Friday 3 February 2017

राष्ट्रप्रेमाची तीन टोके ...

अमेरिकेतील नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रैम्प हे बहुमत घेवून विजयी झाले आहेत. त्यांच्यावर परंपरावादी, अति राष्ट्रवादी आणि रुढीवादी असल्याचा ठपका आहे. ट्रैम्प यांचा विजय विरोधी पार्टीचे सरकार बदलणारा आहे. ट्रैम्प सरकारचा मुखवटा कर्मठ समजला जातो आहे. भारतात सध्या केंद्रातील सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारवरही अशाच प्रकारचा ठपका आहे. मोदी सुध्दा सुस्पष्ट बहुमत घेवून सत्तेत आले आहेत. मोदींनीही सत्ता परिवर्तन करताना विरोधी पार्टी व मित्रपक्षांना सत्तेतून हद्दपार केले आहे. मोदी सरकाराचा चेहरा प्रतिगामी, रुढीवादी आणि धर्मवादी म्हणून रंगवला जातो. या ठिकाणी धर्मवाद हा हिंदूराष्ट्रवादाशी जोडलेला आहे.

डोनाल्ड ट्रैम्प सत्तेत आल्यावर म्हणाले अमेरिका फर्स्ट. मोदी म्हणतात, मेक ईन इंडियाला प्राधान्य. मोदी भारतीय अर्थ व्यवस्थेला हादरा देणारा नोटबंदीचा निर्णय रात्रीतून जाहीर करतात. डोनाल्ड ट्रैम्प हे अमेरिकेतील नागरी जीवन हादरवणाऱ्या व्हिसा किंवा अमेरिकेत प्रवेशाच्या निर्णयावर रात्रीतून सह्या करतात. मोदी व ट्रैम्प यांच्यात अनेक साम्यस्थळे आहेत.

मोदी हे पंतप्रधानपदापर्यंत पोहचू शकणार नाहीत असा दावा भारतीय राजकारणातील बुजूर्ग करीत. मोदींवर खुप आरोप होते. पारंपरिक माध्यमे मोदी विरोधात होती. तरीही विजयाची लाट घेवून मोदी पंतप्रधान झाले. ट्रैम्प यांचेही तसेच. त्यांच्या विचारसरणीची अमेरिकन जनतेला माहिती होती. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वीचा कौल ट्रैम्प विरोधात होता. मात्र निकाल झंझावाती लागला व ट्रैम्प मुसंडी मारुन निवडून आले.

ट्रैम्प हे राष्ट्रध्यक्ष होण्याच्या आधी फार चर्चेत नव्हते, त्यामुळे ते सत्तेत येतील अशी अपेक्षा नव्हती. ट्रैम्प हे निवडणूक लढविण्याच्या पूर्वीपासून कर्मठ आहेत. मुस्लिम समाजाविषयी त्यांना आकस आहे. मोदी तर गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मुस्लिम विरोधी मानले जातात. हेही दोघांमधील साम्यस्थळ.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प नव्या व्हिसा पॉलिसीच्या आदेशावर स्वाक्षरी करताना त्याला ‘विदेशी अतिरेक्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा’ असे म्हणतात. अमेरिकेला अतिरेक्यांचे भय आहे. नोटबंदीचा आदेश देतांना मोदी काळ्या पैशांच्या विरोधात लढा उभारतात. भारतात काळा पैसा बाळगणारे सध्या देशद्रोही ठरत आहेत.

मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले तर मी देशाबाहेर जाईन अशी घोषणा अभिनेता कमाल खान, ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती व माजी पंतप्रधान एच. डी. दैवेगौडा यांनी केली होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कमाल खान पाकिस्तानात निघून गेला. मात्र अनंतमूर्ती व देवेगौडा आजही भारतात आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचा प्रचार करताना ट्रैम्प यांनी व्यक्तव्य केले होते की, अमेरिकेच्या लगत असलेल्या मेक्सिकोतील लोक हे बलात्कारी आणि गुन्हेगार असतात. याशिवाय अॉस्ट्रेलियातील निर्वासित आणि मुस्लिम बहुल देशातील मंडळी अमेरिकेत दहशतवादी कारवाया करतात, असेही मत ट्रैम्प यांनी वारंवार मांडले आहे. यासाठी ते गुन्हेगारीविषयक कारवायांची आकडेवारी देतात व संशयित आरोपींकडे बोट दाखवतात.

अमेरिका ही अनेक राष्ट्रांचा मिळून संघराष्ट्र तयार झाला आहे. अमेरिकेत प्रवेशाचे नियम कडक आहेत. पण युरोपीयन, कैनेडीयन नागरिकांना अमेरिकेत सहज जाता येते. अमेरिकेच्या जवळ असलेल्या जवळपास ३८ छोट्या राष्ट्रांमधील लोकही अमेरिकेत पर्यटक व्हिसा घेवून बाजारपेठेत जाता येतात. याच व्यवस्थेवर ट्रैम्प यांनी अटी लादल्या आहेत. ट्रैम्प यांनी निवडणूकपूर्वी वक्तव्ये करीत आपण काय करणार हे सांगितले होते. ते आता तसे करीत आहेत. निवडणूक सुरु असताना अमेरिकेतही २३ मान्यवरांनी घोषणा केली होती की, ट्रैम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर आम्ही अमेरिका सोडू. अद्याप तसे घडल्याचे ऐकीवात नाही. उलट ट्रैम्प यांनी विविध कर प्रणालीत कपात सुरु काल्यामुळे ही मंडळी खुश आहेत.

पण मेक्सिकोच्या एका महिलेने ट्रैम्पचा निषेध करताना अमेरिकेत प्रवेश न करण्याची शपथ पूर्ण केली आहे. मेक्सिकन नागरिकांना ट्रैम्प यांनी बलात्कारी व गुन्हेगार म्हटल्याचा निषेध करीत कैरिबैन महिला अलमा सीलेर कॉन्ट्रेरास् (वय ५९) यांनी अमेरिकेत प्रवेशाचा एच वन व्हीसा परत करुन तेथे जाणे बंद केले आहे. मेक्सिकन नागरिक एच वन व्हीसा घेवून अमेरिकेत ॲरेझोना, लास वेगास आणि न्यूयॉर्कला सहज जावू शकतात. अलमा या सुध्दा अशा प्रकारे व्हीसा वापरून अमेरिकेत नेहमी जात येत. परंतु ट्रैम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर अमला यांनी मेक्सिकन असल्याचा राष्ट्राभिमान मानून ट्रैम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करीत अमेरिकेत प्रवेशाचा व्हीसा दुतावासाला परत केला. येथे कमाल खानची आठवण होते.

व्हीसा परत करताना अमला यांनी ट्रैम्प यांच्या वक्तव्याची आठवण यंत्रणेला करुन दिला. आता येथे मुद्दा दोन्ही बाजूने राष्ट्र हिताचा आहे. ट्रैम्प हेही म्हणत आहेत की, अमेरिका फर्स्ट. मेक्सिकन आमला म्हणते की, माझ्या राष्ट्राचा अवमान ट्रैम्प यांनी केला आहे. गोंधळ आहे तो येथे. दोघेही आपापल्या जागी योग्य आहेत. व्हीसा परत करताना अमला असेही म्हणाली, मी जुना व्हीसा परत करुन नव्यासाठी अर्ज करेन. ट्रैम्प सरकारने दिला तर मी पुन्हा अमेरिकेत जाईन, पण नाकारला तर मला दुखः होणार नाही.

गंमत अशी की, मोदी जर पंतप्रधान झाले तर मी नाव बदलून टाकेन असेही लालू प्रसाद यादव म्हणाले होते. पण यादव आजही लालू नावानेच वावरतात. अनंतमूर्ती व देवेगौडांचे वय झाले आहे. देवेगौडांना तर आता स्मृतिभंश झाला आहे. अशावेळी त्यांचे वक्तव्य फार कोणी मनावर घेत नाहीत.

ट्रैम्प व अमला यांच्यात कोणाचा पक्ष आपल्याला योग्य वाटतो ???


मोदी आणि ट्रैम्पमधील काही फरक

ट्रम्प हे जन्मजात कोट्यधीश आहेत. मोदी एक चहावाले हाते.
ट्रम्प हे अत्यंत आरामदायी जीवन जगतात. मोदी यांचे राहणीमान साधे आहे.
ट्रम्प यांनी तीन लग्ने केली. त्यांना ५ मुले आहेत. याशिवाय त्यांच्या इतरही भानगडी आहेत. मोदी यांचे एकच लग्न झाले असून ते सध्या पत्नीपासून विभक्त आहेत.
ट्रम्प हे अमेरिकन नागरिक वगळून इतरांना थेट लक्ष करतात. मोदी हे सबका साथ सबका विकास म्हणतात.
ट्रम्प हे एका वर्षांत प्रचार करुन सत्तेत आले. मोदी टप्प्या टप्पाने पंतप्रधान झाले.
ट्रम्प आधुनिक विकासाच्या विरोधात आहेत. मोदी नेहमी विकासाच्या बाजूने आहेत.

No comments:

Post a Comment