Monday 16 January 2017

सोशल मीडियातील अर्धवट शहाणे !!

सोशल मीडियातील फेसबुक आणि व्हाट्स ॲप या दोन ॲपचा वापर कम्प्युटर आणि मोबाईल अशा दोन्ही प्रकारे करता येतो. त्यामुळे बहुतांश मंडळी २४ तास या दोन्ही ॲपवर "लगे रहो" अवस्थेत असतात. काहींना तर दर ५ मिनिटात हे दोन्ही ॲप उघडून इतरांचे काय चालले आहे असा चाळा करायची सवय लागली आहे. हे लक्षण व्यसन किंवा मानसिक विकाराचे असते असे मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात.

सोशल मीडिया कशासाठी असतो ? हेच भारतीय माणसाला नीट समजलेले नाही. त्यामुळे त्याला जे वाट्टेल ते सर्व काही तो फेसबुक व व्हाट्स ॲपच्या प्रवाहात सोडून देतो. चांगल्या आशयाची गंगा आपल्या कृतीमुळे कुचकट विचारांची गंगा कशी होईल ? याचाच प्रयत्न काही जण करतात. त्याची काही उदाहरणे मुद्दाम येथे देत आहे.

फेसबुक व व्हाट्स ॲप हे समुह माध्यम असले तरी त्यात व्यक्तिगत संपर्काची सोय आहे. ही सोय लक्षात घेवून काही संवाद, संदेश हे फेसबुकवर मेसेंजरद्वारे आणि व्हाट्स ॲपवर थेट पाठवता येतात. पण, सोशल मीडियातील अर्धवट शहाणे याचा वापर कधीही करत नाहीत. अशा लोकांमुळे समुह संवादाची ही माध्यमे व्यक्तिगत वादविवादाचे आखाडे बनतात.

आता पहिला अर्धा शहाणा पाहू - व्हाट्स ॲपवर कोणत्याही विचारांची, मत मांडणारी पोस्ट शेअर झाली की त्यातील विचार अथवा मत यावर अनुकूल अथवा प्रतिकूल प्रतिक्रिया अपेक्षित असते. मात्र काही अर्धे शहाणे हे पोस्ट शेअर करणाऱ्यावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करण्यावर उतरतात. अशा हेतूने पहिली प्रतिक्रिया देणारा नंतर आसुरी आनंद घेत पोस्ट शेअर करणाऱ्याची अधिकाधीक बदनामी करण्याचा चंग बांधतो.  अशी अर्ध शहाणी मंडळी मानसिक दृष्ट्या धोकादायक असते. त्यांना अनफ्रेंड करणे किंवा ब्लॉक करणे हा उत्तम पर्याय.

आता दुसरा अर्धा शहाणा पाहू - एखादा उपक्रम किंवा योजना सोशल मीडियातून शेअर केली की, त्यावर सल्ला देण्याचे काम काही जण सतत करीत असतात. हा सल्ला काय असतो ? तर हे असे नको, ते तसे हवे, यात हे असे करा, त्यात याला घाला. असे सल्ले व्यक्तिगत दिले गेले पाहिजेत. तसे न करता ही मंडळी जाहीरपणे खुस्पट (हाच शब्द योग्य) काढत बसतात. ही प्रवृत्ती अर्ध शहाण्यातला प्रकार आहे, पण खुस्पट काढले की अशी मंडळी स्वतःला जगातील शहाणे आपणच असे समजू लागते. जगाचे शहाणपण मलाच आहे असे समजणे हा मानसिक आजार आहे. अशा सदस्यांना गृपमधून रिम्हू करणे हाच उत्तम पर्याय असतो.

आता पाहू तिसरा अर्धा शहाणा - या प्रकारातील बहुतांश मंडाळी ही एका विशिष्ट विचारांची, संघटनेची किंवा राजकीय पक्षांशी बांधिलकी ठेवून असते. अशा लोकांची ओळख कार्यकर्ता, समर्थक, भक्त, अनुयायी, स्वयंसेवक, सैनिक, पंथिय अशा विभागणीतही असते. आपण ज्या विचारधारा, पक्ष याचे समर्थन करतो, त्याची सकारात्मक बाजू अशी मंडळी मांडत नाहीत. कारण त्यांचा स्वतःचा तसा काही अनुभव नसतो. बहुतांशवेळा कॉपी, पेस्ट आणि फॉर्वर्ड असेच यांचे काम असते.  यात सर्वांत धोकादायक मंडळी म्हणजे २४ तास विरोधी विचारधारेतील खोड्या काढणे. म्हणजे, सरकार-पंतप्रधान-मुख्यमंत्री हे काय करतात यावरच टीका, टीपण्णी करण्यात ही मंडळी व्यस्त असते. कुठून कुठून पोस्ट शोधून आणतात आणि टाकतात हेच समजत नाही. एक गोष्ट मात्र चांगली असते. अशा लोकांमुळे फेसबुकवर कमेंटची संख्या वाढते आणि व्हाट्स ॲपवर गृप जिवंत असतो.

आता पाहू चौथा अर्धा शहाणा - कधी कधी फेसबुक किंवा व्हाट्स ॲपवर एखाद्या गंभीर विषयाची चर्चा सुरु असते. कमेंट पडत असतात. त्याचवेळी अर्धी शहाणी मंडळी भलतेच मेसेज गृपमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकत असते. फेसबुकवरचा अनुभव असा आहे की, काही जण कमेंट बॉक्समध्ये प्रमोश्नल किंवा व्यावसायिक मेसेज टाकतात. अशा सदस्यांच्या या विकृतीवर सध्या कोणताही ईलाज नाही.

आता पाहू पाचवा अर्ध शहाणा - अशी मंडळी गृपमध्ये केवळ गुडमॉर्निंग, गुडनाईट, वाढदिवस संदेश टाकायचे काम करते. त्यांना इतर वैचारिक चर्चेत रस नसतो. एखादी निधनवार्ता टाकली तरी ती न वाचता ही मंडळी वाढदिवस शुभेच्छा संदेश कॉपी पेस्ट करून टाकतात. संबंधित व्यक्ती गृपमध्ये सदस्य नसेल तरी त्यांना शुभेच्छा देवून आपले प्रेम जाहीर करतात.

आता पाहू सहावा अर्ध शहाणा - फेसबुकवर आणि व्हाट्स ॲप गृप काही विशिष्ट हेतू वा कार्य निश्चित करुन तयार होतात. अशा ठिकाणी त्याच विषयाशी संबंधित चर्चा होणे अपेक्षित असते. पण फॉर्वर्ड या बोटांच्या वाताची लागण झालेली मंडळी गृपशी संबंध नसलेले मेसेज फॉर्वर्ड करीतच राहतात. असा मेसेज कोणी टाकलाच तर एक अर्ध शहाणा त्यावर लक्ष ठेवून असतोच. तो स्वतः कधी मेसेज टाकत नाही पण चुकून आलेल्या मेसेजवर हा कमेंट करतोच, असे मेसेज टाकू नका.

आता पाहू सातवा अर्ध शहाणा - सोशल मीडिया इंटरनेट डाटा वापरुन चालतो. म्हणजेच त्याला खर्च आहे. मेसेज टाकणारा आणि वाचणारा, पाहणारा असा दोघांचा डाटा खर्च होतो. याचा विचार न करता स्वतःचे ४ ते १० फोटो टाकणारे, हातभर लांब लेख टाकणारे, व्हाट्स ॲप किडा असा मेसेज टाकणारे, हा मेसेज पुढे १० जणांना फॉर्वर्ड करा हा बिनडोक सल्ला देणारे कित्तेक जण फेसबुक व व्हाट्स ॲपवर दिसतात. खरे तर अशा लोकांना गृपमधून रिम्हू केले पाहिजे. आपले भरपूर फोटो असतील तर अल्बम तयार करा व घरी इतरांना चहाला बोलवून दाखवा, अशी विनंती या मंडळींना करावी.

आता पाहू आठवा अर्ध शहाणा - हा अर्ध शहाणा स्व प्रेमात असतो. तो स्वतःसाठी किंवा स्वतःच्या, संस्थेच्या ब्रैण्डींगसाठी फेसबुक अथवा व्हाट्स ॲप गृप चालवतो. त्यासाठी तो स्वतःविषयीच्या हातभर पोस्ट किंवा भरपूर फोटो शेअर करतो. त्याची अपेक्षा असते केवळ आणि केवळ माझ्याविषयी किंवा माझ्या कार्याविषयीच कमेंट करा. अशा गृपमध्ये मग स्तुति पाठकांचा जमघट होतो. ही मंडळी फक्त टाळ्या पीटतात. अंगठे दाखवतात. किंवा तू ग्रेटच असे संदेश टाकतात. अशा गृपमधून आपण बाहेर पडणे चांगले.

आता पाहू नववा अर्ध शहाणा - टाक फोटो आजार असलेली काही मंडळी फेसबुक आणि व्हाट्स ॲपवर दिसतात. पिझ्झा खातोय ... टाक फोटो. पोर जन्माला आले ... टाक फोटो. वाढदिवसाला बायकोला, पोरीला कवटाळले ... टाक फोटो. कोणा पुढाऱ्याला भेटलो ... टाक फोटो. सोशल मीडियात फैमिलीअर फोटो किंवा आयुष्याची गुपीते शेअर करु नयेत. त्याचा गैरवापर होवू शकतो. पण काही मंडळी फक्त बाथरुम, टॉयलेट व लैट्रीनमधील फोटो वगळता आपले सारे फोटो शेअर करतात. अशा काही फोटोंमध्ये आपले शरीर, त्याचे उठाव कसे दिसत असतील याचे भानही अनेकांना नसते. महिला तर याकडे लक्ष देत नाहीत.

आता पाहू दहावा अर्ध शहाणा - फेसबुकवर इतरांना कारण नसताना टैग करणारी, इतरांच्या वॉलवर पोस्ट शेअर करणारी, व्हाट्स ॲपवर ब्रॉडकास्ट लीस्टमधून मेसेज टाकणारी मंडळी त्रासदायक असते. एखाद्या सामुहिक विषयात सोबत असलेल्या व्यक्तीला फेसबुकवर टैग केले तर चालू शकते. पण कोणताही संबंध नसताना टैग करणे हा मूर्खपणाच. व्हाट्स ॲप प्रकारात मी स्वतः ब्रॉडकास्ट लीस्ट वापरतो. कोणी नाकारले तर त्याचे नाव कमी करतो. पण तुम्हाला असे मेसेजच यायला नको असतील तर ब्रॉडकास्ट करणाऱ्याचा नंबर मोबाईलमधून डिलीट करा. पुन्हा तो मेसेज पाठवू शकणार नाही. असाच प्रकार फेसबुकवर गृपचा आहे. नको असलेला गृप लेफ्ट करा किंवा तो ब्लॉक करा.

आता पाहू अकरावा अर्ध शहाणा - फेसबुकवर व व्हाट्स ऍपवर कोणतीही माहिती टाकल्यानंतर ती खरी किंवा खोटी याविषयी कोणतीही शहनिशा न करणारे काही जण असतात. त्यांना काहीही माहिती पुढे पाठवायची घाई असते. अशा वेळी अपघात, मुलगा हरवला, रक्त हवे अशा पोस्ट फिरतच असतात. मोदींना जगात पहिला क्रमांक हे सुद्धा तसेच. जन गण मन हे राष्ट्रगीत सर्वोत्तम ठरलेही तशीच लोणकढी पोस्ट. आपली चूक झाली की अशी मंडळी खुलासा करते, मी पाहिली नाही. तशीच फॉर्वर्ड केली.

असे अनेक प्रकार सोशल मीडियातील अर्ध शहाण्यांचे असतात. कधी कधी चुकून माकून प्रत्येक जण अशा स्टेपमधून जातो. ते व्हायरल इन्फेक्शन असते. वारंवार तसेच वागलो तर त्याचा क्रॉनिकल आजार होतो. तसे होवू नये म्हणून त्यांना अर्ध शहाणे म्हटले आहे. आजार पूर्ण बळावला की अशी मंडळी पूर्ण शहाणी होते. मग त्यावर कोणताही ईलाज नसतो.

1 comment: