Sunday 5 March 2017

वयाच्या पलिकडचे मैत्र ... युसूफभाई मकरा

जळगाव येथील व्यापारी युसूफभाई मकरा यांच्या वाढदिवसाचा तिहेरी घोळ असतो. त्यांचा वाढदिवस दि. २० जुलैला असतो. मात्र, एका दैनिकात तो दि. २० मेस छापून येतो. जळगाव येथे अजून एक ज्युनिअर युसूफ मकरा आहेत. त्यांचा वाढदिवस दि. २ मार्चला असतो. या तिनही दिनांमुळे युसूफभाईंना वर्षभरात तीन वेळा बर्थडेच्या शुभेच्छा मिळतात. गेल्या २ मार्चला मी सुद्धा युसूफभाईंना मोबाईलवरुन शुभेच्छा दिल्या. युसूफभाईंनी अगोदर थँक्यू म्हटले आणि मग म्हणाले, आज माझा वाढदिवस नाही. मला हसू आले. त्याचे कारण मला युसूफभाईंच्या तीनही वाढदिवसांची गंमत आठवली.  

भाईंचे आजचे वय आजोबांच्या बरोबरीचे आहे. तरीही मी त्यांचा मित्र आहे. आमच्यातील मैत्री ही वयाच्या पलिकडची आणि ती किमान २० वर्षांच्या ऋणानुबंधाची. मी दैनिक सकाळला सहयोगी संपादक असल्यापासून युसूफभाई माझे पक्के मित्र. ती मैत्री आजपर्यंत कायम.

अनेक मित्रांच्या वाढदिवसाला त्यांच्या मैत्रीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्याविषयी लिहतो. ज्यांच्यावर लिहावे असे मित्र आजकाल खुप कमी राहिले आहेत. त्यात मी तिरसट पत्रकार समजला जातो. त्यामुळे मला मोजूनच मित्र आहेत. पण, जे आहेत ते व्यवसाय, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात बाप माणूस आहेत. युसूफभाई अशा मित्रांमध्ये खुपच अव्वल आहेत.

मी सकाळला सहयोगी संपादक असताना सिटीझन फोरम नावाचे व्यासपिठ चालवत असे. वृत्तपत्राने बातम्या देण्यासोबत नागरिकांना बोलते करण्यासाठी सकाळ सिटीझन फोरम स्थापन केला होता. युसूफभाई त्याचे क्रियाशील सदस्य होते. धंदापाणी सांभाळून ते नियमित बैठकांना येत. महाराष्ट्रात येवून पक्के मराठी कसे झाले पाहिजे याचे युसूफभाई उत्तम उदाहरण. युसूफभाईंचे मराठी बोलणे व ऐकणे हा एक आनंद असतो. भाई स्वतः कधीही हिंदी बोलत नाहीत. ते मराठीतच बोलतात. बांधकाम व्यवसायात असल्यामुळे अनेकांशी त्यांचा संपर्क येतो. त्या सर्वांशी ते मराठीतच बोलतात. युसूफभाईंची आणि माझी गट्टी अशी सकाळ सिटीझन फोरमपासून.

एकदा नपाने अवास्तव पाणीपट्टी व करवाढीचा निर्णय घेतला होता. तेव्हा बंडू काळे नगराध्यक्ष होते. त्यांना निवेदन देण्यासाठी शहरातील अनेक मान्यवर व्यापारी आले होते. निवेदन देताना मुख्य व्यक्ती युसूफभाई होते. एखाद्याच्या हाताला यश असते असे म्हणतात. तो अनुभव त्यावेळी आला. जळगाव नपाचे व स्थानिक व्यापाऱ्यांचे विळ्या भोपळ्याचे नाते होते. सत्ताधारी मंडळींचा जळगावातील व्यापाऱ्यांविषयी एक ग्रह आहे. तो अजुनही कायम आहे. त्यामुळे करवाढ रद्द होणार नाही असा समज असताना नपाने तेव्हा करवाढ नाकारली होती. सकाळ मार्फत निवेदन दिल्यानंतर करवाढ रद्दचा युसूफभाईंचा तो आनंद कित्तेक वर्षे होता.

त्यानंतर सकाळ, नंतर देशदूत व नंतर तरुण भारतमध्ये मी महिलांसाठी पुरस्कार योजना राबविली. त्यात युसूफभाई हे नेहमी व्यापारी व उद्योजक गटाचे परिक्षक राहिले. कधीतरी आम्ही युसूफभाईंनाच पुरस्कार द्यायला हवा होता. तो नेहमी द्यायचा राहून गेला. हातात काहीही घेवून न आलेल्या युसूफभाईंनी आज जळगावात स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. युसूफभाई कोणत्या व्यवसायात नाही ? अनेक व्यवसायात ते आहेत. युसूफभाईंचा आवडता व्यवसाय फटाका निर्मिती आणि विक्री. आजही त्यांचे नेरी (ता. जामनेर) येथे फटाका निर्मितीचे सुरक्षित युनिट आहे. बिल्डर म्हणून युसूफभाईंचे नाव आदराने घेतले जाते. या व्यवसायातील गमती जमती जेव्हा ते सांगतात तेव्हा काही मान्यवरांच्या कार्यपद्धतीची अनेक बारकाव्यांनिशी माहिती होते. जळगाव शहरातील करोडपती मंडळी कोणाच्या मध्यस्थीने कोट्यवधी रुपये देतात आणि त्याची नोंद केवळ एका साध्या कागदावर कशी असते, हे युसूफभाई सांगतात. अशा व्यवहारात मध्यस्थ म्हणून असलेली व्यक्ती एवढी मान्यवर आहे की, कोणीही त्यांच्या मध्यस्थीवर शंका घेवू शकत नाही. तरीही काहींचे व्यवहार कसे होतात, हे युसूफभाई सहज सांगून टाकतात. जळगाव बिझीनेस पार्क ही योजना युसूफभाई व त्यांच्या मित्रांची. जळगाव शहराबाहेर बिझीनेस पार्क नेण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले.

युसूफभाई आणि माझे घरगुती संबंध आहेत. जळगाहून माझी बदली झाल्यानंतर मला सहकुटुंब घरी बोलावून स्नेहभोज देणारे एकमेव मित्र युसूफभाई आहेत. मी एक गोष्ट येथे स्पष्ट करतो. पत्रकारितेच्या २६ वर्षांत मी तीन-चार जणांकडून भेट वस्तू स्वीकारल्या. त्यात एक नाव युसूफभाईंचे आहे. जळगावमधील कोणत्याही मान्यवर मंडळींकडून मी पत्रकार म्हणून काहीही स्वीकारत नाही. अगदी पत्रकार परिषदांमध्ये मिळणारे पेन किंवा पॅड मी तेथेच परत करतो. पण, युसूफभाई मकरांकडून आलेली गिफ्ट मी नाकारत नाही. दरवर्षी ते नववर्षाची डायरी व दिवाळी भेट घरपोहच पाठवतात. त्यांना माझा स्वभाव माहिती असल्याने ते ही काळजी घेतात. घरी आलेल्या माणसाला नकार देता येत नाही. युसूफभाईंसारख्या मित्रांची भेट स्वीकारण्याचे आणखी एक कारण आहे. माझी अमकी बातमी द्या अशी अपेक्षा कधीही त्यांनी धरली नाही आणि मी सुद्धा दिलेली नाही.

युसूफभाई डाऊन टू अर्थ आहेत. मी राहतो ते घर मागील बाजुला आहे. त्यामुळे एकदा तेथे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मी युसूफभाईंना म्हटले, कारागीर पाठवा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः युसूफभाई दारात हजर. हातात टेप घेवून त्यांनीच मोजमाप सुरू केले. हे सारे पाहून मी थक्क झालो. ओशाळलो सुद्धा. कारण, युसूफभाईंच्या स्वतःच्या साईटवर अशी कामे करायला पाच सात लोक असतात. पण, एक गोष्ट नक्की युसूफभाईंनी माझा प्रश्न असा सोडवला की, पुन्हा तसा विषय गेल्या १० वर्षांत समोर आला नाही. मैत्री आहे ती येथे. अधुन मधून युसूफभाई भेटत असतात. मला साहेब म्हणूनच बोलतील. मी नाही म्हटले तर तेच म्हणणार, तुम्ही आमच्यासाठी संपादकच आहात. अत्यंत मायेने विचारणा करतील, आणि शेवटचे सांगायला हवे, माणसाला मित्राच्या अडचणी न बोलता कळतात. युसूफभाईंचे दोन वाक्य नेहमी असतात. ते म्हणतात, तिवारी साहेब कधीही अडचणीत असाल तर मला सांगा. मी मदतीला आहे. बस्स हे दोन वाक्य ऐकून माझा सारा क्षीण पळून जातो. सुदैवाने जळगावात तसे व्यवहार करण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही. कारण, इतर दोन-तीन मित्र मंडळी अशाच प्रकारे न बोलता काही कामे परस्पर करुन टाकतात. माझ्या मार्गात अडथळा करणाऱ्यांना समजून देतात व धोकेही सांगतात.

काही महिन्यांपूर्वी युसूफभाई मक्का मदिना येथे होते. तेथून त्यांनी व्हॉट्सऍपवर फोटो टाकले. मी ते सर्वत्र व्हायरल केले. भाईंनी तेथून आभारासाठी फोन केला. मला म्हणाले, तिवारी साहब आपके लिए भी दुआ मांगी है. आपका भलाही होगा. ते असे बोलत असताना माझ्या डोळ्यांसमोर साक्षात माझे पिताश्री आले. माझ्या डोळ्यांत पाणी होते. तीन-चार दिवसांनी भाई जळगावला आले. दुसऱ्यादिवशी तेथील ड्रायफूड व जमजमच्या पाण्याची बाटली घेवून त्यांचा माणूस दारात हजर. अशा नातेसंबंधांचे मोल रक्तातही नसते. ते माझ्यात आणि युसूफभाईंमध्ये आहे. युसूफभाई धार्मिक आहेत. पण त्यांनी त्यांचे ते धार्मिकपण स्वतःपुरते ठेवले आहे. बोहरा समाजाची जळगाव येथे अतिसुंदर मशीद त्यांनी उभारली आहे. वेगवेगळे पैलू असलेला असा मित्र अवलियाच. युसूफभाई मोबाईल कॉलेजच्या युवकांना लाजवेल अशा सहजतेने हाताळतात. संदेश, फोटो सुद्धा सभ्यतेचे व विविध माहिती देणारे असतात.

युसूफभाई मला भावतात ते याच गोष्टीसाठी. वय आजोबांचे असले तरी युसूफभाईंना भाई म्हटल्याने बुजूर्गपणा गळून पडतो आणि सोबत राहतो तेवढा ऋणानुबंधाच्या चाफ्याचा दरवळ. युसूफभाईंचा आज वाढदिवस नाही. लेखनाचा राँग नंबर लागला आहे. पण तो मला आनंद देणारा आहे. म्हणूनच मुद्दाम शेअर सुद्धा करीत आहे ...

No comments:

Post a Comment