Thursday 20 April 2017

कौटुंबिक गप्पांमध्ये लैंगिकता विषय हवा !

"समाजस्वास्थ" नाटकाच्यानिमित्त धाडसी चर्चा ...

स्त्री-पुरुषाच्या सहजीवनात घडणाऱ्या अनेक नैसर्गिक क्रियांपैकी अत्यंत महत्त्वाची आणि दोघांच्या सहमतीने दीर्घकाळ चालणारी क्रिया म्हणजे परस्परांसोबतचा प्रणय.  पटकन समजेल असा इंग्रजी शब्द म्हणजे रोमान्स. स्त्री-पुरुषामध्ये परस्परांप्रति असलेल्या आकर्षणातून मानसिक व शारीरिक अशा अनेक क्रिया घडतात. त्या नैसर्गिक असतात. संवाद, स्पर्श आणि समर्पण अशा माध्यमातून होणारी ही क्रिया भिन्न लिंग आकर्षणातून स्त्री-पुरुषाच्या लैंगिक संबंधापर्यंत जाते. दोघांच्याही सहजीवनात ही नैसर्गिक क्रिया नाकारता येत नाही आणि एकमेकांच्या सहमती, सहकार्य व समर्पणाशिवाय पूर्णही होत नाही.


स्त्री-पुरुषांचे सहजीवन आणि कुटुंबविस्तार यातील महत्त्वपूर्ण क्रियांमध्ये लैंगिक सहजीवन हे गरजेचे आहे. कुटुंबातील पती-पत्नी दोघांचे आणि त्यांचे इतरांशी लैंगिक सहजीवन हे सुध्दा परस्परावलंबी आहे. कुटुंबातील प्रत्येक घटक हा लैंगिक सहजीवनाचा मर्यादित हिस्सेदार असतो. कुटुंबाच्या एकत्रिकरणात एरव्ही कोणत्याही विषयांवर चर्चा झडत असल्या तर लैंगिक सहजीवनाविषय मोकळेपणाने फारसा संवाद होत नाही. आजही मानवी लैंगिक संबंध हा विषय चारचौघात चर्चा करण्यासाठी अस्पर्श मानला जातो.

लैंगिक सहजीवन हे स्त्री-पुरुषाच्या सोबत राहण्यापासून शरीर संबंध, काम वासना, अपत्यप्राप्ती, संतती नियमन, प्रौढावस्थेतील परस्परांच्या गरजा, वृध्दावस्थेतील शिथीलता, रजोनिवृत्ती आणि काम वासना निवृत्ती अशा अनेक क्रियांशी संबंधित असते. प्रत्येक दाम्पत्याला या क्रियांच्या अवस्थेतून जावे लागते. लैंगिक सहजीवनात बालपण, पौगंडावास्था, युवावस्था वयात येणे आणि सहजीवनासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार होणे या अवस्थाही प्रत्येक स्त्री-पुरुषाला अनुभवाव्या लागतात. लैंगिक सहजीवनाच्या क्रियांचा हा अपरिहार्य भाग असला तरी एकत्रित कुटुंबात या विषयांवर चर्चा घडत नाही.

शालेय जीवनापासून पाल्यांना लैंगिक शिक्षण द्या अशी चर्चा सरकार पातळीवर आणि सामाजिक तज्ञांच्या पातळीवर होत असते. मात्र सोप्या पद्धतीने लैंगिक शिक्षण देण्याची पद्धत अजुनतरी तयार झालेली नाही. अशा प्रकारचे शिक्षण देण्याची जागा हे पाल्यांचे घर असून पालकांसह संपूर्ण कुटूंबच त्याचे प्रशिक्षक आहेत, हा विचार समजून उमजून कृतीत आणणे आवश्यक आहे.

आज २० व्या शतकातही लैंगिक सहजीवनावर आपण कुटुंबात मोकळा व समंजस संवाद करु शकत नसलो तरी स्वातंत्र्यपूर्व काळात याच विषयावर सामाजाशी जाहिर संवाद कृरण्याचे धाडस रघुनाथ धोंडो कर्वे यांनी दाखविले होते. लैंगिकता, संततीनियमन आणि महिलांना लैंगिक संबंध नाकारण्याचा व स्वीकारण्याचा अधिकार या विषयावर रघुनाथ कर्वे यांनी अभ्यासू, परखड आणि निर्भीड मत मांडले होते. रघुनाथ यांचे विचार केवळ संततिनियमन आणि लैंगिक सहजीवन किंवा स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य या विषयांच्या मर्यादितच होते असे नाही.  समाजात स्त्री-पुरुष नातेसंबंधांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत आणि स्त्रियांच्या मानवीपणाबद्दल एक अतिशय तर्कशुद्ध अशी समानतावादी भूमिका त्यांनी सातत्याने मांडली.

रघुनाथ हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पूत्र. महर्षी कर्व्यांची प्रथम पत्नी राधाबाई ही रघुनाथ कर्व्यांची आई. त्यांचे निधन लवकर झाल्यानंतर रघुनाथ कर्व्यांच्या वाट्याला एकाकी बालपण आले. त्यांना वाचनाची, अभ्यासाची व लेखनाची सवय जडली. गणित विषयाचे विलक्षण वेड होते. तर्कशुद्ध विचार व अचूक मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

रघुनाथ यांनी गंगूबाई गोडे हिच्याशी प्रेमविवाह केला. विवाहानंतर तिचे मालतीबाई झाले. मालतीबार्इंनी आयुष्याच्या अखेरपर्यंत रघुनाथ यांच्या लैंगिक शिक्षण व कुटुंबनियोजनाच्या कार्यात संपूर्ण सहकार्य केले. या सहकार्याची पातळी कुठपर्यत होती ? तर लग्नानंतरही अपत्रप्राप्ती होवू नये म्हणून रघुनाथ यांनी स्वतः संततीनियमन शस्त्रक्रिया करुन घेतली. त्याला मालतीबाईंनी संमती दिली.

रघुनाथ यांचे गणित विषयातील पदविका शिक्षण पॅरिसला झाले. ते 1920 मध्ये भारतात परत आले. पुण्यात डेक्कन कॉलेज, अहमदाबाद कॉलेज व नंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी नोकरी केली. पॅरिसला असतानाच रघुनाथ यांनी लैंगिकतेशी संबंधित संततिनियमन व गुप्तरोग या विषयांचा अभ्यास केला.  रघुनाथ हे 1921 मध्ये भारतात परत आले. त्यांनी तेव्हा पासूनच संततिनियमनाचा जाहीरपणे प्रचार सुरु केला. "संततिनियमन", "गुप्तरोगांपासून बचाव", "आधुनिक कामशास्त्र", "त्वचेची निगा" ही पुस्तके त्यांनी लिहिली. याच विषयांशी संबंधित "समाजस्वास्थ" नावाचे मासिक 1927 मध्ये सुरू केले. या मासिकात लेखांची मांडणी अभ्यासपूर्ण व विज्ञाननिष्ठ असायची. स्त्री-पुरुषांना कामविषयक क्रिया व गरजांविषयी अज्ञान असू नये, तसे अज्ञान असेल तर त्यांचे सहजीवन निरोगी असू शकत नाही, असे ठाम रघुनाथ हे मांडत. रघुनाथ यांचा सहजीवनातील एक महत्त्वाचा मुद्दा होता. तो म्हणजे संतती जन्माच्या भीतीशिवाय स्त्री-पुरुषांना निरामय व आनंददायी कामजीवन उपभोगता यावे. याच हेतूने "समाजस्वास्थ" मासिक ते चालवत होते.

रघुनाथ यांच्या आयुष्यातील ट्वीस्ट आहे तो या ठिकाणी. १९२१ ते २७ च्या दरम्यान रघुनाथ यांचे सहजीवनाच्या लैंगिकतेवर उघड बोलणे कर्मठ, अंधश्रद्धा व पारंपरिक विचारांच्या समाजमनाला न पटणारे होते. त्यामुळे "समाजस्वास्थ्य" हे मासिक वर्ज्य राहिले. "संततिनियमन" या विषयावर लेख लिहिला म्हणून त्यांना प्राध्यापकाची नोकरी सोडावी लागली.

1921 ते 1953 पर्यंत रघुनाथ यांनी संततिनियमनाचे प्रचार व प्रसारकार्य केले. त्यांनी 1923 च्या सुमारास घरातच कुटूंब कल्याण केंद्र सुरु केले. रघुनाथ व मालतीबाई यांनी घरातच संततिनियमनाची साधने विक्री सुरु केली. आता अशा प्रकारे पारंपरिक सामाजिक विचारांशी विद्रोह करणाऱ्या रघुनाथ कर्वे यांच्यावर न्यायालयात ३ खटले दाखल झाले. यातला एक खटला होता शुक्ल यजुशाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मणसभा (पुणे) या संस्थेने दाखल केला होता.

रघुनाथ यांच्यावर दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये गंमत होती. कारण लैंगिकता हा विषय असला तरी रघुनाथ यांचे लेख अभ्यासपूर्ण आणि विज्ञानाच्या भाषेत असत. त्यामुळे कायद्याच्या कोणत्या कलमान्वये खटला दाखल करावा ही तक्रारदाराची अडचण होती. लेखात एकही "अश्लील" शब्द नसताना हे ३ खटले अश्लीलतेच्या कायद्याखाली दाखल झाले.

पहिल्या खटल्यात सरकारी वकिलांची धांदल उडाली. लेखात अश्लील शब्द दाखविण्याचे त्यांना सांगितल्यावर ते एकही शब्द दाखवू शकत नव्हते. अखेर त्यांनी "वेश्या" हा शब्द अश्लील आहे असा दावा केला. न्यायाधिशांनी तो दावा ग्राह्य मानत कृष्णलिलांचा उल्लेख चेष्टेखोर असल्याचे मत मांडत रघुनाथ यांना 100 रुपये दंड ठोठावला. दुसरा खटला समाजस्वास्थ मासिकाच्या गुजराती आवृत्तीवर झाला. यात या न्यायाधिशाने 200 रुपये दंड केला. जर हा दंड 200 रुपयेवर केला असता तर रघुनाथ हे निकालाच्या विरोधात अपील करु शकले असते. या खटल्यात रघुनाथ यांचे वकील होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी निकालाच्या विरोधात मुख्य न्यायाधिशांकडे अपील केले होते. मात्र त्यांनी निकाल फिरवायला नकार दिला. तिसऱ्या खटल्यात मात्र न्यायाधिश समंजस होते. त्यामुळे खटला दोषमुक्त झाला.

रघुनाथ धोंडो कर्वे यांचा हा प्रवास नाट्य रुपाने पाहण्याची संधी जळगावकरांना आहे. अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित "समाजस्वास्थ" हे नाटक उद्या शनिवार, दि. 22 एप्रील रोजी रात्री 8 वाजता गंधे सभागृहात सादर होत आहे. यात गिरीश कुलकर्णी आणि राजश्री वाड यांच्या रघुनाथ व मालतीबाई म्हणून भूमिका आहेत. या नाटकासाठी सन्माननिय प्रवेशिका रूपये 1000, 500 , 200 व 100 रुपये अशा आहेत. पूजा ऑप्टिकल, गोलाणी मार्केट, जळगाव येथे प्रवेशिका उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment