Monday, 12 December 2016

ब्रम्हाच्या सहवासातील ते प्रसंग ...

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक जाणिव असलेले विचारवंत पद्मश्री स्व. भवरलालजी जैन तथा स्व. मोटेभाऊ यांचा आज जन्मदिवस. पहिलांदा असे घडले की, भाऊंचा जन्मदिवस असूनही आज जैन हिल्सवर जाण्याची संधी नाही. गाभाऱ्यात परमेश्वराची प्रतिमा नसताना तेथे जाणे टाळावे लागते. तद्वतच जैनहिल्सवर स्व. मोठेभाऊंची उपस्थिती नसणे या दोन्ही भावना माझ्यासाठी आज तरी एकच आहेत.  

दोन दिवसांपूर्वी फेसबुकने एका पोस्टच्या मेमरीची आठवण करुन देणारा संदेश पाठवला. ती जुनी पोस्ट पाहून खुप आठवणी उचंबळून आल्या. एक एक किस्सा आठवला. हृदय थोडे भारीच झाले. पण, मी जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली नाही. आठवण होती स्व. मोठ्याभाऊंची.

स्व. मोठेभाऊंच्या पंचहात्तरी निमित्त दै. देशदूतच्या टीम सोबत मी विशेषांक केला होता. जवळपास १५ दिवस मी जैन कुटुंबियांच्या सहवासात होतो. अशोक, अनिल, अजित व अतुल या चारही भावांनी स्व. मोठेभाऊं विषयी त्या अंकात लिहावे म्हणून आमचा प्रयत्न होता. अशोक जैन यांची मुलाखत हेमंत अलोने यांनी घेतली. अनिल जैन यांनीही भावना लिहून पाठविल्या. अजित जैन परदेशात होते. त्याच्या लेखासाठी धावपळ सुरू होती. अतुल जैन यांची मुलाखत मीच घेतली. जैन उद्योग समुह स्वतःच्या निधीतून सामाजिक कार्य व खेळावर कसा खर्च करतो हे त्यांनी सांगितले.

अखेरच्या टप्प्यात स्व. मोठेभाऊंची मुलाखतही मी घेतली. तब्बल दीड तास गप्पा करीत मुलाखत झाली. संपूर्ण जीवनाचा सार स्व. मोठेभाऊंनी सांगितला. जैन परिवाराविषयी अनेक संदर्भ मला माहित असल्यामुळे आमच्या गप्पा रंगल्या तशी उत्तरही सविस्तर होत गेली. ही मुलाखत किशोर कुळकर्णी यांच्या मदतीने ध्वनीमुद्रीत केली होती. ती वारंवार ऐकून मी लिखाण केले. त्यामुळे ती खुपच जीवंत झाली.

स्व. मोठेभाऊंच्या पंचहात्तरीच्या विशेषांकांचे प्रकाशन आम्ही जैनहिल्सला चेअरमन ऑफिसला केले. त्या दिवशी स्व. मोठेभाऊ खुप आनंदात होते. त्यांनी आम्हाला जैनहिल्सवर जेवायचा आग्रह केला. ते जेवण आमच्यासाठी पाहुणचारा सारखे ठरले. कारण, जैनहिल्स शेजारी विस्तारित जमिनीत एक वडाचे झाड होते. त्या झाडावर स्व. मोठेभाऊंचे नितांत प्रेम होते. त्या झाडा खाली जावून वनभोजनाची व्यवस्था स्व. मोठेभाऊंनी केली. मी, हेमंत अलोने, मनिष पात्रिकर व किशोर कुळकर्णी असा हा पाहुणचार रंगला. स्व. मोठेभाऊंच्या विषयी त्यांच्या वाहनचालकाने भावनाशिल आठवणी सांगितल्या. आई-वडीलांच्या नंतर एवढ्या प्रेमाने जेवू घालणारे बहुधा स्व. मोठेभाऊच आहेत.

स्व. मोठ्याभाऊंची प्रत्येक भेट लक्षात असणारी होती. प्रत्येकवेळी समोरच्या व्यक्तिला वडीलकीच्या नात्याने ते सल्ला देत. निरीक्षण व अनुभवातून जे जाणवते ते स्व. मोठेभाऊ सल्ला देवून सांगत. स्व. मोठेभाऊंचा हार्ट हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा होता. कारण, दोन यशस्वी बायपास करून त्यांनी हृदयाला कह्यात ठेवले होते. हृदयाशी संबंधित सर्वच माहितीचे त्यांनी अफाट वाचन केले होते. भल्याभल्या हृदय तज्ज्ञांना नसेल तेवढी अद्ययावत माहिती त्यांना होती. चुकून कोणी हृदय विषयावर बोलणे केलेच तर स्व. मोठेभाऊ एखाद्या शल्यविशारदाप्रमाणे दृदयाचा कप्पा नं कप्पा उलगडून दाखवत.

स्वतःच्या हृदयाची माहिती असलेले उद्योगपती तथा विचारवंत म्हणून स्व. मोठेभाऊ यांची एकमेव ओळख असेल. स्वतःला जाणून घेण्याचा हा अध्यात्मिक प्रयोग केवळ स्व. मोठेभाऊ करु शकत असत. त्यामुळे अनेकांच्या हृदयांना जोडण्याची किमयाही त्यांनी सहजपणे जपली. स्व. मोठेभाऊ राजस्थानी मारवाडी होते. स्वतःच्या जन्मभूमिचा शोध त्यांनी घेतला. त्यांचे बोलणे अभ्यासू, विद्वत्ता प्रचूर व लाघवी होते. अशी व्यक्ती जेव्हा दृदयाला जोडण्याचे कौशल्य बाळगून असते तेव्हा ती अहंम ब्रम्हासी म्हणजे, मी स्वतःच ब्रह्म असल्याच्या स्थितीला पोहचते. स्व. मोठेभाऊंच्या सहवासातील असे अनेक प्रसंग ब्रह्माच्या सोबतच निवास केल्याचा आनंद देणारे होते ...

आ. स्व. भवरलालजी जैन तथा स्व. मोठेभाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या स्मृतीला मनःपूर्वक वंदन ....



No comments:

Post a Comment