Thursday, 23 February 2017

सत्तेसाठी एकजूट नव्हे ; बहुमत हवे !

राज्यातील २५ जिल्हा परिषद, १० मनपांसह २८३ पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. सर्वच मनपांसह बहुतांश जि. प. मध्ये भाजपने आघाडी घेत पुन्हा एकदा क्रमांक १ चा पक्ष म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. या विजयाचे श्रेय अर्थात, राज्यातील सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष संघटनचे प्रमुख म्हणून रावसाहेब दानवे यांच्याकडे जाते. भाजप अंतर्गत इतर कोणीही राज्यस्तरावरील या विजयात हिस्सेदारी करु शकत नाही. कारण, स्टार प्रचारक म्हणून फडणवीस व दानवे राज्यभर फिरत असताना इतर नेते आपापल्या जिल्ह्यात प्रतिष्ठा पणाला लावून होते.  

ही निवडणूक भाजपसाठी अनेक प्रकारची परिक्षा पाहणारी होती. फडणवीस यांच्या ३ वर्षांच्या कार्याचे मतदारांनी केलेले मूल्यांकन, मराठा मोर्चाच्या रुपात एकवटलेल्या समाजातील असंतोष, केंद्र सरकारच्या नोट बंदी विषयी नाराजी, आरक्षण मागणाऱ्या समाजांचे प्रश्न, राज्यातील गुन्हेगारी वाढल्याचे आरोप असे अनेक विषय गुंतागुंतीचे होते. या निवडणुकीत भाजपला दगाफटका झाला असता तर फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदावरून विसर्जन करावेच लागले असते. त्याला पक्षांतर्गत दुसरा पर्याय नव्हता.

मात्र, आज भाजप अंतर्गत फडणवीस यांना पर्याय कोण होवू शकतात का ? याचाही निकाल याच निवडणूक निकालाने देवून टाकला आहे. कधीकाळी एकनाथ खडसे हे पक्षात सर्व प्रकारचा दबदबा बाळगून होते. भोसरी (पुणे) येथील एमआयडीसीतील वादातीत भूखंड खरेदी प्रकरणामुळे त्यांनी मंत्रीपद सोडले. आजही ते या प्रकरणाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. जेव्हा हे प्रकरण चर्चेत आले तेव्हा मंत्री पदी असलेले खडसे स्वतःला क्लिनचीट देताना विविध कागदपत्रे दाखवून स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करीत होते. भूखंड खरेदी प्रक्रियेची इत्यंभूत माहिती त्यांनीच माध्यमांना दिली होती. आता चौकशी समिती समोर खडसेंनी म्हटले आहे की, जावाई व पत्नीने केलेला भूखंड खरेदीचा व्यवहार मला माहित नव्हता. खडसेंनी ही भूमिका घेवून पूर्वीचा आपला अविर्भाव का बदलला ? हे समजत नाही. हे सविस्तर सांगायचे एवढ्यासाठीच की, खडसे हे तूर्त मुख्यमंत्री पदाचा पर्याय नाहीत. परंतु खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई खडसे व कन्या जिल्हा बँक अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी जळगाव जिल्हा परिषदेत भाजपच्या एकूण विजयी ३३ पैकी १८ सदस्य निवडून आणण्यात सक्रिय भूमिका निभावली आहे. या जिल्हा परिषदेत ६७ पैकी ३३ भाजपचे व त्यात खडसे गटाचे १८ सदस्य आहेत.

फडणवीस यांना पर्याय कोल्हापूरकर चंद्रकांत पाटील हेही होवू शकतात. पण पाटील यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहे. पाटील एखाद्या समुहापुरते काम करु शकतात मात्र, जनसमुदायासाठी त्यांचे नेतृत्व खुजे ठरते. हे सोप्या भाषेत सांगायचे तर पाटील यांची जवळकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समुहाशी असू शकते पण भाजपचा कार्यकर्ता व जनतेशी थेट नाळ जुळलेली आहे का ? या विषयी शंका येते. कारण आज लोकप्रियतेचे निकष मोजायला कोल्हापूर जि. प. निकालाची आकडेवारी पाहावी लागेल. कोल्हापूर जि. प. त एकूण ६७ पैकी १४ जागा भाजपला जिंकता आल्या आहेत. येथे शिवसेनेचा टेकू घेतला तरी प्रश्न मिटत नाही. पण पाटील यांनी भाजप शिवसेनेत पुन्हा जुगाड व्हावा अशा अपेक्षा करुन तसे व्हावे यासाठी प्रयत्न करा असे आवाहन माध्यमांकडेही केले केले आहे.

फडणवीस हे मुख्यमंत्री होत असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या लाडक्या कन्या सौ. पंकजा मुंडे - पालवे यांनीही मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी मनिषा व्यक्त केली होती. तेव्हा पासून त्या स्वतःला सीएम मटेरियल मानतात. पण गेल्या ३ वर्षांत बीड जिल्ह्यात बरेच राजकारण घडून गेले. धनंजय मुंडे यांनी अनेक ठिकाणी पंकजा यांना टेक ओव्हर केले. बीड जि. प. चा निकाल विपरित लागला. एकूण ६० पैकी भाजपला १९ जागा मिळाल्या. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी २५ जागा जिंकल्या. निकालाच्या नैराश्यातून पंकजा यांनी स्वतःच मंत्रीपदाचा राजीनामा देवून नामुष्की ओढवून घेतली. आता तो राजीनामा नाकारत असल्याचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना म्हणावे लागेल.

फडणवीस यांना पर्याय म्हणून विनोद तावडे यांच्याकडे पाहिले जाते. तावडे मुंबईचे. मुंबईत भाजपने २२७ पैकी ८२ जागा जिंकल्या. शिवसेनेला ८४ मिळल्या. मुंबईत तावडे व आशिष शेलार यांनी शिवसेनेला जेरीस आणले. फडणवीस यांनीही जाहीर सभेत भाषण करताना शिवसेनेला पाणी पाजू असे म्हटले होते. शिवसेनेशी (८४) बरोबरीच्या जागा जिंकत भाजपने (८२) अतीतटीची स्थिती आली आहे. पण तावडे व शेलार यांच्यासाठी या निकालाने धडा दिला. दोघांचे नातेवाईक प्रभांमध्ये पराभूत झाले. तावडे व शेलार यांच्या व्यक्तिगत प्रतिष्ठेची झाकलेली मूठ उघडली गेली.  आपल्या वारसांना राजकारणात आणण्याची घाई तूर्त भाजपतील नेत्यांनी करुन नये. फडणवीस यांचा तसा कोणी वारसदार सध्या नाही. फडणवीस यांच्या संयमाची तुलना करताना मुंबईतील निकाल सुरू असतानाचे उदाहरण लक्षात घेवू. शिवसेनेच्या ९२ व भाजपच्या ५२ जागा असताना उताविळ असलेले संजय राऊत म्हणाले होते, शिवसेनेचा सूर्य तळपत राहील. नंतर आकडेवारी झाली शिवसेना ८४ व भाजप ८२. निकालाच्यावेळी फडणवीस यांनी कुठेही काहीही वक्तव्य केले नाही. रक्तात संयम असावा लागतो तो असा.

या निवडणुकीत फडणवीसांची पत आणि प्रतिष्ठा कशी सिध्द झाली ते पाहू. फडणवीस यांची सर्वाधिक बदनामी पुण्याती सभा रद्द आणि रिकाम्या खुर्च्यांमुळे झाली. मात्र, पुणे मनपा आणि त्याच्याशी जुळे शहर पिंप्री चिंचवड मनपाचा निकाल काय लागला ? पुणेकरांनी मनपात १६२ पैकी ९८ जागा भाजपला दिल्या. ज्या प्रभागातील सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या तेथे चारही उमेदवार भाजपचे निवडून आले. बोनस म्हणून पिंप्री चिंचवड मनपात एकूण १२८ पैकी ७७ जागा भाजपने जिंकल्या. पुण्यात पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी लक्ष घातले होते. गुंडांना पक्षाची उमेदवारी दिली, उमेदवारीसाठी पैसे घेतले असा क्षोभ बापट विरोधात होता. ही बाब लक्षात घेवून फडणवीस सोबत बापटांची सोशल मीडियात छिं थू झाली. सोशल मीडियातील त्याच विखारी, विषारी संदेशांनी अनेकांच्या पराभवाचा पाया खोदला. अखेर पुणे व पिंप्री चिंचवडमध्ये फडणवीस जिंकले.

फडणवीस यांचे शहर नागपूर आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे डोके अधुनमधून वर येते. मुख्यमंत्री नागपूरचे आणि नेते महाराष्ट्राचे. पण त्यांचाच विदर्भ महाराष्ट्रातून बाहेर पडायचे म्हणतो. अशी अडचणीची स्थिती. फडणवीस नागपूरचे महापौर होते. तेव्हाचा नंदलाल समितीचा अहवाल अडचणीचा. तरीही नागपूर मनपात १५१ पैकी १०८ जागा भाजपने जिंकल्या. महाराष्ट्रभर स्टार प्रचारक म्हणून जवळपास ६० सभा घेणाऱ्या फडणवीसांनी स्वतःचा गड निर्विवादपणे राखला. अर्थात, नागपुरातील विजयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे श्रेय हे फडणवीसांपेक्षा कांकणभर जास्त आहे.

फडणवीस यांच्यावर नाशिकमध्येही जाहीर सभेला गर्दी नसल्याची निमुष्की ओढवली होती. सभेपूर्वी अक्षरशः माणसे गोळा करावी लागली. फडणवीस यांचे जवळचे मित्र व जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री. त्यामुळे तेथील भाजप अंतर्गत नाराजीला कंगोरे आहेत. पण जाहीर भाषण करताना फडणवीस यांनी मैदान मारले, त्यांनी थेट नाशिकला दत्तक घेवून टाकले. त्यानंतर निकालात चमत्कार घडला. नाशिक मनपात एकूण जागा १२२ पैकी ६६ भाजपने जिंकल्या. नाशिक फडणवीस यांचे झाले.

फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनपा क्षेत्रात नागपूर, पुणे, पिंप्री चिंचवड, नाशिक जिंकले. मात्र अकोला, अमरावती हेही जिंकले. सोलापूरमध्ये काँग्रेसला धक्का दिला. फडणवीस यांचा विजय आहे तो येथे. फडणवीस यांनी गेल्या ३ वर्षांत नेहमी जोडायचे राजकारण केले. तोडायची भाषा त्यांच्या मुखात नसते. आपल्या ब्राह्मण जातीचा विखार अनेकांना आहे. त्यातून विषारी प्रचार जन्माला येतो हे त्यांनाही माहित आहे. अशावेळी संयम कुठे ठेवायचा हे त्यांना जन्मतः माहित आहे. संयम गमावणाऱ्यांच्या नावावर फंद फितुरीचा इतिहास कधीच लिहीला गेला आहे. आजही दुर्दैव हेच आहे की इतिहासाची पाळेमुळे शोधण्याच्या नादात ती मंडळी जमिनीत डोके घालून बसली आहेत. अशा लोकांवर दुसऱ्यांना माती ढकलावी लागत नाही. संतापात जी माती काठावर फेकली जाते ती हळूहळू स्वतःवर घसरायला लागते. हा खड्डे खोदतानाचा नैसर्गिक नियम आहे. फडणवीसांच्या संदर्भात हे गेल्या वर्षभरात सातत्याने घडले. इतिहासातून डोके वर काढले तरच बदलते राजकारण कळणार आहे.

विधान सभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला झिडकारुन भाजप, शिवसेनेला कौल दिला. भाजपत लोकशाहीने व शिस्तीत फडणवीसांना नेतृत्वाची संधी दिली. लांगुलचालन किंवा जात पाहून फडणवीस नेते झाले नाहीत. तेव्हा खडसे आणि पंकजा यांनी स्वतःहून शब्दांनी अवलक्षण केले. नंतर ज्येष्ठनेते शरद पवारही पेशवाईवर आले. पवार म्हणाले महाराष्ट्रात पेशवाई अवतरली. मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी असताना त्यांचीही हेटाळणी श्रीमंत म्हणून पवारांनी केली होती. फडणवीस यांच्या सरकारला न मागता पाठींबा देणारे पवार व राष्ट्रवादीवाले होते. मराठा समाज  पवारांना कधीही या विषयी प्रश्न का विचारत नाही ? त्यानंतर सुरु झाले मराठा मोर्चांचे पर्व. त्यातील मागण्या बदलत गेल्या. मराठ्यांसाठी आरक्षण हवे ही मुख्य मागणी दुय्यम झाली. पहिल्या नंबरवर आली मागणी ॲट्रॉसीटी रद्द करा. बाबासाहेब पुरंदरे प्रकरणामुळे ब्राह्मणांचा विखार होताच. आज ब्राह्मण अल्पसंख्य वाटतात. पण त्यांच्या प्रमाणेच अल्पसंख्य इतरही आहेत. त्यांनी समुह दडपशाहीचा उन्माद अनुभवला. आज ब्राह्मणांना दडपले जाते आहे. उद्या आपलाही नंबर लागू शकतो, ही भीती निर्माण झाली. ती आहेच. मराठा मोर्चाला प्रथम राष्ट्रवादी व नंतर काँग्रेसने राजकीय रंग दिले. मराठा समुहातच राजकीय लाभाचे दोन पर्याय निर्माण झाले. तवा एक आणि पोळी भाजणारे दोघे. शिवरायांचा नवा इतिहास सांगताना मराठा मंडळी मुस्लिमांना सोबत घेतल्याचा देखावा करतात. यातून शिवाजी राजे मुस्लिम द्वेष्टे नव्हते हे बिंबवायचा प्रयत्न असतो. पण मतदानाच्यावेळी मुस्लिम मंडळी मराठ्यांच्या सोबत असते का ? इतिहासाच्या पानांत शिवरायांच्या लढाया मोगल, अदिलशहा, कुतूबशहा आणि निजामशहा यांच्याशी झाल्या हे मुस्लिम कसे विसरतील ? ते काय ब्राह्मण आहेत तोंड दाबून गप्प बसायला ? बाह्मणांनी चुकीचा का असे ना इतिहास सांगितला. पण मुस्लिमांनी शिवरायांचे पोवाडे गायले किंवा त्यांच्यावर शेरो - शायरी केली अशी उदाहरणे दाखवा. मराठा, मुस्लिम आणि मागास याला सुरूंग लावून इतरांच्या बहुजन असण्याचा धडा मराठेच घालून देत आहेत.

मराठा समाजाने आरक्षण मागताना मागासांमध्ये हिस्सेदारी मागितली. बहुजनांमध्ये वावरताना मराठा आपले अस्तित्व आजही कूळात दाखवतो. शिवरायांना ब्राह्मणांनी विरोध केला हे सत्य मान्य केले तरी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे ते १० कूळ कोण होते ? ज्या जावळीतून राजेंना पहिला विरोध झाला त्याच जावळीत आजही राजेंच्या कुळाला किती टोकाचा विरोध होतोय हे कोण पाहणार ? राजेंनी मुस्लिम सरदाराच्या सुनेला साडी चोळी दिली मात्र आज राजेंच्या वंशावर एका सुनेचे मंगळसूत्र हिरावल्याचा गुन्हा दाखल होतो. सातारच्या गादी संदर्भातील वारस कसा बदलला गेला ? हे धुळ्यातील कदमबांडे घराणे सांगते. कोल्हापूरचे वारस राजकारण कशा प्रकारे करतात ? बहुजन असल्याचा आव आणत परशुरामाला शत्रू ठरवून बळीराजा व वामनाचे चित्रही आक्षेपार्ह ठरते. त्यापुढे जावून गुढीपाडवा हा सण साजरा करु नका हे सांगण्यापर्यत आपण जातो. गढी लावा असे सांगत कोणता ब्राह्मण गल्लीबोळात फिरतो ? मंदिरात या असे आवाहन कोणता भट, पुजारी करतो ? नथुरामाच्या नावाने ब्राह्मणांविषयी शंख करताना इतिहासाच्या पानातील शहाजीराजे भोसले व लखुजी जाधव यांच्या आपापसातील लढाया आपण कशा लपवू शकतो ? शहाजी राजांनी ३ वेळा चाकरी बदलली व ते मुस्लिम सत्तेशीच एकनिष्ट राहिले हेही आपण का विसरतो ? राजगडावर दरवर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाला हजेरी लावणारा पहिला व एकमेव मुख्यमंत्री फडणवीस आहे हेही आपण विसरतो. ज्या बहुजनांना भीती वाटेल अशा भाषांमध्ये सोशल मीडियात संदेश धाडले जातात त्याच बहुजनांसाठी फडणवीस स्वतंत्र मंत्रालय तयार करतात हेही आपण विसरतो.

मराठा समाजाची गल्लत आहे ती येथे. मी पन्नाशीत आहे. माझे मराठा मित्र १०० वर आहेत. मला कधीही ते धोकादायक वाटले नाही. मी कधीही त्यांना नथुराम, कृष्णाजी किंवा पुरंदरेंचा वारसदार वाटलो नाही. गावाच्या निवडणुकीत अनेकदा मित्र व त्याचे नातेवाईक सोबत निवडून आणले. पण आज तेच मित्र पन्नाशीत असताना मला हिणवू लागले आहेत. त्यांचे शब्द विखारी वाटायला लागले आहेत. शिवरायांच्या जयंतीचा त्यांना जल्लोष हवा पण परशुरामाची जयंती आम्ही साजरी करु नये असा त्यांना राग आहे. शिवरायांच्या प्रतिमेचे दैवतिकरण ते करीत आहेत. पण मंदिरात जाणाऱ्यांचा त्यांना विखार आहे. त्यांच्या हे लक्षात येत नाही की समुह करुन एकत्रिकरण होते, पण बहुमत मिळत नाही. बहुमत हवे असेल तर एक एक म जोडावे लागते.

फडणवीसांच्या विजयात अशा विखार आणि विषाचा ही खुप मोठा वाटा आहे. म्हणून फडणवीस यांचे हे यश असले तरी एका मोठ्या समुहाला दूर सारुन मिळालेले हे दोषपूर्ण यश आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे. राजकीय यश जिंकला तो राज असे असते. त्यामुळे काळ धकूनही जातो. पण असा काळ फार काळ नसतो. अशा वातावरणात लोकशाही धोकादायक वळणावर असते. एक मोठा असंतोष मनातल्या मनात धुसमुसत असतो. फडणवीस यांना याचा विचार करावाच लागणार आहे.

मराठा समाजात सध्या अनेक स्थित्यंतरे सुरु आहेत. एकत्रिकरण रस्त्यावर संख्येत दिसते. पण ते मतपेटीत रुपांतर करायला प्रेम, विश्वास व आदर लागतो. अगदी नवा धर्म स्वीकरण्याचा प्रयोगही मराठा समाजात झाला. सामाजिक प्रतिके उखडून फेकली. दादोजी कोंडदेव, राम गणेश गडकरी, बाबासाहेब पुरंदरे, भीडे गुरूजी, समर्थ रामदास अशी यादी किती वाढवणार ? अशी प्रतिके मोडून सत्ता मिळू शकते का ? कोणाच्याही टोकाच्या द्वेषातून १० लोक तरी जोडले जातात का ? हे मुलभूत प्रश्न प्रत्येक मराठा व्यक्तीने स्वतःला विचारावेत. काळाच्या बदलाचे भान आणून देणारी उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हा मराठा समाज खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या उंबरठ्यावर असेल. तसे घडले तर शिवजयंतीला सर्व समावेशक चेहरा देण्यासाठी लोकांना आमंत्रित करावे लागणार नाही, सर्वच समाजातील मंडळी आपसूक मिरवणुकीत येवून उभी राहतील. कारण एकच आहे, रामराज्य होते की नाही याला काहीही पुरावा नाही. मात्र शिव छत्रपतींचे राज्य येथे होते त्याला अनेक पुरावे आहेत. रामाने सामान्य जनतेला न्याय दिल्याचे एकही उदारहण कोणत्याही पुस्तकात नाही पण शिवरायांनी रयतेला पूत्रा समान सांभाळल्याची असंख्य उदाहरणे आहेत.


(हा लेख सामाजिक व राजकिय संदर्भावर आधारित आहे. त्यामुळे त्यातील विचार खोडण्याचे स्वातंत्र्य सुबुद्ध व विवेकी माणसाला आहे. विनाकारण लेखकावर व्यक्तिगत टीका टीपणी करण्यापेक्षा विचाराला खोडायचा प्रयत्न केला तर आनंद होईल. फालतू प्रतिक्रियांना उत्तरे द्यायला वेळही नाही)

9 comments:

 1. समर्पक विश्लेषण.
  प्रत्येकाचा घेतलेला विमर्ष लक्षवेधी.
  सामाजिक भान जागृत करणारे विवेचन.
  अभिनंदन !

  ReplyDelete
 2. Some problem with marathi typing..
  Haven't read such a apt and situational analysis since long..
  A eye opener

  ReplyDelete
 3. फडणवीसांच्या विजयात अशा विखार आणि विषाचा ही खुप मोठा वाटा आहे. म्हणून फडणवीस यांचे हे यश असले तरी एका मोठ्या समुहाला दूर सारुन मिळाले....
  हे आपण लिहिलंय साहेब पण ज्या एका विशेष समूहाला उद्देशुन तुम्ही बोलतायत त्यांच्या मताशिवाय निवडून येन हे पटत नाही आणि तसे असेल तर त्याला काही संदर्भ अथवा पुरावा दिला असता तर अधिक समर्पक झाले असते ...
  बाकी लेख खुप छान आहे������

  ReplyDelete
 4. ज्याना इतिहासाचे सखोल ज्ञान नाही, अश्यानांही संर्दभ लागावा असा लेख आहे...!
  परंतु माझे व्यक्तीगत मत असे की, फडवणीसांचे यश आपण म्हणता आहात त्या मागे मला एकच उदाहरण दिसते ती म्हणजे सर्वोतपरी " लवचिकता " जी सध्याच्या मंत्रिमंडळात कुणाकडेही नाही.....!

  ReplyDelete
 5. Uughda doke vichar karra neet.......wa wa wa dokyala zinn zinya aann nara lekh.....punha ekkdaa uughda doke vichar karra neet....

  ReplyDelete
 6. Writer sheab u r totally confuse.

  ReplyDelete
 7. Nakki tumhi cm sheab na support karat aahe ki virodh. Serva jati

  ReplyDelete
 8. मराठा मोर्चा नंतर झालेला फडणवीस सरकारचा विजय हे त्यांनी मराठा आरक्षण साठी तत्पर घेतलेल्या actions मुळे झाला आहे असं म्हणायला हरकत नाही . मराठा समाजाला आरक्षण का द्यावे याचे दाखले ग्रंथ व इतिहासाातू न्यायालयात सादर केले एक बाब लक्षात घ्यावी लागेल मराठा मोर्चा सुरू असताना राज्य भरात कोठेही हिंसक घटना झाल्या नाहीत त्याच कारण म्हणजे फडणवीस सरकारचा मराठा आरक्षण संदर्भात असलेला स्पष्ट stand सगळं काही न्याय प्रविष्ट करून ठेवलं आहे आत्तापर्यंतची जबाबदारी सरकारने पार पाडली आहे पुढेही पार पाडले . एकीकडे ब्राह्मण मुख्यमंत्री आरक्षण देणार नाही असा प्रचार होतं असताना राज्याच्या राजकारणात अगदी मुख्यमंत्री पदावर मराठा बसलेला असताना समाजाला आरक्षण का मिळाले नाही rather त्यांनी स्वतःच प्रयत्न का केले नाहीत असाही प्रचार social Media मध्ये होते होता .

  ReplyDelete
 9. खरं म्हणजे सीएम परिपक्व झाले असे वाटतं.... कारण अनेक बाबी बाबतीत विचार करून स्वतःला घडवू... म्हणून ते ही परिक्षा पास झाले... अर्थात हे एकट्या माणसाचे काम नाही.... परिस्थितीत म्हणजे योग्य वेळी पेरणी श्रेष्ठ असते....हा कालावधी असा आहे की... लोकांना महाराष्ट्र घडवायचा आहे.. बिघडवायचा नाही... अजून लोकांना खुपच अपेक्षा आहेत.. अशी संधी मिळाली म्हणजे यश फार लांब नाही..... भाजप महाराष्ट्रात सख्ख्या भावाला म्हणजे शिवसेनेला शह देतो, शड्डू ठोकतो आहे हे मोठे काम आहे... बाकींच्या बाबतीत कोण चांगला व कोण वाईट.... असं काही म्हणतात... त्या पेक्षा... आपली पोळी भाजून घेण्यात भाजप.. स्व.प्रमोद महाजन व स्व.गोपीनाथ मुंडे नंतर चांगला तयार झाला... मराठा प्रश्न न्यायप्रविष्ठ असुनही या बहुजन समाजास थोपविण्यासाठी.... श्री दानवे यांची नेमणुक... वारंवार सीएम साहेबांचा मिडियासमोर आश्वासनांचा एल्गार... शिवस्मारकासाठी केलेली घाई... यातून फत्ते... सर्व चाली..... यशस्वी ठरल्या......
  असं माझे वैयक्तीक मत आहे...

  ReplyDelete