Thursday 5 January 2017

प्रवाहाच्या दिशेने पोहताना ... !!

आज दि. ६ जानेवारी २०१७. आद्य पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकारदिन. यानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना पत्रकारदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी एक वर्षाची कारकिर्द पूर्ण झाली. या एक वर्षाच्या कालपर्वाला प्रवाह म्हटले तर माझी कारकिर्द ही त्या प्रवाहात पोहणाऱ्या व्यक्ती सारखी आहे. त्याचेच हे सिंहावलोकन.

प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्याला कुशल म्हटले जाते. पण जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या कार्य प्रवाहात पोहायचे असेल तर प्रवाहाच्याच दिशेने पोहाण्याचे कौशल्य हवे. कारण, हा प्रवाह परंपरेचा आहे. अनेक आजी माजी लोकांशी नाळ जुळलेला आहे. अशा सर्व लोकांना सांभाळून प्रवाहात पोहताना स्वतःचा ओंडकाही होवू द्यायचा नसतो आणि प्रवाहाच्या बाहेरही व्हायचे नसते. जिल्हा पत्रकार संघ स्थापन करण्यासाठी स्व. ब्रिजलालभाऊ पाटील आणि त्यांच्या सोबत इतरांनी प्रचंड मेहनत केली. पत्रकारांना फारशी प्रतिष्ठा आणि हाती पैसा नसताना त्यांचे संघटन करणे त्याकाळी अवघड होते. तरीही त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा पत्रकार संघ उभा राहीला. त्यांच्यानंतर अनेक ज्येष्ठांनी संघाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले आणि लक्षवेधी कामही केले. परंपरेच्या या प्रवाहात मी गेल्यावर्षी उडी मारली.

नदीकाठी किंवा तलावावर पोहायला गेलो की काठावर गंमत पाहाणारे काही मोजके जण असतात. स्वतःला पोहता येत नसले की, बहाणे बनवून केवळ सल्ले देतात. मलाही तसाच अनुभव आला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कशासाठी होत आहात ? अशा कुत्सित प्रश्नापासून तर तेथे असलेली इतर जुनी मंडळी तुम्हाला काही करु देणार नाही असा शहाजोग सल्ला देणारे अनेक भेटले. पण, गेल्या वर्षभरात पत्रकार संघाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील व सचिव अशोकअप्पा भाटीया या दोघांनी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मला मुक्तपणे कार्य करु दिले. त्यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, विश्वस्त आणि भवन पदाधिकारी यांचे मी आभार मानायला हवे.

जळगाव जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून मला काय करता आले ? याचा आढावा घेताना लक्षात येते की, १२ महिन्यात जवळपास ९ उपक्रम किंवा कार्यक्रम मी घेवू शकलो. त्यातील प्रत्येक कार्यक्रम हा संघासाठी माईलस्टोन ठरला. त्याची चर्चा झाली.

संघाचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मी सर्व प्रथम पत्रकारांसाठी दोन कार्यशाळा घेतल्या. पहिली बातमी लेखनाविषयी होती. दुसरी व्यक्तिमत्व विकासावर होती. यासाठी आशा फाऊंडेशनचे संचालक गिरीश कुळकर्णी मार्गदर्शक होते.

संघातर्फे महिला पत्रकारांच्या सत्काराचा लक्षवेधी कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील जवळपास ५० महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पीपीआरएलचे विनय पारख, वसंतस् सुपर शॉपचे नितीन रेदासानी, आर्यन पार्कच्या डॉ. सौ. रेखा महाजन, आयएनआयएफडीच्या संचालिका सौ. संगिता पाटील यांनी सहकार्य केले. सौ. भावना शर्मा यांनी नियोजन केले होते.

मध्यंतरी पत्रकार संघात सदस्य व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशा उपक्रमात पत्रकार मंडळी फारशी सहभागी होत नाही असा निराशाजनक अनुभवही आला. पत्रकार मंडळी हेल्थ चेकअपकडे दुर्लक्ष करतात आणि आजारांना सामोरे जातात हा नेहमीचाच अनुभव आहे.

वयाचे अर्धशतक पूर्ण केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी आणि त्यांना सरकारी मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी दोनवेळा बैठका झाल्या. पत्रकारांसाठी बांभोरी शिवारात असलेल्या गृहनिर्माण सोसायटीतील प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले.

जळगाव शहरातील वाहनांवरील फैन्सी नंबर प्लेट बदलाव्यात म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांच्यासोबत लोकजागर अभियान राबविले. या अभियानाचा सन्मान राखत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे व महापौर नितीन लढ्ढा यांनी वाहनांवरील नंबरप्लेट नियमानुसार केली.

गतवर्षी सर्वात गेगा ईव्हेंट ठरला तो मीडिया ट्रायल या विषयावरील टॉक शो. या कार्यक्रमासाठी जळगावमधील अत्रे प्रतिष्ठान व नवजीवन सुपर शॉप पत्रकार संघासोबत आले. मीडिया ट्रायल या विषयावर चर्चेसाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, आयबीएन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, मुंबई उच्च न्यायालयातील ॲड, उदय वारुंजीकर हे जळगावात आले. या कार्यक्रमासाठी कांताई हॉल तुडूंब भरला.

यानंतर उल्लेखनीय कार्यक्रम झाला तो उमविचे नवे कुलगुरु प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या नियुक्तीनंतर पहिल्या सत्काराचा. जळगाव जिल्हा पत्रकार संघात दैनिकांच्या सर्व संपादकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष होते जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन.

त्यानंतर आज प्रवाहाचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असताना संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान व जीवन गौरव सन्मान दिले जात आहेत. विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते हे सन्मान प्रदान होतील. अशा प्रकारचे हे सन्मानही अलिकडे पहिल्यांदा दिले जात आहे. यानिमित्त घडलेल्या अनेक घडामोडींचा स्वतंत्र लेख होईल. एक मुद्दा मुद्दाम स्पष्ट करायला हवा. पत्रकारांना सन्मान हवा असेल तर त्यांनी त्यासाठी संघाकडे अर्ज करावा ही अट होती. त्यामुळे ज्यांनी अर्ज केले त्यांच्यातूनच निवड झाली. आता खोचकपणे यावर टीपणी करणारे विषय काढले जावू शकतात.सन्मान याला द्यायला हवा  होता, त्याला द्यायाला हवा होता असे सूचविले जाईल. मात्र मी याकडे व्यक्तिगत दुर्लक्ष करतो. पत्रकार संघाचा प्रवाह हा समुहनिष्ठ आहे, व्यक्तिनिष्ठ नाही.

जिल्हा पत्रकार संघाच्या प्रवाहात पोहताना प्रवाहाच्या दिशेनेच पोहावे लागते. येथे विरोधात पोहून दाखवायचे कौशल्य फारसे उपयोगाचे नाही. मी जेव्हा जिल्हाध्यक्ष व्हायचे ठरवले तेव्हा अनेक विषय समोर होते. काय जमेल आणि काय नाही ? हा प्रश्न होताच. नंतर लक्षात आले की प्रवाहासोबतच काम करणे योग्य असते. फक्त तसे करताना आपणही बुडायचे नाही आणि इतरांनाही बुडू द्यायचे नाही. जिल्हाध्यक्ष असण्याचे हेच खरे कौशल्य अंगी असावे.

जळगाव जिल्हा पत्रकार संघात स्व. ब्रिजलालभाऊ पाटील व स्व. भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांचे अर्ध पुतळे स्थापित करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन सहकार्य करीत आहेत. या संकल्पपूर्तीकडे प्रवाहित होत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. पूर्णविराम देतो. धन्यवाद.

2 comments:

  1. श्रीमान दिलीप तिवारीजी...
    आपले वर्षभरातील काम हीच वेगळी ओळख बनेल. जेथे संघटन तेथे मोठ्या पदावर होणारी कसरत मीदेखील अनुभवली आहे. पण हे करत असतांना आपली वेगळी छाप हीच आपली आेळख साऱ्यांच्या स्मरणात राहते. आपल्या वर्षभरातील कार्याला सलाम...!
    पत्रकारदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...!

    .....संजय सूर्यवंशी,
    तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ, अमळनेर.

    ReplyDelete
  2. श्रीमान दिलीप तिवारीजी...
    आपले वर्षभरातील काम हीच वेगळी ओळख बनेल. जेथे संघटन तेथे मोठ्या पदावर होणारी कसरत मीदेखील अनुभवली आहे. पण हे करत असतांना आपली वेगळी छाप हीच आपली आेळख साऱ्यांच्या स्मरणात राहते. आपल्या वर्षभरातील कार्याला सलाम...!
    पत्रकारदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...!

    .....संजय सूर्यवंशी,
    तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ, अमळनेर.

    ReplyDelete