Tuesday 28 February 2017

विवेक हरवलेला विरोध !!

जळगाव शहरात सध्या काही मान्यवर नागरिक सामाजिक कार्यात हात दाखवून अवलक्षण करुन घेण्याचा प्रकार करीत आहेत. जळगाव शहरात कोणतेही सामाजिक कार्य लोकसहभाग किंवा खासगी खर्चातून उभे राहायला लागले, की हे सामाजिक चिंताग्रस्त (Social worriers) मान्यवर शंकांची प्रश्नावली घेवून उभे राहतात. असे तीन जण सध्या बेफामपणे कार्यरत आहेत.


विषयावर जाण्यापूर्वी हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय ? हे समजून घेवू. बहुतांश लोक कुंडली, हात दाखवणे, रत्न, खडे धारण करणे यावर विश्वास ठेवतात. त्यातील काही जण ज्योतिष्याकडे जातात. त्याला हात दाखवतात. जर ज्योतिष्याने सांगितले की तुमचे ग्रह खराब आहेत तर मग ही मंडळी अस्वस्थ होते. दुसऱ्यांनाही अस्वस्थ करते. जळगावात असे तीन सामाजिक चिंताग्रस्त तयार झाले आहेत. ते स्वतः अस्वस्थ असतात आणि जळगावकरांनाही करतात. आपला हात नको तेथे घुसवून दुसऱ्याला अस्वस्थ करतात. यालाच म्हणता येईल, विवेक हरवलेला विरोध.

विषय आहे, जळगावमध्ये तयार झालेल्या भाऊंचे उद्यान चा. हे उद्यान महसूल विभागाच्या भूखंडावर तयार झाले आहे.  महाबळमधील मेहरुण सर्व्हे क्रमांक ४४० हा मूळ महसूलच्या मालकीचा आहे. तेथे मनपाने पाणीपुरवठ्याचे दोन जलकुंभ बांधले. जलकुंभाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केले. सोबत मजीप्राने तेथे विश्रामगृहही बांधले. मसहूलच्या काही जागेचा ताबा तेव्हाची नपा (आता मानपा) व मजीप्राकडे होता. याच सर्व्हेमध्ये वन विभाग अधिकाऱ्यांच्या निवासस्थानसाठी जागा दिली आहे. ही बाब वेगळी की, आताच्या वन अधिकाऱ्यांनी या निवासस्थानातच यावलचे कार्यालय सुरु केले आहे. अशा प्रकारे सध्याच्या भाऊंचे उद्यानची जागा ४ यंत्रणांच्या ताब्यात होती. जळगाव शहर विकास आराखडा १९९३ नुसार या सर्व्हे वर आरक्षण क्रमांक १५६ हे पार्क (उद्यान) करिता (जागा १.६२ हेक्टर) होते. मात्र, हे आरक्षण म्हणजे प्रस्तावित "नाना नानी पार्क" नाही. मग प्रस्तावित "नाना नानी पार्क" आहे कुठे ? असा प्रश्न पडतो.

काव्यरत्नावली चौकात जी मंडळी शहराकडून जाते तेव्हा डाव्या हाताला एसपी बंगला आहे. या बंगल्याचे प्रवेशद्वार आज ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूने आहे. पूर्वी हे प्रवेशद्वार आरटीओ कार्यालयाच्या समोरून होते. मग प्रवेशाची जागा बदलली कशी ? खरे तर मनपाच्या आराखड्यानुसार एसपी बंगला ते डीमार्ट हा रस्ता विस्तारित आहे. एसपी बंगल्यातील काही जागा रस्ता रुंदीकरणासाठी द्यावी यासाठी मनपा प्रयत्न करीत होती. मनपाच्या या प्रयत्नांना पोलीस प्रशासन दाद देत नव्हते. अधिकाऱ्यांना तसे करु न देण्यासाठी तेव्हा कोणाचा तरी दबाव असू शकतो. आजही नागरिकांनी एसपी बंगल्याला लागून आरटीओ कार्यालयाच्या समोरिल जागा पाहिली तर ती रिकामी दिसते. तेथे सर्व्हंट क्वार्टर म्हणून एक इमारत आहे. या जागेचा ताबा मनपाला मिळाला तर तेथे "नाना नानी पार्क" होणार होता. याचाही मेहरुण सर्व्हे क्रमांक ४४० आहे. पण ही जागा एसपींच्या बंगल्यास लागून आहे तर "भाऊंचे उद्यान" एसपींच्या बंगल्यासमोर रस्त्याच्या पलिकडे आहे. हे समजून घ्यायला विवेक हवा. नावाला विरोध नको.

एसपींच्या ताब्यातील जागा हस्तांतरण येन केन प्रकारे लांबत असताना महाबळ सर्व्हे क्रमांक ४४० मधील रस्त्याच्या पलिकडील भूखंडावर पार्कचे आरक्षण असल्याचे लक्षात आले. तेथे खासगीकरणातून पार्क उभा राहू शकतो असे लक्षात आले. पण फाटक्या झोळीमुळे मनपाला पार्क उभारणे शक्य नव्हते. मग मनपाने जैन उद्योग समुहाला विनंती केली. अर्थात, जैन उद्योग समुह पार्क करायला तयार नव्हते. कारण जळगावमधील सामाजिक चिंताग्रस्त मंडळी लगेच अर्जफाटे करतात हा त्यांनाही अनुभव आहे. मात्र मनपाने जैन उद्योग समुहाच्या सहकार्यातून पार्क तयार करण्याचा महासभेत ठराव क्रमांक ४७१ केला. त्यानंतर जागा हस्तांतरणासाठी कलेक्टर, मजीप्रा व वनविभाग यांच्याकडे फॉलोअप घेतला. सर्व्हे क्रमांक ४४० मधील १.६२ हेक्टर जागा मनपाकडे हस्तांतरणाची मागणी केली. महसूल विभागाचा तसा जीआर आहे. सरकारी मालकी कायम ठेवून विकास कामासाठी जागा देता येते. त्यानुसार जागा हस्तांतरण ३० दिवसात झाले. यासाठी कलेक्टरची भूमिका पूरक ठरली. असे असतानाही काही सामजिक चिंताग्रस्तांनी थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे अर्ज केले. काहींनी जलगाव बिक रहा है असे मेसेज पाठवले. काही फलक घेवून उभे राहिले. या सर्व लोकांना असे करण्याचा अधिकार नक्की आहे. पण हा विरोध ही मंडळी कोणासाठी करीत आहेत. जळगावकरांसाठी की स्वतःसाठी ? जळगावकर "भाऊंचे उद्यानात" हजारोने गर्दी करीत आहेत. पण अर्ज करणारा एकटा, फलक धरणारे ५/६ आणि सोशल मीडियात मेसेज पाठवणारे २/३ आहेत. विवेक हरवलेला विरोध असा एकाकी दिसतो.

कलेक्टरांनी पार्कसाठी जागा मनपाला हस्तांतरण करताना  ९ अटी व शर्ती टाकल्या आहेत. त्या अशा - पार्कच्या जागेवर मालकी शासनाचीच असेल. जागा फक्त पार्कसाठीच वापरायची आहे. जागेच्या २०० मीटर भागात वाणिज्य वापर (हॉकर्स करिता) असणार नाही. पार्क नागरिकांसाठी मोफत असेल. जागेवर पार्क नाही झाला तर जागा सरकारला परात जाईल.

मनपाने जैन उद्योग समुहाकडून पार्क तयार करुन घेतला आहे. ४ एकर जागेवर सुमारे ४ कोटी रुपये खर्च जैन उद्योग समुहाने केला आहे. शहराला योगा सेंटर, आर्ट गैलरी, व्यायाम साहित्य, ॲम्पिथीएटर, मॉर्निंग वॉकसाठी ४५०मीटरचा पाथवे, दत्त मंदिर, बसायला लॉन असे काही तरी मिळाले आहे. हा सर्व खर्च केल्यानंतर त्यातून जैन उद्योग समुहाला एक रुपयाचे उत्पन्न नाही. उलट ८/१० जणांना रोजगार मिळणार आहे. आता एवढा खर्च जैन उद्योग समुह स्व. पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या नावे करुन पार्कला "भाऊंचे उद्यान" हे नाव देत असेल तर सामाजिक चिंताग्रस्तांची नेमकी हरकत काय ? हे त्यांनी समजून सांगावे.

सामाजिक चिंताग्रस्त मान्यवरांना चिंता आहे की हे काय चालले आहे ? मनपाने जळगाव विकायला काढले आहे, असा एक आरोप. "नाना नानी पार्क" चे रुपांतर "भाऊंचे उद्यानात" केले हा दुसरा आरोप. "नाना नानी पार्क" ची मूळ जागाच माहित नसलेली मंडळी "भाऊंचे उद्यान" ला दोष लावत आहे. या मंडळींना विनंती आहे, तुम्ही विरोध करणारे एकत्र येवून, पदरचे पैसे खर्च करुन "नाना नानी पार्क" आम्ही उभारा. तसा प्रस्ताव मनपाला द्या. जैन उद्योग समुह यांच्या नाकावर टीच्चून अत्यंत सुंदर असे "नाना नानी पार्क" उभारा. यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे योगदान द्या. किंवा उद्यानावर खर्च करायला इच्छुक असलेले दानशूर जळगावात शोधा. त्यांच्याकडून तुमच्या शब्दांवर काम करुन घ्या. अशा पार्कला तुम्हाला हवे त्याचे एकाचे किंवा पैसा खर्च करणाऱ्या सर्वांचे नाव द्या. अशा प्रकारे आपण जैन उद्योग समुहापेक्षा मोठी सामाजिक कार्याची रेषा मारु शकतो का ? यावर विचार करा.

अशा प्रकरणात जळगावकरांनीही लक्ष द्यायला हवे. जैन उद्योग समुहाने ६६ दिवसात "भाऊंचे उद्यान" वर खर्च केला ४ कोटी रुपये आणि त्याविषयी तक्रार करणाऱ्याचा खर्च आहे कागदाचा ४ रुपये. शेवटी एक खवचट प्रश्न येतोच. तक्रार करणारे स्वतः कोणते सामाजिक विकास काम करतात ? त्यावर पदरचे किती रुपये खर्च केले ? हे जळगावकरांनी विचारावेच !

विरोधकांना जागा देवू, उद्यान करुन दाखवा

"भाऊंचे उद्यान" विषयी कायदेशीर बाबी विषयी महापौर नितीन लढ्ढा यांना विचारले. ते म्हणाले, जे लोक सरकार दप्तरी अर्ज फाटे करीत आहेत किंवा जे सोशल मीडियात उलट सुलट मेसेज टाकून भ्रम वाढवत आहेत त्यांनी आमच्याकडे यावे. "नाना नानी पार्क" ची जागा आम्ही त्यांना देतो, त्यांना मोठी जागा हवी असेल तर ती देतो. त्यांनी पदरचे पैसे खर्च करून उद्यान विकसीत करावे. असे जो करेल त्याचे नाव त्या  उद्यानाला देवू.

(या लेखात सामाजिक चिंता करणाऱ्या कोणत्याही मान्यवराचा अवमान करण्याचा हेतू नाही. विवेक हरवलेला विरोध हे लिहण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे विरोधाचे कारण ठोस असावे, कायदेशीर असावे. नैतिक असावे. जळगावकरांच्या हिताचे असावे. जर तसे नसेल आणि केवळ विरोधासाठी विरोध असेल तर तेथे विवेक हरवलेला विरोध दिसतो व जाणवतो)

No comments:

Post a Comment