Friday 3 March 2017

महामार्ग चौपदरीकरणासाठी मुंबईत ८ मार्चला बैठक

गेल्या ३ वर्षांत खासदार रक्षा खडसेंकडून सतत पाठपुरावा

एकनाथराव खडसे यांची सोशल मीडिया सोल्युशन ला खास मुलाखत

जळगाव शहरातून जाणाऱ्या आणि प्रस्तावित वळण महामार्गाच्या संदर्भात मी स्वतः पाचवर्षांपासून आणि खासदार रक्षा खडसे या गेल्या ३ वर्षांपासून केंद्रीय मंत्रालयात पाठपुरावा करीत आहोत. आतापर्यंत या विषयावर दिल्लीत किमान ७ ते ८ बैठका झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ४ वेळा चर्चा झाली. जे प्रस्ताव होते ते मंजूर होवून त्याचे आराखडे तयार झाले. आता टेंडरिंग प्रोसेसही मार्गी लागली आहे. महामार्गाचा ४५० कोटींचा विकास आराखडा तयार झालेला आहे. आता हा आराखडा लोकांच्या समोर आणून त्यावर सूचना घ्याव्या लागतील. याचाच पुढचा भाग म्हणून दि. ८ मार्चला मुंबईत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे, अशी माहिती माजीमंत्री तथा या कामासाठी सतत पाठपुरावा करणारे एकनाथराव खडसे यांनी सोशल मीडिया सोल्युशन ला दिली.

जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग ठरू शकेल अशा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाचा पाठपुरावा स्वतः खडसे व खासदार रक्षा खडसे हे सातत्याने करीत आहेत. अलिकडे जळगाव शहरात समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभे राहिले असून समांतर रस्ता कृती समितीही स्थापन झाली आहे. या विषयाच्या संदर्भात बारकाव्याने माहिती लोकप्रतिनिधी म्हणून केवळ एकनाथराव खडसे आणि खासदार खडसे यांना आहे. मात्र, निवडणूक आचार संहितेच्या काळात या दोघांकडून कोणताही खुलासा आला नाही. हाच धागा पकडून खडसे यांच्याशी महामार्ग चौपदरीकरण संदर्भात चर्चा केली असता खडसे यांनी या विषयाचे अनेक पैलू उलगडून दाखविले.

खडसे म्हणाले, जळगाव शहरातील आहे त्या महामार्गावर उड्डाण पुलाचे काम, भुयारी मार्ग आणि समांतर रस्ते तयार करणे यासोबत प्रस्तावित वळण महामार्ग तयार करणे हे साधे काम नाही. विकास कामे मंजूर करुन घेताना त्यात अनेक प्रकारच्या अडचणी असतात. कायद्याच्या किचकट अडचणी असतात. एक एक गोष्ट पूर्ण करीत विकास कामे उभी राहतात. जळगाव लगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ साठी केवळ वळण महामार्ग तयार करण्याचे हे प्रकरण नाही, हे अगोदर लक्षात घ्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या इतिहासात प्रथमच एका शहरातील महामार्ग आणि वळण महामार्ग ही दोन्हीही कामे होत आहेत. असे उदाहरण कुठेही नाही. केंद्र सरकार दोन्ही कामांवर पैसा खर्च करीत आहे. वास्तविक एक काम मंजूर केले तर दुसऱे करण्याची गरज नाही. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि खासदार रक्षा खडसे यांनी सतत केलेला पाठपुरावा याचा परिणाम म्हणून ही दोन्ही कामे होणार आहेत. अशा कामांचे आराखडे तयार करणे, पुरेशी तरतुद उपलब्ध करणे याला वेळ लागतोच. तोच वेळ सध्या घेतला गेला आहे. आता महामार्गाचे विषय टेंडरिंगच्या प्रक्रियेत पोहचले आहेत. त्यामुळे गडकरींनी घोषणा केली आणि नंतर काय झाले असे म्हणणे अज्ञानीपणाचे आहे.

खडसे पुढे म्हणाले, या कामातील काही वैशिष्ट्ये सुद्धा लक्षात घ्यायला हवीत. महामार्ग चौपदरीकरण दोन टप्प्यात होईल. एक काम चिखली ते तरसोद दरम्यानचे आहे आणि दुसरे तरसोद ते फागणे दरम्यानचे आहे. पहिल्या कामाची निविदा मंजूर झाली असून ९४८ कोटींचे काम मेसर्स विश्वराज अन्वायरमेंटल प्रा. लि. यांना दिले आहे. त्यांच्याशी करारनामा लवकर होईल. दुसऱ्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून त्यावर ९४० कोटी रुपये खर्च होतील. हे कामही मेसर्स एमबीएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ला दिले आहे. या दुसऱ्या कामात जळगाव शहरातून जाणाऱ्या १८ किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण, उड्डाण पूल, भुसारी मार्ग व समांतर रस्ते होणार आहेत. ही दोन्ही कामे अवाढव्य आहेत. त्यात अनेक आराखडे आहेत. याविषयीची प्रक्रिया पूर्ण करायला वेळ देणे आवश्यक होते व आहे.

खडसे यांनी स्पष्ट केले की, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे, शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काँक्रिटीकरण होणार आहे. म्हणजेच जो रस्ता तयार होईल तो लवकर खराब होणार नाही. अशा प्रकारचे काम खर्चिक असते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, वळण महामार्गाचे जळगाव ते भुसावळ हे काम सहापदरी होणार आहे. याचे कारण जळगाव ते भुसावळ दरम्यान जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची रोजची संख्या हजारांच्या घरात आहे. जेव्हा केंद्र सरकार एकाच शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्चाची योजना तयार करते तेव्हा त्याला लागणारी कागदोपत्री व आराखड्यांची तयारी करायला सुद्धा वेळ जातो. तोच वेळ सध्या लागतो आहे. गेल्या तीन वर्षांत मी स्वतः आणि खासदार रक्षा खडसे जेव्हा जेव्हा दिल्लीत गेलो, तेव्हा तेव्हा या विषयाचा पाठपुरावा केला आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर कोणत्याही लोकप्रतिनिधीला या कामातील बारकावे किंवा तांत्रित तपशील माहिती नाहीत.

खडसे यांनी माहिती दिली की, येत्या ८ मार्चला मुंबईत खासदार रक्षा खडसे यांच्या पुढाकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. तीत अनेक विषयांचा निर्णय होण्याविषयी चर्चा होईल. समांतर रस्ते कृती समितीशी मी स्वतः चर्चा करणार आहे. प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या धुळे येथील अधिकाऱ्यांना बोलावून प्रस्तावित महामार्गाचा विकास आराखडा जनतेसमोर सादर केला जाईल. माझे तसे बोलणे झाले आहे.

खडसे यांनी या विषयावरील अनेक तांत्रिक बारकावे सांगितले. ते म्हणाले, महामार्गालगतचे समांतर रस्ते करण्यासंदर्भात जळगाव महानगर पालिकेने खरा घोळ घातला. मनपाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन आम्ही हे काम करु असे न्यायालयास सांगितले. त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने संमती दिली. नंतर पुन्हा मनपाने शब्द फिरवला. पण एखाद्या विकास कामांची पत्रापत्री सुरू झाली की, त्याचा दोष कामे मंजूर करुन आणणाऱ्यांना कसा लागू शकतो ? महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दोन्ही प्रस्ताव मी व खासदार खडसे मंजूर करुन आणत असताना मनपानेही जमीनीच्या हस्तांतरणाचा प्रश्न निर्माण केला. मनपाने सन २०१२ पासून या विषयात पत्रापत्रीने अनेक घोळ केले. न्यायालयातही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच पुढे जाता येते. अशा वेळकाढू प्रकरणांचा विकास कामांवर परिणाम होतो याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. कोणतेही विकास काम नियोजन करुनच होते. ज्यांना प्रकिया माहिती आहे ते त्यातील वेळ का गेला हे समजून घेतात. इतरांना केवळ आरोप करणे जमते. ते फक्त हवेत गोष्टी करतात.


जळगावातून जाणाऱ्या महामार्ग संदर्भात खडसे यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, हे काम संमिश्र प्रकारचे आहे. काही ठिकाणी पूल, काही ठिकाणी भुसारी मार्ग आहेत. त्यानुसार गिरणा नदीवर दोन पुलांचे काम होईल. १६ ठिकाणी भुसारी मार्ग किंवा स्वतंत्र मार्ग होतील. कालिंका माता मंदिराजवळ उड्डाणपूल होईल. याविषयीचा विकास आराखडा तयार आहे. त्याचे सादरीकरण महामार्ग विकास प्राधिकरणला लवकरच करायला सांगणार आहे. यात समांतर रस्ते कृती समितीलाही सहभागी करुन घेणार आहे.

No comments:

Post a Comment