Saturday, 31 December 2016

छोटा आनंद अनुभवण्याचा संकल्प !!

संग्रहित छायाचित्र
सन २०१६ सरत असताना वर्षभरात मी काय केले ? याचा मनोमनी विचार करीत होतो. जाणारे वर्ष तसे माझ्यासाठी अनपेक्षित वळणाचे ठरले. वेतनभोगी कर्मचाऱ्यांच्या गटातून मी स्वयंरोजगाराच्या गटात आलो. कधीकधी इष्टापत्ती आपल्या क्षमतांना नवे आव्हान देते आणि आव्हानास पेलण्याची रग, धमकही देते. अशाच परिस्थितीतून तावुन सलाखून निघण्याचा अनुभव मी घेतला. अजुनही घेतोय.
सन २०१६ ने माझ्या मैत्रिचा पैटर्न बदलून टाकला. मित्र तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास दाखवतात, हा सर्वोत्तम अनुभव मी गाठीला बांधला. लढवय्या माणसाला मित्र भरपूर असले तरी हितशत्रू कमी नसतात. ते जवळपासही असतात आणि नकाब घालूनही वावरतात. अशावेळी एक शहाणपण मी नव्याने शिकलो. ते म्हणजे नेहमी मित्रांच्या घोळक्यात वावरावे. मग, हितशत्रूंनी कितीही चक्रव्युह रचले तरी तुमचा अभिमन्यु होत नाही.

सन २०१६ ने मला सोशल मीडियात उभे राहण्याचे बळ दिले, ब्लॉगर म्हणून ओळख दिली. स्वयंरोजगारात सोशल मीडिया हैण्डलर म्हणून नवे व्यासपीठ दिले. जळगाव शहरातील सर्वोत्तम नागरिकांशी फैमिलीयर होण्याची संधी दिली. या नव्या प्रयोगात प्रवेश करताना मी परंपरांच्या दाराशी गेलो नाही. काही गोष्टी करायच्या नाही हे निग्रहाने टाळले. अवघ्या ७/८ महिन्यात सोशल मीडियात काम करण्याचा नवा पैटर्न जन्माला आला.

सन २०१६ माझ्यासाठी जळगाव जिल्हा पत्रकार संघातही नवे उपक्रम सुरु करण्याचे श्रेय देवून गेले. जिल्हा पत्रकार संघाचा पदाधिकारी म्हणून मी स्वतःच पत्रकार व फोटोग्राफरसाठी कार्यशाळा घेतल्या. जवळपास ६० वर महिला पत्रकारांचा सत्कार घडवून आणला. मीडिया ट्रायल या नव्या विषयावर टीव्हीवरील प्रसिध्द चैनलच्या मान्यवर संपादकांचा परिसंवाद घडवला. पत्रकारांच्या गौरवासाठी उत्कृष्ट सन्मान योजना सुरु केली. अर्थात, अशा कार्यात अनंत अडचणीही सहन केल्या आहेत.

सन २०१६ ने काही व्यक्तिगत आनंदाचे प्रसंगही दिले. मीडिया ट्रायल विषयावरील संवादासाठी मुंबईतील टीव्ही चैनलचे वलयांकित संपादक जळगावात आले. स्टार प्लस वाहिनीवरील स्पर्धेत विजेता ठरलेला तनय मल्हाराचे सोशल कैम्पेन केले. सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलला सोशल मीडियात व्हायरल केले. जळगावमधील १४ मान्यवरांचे ब्लॉग लेखन सुरु केले.

सन २०१६ सरत असताना मला जाणवले की, खुप मोठ्या अपेक्षांच्यामागे धावत आपण आयुष्यातील लहान लहान गोष्टीतला आनंद हरवून टाकतो. तसे मित्रांमध्ये घडते आणि कुटुंबातही. सन २०१७ चा संकल्प करताना मला हाच लहान गोष्टीतला आनंद आता वारंवार अनुभवायचा आहे.

लहान गोष्टीतला आनंद म्हणजे काय ? दोन उदाहरणे सांगतो. आपल्या शहरावरचा सूर्योदय कसा असतो हे किती जणांनी अनुभवले आहे ? बहुधा नाहीच. कारण आपल्या शहरावरही सूर्य उगवतो ही कल्पनाच आपण करीत नाही. मी मात्र हा भन्नाट अनुभव घेतोय. खेडी परिसरात पहाटे फिरायला जाताना १७ मजलीच्या मागून डोकावत येणारा सूर्य रंगांच्या लिला खेळत येतो. एखाद्या चित्रकाराची कलर डीश उलटल्यानंतर रंग जसे पसरतात तसे रंग घेवून सूर्योदय येतो. पहाटेचा तो अर्धातास शहरापासून लांब जावून कधीही अनुभवा. छोटा आनंद आहे तो यात.

अजुन एक छोटा आनंद अनुभवण्याची जागा. चारचाकी वाहन मुलगा हाकू शकत असेल तर त्याच्यासोबत लांब ड्राईव्ह वर जरुर जा. मुलाला ड्राईव्हींग करु द्या. बायकोला त्याच्या शेजारी बसवा. आणि तुम्ही मागे बसून शांतपणे प्रवासाचा आनंद घ्या. मुलांचा आत्मविश्वास जोखायचा असेल तर त्याला ड्रायव्हींग करु देणे. रस्त्यावरील हर एक गोष्ट मुलांना चौकस करते. निरीक्षण करायला लावते. त्यासोबतच हात, पाय व मेंदूही चालवायला लावते. मुलगा बोलका असेल तर तो गप्पाही मारतो. एकाचवेळी एवढ्या गोष्टींची रिस्क !! धम्माल आणि धम्माल. मुलगा चांगले ड्रायव्हींग करीत असेल तर तो दिवस पद्म पुरस्काराचा आनंद देतो.

नव्या वर्षांत सन २०१७ मध्ये लहान आनंदाच्या अशा अनेक जागा शोधायच्या आहेत. हाच तर संकल्प आहे.

No comments:

Post a Comment