Friday 16 December 2016

समांतर रस्त्यांच्या श्रेयासाठी झगडा !!!

जळगाव शहर, जिल्हा लगतच्या परिसरातून रस्ते, राज्यमार्ग व महामार्ग विकासासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दि. २५ जानेवारी २०१६ ला जळगाव येथे केली होती. या रस्त्यांच्या विकासाचा प्रारंभही गडकरींच्या हस्ते तेव्हा झाला होता. प्रारंभाच्या कामाची कोनशिला नंतर कुठे लावण्यात आली ती आजपर्यंत पाहायला मिळालेली नाही किंवा जळगाव परिसरात रस्त्याच्या विकासाचे काम सुरू झाल्याचे ऐकीवात नाही.  

उलटपक्षी जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ६ (एशियन हायवे ४१) च्या चौपदरीकरणाचे काम रेंगाळत गेले. एल ऍण्ड टी कंपनीने या कामाचा ठेका का सोडला ?  कोणाशी कशा प्रकारे टक्केवारीचे गणित बिघडले ? हा विषय सुद्धा गुलदस्त्यात राहिला. नंतर तीन ते चारवेळा कामाच्या ई निविदा काढण्यात आल्या. पण, काम घेण्यासाठी कोणीही ठेकेदार समोर आले नाहीत. अलिकडे महामार्ग चौपदरीकरण कामाचे दोन तुकडे पाडून ठेके मंजूर झाले आहेत. मात्र, काम सुरू व्हायला एप्रिल २०१७ उजाडेल असे सांगण्यात येते.

महामार्ग ६ चे जळगाव शहरातील क्षेत्र १५ किलोमीटरचे आहे. पाळधी बायपास ते खेडीच्याही पुढील क्षेत्र यात समाविष्ट आहे. महामार्गचा हा भाग जळगावकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. या क्षेत्रात वाहन अपघातात दरवर्षी बळी जाणाऱ्यांची संख्या ९० ते १०० आहे. दरमहा जवळपास ७ ते ८ जणांचे अपघातात मृत्यू होतात. यात जळगाव शहर क्षेत्रात होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणिय आहे. ही भयावह आकडेवारी लक्षात घेवून जळगाव शहरातील महामार्ग लगत समांतर रस्ते तयार करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. महामार्ग व त्या लगतची जागा आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (औरंगाबाद धुळे) कडे वर्ग झालेली आहे. त्यामुळे जळगाव महानगर पालिका स्वतःच्या अधिकारात समांतर रस्त्यांचा प्रश्न सोडवू शकत नाही.  

आजच्या घडीला वस्तुस्थिती अशी आहे की, जळगाव महानगर पालिका कोणतेही मोठे विकास काम करायला अर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. मात्र, महामार्गाच्या लगत जमीन सपाटीकरणासाठी मनपाची यंत्रणा मदत करु शकते. शहरातील टाकावू माती, इमारत बांधकाम, तोडफोड साहित्य महामार्गाच्या लगत टाकले जावू शकते. गेल्या काही वर्षांपासून तशी भर टाकणे सुरूही आहे. याचाच परिणाम म्हणून कालिंका माता मंदिर, औरंगाबाद चौफुली, ईच्छादेवी चौक, आयटीआय, शिव कॉलनी, मानराज पार्क, खोटेनगर, गिराणा पुलाच्या भागात महामार्गाच्या लगत बऱ्यापैकी भराव झाले आहेत. शिस्तबद्ध नियोजन केले तर किमान कच्च्या स्वरुपातील समांतर रस्ते तयार होवू शकतील अशी स्थिती आहे.

समांतर रस्त्यांचा विषय गेल्या काही दिवसात चर्चेला आला. जळगाव हद्दीतील रस्त्याचे सिमांकन करा असे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी एका बैठकीत दिले. अशा प्रकारची बैठक पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने झाली. बैठकीला मनपाचे प्रतिनिधी म्हणून महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, आयुक्त जीवन सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे,  जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर,  भूमि अभिलेख विभागाचे अधिक्षक महेश खडतरे आणि महामार्गाचे बहुतांश क्षेत्र  ज्या वॉर्डात येते तेथील नगरसेवक अमर जैन उपस्थित होते. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेत खड्डे बुजवा व साई पट्ट्यांच्या कामांसाठी प्रयत्न करा अशाही सूचना जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी दिल्या.

या बैठकीपूर्वी काही लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महामार्गाच्या कामासाठीचे निवेदन दिले. दुसऱ्या दिवशी तडकाफडकी काहींनी सह्यांची मोहीम सुरू केली. एक प्रकारे हा सारा फार्स श्रेय लाटण्यासाठीच सुरू झाला. यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या भूमिकेविषयी शंका नाही. पण, एखाद्या विषयाला जेव्हा जिल्हा प्रशासन हात घालते तेव्हाच लोकप्रतिनिधी कसे काय जागे होतात ? असा मुलभूत प्रश्न पडतो. या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला तर काही वेगळ्या गोष्टी समोर येतात.

जळगाव शहराच्या लगत असलेल्या समांतर रस्त्यांचा विषय हा मनपाच्या अधिकारात नाही, हेच अनेकांना माहित नव्हते. त्यामुळे आतापर्यंतच्या अपघातांचा दोष मनपाला लागत होता. याविषयावर वॉर्ड क्रमांक १३ चे नगरसेवक अमर जैन यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी मनपा आयुक्त सोनवणे यांना हा विषय मार्गी लावण्यास सांगितले. त्यावर सोनवणे यांनी मार्ग दाखवला की, या विषयावर जिल्हाधिकारी हेच इतर विभागांना सोबत घेवून मार्ग काढू शकतात. त्यानंतर अमर जैन यांनी जिल्हाधिकारी अग्रवाल यांना भेटून निवेदन सादर केले. तशा बातम्याही काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. तेथून श्रेयासाठी इतर मंडळी समोर आली. जिल्हाधिकारी व या मंडळींची बैठकीपूर्वी भेट झाली तेव्हा, जिल्हाधिकारी त्यांना म्हणाल्या ही, तुम्ही आता श्रेयासाठी का पुढे येत आहात ? एवढेच नव्हे तर काहींनी घाईने सह्यांची मोहीमही सुरू केली.


नागरी सोयी सुविधांसाठी नागरिकांचा दबाव गट असला पाहिजे. जळगाव शहरात तसा दबाव गट नाही. कारण, ज्यांच्याकडे आशेने पहायचे तेच कोणाचे तरी दबलेले आहेत. पक्ष, संघटना आदीत नेते मंडळी विभागली गेली आहेत. अशाही स्थितीत समांतर रस्त्यांसाठी एकत्र आलेल्या नेत्यांचे नक्कीच कौतुक आहे. मात्र, हे एकत्र येणे केवळ फोटो किंवा चमकोगिरीसाठी असू नये. आता विषयाला हात घातलाच आहे तर त्याचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. अशा प्रकारच्या आंदोलनात कोणत्याही एक माध्यमाची मक्तेदारी सुद्धा नको. माध्यमांच्या बातम्यांसाठी आंदोलन करायचे की, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायेच याचाही विचार संबंधित लोकप्रतिनिधींनी करायला हवा. समांतर रस्त्यासाठीचा हा झगडा नागरिकांचा लढा म्हणूनच उभा राहायला हवा ....

No comments:

Post a Comment