Thursday 6 April 2017

मोठ्या सावलीची दोन माणसे

केरळमधील नौदल प्रशिक्षण अकादमीचे प्रमुख तथा व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे यांना लष्करातील मानाचे अतिविशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते प्रदान झाले. या निमित्ताने सुनील भोकरे यांच्याशी केलेल्या कौटुंबिक गप्पांच्या आठवणी ताज्या झाल्या. दुसरीकडे, बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हणमंत गायकवाड जळगावात येत असल्यामुळे त्यांच्या विषयीच्या औत्सुक्यातून त्यांच्या सेवा उद्योगाच्या यशकथांची काही पाने सलग वाचायला मिळाली. दोन्ही व्यक्तिमत्त्वे उत्तुंग भरारी घेणारी. मात्र, कुटुंबाच्या रुणानुबंधाचा दोघांचा धागा घट्ट .
सुनील भोकरे अलिकडे जळगाव दौऱ्यावर असताना त्यांच्या नागरी सत्काराचे तीन कार्यक्रम झाले. गुढे, चाळीसगाव आणि जळगाव येथे. तीनही ठिकाणी भोकरे यांनी स्वतःच्या शिक्षणाचा प्रवास सांगत नौदलातील विविध संधींची माहिती पालकांसह युवकांना दिली. शिक्षणापासून नौदलाच्या व्हाईस ॲडमिरला पदापर्यंत पोहचण्यासाठी केलेला खडतर प्रवास त्यांनी सांगितला.

पण, मला भोकरे यांची कौटुंबिक कहाणी जास्त भावली. मनात खोलवर रुजली. त्यांचे कनिष्ट बंधू व कृषि खात्यातील अधिकारी अनिल भोकरे यांनी नाती जपत केलेला कौटुंबिक प्रवास उलडगडला. खरे तर हिच कहाणी एकत्र कुटुंबाच्या रुणानुबंधाला आणि नात्यांमधील ओलाव्यावा अधिक गडद करते.

भोकरे कुटुंबिय बेताच्या आर्थिक परिस्थितीत होते. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. सुनील आणि अनिल यांना वसतिगृहात राहून शिकावे लागले. याविषयी सुनिल भोकरे म्हणतात, आजच्या मुलांना वसतिगृहात राहणे शिक्षा वाटते. पण, आम्ही वसतिगृहात राहिलो म्हणून अभ्यास करु शकलो. कारण शिक्षण घेवून यशस्वी होण्याशिवाय पर्याय नव्हताच !

आर्थिक प्रश्न आणि एकमेकापासून लांब असल्याने अनिल यांना मोठे बंधू सुनील यांची वारंवार भेट घ्यायची ईच्छा असायची. ते सुनिल यांच्याकडे जात आणि तेथे गप्पा करीत रडत. त्यामुळे सुनिलही रडत. दोघांना रडताना पाहून इतर मुलेही रडत. हा प्रकार पाहून रेक्टरने अनिल यांना वसतीगृहात यायला मनाई केली होती.

अनिल भोकरे म्हणतात, मला भाऊंचा आधार होता. ते मला शिक्षण घ्यायला नेहमी प्रोत्साहित करीत. भाऊची आठवण राहवी म्हणून मी त्यांचे जुने कपडे घालायचो. त्यामुळे मला भाऊ सोबत असल्याचे समाधान मिळायचे. मित्र सुध्दा कपड्यांवरून भाऊंची आठवण काढत.

शिक्षणाचा मार्ग सुनील भोकरे यांनी निश्चित केला होता. सैनिकी शिक्षण घेताना समुद्री सुरक्षा क्षेत्र त्यांनी निवडले होते. त्यात पुन्हा पाणबुडी हा विषय होता. त्यासाठीच्या सर्व परिक्षा सुनील हे उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत गेले. विषय वेगळा व आव्हानात्मक असल्यामुळे त्यांना परदेशात प्रशिक्षणाच्या संधी मिळू लागल्या. ते पहिल्यांदा अॉस्ट्रेलिया येथे गेले. त्यामुळे वेतन दीडपट वाढले. याविषयी सुनील भोकरे म्हणतात, मी अॉस्ट्रेलियाला जाताना चाळीसगावच्या बँकेत माझ्या व वडीलांच्या नावे जोड खाते काढले. माझे सर्व वेतन त्या खात्यावर येत असे. वडील इतर भाऊ व बहिणींच्या शिक्षणावर, इतर गरजांवर खर्च करीत. माझ्या आयुष्यातला तो सर्वोत्तम आनंद होता. सुनील भोकरे जेव्हा हे सांगतात तेव्हा ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.

यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तिंच्या यशात कुटुंबाचे सहकार्य, परस्परांच्या प्रती प्रेम, सदिच्छा आणि पाठिंबा याच खऱ्या आशीर्वादाच्या रुपात असतात. हे सुनील भोकरे यांचे अनुभव आणि बीव्हीजी इंडिया कंपनीचे चेअरमन हणमंत गायकवाड यांची कहाणी वाचून लक्षात येते. भोकरेंच्या प्रगतीत वडील वसंतराव हे केंद्रस्थानी आहेत. तसेच गायकवाड यांच्या प्रगतीत आई सीताबाई केंद्रस्थानी आहे.

गायकवाड यांच्या शिक्षणासाठी आईने दागिने गहाण ठेवल्याचे जेव्हा ते सांगतात तेव्हा ऐकणारा भारावून जातो.

गायकवाड सहज आणि सोपे बोलतात. ऐकेका अनुभवावरुन यशाचे नवे सूत्र सांगतात. ते म्हणतात, मी सोबत कार्यक्षम माणसं घेतली आणि त्यांच्यावर विश्वास टाकून अपेक्षित काम करुन घेतले. मी ज्या लोकांना सोबत घेतले तेच आजही माझ्या सोबत आहेत. आजच्या पैकेज संस्कृतिच्या काळात अल्प काळासाठी नोकरी देणारे व करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे हे यशसूत्र आहे.

सुनील भोकरे आणि हणमंत गायकवाड यांच्या उत्तुंग यशाच्या सावलीत आजही त्यांचे कुटूंब मायेने आणि आपले पणाने उभे आहे. ज्यांच्या यशाच्या सावलीत आपली माणसं नसतात ती सावली कितीही लांब असली तरी नाते संबधाच्या मोजपट्टीत ती खुजी असते. अंधाराशी साधर्म्य दाखवणारी असते.

शिक्षिका असलेली आई प्रत्येकवेळी आर्थिक अडचणीवर मात करीत होती. त्यामुळे मी पुढे शिकलो. शिकता शिकता व्यवसाय करायला लागलो. व्यवसायातून नोकरी आणि नोकरीच्या मार्गावर सेवा उद्योगाची संधी मिळाली हे जेव्हा गायकवाड सांगतात तेव्हा ती मसाला चित्रपटाची कथा वाटते.

1 comment: