Monday, 28 November 2016

अमळनेर नगराध्यक्ष विजयाचा अन्वयार्थ

अमळनेरमधील स्थानिक पुढाऱ्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीच्या सौ. पुष्पलता साहेबराव पाटील या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. या विजयाचे विश्लेषण काही मंडळी चुकीच्या पध्दतीने करीत आहेत. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर मराठ्यांनी एकत्र येवून मिळवलेला हा विजय असल्याचे चित्र काही जण रंगवत आहेत. असा दावा करणे हे धोकेदायक आहे. अमळनेरचा विजय केवळ एका समाजामुळे शक्य झाला असे म्हणत यशाचे श्रेय विशिष्ट घटकाने घेणे हे भविष्यातील राजकीय डावपेच उध्वस्त करणारे ठरू शकते.

सौ. पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या विजयामागे स्थानिक राजकारणाचे अनेक मुद्दे आहेत. त्यात पहिला मुद्दा म्हणजे, गेल्या विधानसभा निवडणुकीत अमळनेरमधील रहिवासी असलेले अनिल पाटील व साहेबराव पाटील यांना पराभूत करून नंदुरबार निवासी शिरीष चौधरी विजयी झाले. बाहेरचा माणूस विजयी झाला, अर्थात हा विजय धनशक्तिच्या बळावर झाला होता. तसे म्हणण्याऐवजी असेही म्हणता येईल की, बहुतांश अमळनेरकरांनी आपले मत तेव्हा विक्री केले होते.

बाहेरुन आलेली व्यक्ती आमदार झाल्यानंतर शहर व तालुक्यातील सत्तास्थानांवर त्यांची ढवळाढवळ होणे स्वाभाविक होते. अगोदर बाजार समिती आणि आता नपा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. बाहेरून आलेल्या माणसाला किती मोठे होवू द्यायचे ? हा प्रश्न पडल्यामुळे एकत्र येण्याची उपरती अमळनेरच्या स्थानिक पुढाऱ्यांना झाली. त्यातून सर्वांनी व सर्व पक्षीयांनी एकत्र येवून शहर विकास आघाडी तयार केली. ही आघाडी मराठा म्हणून केलेली नव्हती. किंबहुना तसे म्हणणे म्हणजे, एकत्रित व सामंजस्याने केलेल्या राजकारणाला संकुचित विचारात अडकविण्याचा प्रयत्न आहे.

सौ. पुष्पलता पाटील यांच्या विजयात स्थानिक मराठा नेत्यांचे एकत्रिकरण झाले हा एक मुद्दा नक्कीच आहे. पण सौ. पाटील यांना मिळालेले मताधिक्य केवळ मराठा समाजाच्या मतदारांनी दिलेले नाही तर ते अमळनेरमधील सर्व पक्षीय मतदार व सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी दिलेल्या मतदानाचे आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. मराठा म्हणून एकत्र आलो आणि आम्ही जिंकलो असा प्रचार व प्रपोगंडा हा भविष्यातील इतर निवडणुकांसाठी घातक ठरू शकतो. जातीपातीची संख्या लक्षात घेवून महाराष्ट्रात राजकीय पक्ष चालवणाऱ्यांचे गणित कधीही यशस्वी झालेले नाही. राज्यातील विधान परिषद निवडणूक निकाल आणि नगर पालिकांचे निवडणूक निकाल लक्षात घेतले तर मागील निवडणुकीत पहिल्यास्थानी असलेला पक्ष आज दारुण अवस्थेत चौथ्यास्थानी आहे. या पक्षाच्या साहेबांनी, त्यांची कन्या आणि पुतण्याने मराठा क्रांती मोर्चा काळात विविध विधाने करून स्वतःकडे लक्षवेध करुन घेतला होता. मराठा एकत्रीकरणाचा लाभ घेण्याचा त्यांचा राजकीय प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाही. हाच संभाव्य धोका अमळनेरच्या निकालाचे एकांगी विश्लेषण करताना होवू शकतो.

अमळनेरच्या आमदारांवर धनशक्ती व गुंडशक्तीचा वापर केल्याचा आरोप होतो. गेल्या अडीच वर्षांत आमदार शिरीष चौधरींनी ज्याप्रमाणे तालुक्यात कार्यकर्ते जोडले ते कौतुकास्पद आहे. त्यांना हे कसे शक्य झाले ? याचा विचार प्रस्थापितांनी करायला हवा. ग्रामीण भागात आज आमदार चौधरींचा संपर्क इतरांपेक्षा जास्त आहे. व्यक्तीगत पातळीवर आमदार चौधरी मृदूभाषी आहेत. त्यातुलनेत माजी आमदारांची भाषा कशी आहे ? हे खासगीत इतरांना विचारावे. अशा इतरही बाबींचा विचार अमळनेर निकालाचा अन्वयार्थ समजून घेताना करावा लागेल. काहीही असले तर अमळनेरकर सध्या तरी देर आए दुरुस्त आए अशा मानसिकतेत आहेत.

मतदानाच्या दिवशी अमळनेरमध्ये जे काही घडले त्याची दुसरी बाजूही समोर येत आहे. कोणी, कोणावर हल्ला केला ? कोणी, कोणाच्या कार्यकर्त्यांना डांबले ? कोणी, कोणत्या भाषेत शिवीगाळ केली ? कोण, कोणाच्या गाडीवर दगडफेक करायला धावले ? याच्या व्हिडीओ व अॉडीओ क्लिप आता व्हायरल होत आहेत. झुंडशाही करत कार्यालय, इमारती व वाहनांची केलेली तोडफोड ही कधीही समर्थनिय ठरू शकत नाही. अशा प्रकारच्या उन्मादाला सुध्दा मग जातीय गुंडागर्दीचा ठप्पा लागतो. हाच मुद्दा मराठा एकत्रीकरणाच्या उदात्त हेतूला बाधा आणतो. बेसावध विश्लेषणाची हीच खरी अडचण आहे. जात व समाज म्हणून केलेली सामुहिक झुंडशाही कधीही समर्थनिय नसते व ती जास्त काळासाठी राजकारणात यशही देवू शकत नाही. पैशांच्या बळावरचे राजकारण जसे लवकर संपते तसे जातीपातीचे राजकारण अल्पावधीत आवरले जाते. अमळनेरच्या मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला आता तडा जाणार नाही याची काळजी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पार पाडावी लागेल.

जळगावमधील १२ नगर पालिकांच्या निकालाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यापैकी चाळीसगाव व भुसावळ पालिकांमधील निकाल परिवर्तनाचा कौल देणारे आहे. चाळीसगावमध्ये भाजपच्या सौ. आशालता विश्वास चव्हाण जिंकल्या. येथे प्रस्थापित आघाडीची सत्ता खऱ्या अर्थाने संपली. आमदार उन्मेश पाटील यांचे हे शहरावरील निर्विवाद वर्चस्व सिध्द झाले. विश्वास चव्हाण यांच्या पक्षावरील निष्ठेचेही फळ मिळाले. असाच विजय भुसावळमधील आहे. तेथे भाजपचे उमेश नेमाडे यांनी बाजी मारली. भुसावळच्या राजकारणातील दोन टोकांच्या विचारसरणीतील संघर्षात आमदार संजय सावकारे यांनी शहरावरही आपली पकड असल्याचे दाखवून दिले. सावकारे यांच्या मितभाषी व संयमशील राजकारणाचे हे भाजपला मिळालेले फळ आहे. रावेर नगर पालिकेचा निकाल सुध्दा वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे कोणताही राजकीय पक्ष रिंगणात नव्हता. आजी माजी नेत्यांनी आघाडी केली होती. यात नगराध्यक्षपदी जनक्रांती आघाडीचे दारा महंमद विजयी झाले. त्यांचा शहरावरील व्यक्तीगत प्रभाव सिध्द झाला. येथे एकूण १७ पैकी ११ नगरसेवक अपक्ष निवडून आले आहेत. ही बाबही लक्षवेधी आहे.

कधीकाळी जळगाव जिल्ह्यात जातीय दंगलीसाठी कुप्रसिध्द असलेल्या धरणगाव शहराच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेकडून सलिम पटेल विजयी झाले आहेत. अर्थात, यात स्वतः सलिम पटेल यांचा जनसंपर्क महत्त्वाचा आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी धरणगाव शहरावरील वर्चस्व दिलासा देणारे नक्की आहे. राज्यमंत्री पाटील व शिवसेना आमदारांनी १२ पैकी ३ नगर पालिकात नगराध्यक्ष निवडून आणले हेही चांगले यश आहे. यात धरणगाव व पाचोरा येथील यश स्वबळावरा आहे तर यावलचे यश युतीत आहे.

या निवडणुकीने राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची स्वतःच्या शहरातील राजकीय कुवत सिध्द केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या पारोळा, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अमळनेर शहरात पक्षाचे पानीपत झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पटील चोपडा शहरात प्रभाव दाखवू शकले नाहीत. डॉ. पाटील व वाघ यांनी आता स्वतःहून पद सोडले पाहिजे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे चोपड्यात शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आणू शकले नाहीत पण यावल नगराध्यक्षपदी सुरेखा कोळी विजयी झाल्या. यावलमध्ये आमदार सोनवणेंमुळे शिवसेना भाजप युती झाली. आमदार सोनवणेंचा मतदार संघ चोपडा व यावल तालुका जोडून आहे.

एकंदरित जळगाव जिल्ह्यात भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व सिधूद केले असून लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, सहकार क्षेत्र पाठोपाठ आता शहरी क्षेत्रही काँग्रेसमुक्त झाले आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत बहुधा असेच चित्र राहिल.

पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी गड राखला. संजय गोहील हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. सावदा, एरंडोल व फैजपूर येथे स्थानिक नेत्यांनी एकत्रीत प्रभावातून भाजपला विजयी केले.

No comments:

Post a Comment