Monday 20 February 2017

साऱ्यांच्याच नेतृत्वाची कसोटी ?

राज्यातील मनपा, जि.प. आणि पंचायत समित्यांचे निकाल लवकरच लागतील. त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भवितव्य अवलंबून असेल अशी मांडणी केली जात आहे. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याही नेतृत्वाची चाचणी याच निवडणुकीतून होणार आहे.

राज्यातील सरकारमध्ये असलेली भाजप - शिवसेना युती खरोखर मोडेल की नाही याचाही निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या नंतर होईल. गेल्या काही महिन्यांत राज्यभर मराठा क्रांती मोर्चाने वातावरण ढवळून काढले. बहुजन समाजाचेही मोर्चे निघाले. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली. मनपा, जि. प. व पंचायत समित्या निवडणुकींच्या वातावरणातही मराठा क्रांती मोर्चाने रास्तारोको केला. शिवाय, फडणवीस यांच्या भाजपला मतदान करु नका असे आवाहनही केले गेले.

प्रचारांच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे मंत्री गिरीश बापट आणि आमदार प्रशांत परिचारक यांची जिव्हा घसरली. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विद्यार्थ्यांना धमकावल्याची क्लिप व्हायरल झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही वादग्रस्त विधान केले. फडणवीस यांच्या पुण्यातील सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या. नाशिकमध्ये अशोक चव्हाण यांची सभा रद्द झाली. कार्यकर्त्यांच्या अपघातामुळे विलेपार्ल्यातही उध्दव ठाकरेंची सभा रद्द करावी लागली. परंतु सभा रद्द झाल्यावरुन लगेच मतदार दुरावलेला वैगरे निष्कर्ष काढणे घाईचे ठरते. असेच एक उदाहरण आठवते. पाच वर्षांपूर्वी (१९९२ मध्ये) पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा गर्दी अभावी रद्द केल्याची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेसने अनुवली आहे. तेव्हाही रिकाम्या खुर्च्यांची छायाचित्रे प्रसिध्द झाली होती. पण, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड मनपा जिंकली होती, हेही लक्षात घ्यावे लागेल.

अशा वातावरणात मोदी, शहा आणि फडणवीस लोकप्रियतेची परीक्षा देत आहेत. निवडणूक प्रचारात कोणत्याही पक्षात भावी नेतृत्व म्हणून प्रदेशाध्यक्षांकडे पाहिले जाते. जि. प. निवडणुका ग्रामीण भागाशी संबंधित आहेत. संपूर्ण प्रचार काळात कोणत्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने गर्दी खेचली हे जरा आठवून पाहा. सत्ताधारी आणि विरोधकातही कोण आहेत, असे मासबेस लीडर ?

आताची राजकीय स्थिती सर्वांसाठी परीक्षेचा काळ आहे. जनमताचा कौल काहीही लागला तरी तो प्रत्येकाला धडा शिकवणारा असेल. त्यामुळे अशा वातावरणात नेतृत्वबदलाचा कोणताही निर्णय करायला कोणीही धजावणार नाही. उत्तर प्रदेशात भाजपला दणका बसला तर ? मोदी व शहा यांना उत्तर द्यायचे आहे. महाराष्ट्रात भाजपला दणका बसला तर दुसरा नेता म्हणून गडकरी होवूच शकत नाहीत. कारण फडणवीस या नावाला नव्हे तर त्याच्या जातीच्या माणसाने राज्याचे नेतृत्व करावे हाच सध्या अनेकांना विखार आहे. मग फडणवीसची जागा गडकरींना देणे हा भाजपसाठी आत्मघातच ठरेल. भाजपत सध्यातरी रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे - पालवे यांनी नेतृत्व करावे अशी अपेक्षा असलेली फारशी मंडळी नाही.

मराठा क्रांती मोर्चाचे कार्ड विरोधात वापरुनही जर निवडणूक निकालाचे कौल भाजपच्या बाजूने गेले तर नेतृत्व बदलाचा विषयच असणार नाही. शिवसेना सत्तेतून बाहेर होईल का ? हे सध्याचे ज्येष्ठ होराभुषणकार तथा अनुभवी व ज्येष्ठ नेते शरद पवार हेही सांगू शकत नाहीत. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मोडतो मोडतो म्हणत ५ वर्षे पूर्ण केली होती. सत्तेचा मोह कोणालाही सोडवत नाही.  त्यामूळे नेतृत्व बदलाची किंवा मध्यावधीची हाळी देत राहणे या पलिकडे सध्या तरी काय करता येते ?? हे सर्व जर तर चे वातावरण पाहता खोचकपणाने असेच म्हणता येईल की, तूर्त पेशवाईतून सुटका नाही ... !!

No comments:

Post a Comment