Thursday 8 December 2016

मृतप्राय जिल्हा काँग्रेसचा दोष कोणावर ?

काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर अखिल भारतीय स्तरावर पहिले ग्रामीण अधिवेशन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आज पूर्णतः मृतप्राय झाला आहे. जिल्हा व जळगाव शहरस्तरावर मोजक्या मंडळींनी संघटनात्मक पदे अडकून ठेवल्यामुळे काँग्रेसमध्ये नव्या कार्यकर्त्यांची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. या घडीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंवा जळगाव शहराध्यक्ष हे दोघेही पक्षांतर्गत क्रियाशिल कार्यकर्ते किती हा आकडाही सांगू शकत नाहीत.  
विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या जळगाव मतदार संघात काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला नाही. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना चोपड्याच्या लता छाजेड यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण, छाजेड यांची उमेदवारी पक्षाच्या नवीदिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाने घोषित केलीच नव्हती. मग, छाजेड यांचे नाव पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून चर्चेत आलेच कसे ? हा प्रश्न समोर येतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताना असे लक्षात येते की, जिल्हा काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून परस्पर छाजेड यांचे नाव चर्चेत आणले. असे करण्यामागे या चार-पाच जणांचा काय हेतू असू शकत होता ? कारण, छाजेड या रिंगणात असणार नाहीत हेही निश्चित होते. पण, भाजपकडून आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार म्हणून चंदूलाल पटेल रिंगणात असणार हेही ठरलेले होते. अखेरीस छाजेड यांनी माघार घेतली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही पटेल यांना सर्वपक्षीय उमेदवार असल्याचे सांगून टाकले. या सर्वपक्षीय उमेदवारीत छाजेड यांच्या माघारीचा काय हिस्सा होता काँग्रेस पक्षाचा कोणता नेता अशा प्रकारची हिस्सेदारी आज मान्य करणार आहे ?

एक काळ असा होता की, जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचा उमेदवार म्हणून दगडाला उभे केले तरी तो निवडून येत असे. आज अशी वेळ आली आहे की, गल्ली बोळात ज्यांना लोक मत देत नाहीत, ते विधान परिषद, विधानसभा व लोकसभेसाठी उमेदवारी मागू लागले आहेत. याचे उदाहरण पुन्हा छाजेड यांचेच घेवू. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणाऱ्या छाडेज या चोपडा पालिकेच्या निवडणुकीतही वॉर्डातून रिंगणात होत्या. त्यांना २७९ मतदान मिळाले. चोपडा हे शहर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्षांचे आहे. जिल्हाध्यक्ष चोपड्यात पक्षाचे पॅनेल देवू शकले नाहीत. शिवसेनेच्या विरोधात एकवटलेल्या आघाडीत त्यांनी काँग्रेसला गोवून टाकले.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे ऍड. संदीप पाटील यांना अडचणीच्याच काळात मिळाली. कधी नव्हे एवढी गटबाजी काँग्रेस पक्षात होती व आजही आहे. मात्र, ऍड. पाटील काही सुधारणा घडवून आणतील अशी अपेक्षा होती. ते काही त्यांना साधले नाही. प्रभारी म्हणून भाई जगताप दोन-तीन वेळा आले. त्यांनी इतरांना कानपिचक्या दिल्या. तोपर्यंत पक्षातून अनेकजण बाहेर पडलेले होते. राहिले ते रिटायर्ड झालेले किंवा कधी तरी पक्ष सोडून अपक्ष लढलेले पराभूत उमेदवार. स्व. व्हीजी आणि स्व. काझी यांच्यातील वादविवादातून आजही जिल्हा काँग्रेसला कोणीही बाहेर काढू शकलेले नाही. त्याचेच पडसाद निवडणुकांच्या पूर्वी उमटत असतात.

काँग्रेस अंतर्गत काही नेते नवीदिल्लीतील आणि काही नेते मुंबईतील नेत्यांच्या संपर्कात असतात. नवीदिल्लीत किंवा मुंबईत गेले की, नेत्यांसोबत पक्ष संघटनेवर चर्चा केल्याचे फोटोही सोशल मीडियात टाकत असतात. मात्र, या बनचुके नेत्यांची आपल्या गावात किंवा शहरात काय पत आहे हेही निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होते. पक्षाच्या नवीदिल्लीत व मुंबईतील कनेक्शनमध्ये राहणाऱ्या नेत्यांच्या शहरात पालिका निवडणुकीत काय घडले हेही जरा पाहू.

चोपडा, रावेर, फैजपूर, अमळनेर, धरणगाव पालिकांच्या निवडणकीत काँग्रेस पक्ष कुठे होता आणि या शहरांचे मूळ निवासी असलेले जिल्हा पदाधिकारी पालिका निवडणुकीत काय करीत होते चोपड्यात पक्षाचे पॅनेल नव्हते. रावेरमध्ये आघाडीची सरशी झाली. रावेर तालुक्यातील मूळ निवासी पदाधिकारी कुठे गेले ? पक्षाचा कोणी राज्य किंवा केंद्रस्तर पदाधिकारी आला तर असे नेते स्वतःच्या संस्थांमध्ये जेवणाचा घोळ घालतात पण पालिकेच्या निवडणूक प्रचारात कुठेही दिसले नाहीत. फैजपुरात माजी आमदारांनी थोडे फार प्रयत्न केले. अमळनेरमध्ये लढवय्या असलेल्या नेत्यांनी स्थानिक आघाडीत सहभाग घेतला. या आघाडीचा चेहरा आज विशिष्ट समाजाचा होवून बसला आहे. काँग्रेसला अशा प्रकारचे सामाजिक समीकरण परवडणार आहे का ? धरणगावच्या संदर्भात काय बोलावे ?

रावेर तालुक्यातील मूळ निवासी असलेल्या माजी खासदारावर भुसावळ पालिका व बोदवड नगरपंचायत यांची जबाबदारी टाकली होती. माजी खासदार तेथे प्रचारासाठी फिरकले नाहीत. भुसावळ येथे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे रिंगणात असलेल्या मुन्वर खान यांनी याविषयी सोशल मीडियातून अत्यंत वाईट भाषेत पोस्ट व्हायरल केल्या. त्यावर कोणीही उत्तर दिले नाही. काँग्रेस पक्षाच्या याच अवस्थेविषयी माहिती विचारायला संबंधित माजी खासदारांना दोन-तीनवेळा मोबाईलवर संपर्क केला. त्यांनी काँल रिसिव्ह केला नाही की कॉल बॅक केला नाही.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाचे नियोजन करणाऱ्या मिनी मंत्रालयाची ही निवडणूक भावी काळातील विधानसभा व लोकसभा निवडणुकांची पाया भरणी असेल. अशा निवडणुकांसाठी आता जे पक्षाचे जिल्हा पदाधिकारी आहेत त्यांच्याच हातात नेतृत्व ठेवणे म्हणजे, तडजोडीचे व तोडीपाणीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये जे काही सामान्य कार्यकर्ते उरले आहेत त्यांचा या जिल्हा पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे का ? याचेही उत्तर आरोपीच्या पिंजऱ्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांनी द्यायला हवे.

काँग्रेसच्या काही नेत्यांना पालिका निवडणुकीत पक्षाचे पानीपत झाल्याविषयी विचारले असता त्यांनी लंगडा युक्तीवाद केला की, आमचा पक्ष हा शहरात कमकूवत आहे. पण, ग्रामीण भागात आजही पक्ष ग्रास रुटला मजबूत आहे. खरे तर हे हास्यास्पद आहे. कारण, जळगाव जिल्हा परिषदेतून १५ वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्ष हद्दपार झालेला आहे.


काँग्रेस पक्ष हा जर ग्रामीण भागात आजही चमत्कार करु शकत असेल तर पालिका निवडणुकीत ज्यांनी पळपुटी भूमिका घेतली त्या शहरी नेत्यांकडून जिल्हा परिषदेसाठीच्या निवडणुकीपूर्वी नेतृत्व का काढून घेवू नये ? या विषयावर काँग्रेसच्या जुन्या, जाणत्या व युवा नेत्यांनी जरुर विचार करायला हवा.

No comments:

Post a Comment