Wednesday 21 December 2016

जि.प. निवडणुकांसाठी गिरीशभाऊंचा बुस्टर डोस ...

जळगाव जिल्ह्यात पालिकांच्यानंतर आता ग्रामीण राजकारणाची सत्ताकेंद्रे असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीचा ज्वर चढतो आहे. जिल्ह्यासह राज्यातील नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक १ चा पक्ष म्हणून लौकिक मिळविला आहे.  आता ग्रामीणच्या लढाईत पंचायत समित्या जिंकण्यासह जिल्हा परिषदही पुन्हा काबीज करण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.

जळगाव जिल्हा भाजप पदाधिकारी व पंचायत समिती गट प्रमुखांची बैठक झाली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मणक्याचे अॉपरेशन असल्यामुळे माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे बैठकीस उपस्थित नव्हते. त्यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे खासदार रक्षाखडसेही अनुपस्थित होत्या. बैठकीपूर्वी मंत्री महाजन यांचे आगमन झाल्यानंतर महाजन व खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आढे बढो चे घोषणायुध्द रंगले. अर्थात, मंत्री महाजन याविषयी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप अंतर्गतची गटबाजी उफाळण्याची शक्यता आहे. खडसे आणि महाजन यांच्यातील रस्सीखेच उमेदवारी वाटप करताना कळीची ठरेल. पालिका  निवडणुकीत खडसे आणि कुटुंबियांनी जसे रावेर मदार संघात व महाजन यांनी जसे जळगाव मतदार संघात लक्ष घातले तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत होवू शकते. खडसे स्वतः आणि त्यांच्या समर्थकांनी गेले दोन महिने संयम बाळगला आहे. काही प्रसंग सोडता आजही खडसेंचे समर्थक त्यांच्या मंत्रिमंडाळातील वापसीची प्रतिक्षा करीत आहेत.

दुसरीकडे मंत्री महाजन हे जिल्ह्यातील काही विषयांचा पाठपुरावा करण्यास पुढे सरसावले आहेत. जामनेर एमआयडीसी, निराधारांना घरकुलासाठी जमीन वाटप यासह जळगावसाठी २५ कोटी आणणेसाठी त्यांचे प्रयत्न आहेत. अर्थमंत्र्यांनीही आमदार सुरेश भोळेंना २५ कोटी देणार असे पत्र दिले आहे. अशा वातावरणात भाजपसाठी पूरक वातावरण निर्माण होते आहे. मावळत्या जिल्हा परिषदेत भाजपचे आणि त्यातही खडसे गटाचे वर्चस्व होते. ते यावेळी टीकविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेत भाजप - शिवसेना युती होती. मात्र, दोन्ही पक्षांनी ऐकमेकांचे विरोधक म्हणूनच नांदले.

निवडणुक तयारीच्या पहिल्या टप्प्यात मंत्री महाजन यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात बहुधा जि. प. निवडणुकीसाठी खडसे - महाजन याच्या प्रभाव क्षेत्राचे विभाजन होईल. तसे झाले तर पक्ष हमखास जास्त जागा मिळवू शकेल. जिल्हाध्यक्ष वाघ यांनी ६८ पैकी ४० प्लस तर मंत्री महाजन यांनी ५० जागा जिंकायचे टार्गेट दिले आहे. गेल्या ५ वर्षांत भाजपची कारकीर्द फारशी लक्षवेधी राहिली नाही. शिवसेनेची भूमिका टोकाचीच होती. आता आगामी निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना स्वबळाचा नारा देत आहेत. मात्र मंत्री महाजन म्हणताहेत की, जेथे युतीची मागणी असेल तेथे युती करु. राज्यमंत्री गुलाबराव म्हणताहेत की, भाजपवर विश्वास ठेवू नका. मंत्री महाजन व राज्यमंत्री पाटील यांचे गूळपीठ आहे. जि. प. निवडणुकीत दोघेही अंतिम काय भूमिका घेतील हे आज सांगता येत नाही.

गारुडी आणि गारुड


जळगाव जिल्ह्याच्या राजपटावर सध्या जलसंपदामंत्री  महाजन यांचे विकास योजनांचे गारुड सुरु आहे. जळगाव मनपाला मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी, जामनेरला प्रस्तावित एमआयडीसी उभारणी, गरजुंना घरकुलासाठी जागा, पुढाकारातून कैशलेस गावे अभियान अशा उपक्रमांमुळे मंत्री महाजनांचा बोलबाला आहे.

जळगावच्या राजकारणातही सर्वपक्षीय नेत्यांसोबतही सलोख्याचे संबधी राखत महाजनांची भूमिका एखाद्या कुशल गारुड्याची आहे. महाजन विकासासाठी सर्व पक्षीयांना एकत्र आणण्यासाठी विकास कामांची पुंगी वाजवत असताना इतर मंडळी माना डोलवू लागलीच आहेत. तीन दिवसांपूर्वी महाजनांनी जामनेर येथे ब्लैककोब्रा हातात नाचवून आपणही खरेखुरे गारुडी असल्याचे दाखवून दिले आहे. सर्पमित्र अतुल कोळीने पकडलेला हा ब्लैककोब्रा महाजनांनी लिलया खेळवला, नंतर त्याची बातमी चैनलवरुनही प्रसारित झाली.

1 comment: