विविध प्रकारची गतीमान माध्यमे
वापराची सध्या वावटळ (बूम) आहे. पारंपरिक माध्यमे वृत्तपत्रे, टीव्ही आणि सिनेमा
यांच्यासमोर इंटरनेटद्वारा वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियाने अनेक आव्हाने उभा केली
आहेत. दिवस आणि रात्रीचे २४ तास सोशल मीडिया धावत असतो. त्यावरील लिखीत, चित्र,
व्हीडीओ स्वरुपातील संदेश निर्मिती व वहन सतत सुरू असते. अशा या सोशल मीडियाच्या
विधायक, सकारात्मक व कृतीशिल वापराची अनेक उदाहरणे जळगावकरांनी निर्माण केली आहेत.
सोशल मीडिया वापराचा युनिक पॅटर्न जळगावकरांनी जन्माला घातला आहे.
जनमाध्यमांमधील आशय हा
वैचारिकदृष्या व कृतीशिल जेवढा प्रगल्भ आणि वास्तव असेल तेवढाच समाज अधिक जागृक व
क्रियाशिल असतो असे म्हणतात. पूर्वी प्रकाशित होणारी वृत्तपत्रे ही संपादकांच्या
नावाने ओळखली जात. आकाशवाणीवरील गप्पा किंवा चर्चा या सूत्रसंचालकांच्या शैलीने
लक्षात राहत. टीव्हीवर सूत्रसंचालकाच्या नावानेच कार्यक्रम बहुचर्चित होण्याचे
दिवस आहेत. बदलत्या काळातही पारंपरिक माध्यमांचा अनुभव वरील प्रमाणेच कमी, जास्त
प्रमाणात कायम आहे.
विसाव्या शतकाच्या
उत्तरार्धात संगणकीय प्रणालीसोबत इंटरनेट हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. २१ व्या
शतकाच्या पहिल्या दशकात इंटरनेटमुळे प्रत्येक क्षेत्रात कामाची सुबकता व गती वाढली.
दुसऱ्या दशकात इंटरनेट हे मोबाईल सारख्या व्यक्तिगत वापराच्या खिशातील उपकरणातून (पॉकेट
डिव्हाईस) प्रत्येकाच्या हातात पोहचले. स्मार्ट फोन किंवा स्मार्ट मोबाईलमुळे
पारंपरिक माध्यमे वृत्तपत्र, आकाशवाणी, टीव्ही सुद्धा मोबाईलवर उपलब्ध झाले.
मोबाईल हे संगणकीय प्रणालीतील पर्यायी व अत्यंत छोटे उपकरण म्हणून प्रत्येकाची गरज
बनले आहे. भारताची लोकसंख्या १२० कोटी गृहीत धरली तर त्यापैकी ९० कोटी लोक हे मोबाईल
वापरणारे आहेत.
![]() |
जळगावमधील मान्यवरांच्या कान्हदेश मंच गृपचा लोगो |
मोबाईल वापराच्या प्रणालीत
गतीमान शोध लागत विविध ऍप्स (कार्यप्रणाली) तयार होत गेले. जगभरातील लोकांच्या
समुहांना जोडणाऱ्या गप्पांचे कट्टे किंवा संपर्क स्थाने असलेल्या ऍप्सला सोशल
मीडियाचा चेहरा लाभला. त्यात फेसबुक, लिंकेड ईन, यू ट्यूब, ट्यूटर या ऍप्सनी संपूर्ण
जगाला एकत्र जोडून टाकले. ऑर्कूट, वुई चॅट, हाईक, लाईन हेही ऍप बाजारात आले.
मात्र, त्याचा फारसा वापर होत नाही. अलिकडच्या काळात व्हाट्स ऍप, इन्स्टाग्राम या
कार्यप्रणालीने लोकांच्या स्मार्ट फोनची दुनिया व्यापून टाकली आहे. चहा, तंबाखू,
मद्य याचे व्यसन असलेल्या लोकांप्रमाणे आता सोशल मीडियाचे ऍडीक्ट असा नवा पंथही
जन्माला घातला आहे. कोणत्याही माध्यमाच्या अतिरेकी वापराचे लाभ जसे समुहाला मिळतात
तसेच त्याचे दुष्परिणामही समुहाला भोगावे लागतात. तसे काहीसे सोशल मीडियासंदर्भात
होईल का ? अशी शंका होती. मात्र, सोशल मीडियाच्या विधायक व सकारात्मक वापराचा जाणिवपूर्क
प्रयत्नही समाजात सुरू झाला. सोशल मीडियाने लोकांचे समुह शेकड्याने, हजार व लाखभर
सदस्यांनी जोडले जात असताना त्याच्या वापराविषयी सुद्धा वापरकर्ते जागृक होत गेले.
सोशल मीडिया हे केवळ वेळ घालविण्याचे (टाईमपास) माध्यम न राहता ते संघटन, वैचारिक
व कृतीशिल प्रसारणाचे माध्यम कसे होवू शकेल याचीही विचार समाजातील अनेक घटक करु
लागले. अशाच विचारातून फेसबुक कम्युनिटी, व्हाट्स ऍप कम्युनिटी असे वेगवेगळे
प्रकार उभे राहिले. याच कम्युनिटीने सामाजिक कार्य, प्रोत्साहन, कृतीशिलता व परिवर्तनाची
नव नवी उदाहरणे समोर ठेवली.
सोशल मीडिया कम्युनिटीची
अनेक वैशिष्ट्ये आहेत. या कम्युनिटीत जगभरातील कोणतीही व्यक्ती सहजपणे जोडली जाते.
जोडलेल्या व्यक्तीला भाषा, लिंग, रंग, वय, शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक कुवत
अशा बाबींचे बंधन नसते. इंटरनेट सहजपणे वापरणारा किंवा त्यावर उपलब्ध असलेला
कोणताही घटक सोशल मीडियाचा सदस्य होवू शकतो. फक्त प्रश्न एवढाच असतो की, सोशल
मीडिया तुम्ही वापरणार कसा आणि कोणता हेतू सिद्ध करण्यासाठी ?
सोशल मीडिया वापराचा जळगाव
पॅटर्न मोठा आगळा वेगळा व खास (युनिक) आहे. जळगावकर मंडळी सोशल मीडियाच्या फेसबुक,
व्हाट्स ऍप, इन्स्टाग्राम, यू ट्यूब या माध्यमांवर किंवा इतर पर्यायांवर सतत
दिसते. विविध क्षेत्रातील लोकांचे समुह जवळपास प्रत्येक माध्यमात तयार झाले आहेत.
![]() |
रतनलाल सी बाफना यांचा मन की बात ब्लॉग |
जळगाव शहरात व्हाट्स ऍप
कम्युनिटीचे हजारो गृप कार्यरत आहेत. अशा प्रकारच्या गृपच्या माध्यमातून काही
सामाजिक विषयांचा उहापोह, चर्चा, निष्कर्ष व कृती असे सार्वत्रिक वर्तन घडते आहे.
शहरातील नागरी प्रश्नांवर चर्चा, पुढाकार आणि कृती अशा घटनाही घडल्या आहेत. शहराचे
महापौर, आयुक्त, आमदार हेही सोशल मीडियातून सक्रिय असून नागरिकांसाठी उपयुक्त संदेशांचे
वहन सातत्याने केले जात आहे. ५०० व १००० रुपयांच्या नोटबंदीच्या काळात करांची
वसुली, स्वच्छता अभियान असे विषय जळगावकरांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी
आयुक्तांनी व्हाट्स ऍपचा वापर केला आहे. मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी सोशल
मीडियातून केलेल्या आवाहनानुसार दि. २० डिसेंबर २०१६ ला जळगाव शहरात महास्वच्छता
अभियान राबविण्यात आले. यात शहरातील विविध प्रकारच्या १७७ संथा, प्रतिष्ठाने
यांच्यातील २२ हजारावरील सदस्यांनी सहभाग नोंदविला.
जळगाव शहरातील अनेक मान्यवर
मंडळींचे व्यावसायिक, सेवा, व्यापार, उद्योग, सामाजिक संघटनात्मक गृप आहेत.
त्यातील एक असलेल्या कान्हदेश मंचच्या माध्यमातून अनेक विषयांवर सक्रिय भूमिका
घेण्यात आली आहे. जळगाव शहरात लोकसहभागातून उपक्रम राबविण्यासाठी आयुक्तांसोबत
चर्चा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक मदत, परिवर्तन संस्थेच्या
नाट्य स्पर्धेसाठी आर्थिक मदत असे विषय या गृपने हाताळले आहेत.
![]() |
फॅन्सी नंबरची जप्त वाहने |
जळगाव शहरातील मेहरुण
तलावाच्या विस्तार व खोलीकरणाचा विषय मल्टी मीडिया फिचर्स प्रायव्हेट लिमिटेड या
जाहिरात संस्थेने सोशल मीडियातून प्रभावीपणे व्हायरल केला. माय सिटी माय ड्रिम या प्रकल्पांतर्गत
मेहरुण तलावाचा विस्तार व खोलीकरणाचे सुमारे १५ कोटींवर खर्चाचे काम लोकसहभागातून उभे
राहिले. मल्टी मीडिया फिचर्सचे संचालक सुशील नवाल आहेत. समांतर रस्त्यांचा असाच
विषय आता सोशल मीडियातून गाजतो आहे. जळगाव शहरातील अतिक्रमण हटावविषयी मनपावर
दबावासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर झाला. त्याचा परिणाम म्हणून प्रमुख
रस्त्यांवरून हातगाडीवाले, फेरिवाले व ठाण मांडून बसणारे विक्रेते यांना हटविण्यात
आले. अर्थात, त्यांना पर्यायी जागाही दिली गेली.
जळगाव शहर व जिल्ह्यातील
अनेक राजकिय नेते फेसबुक, व्हाट्स ऍप व ट्विटरचा वापर जनसंपर्कासाठी करीत आहेत.
यात सर्वाधिक उल्लेखनिय बाब म्हणजे माजीमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे हे सोशल
मीडियात सर्वाधिक अपडेट आहेत. अर्थात, त्यांनी त्यांचे मीडिया हॅण्डलिंगचे काम
जळगाव येथील मृदंग असोशिएट इंडिया या कमर्शिअल ऍड एजन्सीला दिले आहे. अनंत भोळे या
संस्थेचे संचालक आहेत. खडसे यांच्यासह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार उन्मेश
पाटील हेही सोशल मीडियात सक्रिय आहेत. त्यांचेही काम मीडिया हॅण्डलर करतात. आमदार
उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव मतदार संघातील जनसंपर्कासाठी खास मोबाईल ऍप तयार केले
आहे. खासदार रक्षा खडसे, खासदार ए. टी. पाटील यांचाही सोशल मीडियात नियमित वावर आहे.
अमळनेर येथील माजी आमदार साहेबराव पाटील तथा त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा सौ. पुष्पलता
पाटील हे दोघेही सोशल मीडियात दिसतात. त्यांचे काम पूत्र धीरेंद्र पाटील करतात.
इतर काही आमदार, जळगावचे नगरसेवक, राजकिय पदाधिकारी हेही सोशल मीडियाचा वापर
करताना दिसतात. यात विनोद देशमुख, अतुलसिंग हाडा यांचा समावेश आहे. डॉ. राधेशाम
चौधरी यांच्या जळगाव फर्स्ट सारख्या पक्षविरहीत व्यासपिठाने युवकांना जोडण्यासाठी
फेसबुकचा प्रभावी वापर केला आहे. जवळपास १० हजारावर सदस्य जोडले आहेत. या
माध्यमातून जळगाव शहराच्या प्रश्नांवर चर्चा करुन भूमिका घेतली जाते. जळगाव
मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती कैलास सोनवणे हेही सोशल मीडियात सक्रिय असून
व्हाटस ऍपवर विविध विषयांच्या पोस्ट ते व्हायरल करतात.
![]() |
टेरेस व्हेजिटेबल ग्रोवर्स गृप |
सोशल मीडियातील प्रचार व
प्रसारामुळे जळगावचा तनय मल्हारा हा स्टार प्लस वाहिनीवरील डान्स प्लस सिजन २ चा
विजेता ठरला. जळगाव येथील मल्हार कम्युनिकेशनतर्फे त्याच्या सोशल मीडियात
प्रचाराचे नियोजन करण्यात आले. जळगाव येथील कलावंत विजय जैन हे फेसबुकचा वापर
चित्रांच्या प्रदर्शनसाठी करतात. जैन हे जलरंगात अप्रतिम निसर्गचित्रे रंगवतात.
दुसरे कलावंत राजू बाविस्कर हेही फेसबुकरवर सक्रिय आहेत. नाट्य क्षेत्रातील बरिच
मंडळी सोशल मीडियात आपापल्या संस्थांचे, नाट्य विषयक हालचालींचे चित्रण करतात.
नाट्य कलावंत, रंगभुषाकार तथा समीक्षक योगेश शुक्ल हेही फेसबुकवर सक्रिय आहेत.
त्यांनी यावर्षी राज्य नाट्यस्पर्धा, बाल नाट्य स्पर्धा व पुरुषोत्तम करंडक
स्पर्धांमधील नाट्य परियच फेसबुकमार्फत रसिकांपर्यंत पोहचविला. जळगावात दरवर्षी
जानेवारी महिन्यात साजरा होणारा बालगंधर्व संगीत महोत्सवही सोशल मीडियाच्या
माध्यमातून जगभर पोहचला आहे. त्याच्या काही व्हीडीओ क्लिप या यू ट्यूब चॅनेलवर
पाहता येतात. सैराट चित्रपटाचे
प्रदर्शन झाल्यानंतर कैलास सोनवणे यांच्या व्हाट्स ऍपवरील जळगाव महानगरपालिका
गृपच्या माध्यमातून जळगाव शहरातील आंतर जातीय विवाहितांच्या सत्काराचा कार्यक्रम
झाला. सैराट चित्रपटातील नकारात्मक बाजूला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न यातून
केला गेला.
साहित्य क्षेत्रात धरणगावचे
प्रा. बी. एन. चौधरी हे सोशल मीडियात सर्वाधिक संपर्क असलेले साहित्यिक म्हणून
प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत डॉ. संजिवकुमार सोनवणे, कवी आबा महाजन यांचाही सोशल
मीडियात वावर आहे. व्हाटस ऍप गृपवर नामदेव कोळी यांचा खान्देश साहित्य मंच हा गृप
लोकप्रिय आहे. या गृपच्या माध्यमातून वाघुर दिवाळी अंकाचे उत्कृष्ट संकलन, संपादन
तथा वितरण केले गेले. प्रदीप रस्से यांनी फेसबुकवर टीकटीक या सदराचे लेखन करुन
साहित्य प्रांतात एक वेगळा प्रयोग केला आहे. अण्णा भोईटे हे लघु विडंबन काव्य
करणारे शिघ्रकवी म्हणून व्हाट्स ऍपवर प्रसिद्ध आहेत.
![]() |
जळगाव महानगर पालिका गृपतर्फे आयोजित आंतर जातीय विवाहितांच्या सत्कार प्रसंगी नृत्य करताना मान्यवर |
खान्देशातील सांस्कृतिक व
परंपरांची माहिती देणारे यू ट्यूब चॅनेल दिलीप तिवारी यांनी तयार केले आहे. त्यावर
सुमारे १०० व्हीडीओ असून जवळपास ३ लाखांवर प्रेक्षकांनी ते पाहिले आहेत.
व्हाट्स ऍपवरील कान्हदेश
मंच या गृपने महिलादिन, मातृदिन आणि पितादिन निमित्त गृपमधील सदस्यांनी लिहिण्यास
प्रवृत्त केले. आपल्या कुटुंबियांच्या आठवणी सदस्यांनी अत्यंत भावूकपणे लिहील्या.
त्याचे संकलन फेसबुकवरुन व्हायरल करण्यात आले. हा प्रयोग चर्चेत राहिला. जळगाव
शहरात रक्तदात्यांचे विविध व्हाट्स ऍप गृप आहेत. त्यांचे फेसबुक पेजही आहे.
कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या रक्त गटाची गरज असेल तर अवघ्या काही
मिनिटात रक्त किंवा रक्तदाता उपलब्ध होवू शकतो. कुणाल महाजन, राहुल सूर्यवंशी
यांनी जळगावमधील ब्लड डोनर्सला एकत्र केले आहे.
जळगाव शहरात नव्या
संस्कृतिला जन्म देण्याचे कार्यही व्हाट्स ऍप गृप व फेसबुकच्या माध्यमातून घडले
आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी जळगावात स्थापन झालेल्या जळगाव रनर्स गृपमुळे
शहरात धावणाऱ्या महिला, पुरुष व लहान मुलांचे गट तयार झाले आहेत. १८० च्या आसपास
सदस्य एकत्र आले आहेत. जळगावातील रनर्स आता मॅरेथॉनसह अवघड स्पर्धांमध्ये सहभागी
होत आहेत. असाच प्रयोग सायकलिंगसाठी होणार आहे. जळगाव रनर्स गृप प्रमाणेच जळगावात
टेरेस व्हेजिटेबल ग्रोवर्स गृपही तयार झाला आहे. घरगुती स्वरुपात नैसर्गिक व
सेंद्रीय स्वरुपातील भाज्यांचे उत्पादन करणे हा विधायक हेतू अशा प्रकारच्या
गृपमधून साध्य होतो आहे.
सोशल मीडियातील आणखी एक
अनोखा प्रयोग जळगावात सुरू आहे. तो म्हणजे, जळगाव शहरातील विविध क्षेत्रांतील
मान्यवर व अनुभवी मंडळी आपापल्या जीवन प्रवासातील आठवणी ब्लॉग सारख्या माध्यमातून
लिहीत आहेत. त्याचा प्रचार व प्रसार फेसबुक तथा व्हाट्स ऍप गृपमधून होतो आहे. यात
प्रामुख्याने सोन्याच्या ज्वेलरी उद्योगातील अग्रदूत रतनलाल सी. बाफना हे मन की
बात, नवजीवन सुपर शॉप मालिकेचे संचालक अनिल कांकरीया हे झेप, बालरोग वैद्यकिय
सेवेतील सुप्रसिद्ध डॉ. राजेश पाटील हे आनंदयात्रा, निसर्ग पर्यटनस्थळ आर्यन इको
रिसोर्टच्या संचालिका डॉ. रेखा महाजन या ऑफ बिट, रिअल इस्टेट मधील ज्येष्ठ रमेश
मुणोत हे आत्मकथा एक संघर्ष यात्रा, होमिओपॅथी तज्ञ डॉ. रवी हिरानी हे हेल्थप्लस,
महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादीया हे चिंतन, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी
प्रविण पगारीया हे बिझनेस बझ्झ, राजकिय क्षेत्रातील व स्त्रीरोग प्रसुतीतज्ञ डॉ.
राधेशाम चौधरी हे संघर्षवारी, सॅनिटरी पॅड निर्मिती करणाऱ्या सौ. वैशाली विसपुते
या उंबरठ्या पलिकडे अशा ब्लॉगचे लेखन करीत आहेत. यासाठी सोशल मीडिया सोल्युशनच्या
माध्यमातून दिलीप तिवारी यांनी मीडिया हॅण्डलर व्यावसायिक सेवा दिली आहे.
![]() |
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना कान्हदेश मंत गृपतर्फे मदत |
या सर्व मान्यवरांच्या
ब्लॉग लेखनामुळे सोशल मीडियात जळगावमधील अनुभवी, मान्यवर लोकांचे प्रतिबिंब ठळकपणे
दिसत आहे. त्याद्वारे युवापिढीला जुन्या पिढीचे अनुभवाचे बोल वाचायला मिळत आहेत.
कौटुंबिक, व्यावसायिक व व्यावहारिक सल्ला, समुपदेशन प्रकारातील हे लेखन भावी पिढी
घडविण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरते आहे. फेसबुकवर लाईव्ह समुपदेशनाचा प्रयोग रोटरीचे
ज्येष्ठ सदस्य तथा सामाजिक कार्य करणारे गनी मेमन करीत आहेत. अशाच प्रकारे
समुपदेशन, व्यक्तिमत्त्व विकास संदर्भात फेसबुक व व्हाट्स ऍपचा प्रभावी वापर आशा
फाऊंडेशनचे संचालक गिरीश कुळकर्णी यांनी केला आहे. विविध क्षेत्रातील अनुभव व
कार्यक्रमांची माहिती त्यांच्या फेसबुकपेजवर सत्त्वर अपडेट असते. भुसावळ येथील
वेलनेस फाऊंडेशन व वेलनेस इन्स्टिट्यूटचे संचालक निलेश गोरे हेही फेसबुक व व्हाट्स
ऍपचा उपयोग समुपदेशनासह विविध प्रकारच्या प्रोत्साहनात्मक कार्यक्रमांसाठी करतात.
लोकांना हवामानविषयक अंदाज देण्यासाठी ते व्हाट्स ऍप वापरतात. प्रशांत फाऊंडेशनचे
प्रशांत महाशब्दे यांनी प्रशांत क्लासेस विषयी सोशल मीडियात माहिती दिली आहे.
सोशल मीडियातील हा
सकारात्मक पॅटर्न जळगाव जिल्ह्यातील अनेक नागरी समुहांनी सुद्धा स्वीकारला आहे.
त्यांच्याही यश कथा लक्षवेधी आहेत. जळगाव जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा पोलीस
यंत्रणेचे सहकार्य घेवून फॅन्सी नंबरप्लेट विरोधात सोशल मीडियातून आंदोलन केले
होते. त्याच्या परिणाम स्वरुप राज्यमंत्री, महापौर व आमदार यांच्यासह जळगावचे
नगरसेवक व इतर वाहनमालकांनी फॅन्सी नंबरप्लेट रद्द करून नियमित स्वरुपातील
नंबरप्लेट तयार करुन घेतल्या. सोशल मीडियातून हे एक चांगले व विधायक आंदोलन झाले.
गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती विसर्जनासाठी इको फ्रेंडली तलावाच्या वापराचे
आवाहन सोशल मीडियातून करण्यात आले. त्याला सुमारे १० हजारावरील कुटुंबांनी
प्रतिसाद दिला.
उद्योगपती असलेले व समाजिक
क्षेत्रात काम करणारे संजय तोतला यांनीही भारतभरातील सामाजिक संस्थांच्या एकत्र
व्यासपिठाच्या माध्यमातून अनेक संस्थांना जोडले आहे. नेत्र शस्त्रक्रिया क्षेत्रात
मोठ मोठ्या उद्योजकांकडून देणगी मिळविण्यासाठी त्यांना सोशल मीडिया कम्युनिटीचा
उपयोग होत आहे. अशाच माध्यमातून जळगाव येथील स्व. मांगिलालजी बाफना नेत्र पेढीला
प्रतिष्ठेचा सामाजिक पुरस्कार मिळाला आहे.
व्हाट्स ऍप गृपच्या
माध्यमातून जळगाव शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक जुन्या शैक्षणिक संस्थांचे माजी
विद्यार्थी एकत्र येत आहेत. आर. आर., ला. ना., भगीरथ या शाळांच्या माजी
विद्यार्थ्यांचे मेळावे भरले. जिल्ह्यात काही शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांनी
एकत्र येवून शाळा विकासाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. अशा प्रकारचा यशस्वी
प्रयत्न पिंगळवाडे (ता. अमळनेर) येथील शाळेसंदर्भात घडला आहे.
![]() |
गणपती विसर्जनासाठी इको फ्रेंडली पॉण्डचा वापर |
जळगाव जिल्हा पत्रकार
संघाने मीडिया ट्रायल हा बहुचर्चित विषय जळगावकरांना सोप्या पद्धतीने समजावून
सांगण्यासाठी व्हाट्स ऍप व फेसबुकचा वापर केला. मीडिया ट्रायल या विषयावर ५० वर
पोस्ट व्हायरल केल्या. या विषयावरील परिसंवादाचा प्रचारही सोशल मीडियातून केला
गेला. त्याचा परिणाम म्हणून जळगावचे कांताई सभागृह श्रोत्यांनी तुडूंब भरले.
जळगावमधील माध्यम क्षेत्रातील बरीच पत्रकार, फोटोग्राफर, व्हीडीओग्राफर मंडळी सोशल
मीडियात सक्रिय आहेत. सोशल मीडिया, नेट मीडियाशी संबंधित विविध प्रकारच्या तंत्रज्ञानावर
लिखाण करणारे पत्रकार म्हणून शेखर पाटील यांचा लौकिक आहे. चिंतामण पाटील, युवराज
परदेशी, शैलेंद्र चव्हाण, जितेंद्र पाटील, भगवान सोनार, चेतन वाणी, निलेश झाल्टे
ही मंडळी नियमितपणे ब्लॉगवर लिहीतात. नरेंद्र कदम हे चॅनेलसाठी ऍन्कर व कॅमेरामन
म्हणून काम करतात. त्यांनी मोबाईल स्क्रिनवर हाताच्या अंगठ्याच्या रेखाटनातून कार्टून
तयार करण्याची शैली निर्माण केली आहे. जवळपास रोज एक कार्टून ते फेसबुक आणि
व्हाट्स ऍपवर प्रसारित करतात. जेष्ठ पत्रकार विक्रांत पाटील, अयाज मोहसीन हे
व्हाट्स ऍपच्या माध्यमातून विविध बातम्या व त्यावरील भाष्य प्रसारित करतात.
सोशल मीडिया वापरात जळगाव
जिल्हा माहिती कार्यालय सुद्धा आघाडीवर आहे. त्यांचे फेसबुक पेज, ब्लॉग रोज अपडेट
होतात. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाने यांनी व्हाट्स ऍपमधील
ब्रॉडकास्ट या पद्धतीचा वापर करून सरकारी बातम्या प्रसारणाची व्यवस्था केली आहे.
सोशल मीडियाचा विधायक वापर
जलयुक्त शिवार योजनांच्या अंमलबजावणीत दिसला. सरकारी अधिकाऱ्यांनी या योजनेविषयी
फेसबुकवर पाने तयार केली. आढाव्यासाठी मोबाईल ऍपचा वापर केला. व्हाट्स ऍपवरील
चर्चेतून गावातील तरुण एकत्र आले. त्यांनी परिसरात पडणारे पावसाचे पाणी जिरवून नदी
– नाले जिवंत करण्याचे प्रयत्न केले. चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव व धरणगाव
तालुक्यातील भोणे येथे असा प्रयत्न झाला. साळुंके परिवार खेडगाव नावाच्या व्हाट्स
ऍप गृपमध्ये एकत्र आलेल्या सदस्यांनी उतळी नदीचे खोलीकरण केले. उतळी नदी
पावसाळ्यात तुडूंब वाहू लागली आहे. या नदीवर आता तीन बंधारे बांधून पाणीही अडविले
आहे. भोणे येथे कयनी नदीच्या खोलीकरणाचा यशस्वी प्रयत्न ग्रामस्थ व संघ परिवारातील
मंडळींनी एकत्र येवून केला. अमळनेर येथेही
शहरालगतच्या अंबरिश ऋषी टेकडीच्या सौंदर्यिकरण व वृक्षारोपणासाठी व्हाट्स ऍपचा
वापर करण्यात आला आहे. माझा गाव माझा अमळनेर, या नावाने व्हाट्स ऍप गृप सुरू आहे.
भुसावळ येथे राष्ट्रीय महामार्गावर खड्डे तयार झाल्यानंतर अपघात वाढले. तेथे या
विषयी व्हाट्स ऍपवर चर्चा झाली. त्यानंतर माळी महासंघाच्या शाखा पदाधिकाऱ्यांनी
एकत्र येवून खड्डे बुजविले.
मराठा क्रांती मोर्चाच्या जळगाव
येथील शिस्तबद्ध आयोजनात कार्यकर्त्यांनी व्हाटस ऍपचा प्रभावी वापर केला.
रोटरी क्लबने हाताने अपंग किंवा अधू असलेल्या व्यक्तिंना कृत्रिम हात वाटपासाठी
सोशल मीडिया वापरला. त्याच्या फल स्वरुप जवळपास १०० जणांना कृत्रिम हात प्रदान
करण्यात आले. यासाठी रोटरी ३०३० चे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांनी व्हाट्स ऍपचा
वापर प्रभावी केला. डॉ. पाटील यांनी मराठा मंगल या उपक्रमातही सोशल मीडियाचा प्रभावी
वापर केला आहे. मराठा समाजातील उपवर वर-वधुंची माहिती संकलनासाठी व्हाट्स ऍप
वापरले जाते. यासाठी आर. बी. पाटील सहकार्य करतात.
सोशल मीडियात जळगावमधील
मान्यवरांच्या विचारांचे व कार्याचे प्रतिबिंब सकारात्मक स्वरुपात वरील
विवेचनाप्रमाणे उमटत आहे. जळगाव शहर व जिल्ह्यात सोशल मीडियाच्या विधायक,
सकारात्मक व कृतीशिल वापराच्या अनेक कहाण्या आहेत. म्हणूनच जळगाव शहरातील
नागरिकांचा सोशल मीडिया वापराचा हा पॅटर्न युनिक ठरतो.
सर, अतिशय बारीक नि अभ्यासपूर्ण
ReplyDeleteएकदम भारी लिखाण सर
ReplyDeleteदिलीप तिवारी सर
ReplyDeleteलई भारी
सर, दै. देशदुतमध्ये आज प्रकाशित झालेला आपला संपुर्ण लेख वाचला. डिजिटल मिडियाचा प्रभावी वापर जळगाव जिल्ह्यात अतिशय चांगल्या पध्दतीने होत आहे हे वाचुन खुप आनंद झाला.
ReplyDeleteसर, या संपुर्ण लेखात क्रिएटिव कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. गोकुळ चौधरी सर यांचा कुठेही उल्लेख आपण केलेला नाही याचे आश्चर्य वाटते. गोकुळ सरांचे खान्देशातील आय.टी. क्षेत्रातील विविधांगी कार्य सर्वश्रृत आहे. सर्वांनी डिजिटल माध्यमाचा, कॉम्प्युटर, आय.टी. सेवांचा प्रभावी वापर करावा यासाठी ते कायमच आग्रही असतात.
गोकुळ सर, गेल्या 20 वर्षापासुन डिझायनिंग, प्रिंटिंग, ॲडर्व्हटायझिंग, आय.टी. सोल्युशन क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी आतापर्यंत 500 हुन अधिक विविध क्षेत्रातील दर्जेदार वेबसाइटची निर्मिती केलेली आहे, 2002 मध्ये सेंट्रल गर्व्हेमेंटच्या Ministry of Communications & Information Technology, New Delhi तर्फे दिल्या जाणाऱ्या 'Dewang Mehta Award for Innovation in Information Technology (IT) या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातुन Nominate झालेले गोकुळ सर हे एकमेव होते, त्यावेळी तत्कालीन मंत्री स्व. प्रमोद महाजन साहेबांनी त्यांचा गौरव केला होता, 2011 साली IT उद्योगात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल गोकुळ सरांना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित केले गेले होते. फेसबुक, व्हॉटस्ॲप या माध्यमातुन खान्देशातील अनेक चांगल्या, सामाजिक उपक्रमात गोकुळ सरांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.
पुर्वी दै. तरुण भारत मध्ये कार्यरत असलेले व नंतर दैनिक ‘नवभारत’मध्ये नोकरीनिमित्त जॉइन झालेले श्री. मनोज भादलीकरांचा मध्यंतरी अकस्मात मृत्यु झाला होता. त्यावेळी तरुण भारतचे श्री. धन्यकुमार जैन साहेब, गोकुळ सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी श्री. भादलीकरांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी फेसबुक, व्हॉटस्ॲपवर आवाहन केले होते. त्यांच्या सातत्याने केलेल्या आवाहनामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध वर्तमानपत्रात, इलेक्ट्रानीक माध्यमात कार्यरत असलेले तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी रु. 70,000/-ची रोख आर्थिक मदत त्यांचाकडे जमा केली होती. नंतर भादलीकर कुटुंबीयांना हि रु. 70,000/-ची रोख आर्थिक मदत सुपुर्त करण्यात आली होती. त्याच वेळेस भादलीकर कुटुंबीयाला जळगावातील अनेक मान्यवरांनी विविध स्वरुपात यथायोग्य मदत केली होती.
जळगाव शहर मराठी उद्योजक, जळगाव-धुळे-नंदुरबार ॲडर्व्हटायझिंग वर्ल्ड, Jalgaon Advertising Agencies Guild (JAAG), Jalgaon Printers Family, Saturday Club Jalgaon, An Artist Group, Media Group, Yog Group Jalgaon, Blood Doner’s Group, Aamhi Jalgaonkar, Friends Behind The Camera, Jalgaonkar, Khandesh Maza, Patrons of TechnoPark, Khandesh, Jalgaon Autohub यासह अनेक व्हॉटसॲप / फेसबुक गृपमध्ये गोकुळ सरांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. यातील अनेक गृपचे तर ते ॲडमिन आहेत. वरील बऱ्याच गृपची मी सुध्दा सदस्य आहे.
गोकुळ सर पुर्वी ग्राफिक्स डिझायनिंग, ॲनिमेशनचे क्लासेस घ्यायचे त्यावेळसची मी त्यांची विद्यार्थीनी, त्या नंतर काही वर्ष मी सरांकडे जॉबला पण होती. आता लग्नानंतर मी पुण्याला स्थायिक झाले आहे पण आजही जळगावातील अनेक दैनिक मी दररोज ऑनलाइन वाचत असते.
मी अनेक वर्ष गोकुळ सरांचे काम जवळुन पाहिले आहे... सर अत्यंत मितभाषी आहेत... खर तर मी वर उल्लेख केलेल्या कामाव्यतिरीक्तही सरांचे खुप मोठे Constructive कार्य आहे... ते त्या कार्याबद्दल स्वत:हुन कधी बोलत नाही... न बोलता आपले काम करत राहणे हा त्यांचा स्वभाव आहे...
तिवारी सर, आज दैनिक देशदुतमध्ये आपला लेख मी वाचला त्यात गोकुळ सरांचा उल्लेख नसल्यामुळे मला खुप आश्चर्य वाटले त्यामुळे हे लेखनप्रपंच...
आपण कोण आहात ? गोकुळ चौधरी यांच्याविषयी मी लिहिले नाही. कारण ते काय करतात हे मला माहित असण्याचे कारण नाही. असले ही तर मी कोणाचे लिहावे हा माझा अधिकार. तुम्ही सोशल मीडिया त्यांच्याकडून शिकला असाल तर कमेंट ही 3/4 ओळीची असावी हे त्यांनी तुम्हाला शिकवले असावे. एवढा हात भर लेख तुम्ही स्वतःचा ब्लाॅग म्हणून टाकू शकला असता ...
DeleteThank you sir
ReplyDelete