपशब्दच वापरले असतील.

भारतीय परंपरा व संस्कृतित शिव्या देण्याच्या अनेक जागाही आहेत. काही जाती व धर्मात लग्नाच्या पुजाविधी प्रसंगी वधुच्या माहेरची मंडळी वर पक्षाकडील मंडळींना गाण्यातून शिव्या देतात. याची परतफेड जेव्हा नववधू सासरी पोहचते तेव्हा केली जाते. होळीच्या दिवशी बोंबा ठोकण्याचा आणि दुसऱ्या दिवशी शिमगा करण्याचा प्रकार म्हणजे अपशब्द उच्चारण्याचा सुसंस्कृत परवानाच आहे. रंगपंचमीलाही शिव्या देण्याची प्रथा अपवादाने आहे. खान्देशात आखाजीच्या दिवशी काही ठिकाणी गावशिववर परिसरातील महिला एकत्र येवून गाणी गातात. त्यातही शिवी देणे हा भाव असतो.
शिव्यांच्या इतिहासाचा शोध घेताना संत साहित्यात अपशब्दांचा वापर असल्याचे काही अभ्यासक म्हणतात. 

ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात विषयासक्त (लंपट) माणसाविषयी ज्ञानदेवही कठोरपणे अपशब्द वापरतात.
खरी टेंको नेंदी उडे।
लातौनी फोडे नाकाडे।
तर्हा जैसा न काढे। माघौता खरू॥
तैसा जो विषयांलागीं।
उडी घाली जळातीये आगी।
व्यसनाची अंगी। लेणी मिरवी
(अर्थ - गाढवीन गाढवाला स्पर्श करू न देता, उसळून मागील लाथेने त्याचे नाकाड फोडते, तरीही ज्याप्रमाणे गाढव मागे सरत नाही, त्याप्रमाणे विषयासक्तपुरुष जळत्या आगीसारख्या स्त्री देहाचा उपभोग घेण्यासाठी झेपावतो आणि त्या भोगातून प्राप्त होणारी संकटेही शरीरावरील अलंकारासारखी मिरवतो.) यात ज्ञानदेवांनी विषयलंपटांविषयी तिखट भाषा वापरली आहे.

संत तुकारामांनी आपल्या कवनात थेट शिव्यांचा वापर केला आहे. तुकाराम गाथेतील एक उदाहरण पाहू या.
उभ्या बाजारात कथा।
हे तो नावडे पंढरीनाथा।।
अवघे पोटासाठी सोंग।
तेथे कैचा पांडुरंग।।
लावी अनुसंधान।
काही देईल म्हणून।।
काय केले रांडलेका।
तुला राजी नाही तुका।।
(येथे रांडलेका हा शब्द अनौरस संतती या अर्थी वापरला आहे.)
अगदी अलिकडच्या काळात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या बहुचर्चित "हिंदू" कादंबरीत ढीगभर शिव्याच सादर केल्या आहेत. एवढ्या भयंकर की त्याचे अर्थ मुला मुलींना समजावणे अवघड वाटते. ६०३ पानांच्या या कादंबरीत किमान १०० वर शिव्या आहेत. त्यातील नमुना दाखल अशा. (पृ.१०६) फोकनीचे, (पृ.१२९) बहीनझू , (पृ.१५९) तुझ्या आयला, (पृ.१६५) शाटमारी, (पृ.१६६) गांडू. या फारच सभ्य शिव्यांचे संदर्भ येथे दिले आहेत. इतर देता येत नाहीत.

ज्येष्ठ कलावंत आणि विचारवंत गिरीश कर्नाड यांनीही शिव्यांची नैतिकता कधीकाळी स्पष्ट केली आहे. चित्रपटात शिव्यांवर बंधन घालताना केंद्रीय फिल्म सेंसॉर बोर्डाने अलिकडे काही शब्दांच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यावर अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा मुद्दा मांडत कर्नड यांनी सेंसॉर बोर्डाला विरोध केला आहे. शेक्सपिअर पासून तर अन्य जवळपास सर्वच बड्या साहित्यिकांनी आपल्या साहित्यात समाजातील प्रचलित शिव्यांचा सर्रास वापर केला आहे. त्यामुळे अशी बंदी लादली गेली, तर ते सारे साहित्य निकाली काढावे लागेल, असा युक्तिवादही कर्नाड यांनी त्यावेळी केला आहे. कर्नाड म्हणतात तसा नेमाडे यांच्या कादंबरीत तर सर्वच शिव्यांचा भरपूर अर्क आहे.

मध्यंतरी लेखक-दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी शिवी नावाचे नाटकच रंगमंचावर आणले. या नाटकाबाबत ते म्हणाले होते, शिवी हा आपल्या आयुष्याचा एक भाग झालेला आहे. जेव्हा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्द अपुरे पडतात. तेव्हा आपण शिव्यांचा वापर करतो. पण ती देताना कोणालाही दुखावणे हा आपला हेतू नसतो. त्या क्षणाला आलेली ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. आज समाजापुढे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. जी माणसे अनेक गैरप्रकार करतात त्यांना यातून एक कडक भाषेत संदेश देण्यात आला आहे की हे प्रकार जर थांबले नाहीत तर सामान्य माणसाचा तुमच्यावरचा राग हा शिव्यांच्या रूपातून प्रकट होईल. आणि हाच संदेश आम्ही नाटकातून दिला आहे.

शिवी म्हणजे काय ? याचीही कारणमिमांसा अनेकांनी केली आहे. शिवी म्हणजे एखाद्या व्यक्ती, संस्था, सेवा, उत्पादन आदी विषयी अपमानजनक वापरलेला अपशब्द समुह. तो लिखीत किंवा उच्चारित असतो. अशा प्रकारे शिव्यांचे पाच प्रकारही आहे. पहिला म्हणजे, आपल्या नाते संबंधातील लैंगिक संबंधाविषयी वापरलेला अपशब्द, दुसरा प्रकार म्हणजे, शरीराच्या अवयव विशेषला केंद्रीत करुन वापरलेला अपशब्द, तिसरा, प्रकार म्हणजे, प्राणी, जनावरे यांच्या संबंधातून वापरलेला अपशब्द, चौथा प्रकार म्हणजे, जाती अथवा समाजाच्या अनुषंगाने वापरलेला अपशब्द. पाचवा व अंतिम प्रकार म्हणजे, लिंग भेदाचा वापर करुन केला जाणारा उल्लेख. याशिवाय एक उपप्रकार सुद्धा आहे. त्यात संख्या, वृक्ष, फुल आदींच्या नावाने वापरला जाणारा अपशब्द.

वरील सर्व विवेचन लक्षात घेतले तर यातील एक महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की, बदलत्या काळात आपल्या मुला मुलींना कोणत्या स्थळी आणि कोणत्या अवस्थेत अभिव्यक्त व्हावे लागेल याची आज शाश्वती नाही. मुला मुलींवर भाषेचे आणि सार्वजनिक वर्तणुकीचे उत्तम संस्कार हवेत हे प्रत्येक पालकाला वाटते. ते रास्त ही आहे. मात्र, समाजातील विविध विषयांचे कंगोरे कोणत्या प्रकारचे आव्हान कुठे निर्माण करेल याचा अंदाज घेवून आपल्या पाल्यांना किमान अपशब्दांचा वापर करायला शिकवणे किंवा तसा शब्दसाठा त्यांच्याकडे असेल याची काळजी पालकांनी घेणे ही काळाची गरज झालेली आहे. याच अनुषंगाने या विषयाचे लेखन केले आहे.

(या विषयावर इतरांनी त्यांचे मत निश्चित मांडावित. पण लेखकाला कोणताही शहाणपणा शिकवू नये)

काही सर्वसाधारण अपशब्द

नालायक, मुर्खा, बावळट, टरमळया, नरसाळया, सुरनळया, दळभद्री, दलिंदर, फुकटया, वकटया, बावळया, बुचकळ्या, पोंग्या, उड़ानटप्पू, माठ्या, ठोल्या, धटींग, अवकाळी, मंद, मठ्ठ, ढील्ला
डुक्कर, कुत्र्या, गाढव, बैल, बैलोबा, सांड, खेकड्या, डुरक्या, झिन्ग्या, बेडूक, गेंड्या

गाजर, कच्चा लिंबू, कच्च केळं

च्यायला, मायला, बायल्या, च्यामारी

जाड्या, बाचक्या, ढेरपोट्या, थेरड्या, शेळपट, मेंगळट, झिपऱ्या, टकल्या, बेशरम, बदमाश, निर्लज्ज, निलाजरा, बिनडोक, छपरी, तुसाड्या, नसान्या, बडबड्या, बधीर ,वेड्या, येड्या, येडपट, मेंटल, सर्किट, चक्रम, भेकड, घनचक्कर, फाटीचर, फाटक्या, खुळ्या, भामट्या, राक्षसा, कडमडया, दारुड्या, बेवड्या, पेताड, डाम्बिस, भवाने, डाकिन, चेटकीण

4 comments:

  1. निर्नासिका जैसा
    नावडे आरिसा

    असं आहे सर ते

    ReplyDelete
  2. दिलीपराव, अगदी वेगळा विषय आपण खूप वेगळ्या पद्धतीने हाताळला. प्रशिक्षकाचं वा लेखकाचं हेच वैशिष्ट्य ! मला आठवते एकदा पाचोऱ्याला मास कॉपी प्रकरण झाले होते आणि माझ्या एका स्तंभात कॉपीचे समर्थन करत हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडला होता. आपल्याला उमगलेला अर्थ समोरच्याला योग्य पद्धतीने सांगता आला पाहिजे आणि आपली लेखणी हे काम समर्थपणे करते. धन्यवाद !

    ReplyDelete
  3. उत्तम लेख. मला अतिशय आवडला तुमचा लेख. आणि मी पण तुमच्या मताशी सहमत आहे

    ReplyDelete