Thursday 12 January 2017

खंबीर कुटूंबप्रमुख राष्ट्रमाता जिजाऊ

सध्याच्या चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेत विवाहित पुरूष आणि महिलांना आपापल्या सासर किंवा माहेरातील नाते संबंध जपताना अथवा टीकवून ठेवताना अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडचणींचा सामना करावा लागतो. बहुतांश कुटुंबात सासर आणि माहेरातील नाते संबंध हे लहान-मोठ्या कारणांमुळे किंवा समज-गैरसमजातून ताणलेले, अबोला धरलेले असतात. मोजक्या कुटुंबात नाते संबंधात टोकाचे वैमनस्य निर्माण होवून ते पिढीजात पुढेही झीरपत जातात. अशावेळी महिलांची अवस्था संभ्रित होते. त्यांच्या मानसिक अवस्थांची घालमेल होते. नाते संबंध सुधारण्यास मध्यस्थी करावी किंवा न करावी अशा द्विधा अवस्थेत महिला असतात. अशा कौटुंबिक संघर्षात अडकलेल्या महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रातील काही प्रसंग योग्य तो निर्णय घेण्याची प्रेरणा व दिशा देतात.

(वैधानिक इशारा - हा लेख इतिहासातील व्यक्तिमत्त्वांच्या विषयीचे संशोधन नाही. लेखी स्वरुपात व इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही संदर्भांची सुसंगत रचना करुन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या व्यक्तिमत्वाचे कौटुंबिक संघर्षातील खंबीर, अविचल व निश्चयी असे पैलू मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. लेखातील संदर्भात चूक असेल तर ती दुरुस्त करण्याची तयारी आहे. ज्या कोणाला तसे वाटेल त्यांनी आपले मत प्रतिक्रियेत जरुर नोंदवावे. तपशीलात योग्य तो बदल जरुर केला जाईल.)

राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरित्रातील अनेक प्रसंग हे त्यांच्या बहुगुणी व सर्वव्यापी व्यक्तिमत्वाचा प्रत्ययकारी परिचय देतात. स्वराज्य निर्मिती आणि विस्ताराच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारांचा प्रभाव जाणवतो. भोसले परिवारात कुटूंब प्रमुख म्हणून जिजाऊंची भूमिका प्रारंभापासून निर्णायक ठरत जाते. निजामशाही व अदिलशाहीच्या दरबारात चाकरी करताना शहाजी राजे सातत्याने वेगवेगळ्या प्रांतातील मोहिमांवर गुंतलेले दिसतात. त्यामुळे शिवाजी राजे यांचे बालपण, शिक्षण, स्वराज्याची शपथ व स्थापना, त्याचा विस्तार अशा अनेक टप्प्यांवर कुटूंब प्रमुख म्हणून राष्ट्रमाता जिजाऊंनीच बहुतांश निर्णय हे दूरदृष्टीने, खंबीरपणे, अविचलीत राहून ठाम निश्चयाने घेतल्याचे स्पष्टपणे लक्षात येते.

या सर्व घटनाक्रमात भोसले व जाधव कुटुंबातील संघर्षाचेही काही प्रसंग आहेत. हे प्रसंग टोकाचे आणि आपापसात हातघाईचेही आहेत. अगदीच टोकाला गेलेल्या काळात पती सोबत जायचे की, माहेरच्या मंडळींसोबत राहायचे अशीही द्विधा मनःस्थिती जिजाऊंनी अनुभवली आहे. मात्र, या निर्णायक प्रसंगी जिजाऊंनी खंबीरपणे शहाजी राजांची साथसोबत करुन माहेराशी असलेले मोहाचे व रक्ताचे पाश तेवढ्याच निश्चयाने तोडलेले दिसतात. राष्ट्रमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व या अनुषंगाने भावते आणि प्रेरित करते. जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील हे पैलू आजच्या कुटूंब व्यवस्थेतील विवाहित महिलांनी समजावून घेतले तर लहान-मोठ्या वाद-विवादातून अथवा समज-गैरसमजातून उध्वस्त होत जाणारी कुटूंब व्यवस्था सावरण्याची दिशा विवाहित महिलांना मिळणार आहे.

राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरित्रातील अशा कौटुंबिक संघर्षाची मालिका त्यांच्या लग्नापूर्वीपासून सुरू होते. तेव्हा पासूनच्या काही प्रसंगाची सुसंगत रचना केली तर जिजाऊंचे चरित्र खंबीर कुटूंब प्रमुख महिला म्हणून डोळ्यांसमोर उभे राहते.

जिजाऊंचे माहेर म्हणजे सिंदखेडराजा येथील जाधव घराणे. सिंदखेडकर जाधवांचे घराणे हे मूळ देवगिरीच्या यादव वंशाचीच उपशाखा होती. या घराण्यातील राजे लखुजी हे जिजाऊंचे वडील होते. आई म्हाळसाई होत्या. राजे लखुजी हे निजामाच्या दरबारी पंच हजारी मनसबदार होते. राजे लखुजींचे खरे नाव लक्ष्मणसिंह होते, तथापि ते लखुजी नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. जाधव कुटुंबात दि. १२ जानेवारी १५९८ रोजी जिजाऊंचा जन्म झाला. राजे लखुजी यांनी आपल्या मुलांबरोबरच जिजाऊंना देखील राजनीतीयुद्धकलेचे शिक्षण दिले. त्यामुळे एक लढवय्यी कन्या म्हणून जिजाऊंना बालपणीच कर्तव्य कठोर होण्याचा संस्कार मिळाला.

राजे खुली यांचे धाकटे बंधू जगदेवराव होते. यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे राजे लखुजी यांनी आपले पूत्र बहादूरजी यांना भावास दत्तक दिले होते. यावरून राजे लखुजी आणि जगदेवराव यांच्यातील भातृप्रेमाची कल्पना येते.

इतिहासाच्या पानांत एक संदर्भ असा आहे की, भोसले घराण्यातील मालोजी राजे भोसले आणि त्यांचे भाऊ विठोजी राजे हे सन १५७७ च्या दरम्यान सिंदखेड येथे राजे लखुजी यांच्याकडे नोकरीस होते. सन १५९४ मध्ये सिंदखेड येथे मालोजी राजे दीपाबाई (उमाबाई) यांच्या कुटुंबात शहाजी यांचा झाला. सन १५९९ च्या दरम्यान मालोजी राजे यांनी राजे लखुजी यांची नोकरी सोडून अहमदनगरच्या निजामाची नोकरी पत्करली. राजे लखुजी हे निजामाचे मनसबदार होते. त्याचप्रमाणे मालोजी राजेही मनसबदार झाले. मालोजी राजेंचे पूत्र शहाजी होते तर राजे लखुजींची कन्या जिजाऊ होती. मधल्या काळात शहाजी व जिजाऊ हे मोठे झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव समोर आला. या संदर्भातही वेगवगेळ्या मान्यवरांनी मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येते. त्यात निजामानेही पुढाकार घेतला असा संदर्भ आहे. सन १६०५ मध्ये शहाजी आणि जिजाऊंचा विवाह दौलताबाद येथे झाला. शहाजी हे पराक्रमी, राजकारणी मुत्सद्देगिरीत प्रविण होते. त्यांची कीर्ती निजामापर्यंत पोहचली होती. मधल्या काळात मालोजी राजे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहाजी यांनी निजामाकडे चाकरी पत्करली. राजे लखुजी आणि शहाजी हे दोघेही निजामाचे मनसबदार झाले.

मध्यंतरी एक दुर्देवी घटना घडली. एकदा निजामाचा दरबार संपल्यावर सर्व सरदार आणि त्यांचा जमाव दरबाराच्या बाहेर पडत होते. राजे लखुजी हे तेथून पुढे निघून गेले होते. सरदार खडांगळे याचा एक हत्ती बिथरला. तो रस्त्याने धावत सुटला. जे समोर येतील त्यांना धक्के मारू लागला किंवा सोंडेत धरुन बाजुला फेकू लागला. लोक सेरावैरा धावू लागले. या कोलाहलात राजे लखुजी यांचा मुलगा दत्ताजी तेथे पोहचले. त्यानी सोबतच्या सैनिकांना हत्तीला जेरबंद करायची सूचना दिली. पण हत्ती काही कह्यात येत नव्हता. तेव्हा संतप्त झालेल्या दत्ताजी यांनी हातात तलवार घेवून हत्तीसमोर उडी मारली. त्याच वेळी शहाजी यांचे भाऊ संभाजी हेही तेथे आले. संभाजी यांनी दत्ताजी यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, दत्ताजी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी संतापाच्या भरात तलवारीने हत्तीची सोंड कापून टाकली. हत्ती किंचाळत निघून गेला. मात्र, आपल्याला रोखणाऱ्या संभाजींवर दत्ताजी हे तलवार उगारुन धावून गेले. हे पाहून भोसले-जाधव सैनिकांमध्ये खडाजंगी सुरू झाली. दत्ताजी संतप्त होते व विवेक हरवून बसले होते. त्यांना जाणिव राहिली नाही की, संभाजी हे जिजाऊंचे दीर आहेत. संभाजी यांनी स्वतःचा बचाव करायला तलवार काढली. त्यानंतर दोघांच्या तलवारी चालल्या. त्यात संभाजींच्या हातून दत्ताजी मारले गेले. दत्ताजी हे संभाजींच्या तलवारीने मारले गेल्याचे राजे लखुजी यांना समजले. तेही तेथे आले. तेव्हा जाधव-भोसले सैनिकात तलवारी चालतच होत्या. मुलाच्या मृत्यूमुळे बेभान झालेले राजे लखुजी यांना तेथे शहाजी राजे दिसले. त्यांनी थेट जावायावर तलवारीने हल्ला केला. हा हल्ला अनपेक्षित असल्याने शहाजी राजे यांच्या खांद्याला मोठी दुखापत होवून ते बेशुद्ध पडले. त्यांना सोडून राजे लखुजी यांनी नंतर संभाजी यांच्यावर वार केले. त्यात ते मारले गेले. जाधवच्या बदल्यात भोसले धाराशाही पडले. नंतर निजामाने जाधव-भोसले यांच्यातील हा वाद शमविला. या घटनेत जिजाऊंनी भाऊ आणि दीर गमावला. इतिहासाच्या पानात या घटनेविषयी काही संदर्भ विभिन्न प्रकारे आहेत.

एक गोष्ट नक्की की, या घटनेनंतर जिजाऊंच्या समोर सासर-माहेर असा नवा संघर्ष उभा ठाकला. जाधव कुटुंबियांनी जिजाऊंना माहेरी राहण्याचा आग्रह केला. परंतु, जिजाऊंनी पतीशी एकनिष्ठ राहत माहेराशी असलेले नाते व भावनिक संबंध पूर्णतः तोडले. त्या खंबीरपणे प्रसंगाला सामोऱ्या गेल्या.

भोसले-जाधव कुटुंबातील वादाचे प्रसंग नंतरही वेगवेगळी वळणे घेत उभी राहतात. निजामशाहीत काम करताना शहाजी राजे हे विविध प्रकारच्या मोहिमा फत्ते करीत होते. त्यामुळे निजामाने त्यांच्यावर खुश होत त्यांना स्वंत्रपणे मनसबदारी, जहागिरी दिल्या. दुसरीकडे राजे लखुजी यांच्याविषयी निजामाच्या दरबारात नाराजी होत गेली.

निजामशाहीत नंतरचा काळ मलिक अंबरचा होता. त्याच्यासोबत शहाजी राजे यांनी विविध मोहिमा फत्ते केल्या. मलिक अंबरच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी मोगल व अदिलशा एकत्र आले. या काळात अहमदनगर जवळ भातवडी येथे निजामाचे सैन्य आणि मोगल-अदिलशाचे सैन्य यांच्यात घमासान लढाई झाली. भातवडीच्या युद्धात शहाजी राजे यांनी अतुल्य शौर्य गाजवले. निजामाचे सैन्य जिंकले. परंतु शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी मारले गेले.

युद्धातील विजयामुळे शहाजी राजे यांचा निजामशाहीत सत्कार झाला. पण मलिक अंबर मनातून नाराज झाला. मलिक अंबरने शहाजी राजेंचे चुलते विठोजी यांना फितवले. कुटुंबातील वादापायी अखेर शहाजी राजे यांनी निजामशाही सोडून पुण्याकडे प्रस्थान केले. तेथे सैन्य जमवून शहाजी राजे बंड करणार होते. मात्र, जवळच्या लोकांनी ही माहिती मलिक अंबरला दिली. त्याने हे बंड मोडून काढले. नंतरच्या काळात शहाजी राजेंनी अदिलशाकडे मनसबदारी पत्करली. या काळात जिजाऊ आपली कुटूंब प्रमुखाची भूमिका पार पाडत होत्या. नंतरच्या काळात मलिक अंबरचा मृत्यू झाला. शहाजी राजे हे अदिलशाही सोडून पुन्हा निजामशाहीत आले.

मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीत यादवी माजली. त्याचा मुलगा फतेहखान वजीर झाला. थोड्याच काळात सरदार हमीदखान याने फतेहखानला वजीर पदावरून हटविले. हमीदखान हाच स्वतः वजीर होवून बसला. फतेहखानच्या समर्थकांची धरपकड सुरू झाली. या काळात जाधव कुटुंबिय निजामशाहीतील वागणुकीमुळे नाराज होते. ते मोगलांकडे जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे हमीदखानचा सेनापती मुर्बारकखान याने जाधवांचा कपटाने अंत करण्याचे कारस्थान रचले. दि. २५ जुलै १६२९ ला जाधवांना मुलांसह दरबारात बोलावण्यात आले. राजे लखुजी व मुलगे अचलोजी, रघुजी व नातू यशवंत यांच्यासह दरबाराकडे निघाले. तेव्हा त्यांची शस्त्रे काढून घेण्यात आली. नंतर दरबारात हाराकारी करून जाधवांना ठार मारण्यात आले. निजामाने कपटाने जिजाऊंच्या वडीलांना व भावांना ठार मारले. ही घटना घडली तेव्हा जिजाऊंच्या आई म्हाळसाई दूर होत्या म्हणून वाचल्या.

या घटनेच्या काळात शहाजी राजे हे परांड्याला होते. त्यांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. ते परांड्याहून पुणे-चाकण परगण्याकडे गेले. मात्र, याच काळात निजामशाहीत माजलेली यादवी पाहून मोगल व अदिलशाहने पुन्हा निजामावर आक्रमण केले.

नंतरच्या काळात निजामशाहीत बऱ्याच घटना घडल्या. मोगल बादशहा शहाजहानने निजामशाहीतील पुरुषांना ठार करणे सुरू केले. निजामशाहीला वारस रहाणार नाही अशी शक्यता होता. तेव्हा शहाजी राजे यांनी निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादिवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. ज्या निजामाने जिजाऊंच्या माहेरच्या कुटुंबाला कपटाने ठार मारले होते त्याच निजामाच्या वारसाला वाचविण्याचा प्रयत्न शहाजी राजे करीत होते. मात्र, हा विषय कधीही भोसलेंच्या कुटुंबात कलह निर्माण करणारा ठरला नाही.

अखेर मोगल बादशहा शहाजहानने पुन्हा मोठे सैन्य पाठवून निजामशाहीवर हल्ला केला. तेव्हा अदिलशहा सुद्धा शहाजहानला मिळाला. शहाजी राजांनी नेटाने शहाजहान व अदिलशाशी लढा सुरू ठेवला. या काळात छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. त्याच्या सुरक्षिततेसाठी शहाजी राजे यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहिल आणि शहाजी राजे अदिलशाकडे चाकरी करतील असे ठरले. अदिलशाने सावधगिरी म्हणून शहाजी राजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. मात्र, पुणे-चाकण परगणा त्यांच्याकडेच ठेवला. या परगण्यात जिजाऊ या शिवरायांसह निवासी होत्या.

नंतरच्या काळात शहाजी राजेंच्या प्रोत्साहन व मुत्सद्दीपणातून आणि जिजाऊंच्या तालीमीत तयार झालेल्या शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यांनी मोगलशाही व अदिलशाहीच्या विरोधात गड, किल्ले जिंकणे सुरु केले. शिवरायांच्या या कारवायांना शहाजी राजांची फूस आहे या संशयाने अदिलशाहीने शहाजी राजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. हे कळताच शिवाजी महाराजांनी मोगल बादशहा शहाजहानला पत्र पाठवले. आपण व आपले पिता शहाजी राजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे पत्रात लिहिले. या बदल्यात शहाजी राजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजी राजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजी राजांची नंतर सन्मानपूर्वक सुटका झाली.

वरील प्रमाणे कुटुंब कलहाची अनेक उदाहरणे राष्ट्रमाता जिजाऊंनी अनुभवली. माहेर आणि सासरच्या कलहात त्या पतीच्या आणि मुलाच्या सोबत ठामपणे उभ्या राहिल्या. निजामाची चाकरी करणाऱ्या शहाजी राजे यांना अनेक निर्णय गरजेनुसार घ्यावे लागले. वारंवार चाकरी बदलावी लागली. कधीकधी प्रसंग बाका उभा राहिला. त्यांच्या जीवावरच बेतले. मात्र, अशा सर्व प्रसंगात जिजाऊ खंबीर, अविचल आणि निश्चयी राहिल्या. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व खंबीर कुटुंब प्रमुख राष्ट्रमाता जिजाऊ याच रुपात भावते.

No comments:

Post a Comment