Wednesday 30 November 2016

भाजपतील अर्धा प्याला ... !

नशा मद्याची असते तशी ती सत्तेचीही असते. सत्तेच्या नशेत मिळणारे यश कधी भरलेल्या प्याला प्रमाणे असते. म्हणजे १०० टक्के विजयाचा कैफ देणारे. कधी कधी सत्तेचा प्याला हा अर्धाच भरला जातो. काही तरी मिळवताना बरेच काही गमावले जाते. अशा प्रकारचे यश हे अर्धा भरलेल्या प्याला प्रमाणे असते. यात यश ५० टक्के असते तर अपयश ५० टक्के असते. जळगाव जिल्हा भाजपतील नेत्यांच्या प्रभावळीची अवस्था ही अशीच आहे. सर्व सामान्याला अर्धा पेला भरल्यागत वाटणारी आणि भाजप कार्यकर्त्यांना अर्धवट रिकामा वाटणारी.
विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जळगाव मतदार संघातून भाजपचे चंदूलाल पटेल तब्बल ४२१ मतदान घेवून विजयी झाले. त्यांच्या विरोधात अपक्ष ॲड. विजय पाटील यांना ९० मतदान मिळाले. ३४ मते बाद ठरलीत. पटेल यांच्या विजयाचे चित्र अर्धा प्याला भरलेला आहे असे दाखविते. मात्र, या निकालात भाजपचा अर्धा प्याला रिकामा कसा झाला ? याचीही चर्चा आता आहे. त्यामागील वास्तव स्तब्ध करणारे आहे.

चंदूलाल पटेल यांच्या विजयासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एक हाती प्रयत्न केले. पटेल हे त्यांचेच उमेदवार होते. पटेल यांच्यासाठी जळगाव जिल्ह्यातील भाजप एकसंध उभा राहाणे अपेक्षित होते. पण पटेल यांना मिळालेल्या ४२१ मतांवरुन तसे दिसत नाही. पटेल यांना एकूण ५५० पैकी किमान ४९० ते ५०० मते मिळायला हवी होती. एकूण ५५० मतदारात जळगाव महापालिकेचे ७९ नगरसेवक, जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे ८३ सदस्य व १५ नगरपरिषद व नगरपंचायतींचे ३८८ मतदार होते. यात १३९ राष्ट्रवादी, १०३ भाजप, ६४ शिवसेना, ५७ काँग्रेस, १५ मनसे आणि इतर आघाड्यांचे ०९ सावदा शहर विकास अाघाडी, १० यावल शहर विकास अाघाडी, १७  अमळनेर शहर विकास अाघाडी, २०  पाचाेरा खाविअा, ३५  जळगाव महापालिका खाविअा, ०४  यावल शविअा, ०९  भुसावळ खाविअा, ०४  पाराेळा शहर विकास अाघाडी, २६  चाळीसगाव शहर विकास अाघाडी, ०२ जनक्रांती, ०१ बसपा व २८ अपक्ष असे बलाबल होते.

पटेल यांच्यासाठी भाजपच्या १०३ सदस्यांसह किमान ५०० जणांचे मतदान होईल अशी व्युहरचना मंत्री महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती, म्हणजेच अपक्ष ॲड. पाटील यांना फार फार ५० मते मिळणे अपेक्षित होते. यातही त्यांचे नातेवाईक व मित्र परिवार होता. मात्र ॲड. पाटील यांना ९० मते मिळाली. पटेल यांना अपेक्षित ४० मते फुटली असे आकडेवारी सांगते, पण अर्धा रिकामा प्याला सांगतो की, प्रत्यक्ष ६८ मते फुटली. यात भाजपची किमान ४० मते आहेत. अंदाज असा आहे की, महाजन यांच्या जामनेर मधील भाजपची ८ मते पटेल यांना मिळालीच नाहीत. जळगाव मनपातील ३० मते विरोधात गेली. यात १० ते १२ भाजपची आहेत. काही खाविआतील आहेत. या शिवाय भुसावळ, बोदवड, यावल, रावेर पालिका, पंचायत समित्यांमधील मते फुटली.

प्रश्न आहे की, भाजपच्या पारड्यात अपेक्षित असलेली ३० मते ॲड. पाटील यांना गेली व ३४ मते बाद ठरली. असा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून झाला असेल ? यावर सध्या खल सुरु आहे. काही मतदारांनी अर्थपूर्ण व्यवहार करुनही प्याला अर्धाच भरला. मतदानापूर्वी मंत्री गिरीश महाजन, चंदूलाल पटेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भेटल्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. याचाच अर्थ पटेल यांच्यासाठी खडसेही वरकरणी अनुकूल होते. प्रत्यक्षात मतदान तसे झाले नाही. पटेल विजयी झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना मंत्री महाजन, मंत्री पाटील, सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, हरिभाऊ जावळे, डॉ. गुरुमुख जगवानी, उदय वाघ आदींचा फोटो व्हायरल झाला. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पटेल यांचे स्वागत केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पण पटेल यांचे अभिनंदन करताना खडसे व सावकारे यांचे छायाचित्र अजूनही समोर आलेले नाही. विधान परिषद निवडणूक निकालात भाजपचा पेला अर्धा रिकामा आहे तो या ६८ मतांच्या घोळात !

जळगाव जिल्ह्यात १२ नगर पालिका व १ नगर पंचायत निवडणूक निकालात भाजपचे ६ नगराध्यक्ष निवडून आले. बोदवड नगर पंचायतही भाजपकडे जाईल. मात्र भाजपने नगराध्यक्ष म्हणून रिंगणात उतरवलेल्या ८ पैकी विजयी ६ जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत कोणाची होती ? याचा शोध घेताना भाजपचा पेला अर्धा भरलेला व अर्धा रिकामा दिसतो. नगर पालिका निवडणूक प्रक्रिया सुरु होताना पक्षाचे सुकाणू खडसेंच्या हाती होते. त्यांनीच पक्षाचे उमेदवार जाहीर केले होते. पक्षनेता म्हणून तेच भूमिका मांडत होते. पण, खडसे हे प्रचारासाठी लोकसभेच्या रावेर मतदार संघातील भुसावळ, बोदवड, फैजपूर व सावदा येथे गेले. खासदार रक्षा खडसे व जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे याही सहभागी झाल्या.  यापैकी रमण भोळे (भुसावळ), सौ. अनिता येवले (सावदा) व सौ. महानंदा होले (फैजपूर) हे विजयी झाले. जळगाव मतदार संघातील पारोळा, चाळीसगाव व एरंडोल नगर पालिकांवर मंत्री महाजन यांचे सर्व प्रकारचे लक्ष होते. त्यांनी सावदा, फैजपूर येथेही सभा घेतल्या. यापैकी करण पवार (पारोळा), सौ. आशालता चव्हाण (चाळीसगाव) व रमेश परदेशी (एरंडोल) हे विजयी झाले. या तिघांचा सत्कार मंत्री महाजन, आमदार उन्मेश पाटील, सुरेश भोळे व चंदूलाल पटेल यांच्यासह उदय वाघ यांनी केल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्याही सभा झाल्या. खडसे व महाजनही सोबत होते. आता नगराध्यक्षांच्या सत्काराचेही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. सहा पैकी तिघा विजयी नगराध्यक्षांचा सत्कार मंत्री महाजन यांनी केला. भाजपला पटेल यांच्या पायगुणामुळे यश मिळाले असेही मंत्री महाजन म्हणाले. या वक्तव्यात पडद्यामागील अनेक गोष्टींचे संकेत आहेत. इतर नगराध्यक्षांच्या सत्काराल खडसे कसे नाहीत यात भाजपतील काही विषय झाकल्या मुठीत बंद आहेत. खडसे यांनी भुसावळमध्ये लक्ष घातले होते. त्यामुळे विजयी झालेले रमण भोळे यांचा सत्कार खडसे व आमदार सावकारे हे करीत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले. भाजपचे इतर पदाधिकारी त्यात का नाहीत ? हा प्रश्नही भाजपचा प्याला अर्धा रिकामा आहे असेच सांगतो.

नगर पालिका निवडणुकीत धरणगावचे उप कथानक आहे. मंत्री महाजन व राज्यमंत्री पाटील यांचे जिल्ह्यात सख्य असताना धरणगाव येथे शिवसेनेसमोर भाजपचा उमेदवार दिला गेला. अतीतटीच्या लढाईत शिवसेनेचे सलीम पटेल जिंकले. पण, भाजप उमेदवाराचा थोडक्यात पराभव का झाला ? यावर कोणीही बोलत नाही. धरणगावला भाजप उमेदवार कोणी दिला होता ? यावल व चोपडा येथे शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सोबत भाजप युतीसाठी राजी असताना धरणगावात शिवसेना राज्यमंत्री पाटील यांच्याशी युती कोणामुळे बारगळली ? धरणगाव येथे मुख्यमंत्र्यांची सभा सुध्दा घेतली गेली. अमळनेर येथे भाजपचे अक्षरशः पानिपत झाले. यावरही कोणी भाष्य करीत नाही. भाजपची राजकीय  ताकद नसताना तेथे भाजपचे स्वतंत्र पैनल कोणी दिले ? यावर जिल्हाध्यक्षांसह इतरांचे मौन आहे. आमदार सोनवणे हे सहकिर क्षेत्रात सर्व पक्षीय पैनलमध्ये चालतात पण राज्यमंत्री पाटील चालत नाहीत. वादविवादाची कारणे येथेही आहेत.

केंद्रात व राज्यात भाजपच्या नेतृत्वात सत्ता असतानाही जळगाव जिल्ह्यात भाजप अंतर्गत सत्तेचा प्याला अर्धाच का भरतोय ? हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. प्याला पूर्ण भरत असतानाही तो कोणी रिकामा करतोय का ? हे राज्यातील पक्षश्रेष्ठींना पाहावे लागणार आहे. या सर्व घटना व घडामोडी क्रमशः समजून घेतल्या तर जे पडद्यावर दिसते त्यापेक्षा पडद्यामागे वेगळेच काही असल्याचे जाणवते. बहुधा भाजपांतर्गत या पध्दतीने बेमालूम ध्वृवीकरण सुरु असल्याचे दिसते.

2 comments: