Tuesday 28 March 2017

व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरेंच्या शौर्याची पाण्याखालील कहाणी

भारतीय नौदल अकादमीचे चीफ कमान्डन्ट तथा खान्देशचे सुपूत्र व्हाइस अॅडमिरल सुनील भोकरे यांचा उद्या बुधवार (दि.२९ मार्च) रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहरातील कांताई सभागृहात नागरी सत्कार उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव येथील गौरव समितीने केले आहे.  

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे सीईओ अस्तिक कुमार पांडेय, एन. सी. सी. कमांडर कर्नल दिलीप पांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, माजी कुलगुरू प्रा. डॉ. के. बी. पाटील, आमदार सुरेश भोळे व महापौर नितीन लढ्ढा उपस्थित राहणार आहेत. गौरव समितीचे निमंत्रक जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन आहेत.
भोकरे हे मूळचे गुढे (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील रहिवासी तथा कृषी सहाय्यक वसंतराव शंकर भोकरे यांचे सुपुत्र आहेत.

 गतवर्षी (सन २०१६) विशाखापट्टणम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनात महत्त्वाची कामगिरी यय़स्वीपणे पार पाडल्यानंतर भोकरे यांची केरळमधील एझिमला येथील भारतीय नौदल अकादमीच्या प्रमुखपदी निवड झाली.

भोकरे यांचा नौदलातील सेवेचा प्रवास हा एखाद्या चित्रपटातील थरारक कहाणी सारखा आहे. त्यात सैनिकी शिक्षणाची जिद्द, प्रशिक्षणासाठी खडतर परिश्रम, सैनिकी शिक्षणातील अगदीच वेगळा पर्याय (पाणबुडीत काम करणे) स्वीकारणे, शांतपणे जबाबदारी पार पाडणे, उत्कृष्ट टीमवर्क आदी बाबींचा समावेश होतो.

भोकरे यांना लहानपणापासूनच नौदलात जाण्याची इच्छा होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुढे येथे झाले. पाचवी ते बारावीपर्यंत सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पुढील शिक्षण घेतले. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज तसेच इंदूरजवळच्या महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलिया डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी मास्टर्स पदवी घेतली आहे. त्यांनी नौदलात पाणबुडी विभागातील तज्ज्ञ म्हणून जबाबदारी पार पाडली. आयएनएस सिंधुघोष, सिंधुध्वज व सिंधुशस्त्र या पाणबुड्यांचे तसेच आयएनएस बियास या फ्रिगेटचे सारथ्य त्यांनी केले आहे. आयएनएस वज्रबाहू या पाणबुडी तळाचे ते प्रमुख होते. नौदलाच्या पश्चिम तळावरील पाणबुडी विभागाचे कमोडोर म्हणून तसेच पूर्व कमांडचे मुख्य स्टाफ ऑफिसर म्हणून त्यांनी जबाबदारी भूषविली. त्यानंतर रिअर अॅडमिरलपदी त्यांना बढती मिळाली. पाणबुडी विभागाचे ते ध्वजाधिकारी बनले. नंतर वर्षभर पूर्व विभागाच्या संपूर्ण युध्दनौका ताफ्याचे ध्वजाधिकारी म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. ३३ वर्षांच्या सेवाकाळात त्यांना युध्दसेवा पदक व नौसेना पदकाने गौरविण्यात आले आहे. नौदल अकादमीच्या प्रमुखपदी आलेले पाणबुडी विभागाचे ते पहिलेच अधिकारी आहेत.

 भोकरे यांना सन १९९९ मध्ये नौसेना मेडल व २००४ मध्ये सैन्य दलाचे युद्ध सेवा मेडल मिळाले आहे. सन १९९९ चे कारगिल युद्ध प्रत्येक भारतीयाला माहित आहे. या कारगिल युद्धात भारतीय नौदलाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, सुरक्षेच्या हेतूने त्याचा तपशील फारसा चर्चेत येत नाही.

मात्र, भोकरे यांचा जळगाव येथे नागरी सत्कार करीत असताना कारगिल युद्धात नौसेनेची व भोकरे यांच्या पाणबुडीचा सहभाग माहित असणे आवश्यक आहे. कारगिलसह बटालीक व इतर क्षेत्रात पाकिस्तानच्या घुसखोर व छुप्या सैन्यदलाशी भारतीय सेना आणि वायुसेना मिळून लढाई करीत होती. पाकिस्तानचे घुसखोर व छुपे सैन्यदल हे डोंगरी भागात वरच्या बाजुला भारतीय सैन्यावर लपून गोळीबार करीत होते. त्यामुळे खालच्या बाजुने वर जाणाऱ्या सैन्यदलाच्या जानमालाचे मोठे नुकसान होत होते. भारतीय वायुदलाने सैन्यदलास वरच्या बाजूने संरक्षण देण्यास सुरू केल्यानंतरही घुसखोरांचा व पाकिस्तानच्या छुप्या सैन्याचा प्रतिकार कमी होत नव्हता. कारण, त्यांना पाकिस्तानातून इंधन (पेट्रोल व डिझेल) पुरवठा नियमित सुरू होता.

भारतीय सैन्यदल प्रमुखांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर पाकिस्तानला समुद्री मार्गे होणारा इंधन पुरवठा रोखून कराची बंदराला ठप्प करण्याची योजना भारतीय नौदलावर सोपविण्यात आली. याला नौदलाने नाव दिले होते ऑपरेशन तलवार. समुद्री मार्गातून बहुतांश देशांचे इंधन इंडीयन ओशनमधून होते. त्यामुळे भारताने समुद्रात नाकेबंदी केली की जवळपास ९० टक्के जहाजांचे आवागमन थांबते. याचाच विचार अॉपरेशन तलवारमध्ये केलेला होता.

भारतीय नौदलाच्या पूर्व आणि पश्चिम शाखांनी एकत्र येवून दक्षिण अरबी समुद्रात आपली सुरक्षा वाढवून पेट्रोलिंग सुरू केले. त्यामुळे आखाती देशातून पाकिस्तानला होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला. एवढेच नव्हे तर उद्योग, व्यापाराशी संबंधित वाहतूकही थांबली. हा प्रकार होता नाक दाबले की तोंड उघडणारा. कराची बंदराजवळ भारताने नौदल कारवाई सुरू केल्यानंतर पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ काकुळतीला येवून म्हणाले, पाकिस्तानात केवळ ६ दिवस पुरेल एवढाच इंधनसाठा उरला आहे. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानातील नागरी जनजीवन इंधनाच्या अभावी अडचणीत येण्यास सुरुवात झाले. अशा स्थितीत डोंगर दऱ्यातील घुसखोर व छुप्या सैन्यदलास इंधन पाठविणे पाकिस्तान सरकारला अडचणीचे ठरत होते. नागरिकांना इंधनासाठी ताटकळत ठेवून घुसखोरांना इंधन देण्याच्या भूमिकेवर पाकिस्तानी माध्यमेही टीका करीत होती. अशा अतीतटीच्या काळात पाकिस्तानने घुसखोरांचा इंधन पुरवठा बंद केला. त्यानंतर घुसखोरांसह छुप्या सैन्य दलाची माघर सुरू झाली.

आता भारतीय नौदलाने कराची बंदराजवळ काय केले होते तेही समजून घेवू या. कराची बंदराच्या परिसरात भारताच्या ३० विमानवाहू नौका तैनात होत्या. सैनिकी नावा आणि हेलिकॉप्टर सतत गस्त घालत होते. नौसेनेच्या जहाजांचे कराची बंदरापासूनचे अंतर होते अवघे १३ नॉटीकल मैल (म्हणजे २४ किलोमीटर). अर्थात, अशा प्रकारे नौदलाच्या जहाजांची जमवाजमव करुन भारताने युद्धाच्या तयारीचे प्रदर्शन केले होते. पाकिस्तानने कराची बंदर रिकामे करुन दुसरीकडे शिफ्ट केले होते. भारताकडून युद्धाच्या तयारीचा चर्चा आंतराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली होती. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी आम्ही अण्वस्त्रे वापरू अशी पोकळ धमकीही दिली होती. मात्र, अमेरिका व चीन यांनीही पाकिस्तानवर दबाव वाढवला.

अरबी समुद्रात एवढी मोठी युद्ध सिद्धता करताना याच परिसरात सिंधुघोष ही पाणबुडीही आपले काम करीत होती. या पाणबुडीचे कमांडिंग ऑफीसर भोकरे होते. संपूर्ण पाणबुडी त्यांच्या नियंत्रणात होती. पाणबुडीचा किंमत होती एक हजार कोटी रुपये. त्यावर अधिकारी होते २५ आणि जवान होते. भारताने कराची जवळ उभ्या केलेल्या नौदलाच्या जहाजांना पाण्याखालून संरक्षण देण्याचे काम या पाणबुडीचे होते. कारगिल युध्दाच्या काळात जवळपास ४२ दिवस सिंधुघोष ही पाणबुडी सागराच्या तळाशी होती. प्रत्येक जहाच्या तळाशी निरीक्षण करीत त्या भागात होणाऱ्या हालचाली ही पाणबुडी टीपत होती. मात्र, इंधन व इतर साहित्याचा पुरवठाच बंद झाल्यामुळे पाकिस्तान सरकारने कारगिल मधून घुसखोर व छुप्या सैनिकांचा गाशा गुंडाळायला सुरवात केली. आंतरराष्ट्रीय दबावही होताच. अशा प्रकारे भोकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारगिल युध्दात पाण्याखालची भूमिका पार पाडली.

खान्देशच्या या सुपूत्राचा सन्मान उद्या बुधवारी (दि. २९) जळगावात होत आहे. या सोहळ्यास जळगावकरांनी न चुकता हजेरी लावलीच पाहिजे. समुद्राच्या लाटांवर आणि गर्भस्थळी वर्चस्व गाजवणाऱ्या अॅडमिरल सुनील भोकरेंचा नागरी सत्कार हा लक्षात राहणाराच झाला पाहिजे.

No comments:

Post a Comment