Saturday 11 March 2017

शिमगा बहाद्दरांनो सावधान !

देशातील ५ राज्यांच्या विधानसभांपैकी सर्वांत मोठी विधानसभा असलेले उत्तरप्रदेश हे राज्य भाजपने पाशवी बहुमताने जिंकले आहे. ४०३ पैकी ३२५ जागा भाजपने जिंकल्या. उत्तराखंडमध्ये ७० पैकी ५७ आणि मणिपूरमध्ये ६० पैकी २१ जागा भाजपने जिंकल्या. पंजाबमध्ये भाजपने काँग्रेसकडून सपाटून मार खाल्ला तर गोव्यात काँग्रेसला संधी आहे. एकंदर ५ पैकी ३ राज्ये भाजपने जिंकली. जो जिता वो सिकंदर. नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या खुर्च्या अजून पक्क्या झाल्या. उत्तरप्रदेशच्या निकालावर गणिते मांडणारे गपगार झाले.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे या जोडीने विरोधकांना धूळ चारली. महाराष्ट्रात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष व मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष बोटांवर मोजता येतील अशा संख्येत गेले. मासबेस अर्थातच जात, पात, धर्म याचा संख्यात्मक लाभ घेत असूनही पवार, अखिलेश व मायावतींवर ही वेळ का आली ? या प्रश्नाच्या उत्तरात निकालांचा अन्वयार्थ लपला आहे.

पवार यांचे मराठा केंद्रीत, अखिलेश यांचे यादव-ठाकूर-मुस्लिम केंद्रीत व मायावतींचे मागास तथा इतर बहुजन केंद्रीत राजकारण आहे. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. हे तिघेही नेते निवडणूक काळात उमेदवार देताना थ्री एम पाहतात. म्हणजे मास (संख्यात्मक जात/समाज), मनी (पैसा) आणि मसल (संबंधितांची दबंगगिरी). निवडणुकीत उमेदवाराचे मेरिट काय पाहिले जाते तर तो निवडून येईल का ? याचे उत्तर होकारार्थी असेल तर मग उमेदवार कशाही चारित्र्याचा असेल तरी चालतो.

भाजपने देशभरात अनेक निवडणुका जिंकल्यानंतर गुन्हेगार उमेदवारांना राजकारणात प्रतिष्ठा मिळवून दिली असे विरोधक छाती पिटून म्हणत आहेत. महाराष्ट्रात अलिकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपच्या विजयावर डाग लावणारा हा मुद्दा वारंवार मांडला गेला. पण महाराष्ट्रातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचा इतिहास हा पवार यांच्या नावे जसा लिहीला आहे तसा तो उत्तरप्रदेशात मुलायमसिंह व मायावतींच्या नावेही आहे.

महाराष्ट्रातील राजकीय इतिहास चाळला तर असे लक्षात येते की, पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर, भाई ठाकूर आदींना राजकारणात प्रतिष्ठा पवार  यांनी मिळवून दिली. म्हणजे जी मंडळी पोलीस दप्तरी गुन्हेगार आहेत त्यांना विधी मंडळात पवार यांनी आणले. एवढेच नव्हे तर पवार यांच्या सोबत असलेले काही बडे पुढारीही नंतर काही गंभीर गुन्ह्यांत अडकले. जसे पद्मसिंह पाटील व छगन भुजबळ. अखिलेश व मायावतींचेही काही कार्यकर्ते, नेते असेच आहेत. व्होरा समितीने राजकीय गुन्हेगारीकरणावर दिलेला अहवाल कधीच चर्चेला आला नाही. पवार यांचे विदेशातील गुन्हेगारांशी संबंध आहेत हा आरोप स्व. गोपीनाथ मुंडे व गो. रा. खैरनार करीत. स्व. मुंडे गृहमंत्री झाले तरी ते आरोप सिद्ध करु शकले नाही. खैरनार एकही अधिकृत पुरावा देवू शकले नाही. पण अशा आरोपांनी पवार संशयात राहिले हे नक्की. पवार विरोधात हा प्रचार बामणी कधीही नव्हता. उलट पवारांची भलावण करायला गोविंराव तळवलकर व माधवराव गडकरी यांनी लेखण्या झिजवल्या.

मुंबईतील परप्रांतीय व गुन्हेगारी प्रतिष्ठेचा इतिहासही पवार यांनीच लिहिला आहे. मुंबईचे पहिले परप्रांतीय महापौर आर. आर. सिंह झाले. ते पवारांच्या कृपेने. याच सिंह यांच्या सांगण्यावरून पवार यांनी एका गुन्हेगाराला दिल्लीहून मुंबईत आणले होते, तेव्हा पवार संरक्षणमंत्री होते. पवार यांच्या गुन्हेगारी संरक्षणाविषयी माजी पोलीस अधिकारी उल्हास जोशींनी न्यायालयात खळबळजनक प्रतिज्ञापत्रेही दिली होती. फडणवीस यांच्या व भाजपच्या विजयानंतर जी मंडळी गुन्हेगारीकरणाविषयी सोशल मीडियात पोस्ट व्हायरल करतात त्यांनी हा राजकीय गुन्हेगारी करणाचा इतिहास किमान एकदा वाचावा.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक निकाल भाजपच्या बाजूने एवढ्या संख्येत का गेले ? हाच प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. मोदींच्या कामाचे मूल्यांकन करणारे त्यांची भलावण करतात. पण मोदींना दोष लावणारे कोणत्याही कारणावरून टीका करतात. नोट बंदीचा विषय हा या दोन्ही प्रकारात मोडतो. मतपेटीचा कौल मात्र मोदींच्या बाजूने जातो. या मूल्यांकन चाचणी नंतर मोदींना दोष लावायला काय शिल्लक राहते ? जवळपास सर्वच देशात भाजपला समर्थन मिळते आहे. हे लोक समर्थन पाहून तरी विरोधक काही काळ गप्प बसतील अशी अपेक्षा आहे. हे सत्य समजून न घेता ईव्हीएमला दोष लावणारे महाभाग आता काय म्हणतील ? मोदी अंमळच वेडे म्हणायचे. गोवा व पंजाबात ईव्हीएम का लावले नाहीत ? लावले असतील तर उलटफेर कसा झाला ? खुळचट मंडळी यावर काथ्याकूट करतील.

भाजपच्या यशात सोशल मीडियाच्या प्रभावाची टक्केवारी ७६ टक्के आहे. ती कशी यावर नंतर लिहीणार आहे. पण मोदी, शहा, फडणवीस यांच्या यशात बहुसंख्यांनी त्यांच्या विरोधात सुरू केलेला विखारी प्रचार व प्रसार हे महत्वाचे कारण आहे. मोदी, फडणवीस किंवा दिल्लीत केजरीवाल विरोधातील विखारी प्रचार मतदारांनी स्वीकारला नाही. बिहारमध्ये प्रचार पातळी जास्त न घसरु देता नितीशकुमार यांनी मोदींना परास्त केले. ही सुध्दा उदाहरणे अशीच. अशा प्रकारचा विखारी प्रचार वाचूनही भाजपला मतदान करणारा आजचा सुशिक्षित आणि विवेकी तरुण वर्ग आहे. जे थे जेथे युवकांच्या मतदानाची टक्केवारी वाढली तेथे तेथे भाजपचा टक्का वाढला. तरुण वर्गाचा हा संदेश समजून घ्यायला हवा.

महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात जात व समाजाचे बहुसंख्य असण्याचे लाभ घेण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात संख्यात्मक संघटन हे रस्त्यावर आणले गेले. एक लाख लोक जोडण्यासाठी ज्या पध्दतीने विशिष्ट जात, धर्म या विषयी संदेश वहन होते आहे तेच विरोधकांच्या माघारीचे खरे कारण आहे. एक लाख जोडू पण दहा लाख तोडू, असे हे गणित आहे. सामाजिक मांडणीचा नवा प्रयोग करताना शिवछत्रपतींचे कार्य नव्याने सांगायचे पण दलितांच्या संरक्षणाच्या कायद्याला विरोध करायचा. स्वतःसाठी आरक्षण मागायचे पण बहुजन म्हणून इतर लाभही मागायचे. ओबीसींच्या हक्कावरही गदा आणायची. शिवरायांच्या इतिहासातील मुस्लिमांची भलावण करायची, बामणांची नावे शोधून टीका करायची पण जी स्वजातीय कूळे शिवरायांना त्रास देत होती त्यावर भाष्य करायचे नाही. महाराष्ट्रात आतापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यात मराठा जास्त होते. मनोहर जोशी नंतर दुसरे बामण फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, पण त्यांचा एवढा विखार केला जातोय की, बहुजनांच्या संख्यात्मक दपडशाहीचे हे उत्तम उदाहरण आहे. ही दडपशाही जात, कायदा, भाषा, अस्तित्व, सत्ता, अर्थकारण, नोकरी, सेवा अशा सर्वच क्षेत्रात केली जाते आहे. बामण वगळून इतरांनाही हे दिसते आहे. एका बहुसंख्याला जेव्हा कोंडीत पकडायचे असते तेव्हा बाराबलुतेदार मावळे गनिमीकावा करतात. हे शिवराय शिकवतात. अफजल खानाची फौज मोठी होती. राजेंचे सैन्य मूठभर होते. अफजल खान धिप्पाड होता. राजे लहान होते. तरी त्यांनी खानाचा कोथळा काढला. तंबुतल्या एका कुळकर्णीने राजेंवर हल्ला केला म्हणून त्याचा व त्याच्या समाजाचा उल्लेख कशा विखारातून होतो ? त्याच लढाईत अफजल खान कडून लढणारे शिवरायांचे चुलतेही ठार होतात हे किती दिवस लपवणार ? मोरे, शिर्के, जेधे आदी १० कुळांनी आज तरी शिवरायांना स्वीकारले आहे का ?  यावरही कधीतरी मंथन व्हायला हवे. मराठ्यांचा विकास करु नका असा दबाव मराठा मुख्यमंत्र्यांवर कोण आणत होते ? जे मराठा मुख्यमंत्री होते त्यांचा विश्वास किती मराठ्यांवर होता व त्यांचे पाय ओढणारे मराठे कोण होते ? यावरही चर्चा व्हायला हवी.

शिवरायांच्या सैन्यात व व्यवस्थेत सर्व जाती धर्मांचा समावेश होता. याचा अर्थ असा नाही की शिवराय मुस्लिम विरोधक नव्हते पण शिवरायांचे स्वराज्य मुस्लिम पातशाहांच्या विरोधात होते. शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्याचे का सूचले तर तेव्हा निजाम, औरंगजेब, अदिलशाह, कुतूबशाह यांचीच सत्ता होती. शिवराय मुस्लिम राजांच्या विरोधात होते हे नक्की. आता भारतातील मुस्लिमांमध्ये शिवरायांची सर्व समावेशक प्रतिमा ठसवायचा प्रयत्न होतो. पण हे कितपत पचणारे आहे. एक नथुरामने गांधी हत्या केली तर त्याच्या समाजाला शिव्या शाप देणारा समाज अपेक्षा अशी करतोय की, ज्या शिवरायांनी मुस्लिम सत्ताधिशांना आव्हान दिले, ज्यांचा कोथळा काढला, ज्यांची बोटे कापली त्यांचा समाज सारे काही विसरुन शिवजयंतीच्या मिरवणुकीत छाती काढून पुढे चालेल ? वामनाने बळीला पाताळात दाबले हे तुम्ही विसरू शकत नाही मग शाहिस्ते खानाची बोटे इतरांनी विसरावीत हे शक्य आहे ? परशुराम क्षत्रिय विरोधक होता हे तुम्ही भाकड कथा पोथी पुराण वाचून सांगता. ते तुम्ही विसरत नाही पण अफजलचा कोथळा शिवरायांनी काढला हे त्याच्या समाजभाईंनी विसरावे हे तुम्ही कसे गृहीत धरता ?

दलितांच्या संरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला कायदा आज तुम्हाला आक्षेपार्ह वाटतो. पण याच घटकातील लोकांशी पुण्यातील पेशव्यांसह मराठा सरदार त्यांना कसे वागत होते हे कोण विसरणार ? पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख करीत संदेश पाठवायचे पण ओबीसींच्या आरक्षणात आपली हिस्सेदारी मागायची. असे सर्व प्रकार आता इतर छोट्या संख्येतील बहुजनांच्या लक्षात येत आहेत. उत्तर प्रदेशातील निकालाने राजकारणात नवा धडा दिला आहे. तो म्हणजे बहुसंख्यांना बाजुला सारुन अल्प संख्येतील बहुजनांचे राजकारण. महाराष्ट्रात जे घडले त्याची मोठी आवृत्ती उत्तर प्रदेशात घडली.

सोप्या भाषेत काय तर, मोठ्या भावाच्या दादागिरी विरोधात इतर लहान भावांचे एकत्र येणे. ही दादागिरी संख्यात्मक होती तोपर्यंत ठिक होते. ती आता वैचारिक व अस्तित्वाला आव्हान देत असेल तर निवडणूक निकालांचे परिणाम उत्तर प्रदेशसारखेच असतील. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हेच तर अनुभवले.

होळीच्या दिवशी शिमगा बहाद्दर राजकीय हंगाम बदलाचा हा अर्थ समजून घेतील का ???

No comments:

Post a Comment