Monday 27 March 2017

जिंदा दिल मित्र डॉ. राजेश पाटील ...

गुढीपाडवा आज पहाटे पहाटे चांगली बातमी घेवून आला. एका मित्राने रात्री उशीरा मेसेज टाकलेला होता. "आयएमए" च्या सचिवपदी विश्वप्रभा हॉस्पिटलचे डॉ. राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बातमी वाचून आनंद झाला. डॉक्टरांच्या संदर्भात सध्या आव्हानात्मक वातावरण असताना जळगाव आयएमएच्या सचिवपदी डॉ. राजेश यांनी निवड होणे यात निश्चित चांगला योग आहे. नव्या कार्याची गुढी उभारण्याची संधी डॉ. राजेश यांना मिळाली आहे. याबद्दल नक्कीच त्यांचे तोंडभरून कौतुक आणि तमाम डॉक्टर व रुग्णांसाठीही काही वेगळे कार्य घडावे यासाठी शुभेच्छा !!

डॉ. राजेश माझ्या ठराविक मित्र परिवारातील एक "जिंदा दिल" माणूस. दिल म्हणजे हृदय प्रत्येकाला असते. ते नैसर्गिकरित्या धडधडते. त्याची धडधड माणसाला जिवंत ठेवते. पण दिल सुध्दा "जिंदा" असले पाहिजे. म्हणजेच हृदय सुद्धा सजग असले पाहिजे. नैसर्गिकपणे हृदय धडधडणारा माणूस केवळ जिवंत असतो. "जिंदा दिल" असणारा माणूस "हरहुन्नरी" असतो. डॉ. राजेश या दुसऱ्या प्रकारातील आहे.

माणूस कुटुंबात सुखी असला की तो "आत्मकेंद्री" होतो. कुटुंबासोबत मित्र परिवारात सुखी असला की तो "बहुकेंद्री" होतो. समाजात सुखी असला की तो "समाज केंद्री" होतो. डॉ. राजेश तीनही प्रकारात सुखी असलेला माणूस. खासगी वैद्यकिय सेवा देताना वडीलांनी दिलेले आदर्श आजही डॉ. राजेश पाळतात. रोटरी सारख्या संघटनसोबत काम करताना नवनवे विषय घेवून डॉ. राजेश उपक्रम राबवतात. यात जिल्हा रुग्णालयात शिशुंसाठी तयार केलेले रोटरी निओ केअर सेंटर, अमरधामजवळ तयार केलेला विसावा, अगदी अलिकडे गरजुंना कृत्रिम हात लावण्याचा मोठा प्रकल्प, जिल्हा पत्रकार संघासोबत महिलांचा सन्मान यासह अनेक प्रकल्प डॉ. राजेश यांनी राबविले. आज ते रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे उपप्रांतपाल आहेत. बहुधा प्रांतपालही होतील.

डॉ. राजेश सामाजिक संघटनमध्येही आहेत. जळगावमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघावा यासाठी त्यांनी मित्रमंडळीत प्रयत्न केले. मोर्चा नंतर समाज संघटनचा उपयोग मराठा मंगल या उपक्रमासाठी केला. समाजातील जवळपास १७०० उपवर मुली मुलांची माहिती मोफत पुस्तिकेत संकलित केली. भर उन्हाळ्यात गरोदर महिलांना लग्न कार्यात आणून महिलेची व पोटातील बाळाची आबाळ करु नका हे जाहीरपणे सांगण्याचे धारिष्ट्य डॉ. राजेश यांच्यात आहे.

सांस्कृतिक क्षेत्रातही डॉ. राजेश यांचा सहभाग आहे. किशोर कुमारच्या आवाजातील गाणी ते गातात. जळगावात डॉक्टर मंडळींचा अॉर्केस्ट्रा आहे.

डॉ. राजेश खासगी वैद्यकीय सेवेतील अडचणींवरही सातत्याने प्रकाश टाकतात व प्रसंगी संघर्ष करतात. सोनोग्राफीतील कागदोपत्रीचा त्रास, समितीच्या अनावश्यक चौकशा, डॉक्टरांना पोलिस चौकशींचा होणारा त्रास, रुग्णाच्या नातेवाईकांचा गोंधळ, प्रसिध्दी माध्यमातील व राजकीय संघटनवाल्यांचा त्रास,  डॉक्टरांवरील हल्ले, हॉस्पिटलसाठी कर आकारणी अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रत्येकवेळी उघड भूमिका घेतली आहे. आताही आयएमए सचिवपदाची जबाबदारी डॉ. राजेश स्वीकारत असताना डॉक्टरांवरील हल्ल्यामुळे वातावरण सरकारी पातळीवर उदासिन व सामाजिक पातळीवर दुर्लक्षित आहे. अशा वातावरणात काम करण्याची चांगली संधी डॉ. राजेश यांना आहे. आयएमए सोबत इतर समाज घटकांना जोडून डॉक्टरांविषयी आपलेपणा निर्माण करण्याचे आव्हान डॉ. राजेश यांच्या समोर आहे. डॉ. राजेश यांची या पदावरील कारकिर्दही लक्षवेधु असेल या विषयी मनांत शंका नाही.

डॉ. राजेश यांच्या व्यक्तिमत्वाला चपखल बसणारी एक कविता ...

किसी को तकलीफ देना मेरी आदत नही,
बिन बुलाया मेहमान बनना मेरी आदत नही...!
मैं अपने गम में रहता हूँ नबाबों की तरह,
परायी खुशियो के पास जाना मेरी आदत नही...!
सबको हँसता ही देखना चाहता हूँ मै,
किसी को धोखे से भी रुलाना मेरी आदत नही...!
बांटना चाहता हूँ तो बस प्यार और मोहब्बत,
यूँ नफरत फैलाना मेरी आदत नही...!
जिंदगी मिट जाये किसी की खातिर गम नही,
कोई बद्दुआ दे मरने की यूँ जीना मेरी आदत नही...!
सबसे दोस्त की हैसियत से बोल लेता हूँ,
किसी का दिल दुखा दूँ मेरी आदत नही...!
दोस्ती होती है दिलों से चाहने पर,
जबरदस्ती दोस्ती करना मेरी आदत नही..!
नाम छोटा है मगर दिल
बडा रखता हूँ.
पैसो से उतना अमीर नही हूँ.
मगर अपने यारो के गम खरिद ने
की हैसयत रखता हूँ.

No comments:

Post a Comment