Friday 31 March 2017

मनिष भंगाळे हा तर “फेकर”च !

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी दूरध्वनी संभाषणाद्वारे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप करणारा कथित हॅकर (नव्हे फेकर) मनिष भंगाळेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. तशी ही कारवाई खुपच उशीरा झालेली आहे.
या प्रकरणाचे थोडे जुने तपशील लक्षात घेवू. मंगेश भंगाळे याने दावा केला होता की, 2014 ते 2015 दरम्यान त्याने हॅकिंग करुन दाऊदने पाकिस्तानातून भारतातील  कुणा-कुणाला कॉल केले, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या 10 क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे, असेही तो म्हणत होता. भंगाळेचा हा आरोप सामाजिक कार्यकर्त्या प्रिती शर्मा मेमन यांनीही उचलून धरला होता. एकिकडे खडसेंना विविध आरोपांनी घेरले असताना भंगाळेचा आरोप खडसेंची पूर्णतः अप्रतिष्ठा करणारा होता. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून सत्त्वर खुलासा मिळून खडसेंनी सर्व आरोप फेटाळले होते. तेव्हा मुंबई पोलिसांची क्लिनचीटही वादातित ठरली होती.

या प्रकरणाती तथ्य क्रमाने समजून घेतले तर मनिष भंगाळे हा हॅकर नव्हे तर फेकर असल्याचे आधीपासून जाणवत होते. ज्यांना थोडेफार संगणकिय आणि इंटनेटचे ज्ञान आहे त्यांना मनिष भंगाळेची चलाखी सहज समजत होती. आपणही त्याची चलाखी क्रमाने समजून घेवू.

पाकिस्तानस्थित कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमची पत्नी मेहजबीन शेख हिच्या नावावर असलेल्या लॅण्ड लाईन नंबर वरून महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर (वादातीत मोबाईल नंबर 9423073667)  कॉल आल्याचा दावा करणाऱ्या फेकर (हॅकर नाही) मनिष भंगाळे याची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधिशांच्या पिठाने यापूर्वीच निकाली काढली आहे. तेव्हाच मनिष भंगाळेच्या स्वतःच्या बचावाचा न्यायालयीन मार्ग आता बंद झाला होता. न्यायालयाने या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसला गुन्हा दाखल करून स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे एटीएस आता मनिष भंगाळेला सोबत (खरे तर ताब्यात) घेवून त्याने केलेल्या आरोपांचे पुरावे मागत सखोल चौकशी करीत होती. मात्र, ती चौकशी हवी तेवढी गतीही घेत नव्हती. बनावट डिजिटल पुरावे तयार करुन खडसेंवर आरोप करणाऱ्या भंगाळेचा खेळ यापूर्वीच खल्लास झालेला दिसला असता.

मनिष भंगाळे हा हॅकर का नाही हे समजून घेवू. मूळचा गुजरातचा असणाऱ्या मनिष भंगाळेने एप्रिल २०१६ पूर्वी मेहजबिन शेख हिच्या नावाचे पीटीसीएल (पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन लिमीटेड) च्या बिलांचे पुरावे देत खडसेंवर आरोप केले होते. त्याचा दावा होता की, मेहजबिन शेख ही कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमची पत्नी असून तीच्या नावाने असलेल्या लॅण्ड लाईनवरून खडसेंच्या मोबाईलवर कॉल आले आहेत. त्यामुळे या फोन कॉलची चौकशी करावी. कारण, हा देशाच्या सुरक्षेचा मामला आहे. दुसरीकडे, भंगाळेच्या आरोपांमुळे खडसेंना तातडीने खुलासा करण्याची वेळ आली होती. मुंबई पोलिसांनी खडसेंच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासून पाकिस्तानातून कॉल आलेले नाहीत असा निर्वाळा दिला होता. तो वादग्रस्त ठरला होता. मात्र नंतर विविध आरोपांच्या चौकशीसाठी खडसेंनी स्वतःच मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुंबई पोलिसांच्या एटीएस पथकाने भंगाळेकडेही कॉल प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. पण भंगाळे हा तपासात मदत करण्याऐवजी माध्यमांकडे फिरत खडसेंची बदनामी करीत होता.

दरम्यान, या प्रकरणात आपला स्वतःचा मुंबई पोलिसांच्या चौकशीपासून बचाव करण्यासाठी भंगाळेने स्वतःच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कॉल प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, स्वतःसह कुटुंबाला प्रभावशाली व्यक्तीच्या धमकावण्यापासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. कारण, मुंबई पोलिसांना अगोदरच माहित झाले होते की, तसे कोणतेही कॉल झालेले नाहीत. मात्र, भंगाळेने स्वतःवर माध्यमांचे लक्ष केंद्रीत करून दावाही केला होता की, मुंबई पोलिसांच्या एटीएसने या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल करावा आणि नंतर प्रकरणाचा तपास करावा. त्याच्या या मागण्यांची याचिका दाखल होवून सुनावणीला आल्यानंतर भंगाळेने दुसऱ्या सुनावणीत दावा केला की, त्याचे डिजिटल पुरावे गहाळ झाले आहेत, इतरांनी मेहजबीन शेखचे फेक अकाऊंट हॅक केले आहे. त्याचा हा बचावाचा पावित्रा होता.

मात्र, न्यायालयाने हे प्रकरण गंभारपणे घेतले. न्या. नरेश पाटील आणि न्या. प्रकाश पाटील यांनी मनिष भंगाळे प्रश्न विचारून त्याच्या न्यायालयीन चलाखीचा अंदाज घेतला. या संदर्भात न्यायालयाने मनिषला विचारलेल प्रश्न आणि त्याची उत्तरे बरीच बोलकी आहेत. न्यायाधिशांनी विचारले की, मेहजबीन शेख कोण आहेत ? त्यावर भंगाळेचे वकिल म्हणाले,  ती दाऊद इब्राहीमची पत्नी आहे. न्यायाधिशांनी विचारले, ते तुम्ही कसे सिद्ध करणार ? त्यावर भंगाळेचे वकिल म्हणाले, पीटीसीएल कडून मिळालेल्या बिलावरुन. न्यायाधिशांनी विचारले, फोनवर कोणी कॉल केल्यामुळे गुन्हा होवू शकतो ? त्यावर भंगाळेचे वकिल म्हणाले, काय बोलणे झाले हे तापासावे, मुंबई गुन्हा शाखेने भंगाळेची पाच तास चौकशी केली आहे पण गुन्हा दाखल केला नाही. दाऊदच्या घरून आलेले कॉल हे राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असू शकतात. म्हणून चौकशी व्हावी.

न्यायाधिशांनी भंगाळेला विचारले की, पुरावा म्हणून टेलेफोनची बिले कोठून आणली ? त्यावर भंगाळेच्या वकिलांनी सांगितले की, भंगाळे हा हॅकर असून त्याने मेहजबीन शेखच्या नावाने बनावट (फेक) मेल अड्रेस तयार करून पीटीसीएलकडून ही बिले मिळविली आहेत. याच्या मागचा अर्थ असाच आहे की, भंगाळेने मेहजबीनच्या नावाने फेक (बनावट अकाऊंट तयार करुन) बिले मिळविल्या दावा केला आहे. पण ती बिले खरोखर पीटीसीएलची आहेत का ?  हे सिद्ध करायचे असेल तर तो आता म्हणतो की, ते फेक अकाऊंट हॅक झाले.

दरम्यान, भंगाळेची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढावी म्हणून दिलीप प्रभाकर सोनिल (रा. ठाणे) यांनी तटस्थ याचिकाकर्ते म्हणून याचिका दाखल केली होती. त्यांनीही भंगाळेच्या दाव्यावर व भूमिकेवक हरकत नोंदली होती. या काळात भंगाळेच्या याचिकेची सुनावणी करताना न्यायालयाच्या लक्षात आले की, भंगाळेने केलेल्या मागण्यांमध्ये तथ्य नाही. त्यामुळे न्यायाधिशांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून एटीएसला चौकशीचे आदेश दिले. मात्र, हा निर्णय देताना भंगाळेची याचिका निकाली काढली होती. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात चौकशी करताना आता भंगाळेला हात लावता येणार होता. त्याच्याकडूनच बरीचशी माहिती उगाळून घेता येणार होती. प्रकरण चौकशीसाठी उच्च न्यायालयात आहे, असा बचावही आता भंगाळेला करता येणार नव्हता. म्हणजेच, भंगाळेचा खेळ खल्लास होताना दिसत होता. भंगाळेच्या तेव्हा सोबत असलेल्या आम आदमी पार्टीच्या मुंबईतील नेत्या प्रिती मेमन शर्मा यांची अडचण होणार असे दिसते होते. पण तसे झाले नाही. यात जवळपास ४ महिने गेले.

दरम्यान काल, खडसे यांचे समर्थक रवींद्र बऱ्हाटे (रा. पुणे) यांनी मनिष भंगाळेच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आयटी शाखेकडे तक्रार दाखल करुन मनिष भंगाळेने तयार केलेल्या बनावट डिजिटल पुराव्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार गुन्हा दाखल होवून आता मनिष भंगाळेला अटकही झाली आहे. मनिष भंगाळेने बनावट डिजिटल पुराव्यांसाठी ज्यांची मदत घेतली अशा ७ ते ८ जणांची नावे समोर येण्याची शक्यता असून त्यात जळगाव जिल्हा काँग्रेसचे दिवंगत जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील खून प्रकरणातील प्राथमिक संशयिताचे नावही असण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment