Thursday 2 February 2017

आशा महोत्सव एक सांस्कृतिक उत्सव

आशा फौंडेशनतर्फे जळगाव शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी घेतला जाणारा आशा महोत्सव २०१७ दि. २५ व २६ जानेवारीस उत्साहात साजरा झाला. उत्सवाचे हे पाचवे वर्ष होते. नेहमी प्रमाणे नियोजन, आयोजन, सादरीकरण आणि पुरस्कार प्रदान सोहळा अशा सर्वच पातळ्यांवर हा आशा महोत्सव सर्वोत्तम ठरला. या मागील समाधानाची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे, आशा महोत्सवाचे या पुढील प्रायोजकाचे दायित्व जैन उद्योग समुहाने कायमचे स्वीकारले आहे. सर्व काही चांगले घडत असताना दुधात साखर पडणे याचा प्रत्यय येतो तो असा. 

जळगावमधील शाळांतर्गत स्नेहसंमेलने होतात. त्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात. मुला मुलींना आपले कलागुण दाखवायची संधी मिळते. कलात्मक कौशल्य वृध्दींगत करण्यासाठी मुले मुली आणि त्यांचे पालक शाळाबाह्य व्यावसायिक प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही घेतात. नृत्य, संगीत, संवाद आणि उत्तम सादरीकरण या गुणवैशिष्ट्यांच्या बळावर शाळांमधील अनेक सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरतात. त्यातून निखळ करमणूक तर होतेच सोबत सामाजिक संदेशही दिले जातात. मात्र, शाळांच्यास्तरावर कितीही उत्तम कार्यक्रम निर्माण झाले तरी त्याचा प्रेक्षक वर्ग हा केवळ त्या शाळेचे विद्यार्थी, पालक, शाळेचे शिक्षक, कर्मचारी व व्यवस्थापनापुरता मर्यादीत असतो. शाळेच्या परिघाबाहेरची संधी मुला मुलींच्या कलागुणांना उपलब्ध होत नाही.

शाळांमधील स्नेहसंमेलनात सादर होणारे उत्कृष्ट व सामाजिक संदेश देणारे चांगले कार्यक्रम एकत्रित करुन त्याचा सांस्कृतिक उत्सव साजरा करण्याची आशा फौंडशनची ही भन्नाट कल्पना मुला मुलींच्या कलागुणांना सामाजिक प्रसिध्दी व प्रचाराचे सन्मानजनक व्यासपिठ देणारी आहे. आशा फौंडेशनचे संचालक गिरीश कुळकर्णी यांनी पाच वर्षांपूर्वी हा एकत्रित सांस्कृतिक उत्सव सुरु केला. सुरुवातीला शाळांचा सहभागही मर्यादीत होता. परंतु पाचवे वर्ष साजरे करताना त्यात सहभागी होणाऱ्या शाळांची संख्या दुपटीने वाढली आहे. आशा फौंडेशनचा आशा महोत्सव आता जळगाव शहरातील शाळांचा सांस्कृतिक उत्सव झाला आहे हे नक्की. या उत्सवाला कायमस्वरुपी प्रायोजकाचे दायित्व देण्याचा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचा निर्णय योग्यच आहे.

आशा महोत्सवाच्या सादरीकरणाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती पहिल्या वर्षांपासून जपली जात आहेत. पहिले वैशिष्ट्य म्हणजे मुला मुलीच्या या उत्सवातील कार्यक्रमांचे सादरीकरण शालेय मुले व मुलीच उत्तम प्रकारे करतात. यावर्षी काशिनाथ पलोड शाळेचे मृण्मयी कुळकर्णी व सोहम वाणी यांच्यासह महाराणा प्रताप विद्यालयाची गायत्री नन्नवरे, यश चौधरी, ब. गो. शानभाग विद्यालयाचा प्रथमेश भालेराव, अ. वा. अत्रे विद्यालयाची सानिका शेटे  प्रत्यय झारे, डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाची तेजल भट यांनी ही जबाबदारी सांभाळली. मृण्मयी व सोहम यांनी गौरी व सौ. स्नेहा गाडगीळ यांची मुलाखत घेतली. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे काटेकोर नियोजन. उत्सव दोन दिवस साजरा होतो. त्यात सादर होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळा पाळल्या जातात. यासाठी आशा फौंडेशनची टीम महिनाभर सतत परिश्रम घेत असते. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवातील कार्यक्रमांचे तटस्थ आणि पारदर्शी परिक्षण. कला क्षेत्रातील मान्यवरांना सन्माननिय परिक्षक होण्याची संधी या उत्सवाने दिली आहे. अशा मंडळींच्या देखरेखीतून तयार होणारा निकाल हा गुणवत्तापूर्ण असतो. चौथे वैशिष्ट्य म्हणजे विशेष मुलांना (गतीमंद किंवा पूर्वीचा मतीमंद) सुध्दा कला गुण सादर करण्याची संधी उत्सवात मिळते. अशा विशेष मुलांचे सादरीकरण पाहताना आपसूक टाळ्या पडतात मात्र नजरेच्या कडा ओलावतात. पाचवे वैशिष्ट्य म्हणजे शाळांमधील नापास होणाऱ्या अथवा अभ्यासात मागे रेंगाळणाऱ्या मुला मुलींच्या गटालाही कलागुण सादरीकरणाची संधी मिळते. आशा फौंडेशनतर्फे जळगाव शहरातील काही शाळांमध्ये नापास अथवा अभ्यासात गतीमंद मुलांना मार्गदर्शनाचा शार्प प्रकल्प चालवला जातो. त्यातील मुला मुलींचे गट कलागुण सादर करतात. या गटातील मुले मुली ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील असतात. बहुतेकवेळा सादरीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च आशा फौंडेशनचे प्रशिक्षकच करतात. सहावे वैशिष्ट्य म्हणजे विजेत्या पथकांना रोख पारितोषिक (ठराविक रकमचे साहित्य खरेदीसाठी सहकार्य) दिले जाते. अशा पारितोषिकांमुळे शाळांच्या व्यवस्थापनाचे लक्ष उत्सवाकडे वेधले जाते आणि सहभागी होण्याची संख्या वाढते. सातवे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक क्षेत्रात गुरुतुल्य आणि दीपस्तंभाप्रमाणे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा आशा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जातो.

आशा महोत्सवाचे सातवे वैशिष्ट्य नाविन्यपूर्ण आहे. ते म्हणजे पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नव्या क्षेत्रात ओळख तयार करणाऱ्या आणि जळगावातील युवकांसाठी आदर्श ठरू शकतील अशा आयडॉल्सला बोलावले जाते. यावर्षी पैरालिम्पीकमध्ये सिल्वर मेडल मिळवणारी विशेष घटकातील गौरी गाडगीळ व तिची आई सो. स्नेहा गाडगीळ हे मान्यवर पाहुणे होते. दूरदृष्टीची, धोरणी, निश्चयी आई सौ. स्नेहा आणि जिद्द व परिश्रमाच्या बळावर आपल्यातील कमतरतेवर मात करणारी कन्या गौरी यांच्या मुक्त संवादाने उत्सवाच्या समारोपाला उत्तुंग उंची गाठली. सारे वातावरण भारावणारे होते. जळगावकर स्तब्धही झाले आणि पालकत्व निभावण्याची वेगळी बाजू समजून घेत अंतर्मुखही झाले.

गिरीश कुळकर्णी व प्रशांत महाशब्दे यांच्या सहकार्यामुळे मला सौ. स्नेहा गाडगीळ यांच्याशी बोलता आले. गौरीच्या प्रवासाविषयी वाचून जुजबी माहिती होती. प्रत्यक्षचर्चेत अनेक गोष्टी कळल्या. गौरीला योग्य प्रकारचे शिक्षण मिळावे म्हणून गाडगीळ दाम्पत्य जळगाव सोडून पुण्यात गेले. तेथे सुध्दा गौरीच्या शिक्षणात सातत्याने लक्ष घालावे लागते आहे. गौरीतील वैगुण्य पाहून निराश होण्यापेक्षा तिच्यातील क्षमतांची बलस्थाने शोधून त्याचा विकास करण्याकडे लक्ष दिले. याचाच चांगला निष्कर्ष म्हणजे गौरीला पोहण्याच्या प्रकारात कौशल्य मिळवाता आले. या कौशल्याची कसोटी तपासता येईल असे पैराऑलम्पिक हे क्रिडा क्षेत्र निवडले. या प्रवासात गौरी आणि आई सौ. स्नेहा या दोघी सेलिब्रीटी झाल्या. हा प्रवास थक्क करणारा आहे.

चर्चेच्या शेवटी मी सौ. स्नेहा गाडगीळ यांना विचारले, पुनर्जन्मावर विश्वास असेल तर पुन्हा गौरीची आई व्हायला आवडेल ? या प्रश्नावर त्यांनी थांबून पण शांतपणे स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. सौ. स्नेहा म्हणाल्या, खरे सांगते. मी प्र्याक्टीकल आई आहे. गौरी जन्माला आल्यानंतर आजपर्यंतच्या प्रवासात अनेक अनुभव घेतले. आम्ही ठरवून कृती केली. त्यातून गौरी उभी राहते आहे. पण पुन्हा गौरीची आई कुणीही होवू नये. म्हणजे विशेष मूल जन्मालाच येवू नये. आता गर्भावस्थेत काही विश्वासार्ह चाचण्याकरुन मुलांच्या शारिरीक व मानसिक अवस्थांचा निष्कर्ष काढता येतो. मी आजच्या पालकांना थेट सांगेन की मूल जन्माला येण्यापूर्वी अशी चाचणी निग्रहाने करा. दोष आसेल तर ते मूल जन्माला येवू देवू नका. यासाठी कायदेशीर सहाय्य घ्या. गौरीची कहाणी शेकड्यात एक आहे. उरलेल्या ९९ गौरींची आई होणे तेवढेच अवघड आणि कठीण आहे .... सौ. स्नेहा गाडगीळ यांचे उत्तर संपले होते. मी मात्र प्रत्येक शब्द ऐकून स्तब्ध होतो. नंतर प्रकट संवादातही सौ. स्नेहा गाडगीळ यांनी हेच सांगितले.

आशा फौंडेशनचा रंगारंग पाचवा आशा महोत्सव अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. या बद्दल आशा फौंडेशनच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन !!!


1 comment:

  1. दिलीपराव, आपण आपल्या सिद्धहस्त लेखणीतून आशा महोत्सवाचे केलेले विश्लेषण उत्साहवर्धक व प्रेरणादायी आहे. खूप वेळेस असा प्रश्न येतो हे सर्व केल्याचा आपल्याला फायदा काय ? पण आपण मांडलेला जळगावचा सांस्कृतिक उत्सव शेवटी ' याचिसाठी केला अट्टहास... ' हि उक्ती सार्थ ठरविणाराच... मनापासून धन्यवाद !

    ReplyDelete