Tuesday 8 November 2016

राजकिय जाहिरातींचा किमयागार !

जळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघासाठी आणि १३ नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. याच बरोबर विधान परिषदेच्या नाशिक पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार होणे सुरू आहे. एकूणच राजकिय वातावरणात गर्मी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकिय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून एकमेव भाजचे उमेदवार रिंगणात आहेत. इतर उमेदवार अपक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या जाहिर प्रचाराचा धुराळा फारसा उडणार नाही. थेट मतदाराशी लेन-देनच्या व्यवहारावर सारे काही अवलंबून असल्यामुळे उमेदवार वृत्तपत्रात किंवा इतर प्रचारावर फारसा खर्च करणार नाही. पालिकांच्या निवडणुकीचा प्रक्रिया माघारीच्या फेरीत आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. यावेळी नगराध्यक्षपदासाठी शहरांमधील सर्व मतदार मतदान करतील. म्हणजेच नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेतून तीन वर्षांच्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या संभाव्य बदलाची कल्पना येवू शकते. विज्ञानाच्या प्रयोगिक भाषेत बोलायचे तर नगराध्यक्षांची निवडणूक ही लिटमस टेस्ट आहे. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी प्रचाराची मोठी रणधुमाळी जवळपास सर्वच ठिकाणी दिसते आहे. अशा या साऱ्या गर्मीच्या वातावरणात निवडणुकीच्या जाहिर प्रचाराची साधने अद्यापही थंडावलेली दिसतात.  

अर्ज माघारीपर्यंतच्या पहिल्याफेरीत कोणत्याही उमेदवाराने वृत्तपत्रिय किंवा इतर माध्यमातील जाहिरातींवर लक्ष दिलेले दिसत नाही. यापूर्वीच्या निवडणुकांमधील प्रचार डोळ्यांसमोर आला की उमेदवारांनी प्रचाराची नानाविध आयुधे वापरल्याची आणि त्यातून राजकिय खडाजंगी झाल्याची अनेक उदाहरणे समोर येतात. आता तर डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून २४ तास प्रचार सुरू असतो. प्रत्येक सेकंदाला काहीना काही संदेशाचे प्रसारण होत असते. त्यामुळे उमेदवारांनी जाहिर प्रचाराच्या नियोजनात प्रींट, लाईव्ह, वेब आणि सोशल मीडिया याचा विचार करावा लागतो. मोबाईलच्या वापरामुळे व्यक्तिगत प्रचाराचे विश्वासार्ह साधन मिळाले आहे. त्याचा योग्य वापर करण्यासाठी त्याचे तंत्र माहित असलेली मंडळी प्रचारात जोडावी लागते.

सन १९९९ पासूनच्या निवडणूक प्रचाराचा मागोवा घेताना असे दिसते की, निवडणूक जाहिरातींचा किमयागार म्हणून जळगाव येथील मृदंग इंडिया असोशिएटचे अनंत भोळे यांनी आपली ओळख तयार केली आहे. जवळपास १७ वर्षांच्या प्रवासात अनेक निवडणुकींसाठी जाहिरात मोहिमा (कॅम्पेन) राबवून उमेदवारांच्या शिरात विजयाचा तुरा मृदंगने रोवला आहे. लोकसभा, विधानसभा, मनपा, पालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक जिल्हा दूध संघ, साखर कारखाने अशा अनेक संस्थांच्या निवडणुकीत मृदंगने शंभरावर निवडणूक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. 

अनंत भोळे हे तसे व्यवस्थापन शाखेचे (एमबीए) पदवीधर. वृत्तपत्रासह, जाहिरात संस्थांमध्ये नोकरीचा अनुभव घेवून हा माणूस स्वतःची जाहिरात संस्था घेवून उभा राहिला. कला प्रांताच्या शिक्षणाचा कोणताही अनुभव नाही. मात्र, अंगिभूत कला गुणातून जाहिरात निर्मिती हा त्यांचा प्रांत ठरला. व्यवस्थापन शाखेच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणात जे काही विपणन (मार्केटींग) शिकले ते अनुभवासह व्यवहारात आणले. बदलत्या काळाने संगणकिय कौशल्यातून हवी त्या आशयाची कला निर्मिती सहज शक्य झाली. यातील संगणकिय तंत्र अनंत भोळे यांनी परिश्रमातून आत्मसात केले. त्यानंतर मेंदू आणि बोटांच्या करामतीतून साकारत गेला निवडणुकीच्या जाहिरातींचा किमयागार होण्याचा प्रवास.

अनंत भोळे माझे जवळचे मित्र आहेत. नोकरीतून बाहेर पडल्यानंतर मला स्वतःच्या व्यवसायाला लावणारा मित्र. त्याला आम्ही अनंताच म्हणतो. त्याच्या प्रत्येक निवडणूक मोहिमेचा मी जवळचा साक्षीदार. अपवादात्मक काही जाहिरातींचा कच्चा आशय पुरवणारा.


निवडणूक जाहिरातींच्या मोहिमेत अनंताची एक खासियत आहे. ती म्हणजे त्याच्या जाहिरातीचा मजकूर (कॉपी). कशाची जाहिरात तयार करायची त्याची पूर्ण माहिती गोळा करा आणि ती माहिती लिहून काढा असे जाहिरातीच्या पुस्तकी शिक्षणात शिकवले जाते. आज काल या मुलभूत तत्वावर फारसे जाहिरातकर्ते काम करीत नाही. मिळेल त्या जुजबी व तात्कालिक माहितीवर जाहिरातींचा आशय निर्मिला जातो. त्यामुळे अशा जाहिरातींमधील कॉपी, स्लोगन, पिक्चर कोणताही परिणाम घडवून न आणता फसतात. त्यावरील खर्च निरर्थक जातो. अनंताच्या कार्यपध्दतीत कॉपीला खूप महत्त्व आहे. निवडणुकीशी संबंधित जाहिरातीत कॉपीसह त्यातील प्रत्येक शब्दाला अर्थ आणि अनर्थ आहे.

कोणत्या निवडणुकीत कोणाचा प्रचार करायचा ? हे निश्चित करताना उमेदवार अथवा संस्था याच्याशी संबंधित खरी-खोटी अशी सर्व प्रकारची माहिती अनंताला सांगावी लागते. याबरोबरच विरोधकांच्या कार्याची आणि कृत्यांची कुंडलीही अनंताला सोपवावी लागते. येथे एक विशेष बाब म्हणजे, अनंता स्वतः राजकिय संदर्भ अद्ययावत (अपडेट) ठेवतो. वृत्तपत्रांचे बारकाव्याने वाचन आणि नेट वरुन उपलब्ध होणाऱ्या सर्व माहितीचे किमान अवलोकन अनंता करीत असतो. मोबाईलवर वृत्तपत्रे किती जण वाचतात माहित नाही, पण अनंताच्या मोबाईलमध्ये आघाडीच्या मराठी, हिंदी व इंग्रजी दैनिकांचे ऍप अपडेट असते.

निवडणूक जाहिरातींचे नियोजन चार विविध प्रकारात असते. त्यात उमेदवाराचा परिचय, त्याने केली कामे व करणार असलेली कामे, उमेदवाराचे समर्थक-पक्ष-संघटनांची भूमिका आणि उमेदवाराविषयीचे आरोप-आक्षेप याचा प्रामुख्याने विचार केला जातो. अनंता या चारही प्रकारात अभ्यासपूर्ण आशयाची निर्मिती करतो. मला चांगले आठवते, १९९१ मध्ये जळगाव पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची शहर विकास आघाडी व पारंपरिक विरोधकांची नगर विकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस होती. तेव्हाच्या जाहिरात युद्धातून जाहिरात जुलबंदी हा नवा प्रकार जिल्ह्याच्या राजकारणात जन्माला आला. भ्रष्ट व्यवहारांच्या कारणावरून जळगाव पालिका सरकारने बरखास्त केल्यानंतर ही निवडणूक झाली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर अगदी कवडट भाषेत टीका सुरू होती. त्याच्या उत्तराच्या जाहिराती करताना सत्ताधाऱ्यांची दमछाक झालेली होती.

सन २००१ मध्ये जळगावच्या नगराध्यक्षांची निवडणूक सार्वत्रिक पद्धतीने झाली होती. त्याकाळात अनंताने सत्ताधारी आघाडीला विविध प्रकारांच्या आरोपांच्या जाहिरातींनी सळोकी पळो करुन सोडले होते. तेव्हा ओसामा बीन लादेनचाही संदर्भ जाहिरातीत वापरला गेला होता. अनंताची ही निवडणूक जाहिरात मोहिम एवढी यशस्वी ठरली की, सत्ताधारी आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. त्यांना नगरसेवकांच्या संख्येत बहुमत मिळाले मात्र, नगराध्यक्षपद भाजपकडे गेले. जळगाव शहरात भाजपने कमळाच्या चिन्हावर पाहिलेला हा पहिला विजय. त्यानंतर २०१४ विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरातून भाजपचा उमेदवार विजयी झाला. हा निकाल सुद्धा ३५ वर्षांची राजकिय दादागिरी मोडणारा ठरला होता. त्याचीही जाहिरात मोहीम अनंताचीच होती.

गेल्या १७ वर्षांच्या प्रवासात अनंताच्या मृदंग इंडिया असोशिएटने जवळपास १९ विविध निवडणुकांच्या प्रचारात यशस्वी जाहिरात मोहिमा राबविल्या आहेत. त्यात २००१ ची जळगाव नगराध्यक्ष, २००१ मध्ये भुसावळ नपा, २००३ जामनेर नपा, २००४ मध्ये लोकसभा, २००५ मध्ये जळगाव विधानसभा, २००६ मध्ये पाचोरा, २००७ मध्ये जळगाव विधानसभा मतदारसंघ, २००८ मध्ये जळगाव नपा, २००९ मध्ये जळगाव, मुक्ताईनगर व रावेर विधानसभा मतदारसंघ, २०११ मध्ये फैजपूर नपा, २०१३ मध्ये जळगाव मनपा निवडणुकांसाठी अनंताने यशस्वीपणे जाहिरात मोहीमा राबविल्या आहेत. २०१३ च्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये असे की, या काळात मनपातील सत्ताधारी गटाचे नेते सुरेशदादा जैन हे घरकूल घोटाळ्याच्या आरोपात कारागृहात असताना सत्ताधारी गटासाठी अनंताने जाहिरात मोहिम तयार केली. तेव्हा सत्ताधारी गटाविषयी सांगण्यासारखे काहीही नव्हते. पण अनंताने आघाडीच्या मागील काळाचा उल्लेख प्रभावीपणे करीत बाजी मारून नेली. सत्ताधारी गटाला संख्याबळ मिळाले. अनंताच्या राजकिय अभ्यास व निरीक्षणाचे हे यश होते. याशिवाय जिल्ह्याबाहेरील बीड (मराठवाडा) व बार्शी (जि. सोलापूर) येथील पालिकांच्या निवडणुकांचे कामही अनंताने केले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये संबंधितांना यश मिळाले होते. मात्र त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत अनंताने भाजपच्या उमेदवाराचे जाहिरात नोहिम नियोजन करून गेल्या ३५ वर्षांपासून असलेली सुरेशदादा जैन यांची राजकिय मक्तेदारी मोडीत काढली. या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला.

अनंताची निवडणूक जाहिरात मोहमांची खासियत लक्षात घेवून त्याच्याकडे विविध राजकिय पक्षांचे नेते अगोदरच कामाचे बुकींग करतात. व्यवसायातील तत्त्व म्हणून एकदा एकाचे काम स्वीकारले की, अनंता विरोधातील दुसऱ्याचे काम स्वीकारत नाही. काही वेळा विरोधकांनी आग्रह केला, जादा रकमेचे सूतोवाच केले पण अनंताने आपली तत्वे सोडली नाहीत.


सध्याचा राजकिय गर्मीचा काळ पाहता अनंताच्या राजकिय जाहिरातींचा किमयागार असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. निवडणुकीच्या फडात अजून रंगत यायची आहे. दिवस सरत जातील तसा आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी वाढेल. यात कुठेतरी अनंताच्याही काही जाहिराती असतील.

No comments:

Post a Comment