Monday 5 December 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मला काय दिले ?

सध्याच्या समाजाची विभागणी भक्त (Divoties), अनुयायी (followers), पंथीय (Stoic) आणि कार्यकर्ता (Workers) अशा चार प्रकारात केली जाते. या चारही शब्दांना विशिष्ट कृतीचा ठोस अर्थ आहे. प्रत्येक शब्दाशी निगडीत भाव, वर्तन व आचरण विभिन्न आहे. देवादिकांच्या कर्मकांड मार्गावर चालणारा भक्त, आदर्श व्यक्तीच्या विचारांनुसार आचरण किंवा अनुनय करणारा अनुयायी, जगण्याची विशिष्टशैली स्वीकारुन एकाच पथ वरुन चालत ओळख जपणारा पंथीय आणि व्यक्ति, समाज, पक्ष, संघटन यासाठी झेपेल व पडेल ते कार्य करणारा कार्यकर्ता अशा या ढोबळ व्याख्या आहेत.

कोणती व्यक्ती कोणाला कशा प्रकारचा आदर्श मानते, कोणत्या प्रकारे आदर करते ? याच्यावर वरील चारही कृतींचे बाह्य दृश्य वर्तन अवलंबून असते. त्यामुळे माणसांच्या आदर्शविषयक संकल्पना बदलल्या की, त्याचे वर्तन आणि आचरण बदलते. माणसाचा देव केला की भक्त निर्माण होतात. माणसाचा राष्ट्रपुरुष केला की, अनुयायी  तयार होतात. माणूस देव, धर्माच्या पलिकडे बोलू आणि वागू लागला की पंथ निर्माण होतो. कार्यकर्ता असणे ही सामान्य अवस्था आहे. कोणाचेही आणि कसेही कार्य करा. तुम्हाला कार्यकर्ता शब्द चपखल चिकटतो.

महामानव तथा युगपुरुष भारतरत्न डॉ. भीमरावजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जयंतीदिन. हिंदुस्तानातील सर्व सामान्य माणसाला सामान्यपणे जगण्याचा अधिकार देणाऱ्या घटनातज्ज्ञाचा आज स्मृतीदिन. डॉ. बाबासाहेब यांनी ज्या सामान्य माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचे मुलभूत अधिकार दिला त्यातील मी एक. मी बाबासाहेबांचा भक्त, अनुययी, पंथीय किंवा कार्यकर्ता नाही. कारण भक्त पाखंडी असू शकतो. अनुयायी ढोंगी असू शकतो. पंथीय पथ भ्रष्ट असू शकतो. कार्यकर्ता बंडखोरी करु शकतो. मग मी आहे कोण ? तर कोणीही व्यक्ती विशेष नसलेला सामान्य माणूस.

डॉ. बाबासाहेबांनी सामान्य माणसाला काय दिले हे नीटपणे समजून घेतले तर हेही लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब यांचे विचार मेंदूत साठवण्याची गरज आहे. विचार हृदयात साठवले जावू नयेत. हृदयात प्रतिमा आणि भावना असावी. गल्लत होते ती येथे. आपण विचार हृदयात ठेवतो आणि प्रतिमा मेंदूत. हृदय नेहमी भावनाशिल होते. भानवेच्या भरात अथवा प्रवाहात विचार वाहून जातात. मेंदूत केवळ प्रतिमा असली की तिच्या विटंबनेचाच तणाव निर्माण होतो. प्रतिमेचे माध्यम कागद, दगड, माती किंवा इतर काही आहे हे विसरुन आपण केवळ प्रतिमेतच आदर्शाला शोधतो. हाच खरा मेंदू आणि हृदयातील भ्रम आहे. खरेतर विचार मेंदूत व प्रतिमा हृदयात हवी. हृदयातील प्रतिमेची विटंबना कोणीही करु शकत नाही आणि मेंदूतील विचार कोणीही पुसू शकत नाही.

डॉ. बाबासाहेब यांनी मला सामान्य नागरिक म्हणून काय दिले आहे ? याचे उत्तर भारतीय संविधान कलम १९ (१) मध्ये  आहेत. कलमाच्या भाषेत बोलायचे तर मला (अ) वाणी (भाषण) व अभिव्यक्ती होण्यासाठी स्वातंत्र्यचा अधिकार दिला आहे. सोप्या भाषेत, हवे ते आणि हवे तेथे बोलण्याचा अधिकार दिला आहे. (ब) शांततेने व नि:शस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार दिला आहे. सोप्या भाषेत, मी जात,धर्म, पंथ आणि पक्ष म्हणून कुठेही, कधीही एकत्र येवू शकतो. (क) संघटना स्थापन करण्याचा अधिकार दिला आहे. सोप्या भाषेत, मी कोणत्याही विचारधारेची अथवा कार्याची संघटना, संस्था व पक्ष स्थापन करु शकतो. (ड) देशातील कुठच्याही भागात मुक्त संचार करण्याचा अधिकार दिला आहे. सोप्या भाषेत देशांतर्गत कुठेही जाण्या-येण्याचा अधिकार. (इ) देशातील कुठच्याही भागात राहणे व स्थायिक होणे आणि (ग) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार वा उद्योग करणे यांचा अधिकार दिला आहे. सोप्या भाषेत पोटासाठी कुठेही कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार घटनेने मला दिला आहे.

म्हणजेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतील तरतुदींच्या माध्यमातून देवा धर्माच्या नावाने भक्तांना, व्यक्ती-संस्था-संघटनेच्या नावाने अनुयायांना, वर्तन-आचरणाच्या नावाने पंथीयांना आणि इतर कोणतेही कार्य करण्याच्या नावाने कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. अशा प्रकारच्या चारही वर्गिकरणात आपली विभागणी करुन घेण्यापेक्षा सामान्य नागरिक म्हणून सर्व अधिकार व्यक्तिगत पातळीवर आबाधित ठेवणे मला संयुक्तिक वाटते.

सामान्यपणे जगण्याचा अधिकार घटनेच्या माध्यमातून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा माझ्या घरात आहे. भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर आणि भगवान परशुराम यांचेही पुतळे माझ्या घरात आहेत. अलिकडे एका हितचिंतकाने भगवान महाविर यांचा पुतळा भेट दिला. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी गांधीजी भेट दिले. दोन दिवसाःपूर्वी एकादशीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पांडुरंगाचा पुतळा भेट दिला.

या सर्व प्रतिमा मी माझ्या घरात ठेवतो. त्या प्रतिमा हृदयात जपतो. त्यामुळे इतर कोणत्याही ठिकाणी पुतळ्यांची विटंबना झाली तरी माझ्या मनातील पावित्र्य नष्ट होत नाही. प्रतिमा हृदयात असणे ही व्यक्तिसापेक्ष क्रिया आहे. सार्वजनिक ठिकाणी मूर्तीची विटंबना ही समुह सापेक्ष विकृती आहे. मी असे मानतो की, जेव्हा माझ्या घरातील पुतळा आणि हृदयातील प्रतिमा सुरक्षित असेल तेव्हा बाहेरच्या कागद, माती, दगडातील प्रतिमेची विटंबना झाल्याचा ताण-तणाव व्यक्तीगत पातळीवर का घ्यावा ? कारण डॉ. बाबासाहेबांनीच मला स्वतंत्र व मुक्तपणे जगण्याचा अधिकार दिला आहे. या अधिकारांच्या सजग व हेतूतः वापरातून मी आनंदी, समाधानी व सुरक्षित आयुष्य सहज जगू शकतो. इतरांनाही जगू देवू शकतो.माझ्या दृष्टीने हीच तर खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली आहे. हाच आदर मी आचरणात ठेवला आहे.

जयभीम !!!

4 comments: