Saturday, 8 April 2017

हणमंत गायकवाड यांची यशसूत्रे

(हा लेख हा दैनिक देशदूत – खानदेश आवृत्तीच्या शब्दगंध पुरवणीत (दि. ९ एप्रिल २०१७ (पान १५ वर प्रकाशित झाला आहे)

बीव्हीजी इंडियाचे चेअरमन तथा व्यवस्थापकिय संचालक हणमंत गायकवाड यांचे दि. ७ एप्रिलला जळगाव येथे कल्पनेपलिकडचे यश या विषयावर व्याख्यान झाले. जळगावमधील कांताई सभागृह श्रोत्यांच्या गर्दीने खचाखच भरले होते. टाचणी पडेल आणि तिचा आवाज ऐकू येईल अशा शांततेत जळगावकरांनी गायकवाड यांच्या सेवा उद्योग समुहाची यशसूत्रे ऐकली. गायकवाड यांच्यासोबत प्रश्नोत्तराचा तासही रंगला. रोटरी क्लब जळगावतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने हणमंत गायकवाड यांच्या सेवा उद्योगातील यशसूत्रे समोर आली. त्याचा धावता आढावा ... 

रोटरी क्लबतर्फे दि. ७ एप्रिलला जळगावात बीव्हीजी इंडियाचे चेअरमन तथा व्यवस्थापिय संचालक हणमंत गायकवाड यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानाच्या निमित्त आणि व्याख्यानानंतर गायकवाड यांच्या सेवा उद्योगातील यशाची नऊ सूत्रे समोर आली. एक वेगळ्या अंगाने कंपनीच्या व्यवस्थापनाचे आगळे वेगळे पैलू समजले. पाश्चात्य अभ्यासक्रमावर आधारित बोर्डरुम पुस्तकातील तत्वे शिकण्यापेक्षा हणमंतराव गायकवाड यांची अनुभवाधारित यशसूत्रे यशाच्या मार्गावर धावण्यासाठी जास्त आश्वासक वाटतात.

कार्यक्रमाच्या निमित्त दोन वेळा गायकवाड यांना ऐकता आले. व्याख्यानाच्या पूर्व प्रसिद्धीसाठी विविध माध्यमातून गायकवाड यांना वाचून आणि ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारच्या प्रयत्नातून केवळ ओळख झाली. समजून घेण्यासाठी अधिक काळ द्यावा लागेल.

व्याख्यानाच्या अगोदर गायकवाड यांच्यासोबत मान्यवर संपादक तथा पत्रकारांचा संवाद झाला. एखाद्या परिचित मित्रासारख्या गप्पा गायकवाड यांनी केल्या. प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांचे अनुभव ऐकण्यात अधिक मजा होती.

हणमंत गायकवाड यांचा उद्योजक म्हणून प्रवास १९९७ ते २०१७ असा २० वर्षांचा आहे. मात्र, या काळात बीव्हीजी इंडिया गृपने घेतलेली दर्जा, गुणात्मक व विस्तारात्मक भरारी अचंबित करणारी आहे. त्यामुळे त्यांच्या यशाचे एक एक सूत्र प्रत्येक अनुभवातून ठळक होत जाते.

 सन १९९७ मध्ये गायकवाड यांनी भारत विकास प्रतिष्ठान सुरू केले. त्याची उलाढाल होती अवघी ८ कोटी रुपये. १९९९ मध्ये ती उलाढाल झाली ५६ कोटी रुपये. आज सन २०१७ मध्ये उलाढाल आहे २,००० कोटी रुपये. बीव्हीजी गृपमध्ये आज कर्मचारी आहेत ६५ हजार. सन २०२७ मध्ये बीव्हीजी गृपमध्ये कर्मचारी असतील १० लाख. तेव्हा कंपनीची उलाढाल काय असेल ? यावर अंदाज नको. पण, गायकवाड भविष्यातील व्हीजन स्पष्ट करताना म्हणतात, देशातील १३० कोटी लोकांपैकी १० कोटी लोकांच्या जीवनमानावर बीव्हीजी गृपचा प्रभाव पडलेला असेल हे नक्की.

रहिमतपूर (जि. सातारा) सारख्या खेड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे गायकवाड आज उद्योगात सर्वोच्चपदी पोहचले. त्यांचा हा प्रवास जाणून घेताना त्यांना यश कोणत्या सूत्रांमुळे मिळाले हेही लक्षात येत जाते.

मी एकटाच तसा असावा

आपल्या यशाचे पहिले सूत्र गायकवाड मांडतात. ते म्हणतात, मी जे करतो ते इतरांपेक्षा वेगळे असावे आणि लोकांच्या जास्त लाभाचे असावे याच हेतूने करतो. जे करायचे ते अगोदर स्वतः प्रात्यक्षिकाने करुन पाहतो. कामाच्या अगोदर पूर्णतः संशोधन केले जाते. त्यातून गुणात्मक आकडेवारी माझ्याकडे तयार होते. त्यामुळे इतरांच्या कामापेक्षा आमचा निष्कर्ष हा अधिक वास्तव आणि यशाची टक्केवारी वाढविणारा असतो. अशा प्रकारे काम करणारा मी एकटाच असतो. ज्या क्षेत्रात काम करायचे तेथे वेगळ्या शैलीने काम करणारा मी एकटाच असावा याची काळजी घेतो.
  
माणसांवर विश्वास आणि स्वांतत्र्य

कोणतीही सेवा अथवा उत्पादन संस्था कर्मचाऱ्यांच्या परिश्रमावर चालते. माणसे सतत लागत असतात. गरजेनुसार कौशल्ये व शिक्षण असलेली माणसे सर्वंच संस्था भरतात. पण, कर्मचाऱ्यांवर कामासाठी विश्वास किती ठेवला जातो ? किती कर्मचारी कंपनीत टीकतात ? असा प्रश्न करीत गायकवाड म्हणतात, मी माणसे घेताना त्यांची गरज, त्यांचे कौशल्ये आणि त्यांचे मूल्य याचा मी विचार करतो. या तीन गोष्टी शक्य असतील तर मी माणसे सोबत घेतो आणि त्यांच्यावर कामाच्या स्वतंत्र्याचा विश्वास टाकून काम करून घेतो. हे गायकवाड यांच्या यशाचे दुसरे सूत्र आहे.

मी ८ कर्मचाऱ्यांवर काम सुरु केले. आज ६५ हजार कर्मचारी माझ्याकडे आहेत. मी माणसे कार्यक्षम आणि परिपूर्ण कौशल्ये असलेलीच घेतो. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून काम करण्याची संधी देतो. मी आज इतके उद्योग यशस्वीपणे करतोय त्यामागील कारण म्हणजे, माझ्या सोबत सुरुवाती पासून असलेली मंडळी आजही कायम आहेत.
  
शिक्षण घेताना पडेल ते काम केले

युरोपियन देशात महाविद्यालयीन शिक्षण घेताना तेथील विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका व्यवस्थेत काम करुन शिक्षणाचा खऱ्च भागवावा लागतो. महाविद्यालये सुद्धा तशी सक्ती करतात. तेथील मुलांना शिष्यवृत्तीही अशा कामांवरच मिळते. आपल्याकडे असे होत नाही. पाल्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणावर पालक लाखो रुपये खर्च करतात. किंबहुना त्या खर्चाची त्यांना चिंता असते.
गायकवाड यांचा या संदर्भातील अनुभव बोलका आहे. ते म्हणतात, आमच्या घरात दारिद्र्य होते. मी शिक्षण घेत असताना घराला हातभार लावण्यासाठी लहान मोठी कामे करीत आलो. ही कामे करीत एक एक इयत्ता शिकलो. चौथीत असताना मला १० रुपये महिना शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीने मला आत्मविश्वास दिला. मला अभियांत्रिकी शिक्षणासाठी रोज ४० किलोमीटर सायकल पळवावी लागली. वसतीगृहात राहत असताना रोज अर्धा कच्चा भात खावून दिवस काढले. त्यानंतर मला पदवी मिळाली. या काळात मी घर रंगविण्याचे काम शिकलो. अधिक पैसे मिळावेत म्हणून घरोघरी दावून जॅम, सॉस विकला. घरे रंगवायच्या कामाने मला नफ्याचा हिशेब शिकवला. पुण्यात स्वतःचे छोटे घर बांधताना हिशेब पक्का झाला. बांधकामापेक्षा पेंटींगचे काम नफ्याचे होते. त्यानंतर मी बालेवाडीच्या परिसरात एक रस्ता तयार करण्याचे काम केले. ते तांत्रिकदृष्ट्या योग्य नव्हते. पावसात वाहून गेले. रस्ताच जागेवर नसल्याने सरकारी बिल निघत नव्हते. मग, मी तो रस्ता पुन्हा बांधून दिला. या कामाने मला तोट्याचे गणीत शिकवले.

डोळ्यांत अंजन घालणारी एक गोष्टही गायकवाड सांगतात. ती गोष्ट प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या नोकर व मालकांसाठी महत्त्वाची आहे. गायकवाड म्हणतात, पहिला रस्ता बांधताना मी कामगारांवर खुप विश्वास टाकला होता. त्यांना चांगले वागविले होते. त्यामुळे जेव्हा दुसऱ्यांदा मी रस्त्याचे काम करीत होतो तेव्हा आर्थिक अडचणीत होतो. पण, कामगारांनी दुसऱ्यावेळी माझे काम मोफत केले. कारण, मी त्यांना पहिल्यावेळी चांगले वागविल्याची त्यांना जाणिव होती. माणसांना चांगले वागवा आणि काम करुन घ्या हे गायकवाड यांच्या यशाचे तिसरे सूत्र आहे.

संधीचे सोनेच कारयला हवे

माणसाला संधी कोणत्या रुपात येते याचा अंदाज बऱ्याचवेळा येत नाही. संधी साधणे, संधी हुकणे आणि संधीचे सोने करणे असे तीन वाक्प्रचार यामुळेच तयार झाले आहेत. विविध क्षेत्रातील यशस्वी माणसे आपल्याला मिळणाऱ्या संधी हेरतात आणि त्याचे सोने करतात. संधीचे सोने करणारे फारच कमी असतात. अशा पैकी एक आहेत गायकवाड.

संधीचे सोने कसे करावे ? या प्रस्नाच्या उत्तरात यशाचे चौथे सूत्र गायकवाड सांगतात. सन १९९४ मध्ये मला इंजिनिअरिंगची पदवी (बीटेक) मिळाली. त्यानंतर टाटा मोटर्सच्या टेल्कोमध्ये त्यांना ७ हजार रुपये महिन्यांची नोकरी मिळाली. अर्थात, एवढ्या पगारात घर खर्च भागणे शक्य नव्हते. त्यामुळे इतर कामे सुरूच होती. टेल्को कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या तार पडून असल्याचे माझ्या लक्षात आले. आयुष्यात काही तरी करुन दाखविण्याची ही पहिली संधी मला होती. मित्राच्या सहकार्याने भंगारातील ती तार स्वच्छ करीत तीला पुन्हा वापरत आणले. त्यातून टेल्कोचा अडीच कोटी रुपये फायदा झाला. या संधीने मला टेल्कोत इतर कामांची संधी मिळवून दिली.

कामांचे सुरवातीचे करार भारत विकास प्रतिष्ठान नावाने केले. त्यानंतर भारत विकास गृप झाला. आता भारत विकास इंडिया हा गृप आहे.
  
कौटुंबिक पाठबळ हवेच

गायकवाड यांच्या सेवा उद्योगाच्या भरारीत कुटूंब आणि मित्र परिवाराच्या पाठिंब्याचा मोठा हिस्सा आहे. त्यांच्या यशाचा हा अंतर्गत स्थायी भाव आणि पंचसूत्र आहे. आर्थिक अडचणीच्या वेळी आई सिताबाई यांनी जमेल ती उसनवारी करुन आणि प्रसंगी दागिने गहाण ठेवून प्रगतीच्या वाटेवर चालायचे बळ दिले.
  
या विषयी गायकवाड म्हणतात, पुण्यात फुगेवाडीतील रामचंद्र गणपत फुगे यांच्या चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही राहत होतो. चार माणसे एकत्र जेवायला बसू शकत नव्हती. तेथून रोज मॉडर्न हायस्कूलमध्ये बसने प्रवास करीत होतो. बसच्या भाड्यासाठी एक रुपया नसायचा. वडील रामदास हे नेहमी आजारी असायचे. आई सिताबाई शिवणकाम करून घराचा खर्च भागवायची. नंतर आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली.  दहावीत मला ८८ टक्के गुण मिळाले. पुढे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधून इलेक्‍ट्रॉनिक्‍स शाखेचा डिप्लोमा पूर्ण केला. डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात असतानाच वडिलांचे निधन झाले. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर मला फिलिप्स कंपनीत काही काळ नोकरी मिळाली. मात्र, तेथे मन रमत नव्हते. वडीलांची इच्छा होती मी आयएएस अधिकारी व्हावे. वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पदवी असणे आवश्‍यक होते. माझे शिक्षण डिप्लोमाचे होते. पदवी घेण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजला जाणे आवश्‍यक होते. त्या अभ्याक्रमाची फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आईने बॅंकेतून १५ हजार रुपयांचे कर्ज काढले. जवळचे दागिने गहाण ठेवले. विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूटमध्ये बीटेकसाठी मी प्रवेश घेतला. आईवर किती भार टाकायचा म्हणून डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी क्‍लासेस घेण्यास सुरवात केली. तेथे स्वकमाई सुरू झाली. घरची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी मी झगडू लागलो. नवीन कल्पना लढवू लागले. याच कल्पनांनी पुढचे आयुष्य बदलून टाकले. आईच्या पुढाकाराचा आणि संकटावर मात करण्याच्या खंबीर वृत्तीचा उल्लेख वारंवार गायकवाड करतात.

 शिवराय आणि विवेकानंदांचा प्रभाव

कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळविणाऱ्या माणसांच्या कार्यशैलीवर बहुतांशवेळा राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा प्रभाव असतो. जी व्यक्तिमत्त्वे मनाला भावतात, त्यांनी दाखविलेल्या मार्गावर अनेकजण चालतात. मात्र, ज्यांच्यात सातत्य, चिकाटी, जिद्द, यासह पडेल ते परिश्रम घेण्याची तयारी असते तेच मोजके लोक यशस्वी होतात. बीव्हीजी गृपचे चेअरमन हणमंत गायकवाड यांची कहाणी याच मार्गाने जाते. त्यांच्या यशाचे हे सहावे सूत्र आहे.

गायकवाड म्हणतात, लहानपणी मी प्राचार्य शिवाजारीव भोसले यांची व्याख्याने ऐकत असे. त्यात नेहमी शिवराय आणि विवेकानंद यांचे विचार असत. मी त्या विचारांनी भारावून जात असे. आपणही त्यांच्यासारखे कार्य करु शकतो असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण व्हायचा. मी कोणतेही लहान-मोठे काम करताना ते चांगले आणि उत्तम करण्याच्या हेतूनेच करीत असे.

गायकवाड पुढे म्हणतात, मी आयुष्यात नेहमी चांगल्याचा विचार करतो. कालच्या पेक्षा आज चांगले झाले आणि उद्या आणखी चांगले होईल असा माझा विचार असतो. त्यामुळे जे काम करतो त्याची इतरांशी स्पर्धा असत नाही. आपला समाज व देश यासाठी चांगले काम करायचे एवढे ठरवून मी काम करतो. माझ्या कामातून लोकांच्या भल्याचा विचार असतो. शिवाजी महाराज आणि विवेकानंद यांनीही अशाच विचारांची पेरणी केली. त्यामुळेच मी त्यांना माझे आदर्शन मानतो.

बीव्हीजी गृपचे ब्रीदही ह्युमॅनिटी अहेड हेच आहे. समाजाचा फायदा झाल्यानंतर आपल्या लाभाचा विचार गायकवाड आणि त्यांची कंपनी नेहमी करते. गायकवाड जाहिरपणे म्हणतात, मी केवळ १५ टक्के नफ्याचाच विचार करुन काम करतो. कारण अगोदर लाकांच्या लाभा,फायद्याचा विचार महत्त्वाचा असतो.

विद्यार्थी दशेतील प्रलोभन टाळा

महाविद्यालयीन शिक्षण घेणारी आजची पीढी टेक्नोसॅव्ही झाली आहे. पण त्यांचे खर्चही वाढले आहेत. त्यामुळे महाविद्यायीन शिक्षणाचा काळ हा अनेक प्रलोभनांचा असतो. या काळात युवकांनी नकार द्यायला व नको ते नाकारायला शिकले पाहिजे. हाच विचार गायकवाड प्रभावीपणे मांडतात. या विचाराने प्रेरित त्यांच्या यशाचे सातवे सूत्र आहे.

गायकवाड म्हणतात, मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअरींगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजच अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायच ठरवि. पण महिन्याच ३०० रुपयांच भाड देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोर टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पार्ट्या करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.

गायकवाड पुढे म्हणतात, दहापैकी दोन पोर मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोर मजा पाहायची. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकड पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात.

 वडिलांना कपड्यांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी एक सूट शिवायला टाकला होता. तो शिवून यायच्या आधी त्यांचे निधन झाले. नंतर मी टेलर कडून तो आणला. पण त्या प्रसंगाने मला शिकवले, माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.
  
शांत झोप लागणे ही खरी गरज

माणसांच्या हाती पैसा आला, उद्योग व्यापार विस्तारला की त्याच्या चिंता वाढतात. ही चिंता हळूहळू झोप कमी करते. आयुष्य पोखरू लागते. माणसाचे शरीर अनेक आजार व विकारांचे आगार होते. यावर कशी मात केली याचे सोपे सुटसुटीत उत्तर आठव्या यशसूत्रात गायकवाड सांगतात. ते म्हणतात, लोकांतच्या भल्याचा व लाभाचा विचार करुन काम केले की आपोआप पैसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मी सुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाच वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी सुद्धा अनैसर्गीक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी १० मिनिटात शांत झोप लागते.

 अपमानातूनच शिकता येते ...

कोणताही उद्योग, व्यापार किंवा व्यवसाय विस्तारताना अनेक वेळा अपमान व अवहेलना सहन करावी लागते. पण अपमानातून नवे शिकण्याचा दृष्टीकोन नेहमी बाळगला तर आपली प्रगती होते असेही नववे यशसूत्र गायकवाड मांडतात. ते म्हणतात, माझी कुणी निंदा केली तरी मी ती सकारात्मक दृष्टीने स्विकारतो. कुणी अपमान केला तर समजतो की, त्याला माझे महत्त्वच समजले नाही.

गायकवाड या संगर्भातील एक उदाहरण सांगतात. ते म्हणतात, माझ्या घरापासून एकवीस किलोमीटर लांब कॉलेज होते. रोज वीस किलोमीटर सायकल चालवत मी जायचो. या प्रवासादरम्यान स्वतःला स्फूर्ती देणारी गाणी मोठमोठ्याने म्हणायचो. बाबूजींचे "यशवंत हो, जयवंत हो" हे त्यात होते.

गायकवाड पुढे मन हेलावून टाकणारा अनुभव सांगतात. ते म्हणतात, माझ्या सायकलच्या सीटचे रिबिट निसटलेले होते. काही खोडकर मुले, ते सीट काढून लांब फेकून देत. रिबिट बसविण्याचेही पैसेही माझ्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी दूर वर फेकलेले सीट मी शोधायचो, ते पुन्हा बसवायचे आणि घराकडे निघायचे. नंतर त्यावर त्यांनी नामी उपाय शोधला. गळ्यात शबनम असायची. कॉलेजात पोहोचलो की स्वतःच सीट काढून त्या शबनममध्ये टाकायचे आणि वर्गात जायचो. 

 गायकवाड पुढे सांगतात, मी जेव्हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होतो त्यावेळी राष्ट्रीय खेळांसाठी तयार होणाऱ्या बालेवाडीमध्ये मला काम मिळण्याची अपेक्षा होती. अनेक स्वप्न उराशी बाळगून मी जिल्हाधिकारी कार्यालयात जात असे. तेथे दिवसभर वाट पहात बसायचो. अपेक्षा होती की जिल्हाधिकारी बोलावतील व काम देतील. जिल्हाधिकारी यांना माहिती होते की हणमंत बाहेर बसले आहेत, वाट पहात आहेत. पण ते मला बोलावत नसत. कार्यालयातून आत-बाहेर जाताना ते पाहत पण विचारणा करीत नसत. असे अनेक  अनुभव मी घेतले पण उदास, निराश झालो नाही.
  
आता शेतीसाठी नवे प्रयोग

 सध्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळावी या विषयावर महाराष्ट्र विधी मंडळात चर्चा सुरू आहे. भारतातील औद्योगिकरण व सामुहिक सामाजिकरण याच्या मुळाशी शेतकऱ्यांचे न सुटणारे प्रश्न हे एकमेव कारण आहे. अशा स्थितीत गायकवाड हेही आता शेती व्यवहारात नवनवे प्रयोग करीत आहेत. शेतीच्या प्रश्नांवर ते आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत. आजचा शेतकरी विज्ञान व नंत्रापासून लांब आहे. तो परंपरेत अडकला आहे हे रोखठोक मत मांडताना गायकवाड म्हणतात, शेतकऱ्यांच्या मनांत ज्ञानाची आणि शेतात तंत्राची पेरणी करायला हवी. महाराष्ट्रात सरासरी शेती उत्पादन ३० टनांवर आहे. शेतकऱ्याला योग्य ज्ञान व तंत्र दिले तर अवघ्या ३ वर्षांत ६० ते ९० टनांवर शेती उत्पादन जावू शकते. वादात सापडणाऱ्या तूरडाळीचे उत्पादन ४ क्विंटल वरुन १२ ते १५ क्विंटलवर जावू शकते. शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या मुलांना शेतीचे आधुनिक शिक्षण देण्यासाठी बीव्हीजी इंडिया विविध कोर्सेस सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. याला जोडून जैविक किटकनाशके, खते तयार करण्याचा प्रयत्न गृप करीत आहे. भाकड जनावरांना पुन्हा दुभते करण्यासाठीचे त्यांचे संशोधन यशस्वी झाले आहे. याविषयी विविध प्रकारची माहिती गायकवाड देतात.

 गायकवाड यांनी शेतकऱ्यांना प्रगतीचा एक नवा मार्ग दाखविला आहे. ते म्हणतात,  तुमच्या शेत जमिनीपैकी ९० टक्के शेत जमिनीत बीव्हीजी इंडियाला भागिदारी कसायला द्या. त्यात कंपनी आधुनिक तंत्र व जैविक घटकाचा वापर करेल. यातून निघणाऱ्या उत्पन्नातील निम्मा हिस्सा हा बीव्हीजी इंडियाचा असेल.

शेती क्षेत्रात खर्च कमी करणे, पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढविणे यात गेले तीन वर्षे संशोधन करीत ते कार्यरत आहेत. वेगळ्या प्रकारची 'हर्बल' कीटकनाशके, जमिनीचा कस वाढवणारे घटक त्यांनी आणले आहेत. गाई-म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठीची उत्पादने, भाकड गाई-म्हशींसाठीची उत्पादनेही त्यांनी बनवली आहेत.

गायकवाड यांच्याशी पाऊण तास थेट चर्चा आणि नंतर दीड तासांचे त्यांचे भाषण व प्रश्नोत्तरे यातून त्यांच्या उत्तुंग यशाची काही सूत्रे शोधण्याचा प्रयत्न केला. इतरांना ती सोप्या शब्दांत सांगितली आहे. याविषयी वाचकांनी नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात अशी अपेक्षा आहे. संपादक, देशदूत, जळगाव यांना आपल्या प्रतिक्रिया कळवा.

No comments:

Post a Comment