Friday 24 February 2017

मरावे परि उद्यान रुपी उरावे ...

भाऊंचे उद्यान जळगावकरांच्या सेवेत
 जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जळगावचा वैचारिक, साहित्यिक व सांस्कृतिक वारसा संपन्न करणारे थोर व्यक्तिमत्त्व तथा खान्देशचे मोठेभाऊ पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांचा २५ फेब्रुवारी २०१७ ला पहिला स्मृतिदिन. मोठेभाऊ गेले वर्षभर आपल्यात नाहीत याची जाणिव त्यांच्या चौघा वारसदारांनी जळगावकरांना होवू दिलेली नाही. त्यामागील हे एक कारण आहे की, जैन उद्योग समुहाच्या विचारांची व कार्याची भरभक्कम पायाभरणी मोठ्याभाऊंनी करुन ठेवली आहे. ते हयात असताना समाजाप्रति जे कार्य सुरु होते ते आजही जैन उद्योग समुहातर्फे सुरू आहे.


मोठेभाऊ हयात असताना त्यांनी अलिकडे जळगावकरांसाठी खास लक्ष घालून तयार केलेल्या दोन सामाजिक कार्यांचा मी जवळून साक्षीदार होतो. मोठ्याभाऊंचे पहिले कार्य म्हणजे, त्यांचे मित्र ना. धो. महानोर आणि स्वतः मोठेभाऊंच्या संकल्पनेतील निर्मिलेला काव्यरत्नावली चौक. जळगावातील नागरिकांना खान्देशी ४ कवींच्या सानिध्यात विसावण्याची रोज मिळणारी संधी. या चौकाची ओळख आज केआरसी म्हणून झाली आहे. मोठ्याभाऊंनी पुढाकार घेवून करुन आणलेले दुसरे काम म्हणजे, सन २०१५ मध्ये गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाचे गरजेनुसार केलेले काँक्रिटीकरण. गणेश महामंडळाच्या प्रतिनिधींनी खड्ड्यांचा रस्ता दुरूस्त करायचे सांगितले आणि मोठ्याभाऊंनी तेथे रात्रीतून काम पूर्ण केले. जैन उद्योग समुहाची इतरही सामाजिक कार्ये आहेत. त्याचा उल्लेख नेहमी होत असतो. मी अगदी जवळून या दोन कामांची प्रक्रिया अनुभवली म्हणून त्याचा उल्लेख केला आहे.


जळगाव जिल्हा पत्रकार संघात मोठ्याभाऊंच्या नावे असलेल्या सभागृहात त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी अर्धाकृती पुतळा अनावरण व्हावे ही संघ पदाधिकाऱ्यांची ईच्छा होती. मात्र, ते काम होवू शकले नाही.

आज वेगळ्या गोष्टीचा आनंद नक्की आहे. तो म्हणजे, मनपाने शहराच्या विकास आराखड्यात महाबळ परिसरात नियोजित केलेला नाना - नानी पार्क आता भाऊंचे उद्यान म्हणून २५ डिसेंबर २०१७ पासून वापरात येत आहे. या उद्यानाचे लोकार्पण जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होत आहे.
  
या उद्यानाच्या निर्मितीच्या खऱ्या शिल्पकार जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आहेत. त्यांनी आणि त्यांच्या महसूलच्या अधिकाऱ्यांनी महाबळमधील भूखंड मनपाला हस्तांतरित करण्यासाठी अक्षरशः ३० दिवसात मॅरेथॉन कार्यवाही केली. सरकारी जागा ताब्यात मिळाल्यानंतर अवघ्या ६६ दिवसात ४ एकर जागेवर भाऊंचे उद्यान उभे राहिले आहे. काव्यरत्नावली चौकाला लागून असलेले हे उद्यान जळगावकरांसाठी विश्रांती, विरंगुळ्यासह विचारांच्या पेरणीचे, सुदृढ आरोग्याचे ठिकाण ठरणार आहे.

जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, महापौर नितीन लढ्ढा व स्थायी समितीचे माजी सभापती नितीन बर्डे यांच्या समन्वयातून जळगावात उभे राहिलेले हे दुसरे काम. या तिघांच्या एकत्र येण्यातून मेहरुण तलावाचे सुशोभिकरण व विसर्जन घाट निर्मिती हे कार्य पूर्ण झाले. त्या घाटाचे लोकार्पणही याचवेळी पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते होते आहे.

भाऊंचे उद्यानाचा आराखडा जळगावचे ज्येष्ठ वास्तूविशारद शिरीष बर्वे यांनी तयार केला आहे. भाऊंच्या उद्यानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील पहिले म्हणजे, उद्यानात पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवून पुन्हा वापरले जाणार आहे. दुसरे म्हणजे, १५० रसिक प्रेक्षक बसू शकतील असे ऍम्पिथीएटर तेथे तयार झाले आहे. चौथे म्हणजे, पाण्याच्या दोन टाक्यांच्या खालील बाजूस योगा सेंटर आणि आर्ट गॅलरी तयार झाली आहे. ही आर्ट गॅलरी कलावंतांसाठी एक जागा निर्माण करणारी आहे. शिरीष बर्वेंच्या याच कल्पकतेला सलाम. याशिवाय पाचवे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व वयोगटातील नागरिकांना गरजेच्या व्यायामासाठी लावलेले साहित्य. सहावे वैशिष्ट्य म्हणजे, लहान मुलांसह मोठ्यांच्या खेळासाठीची खेळणी. सातवे वैशिष्ट्य म्हणजे, नव्या रुपात साकारलेले दत्ताचे मंदिर. हे मंदिर नव्या मंदिर उभारणीचा उत्तम नमुना आहे. नक्षी कामाच्या दगडांसह सर्व मंदिर असेम्बल्ड आहे. आठवे वैशिष्ट्य म्हणजे, उद्यानाच्या आवारातील जवळपास सर्वच वृक्षांना जीवनदान मिळाले आहे. मनपाची वृक्ष समिती आणि पर्यावरण रक्षण समितीने दाखविलेली झाडेच तोडण्यात आली आहेत. नववे वैशिष्ट्य म्हणजे, उद्यानाचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेराने जोडलेला आहे. उद्यानात सर्व प्रकारेच पथदीप व बसण्याची बाके खास कास्टींग केलेली आहेत.
  
भाऊंचे उद्यानाची आणखीही वैशिष्ट्ये असतील. शिवाय तेथे इतरही सेवा सुविधा विस्तारतील. या उद्यानाचा लाभ घेताना जळगावकरांनीही काही गोष्टींची शिस्त पाळायला शिकले पाहिजे. सुंदर व सृजनात्मक ठिकाण हे कायम तसेच राहिल असे वर्तन व वागणूक जळगावकरांनी स्वीकारली पाहिजे. हे जग मला जसे मिळाले ते इतरांसाठी किमान तसेच ठेवावे, हाच विचार मोठ्याभाऊंनी वारंवार केला. म्हणून जैन उद्योग समुहाने मोठ्या भाऊंना जळगावकरांसाठी उद्यान रुपात अजरामर करण्याचा केलेला प्रयत्न अधिकच भावतो.


मित्रवर्य अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन आणि अतुल जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सुनांना व नव्या पिढीला भाऊंचे उद्यान निर्मितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ...

No comments:

Post a Comment