Tuesday 22 November 2016

गिरीश महाजनांचे निर्विवाद वर्चस्व ...

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे चंदुलाल पटेल हे दणदणीत मताधिक्य मिळवून विजयी झाले. पटेल यांच्या विजयामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व समावेश राजकारणावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. महाजन आणि त्यांच्या सोबतींचे व समर्थकांचे हे निर्मळ यश आहे.

चंदुलाल पटेल विजयी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना महाजन, पटेल यांच्यासोबत राज्यमंत्री गुलाबराव पाटील (शिवसेना), सुरेशदादा जैन (शिवसेना व खाविआचे नेते), महापौर (खाविआ), ललित कोल्हे (मनसे), कैलास सोनवणे (कधीतरी स्थापन केलेली शहर विकास आघाडी) होते. याच नेत्यांच्या गर्दीत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, गोविंद अग्रवाल व डॉ. गुरुमुख जगवानी यांचेही हसमुख चेहरे पाहता आले.  

राजकारणातील काही विषय असे असतात की ते कधीही विसरता येत नाही. नेत्यांच्या विजयाचा हा आनंद पाहत असताना मुद्दाम आठवले की, महिनाभरापूर्वी जामनेर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आयोजित असताना भाजपमधील काही मंडळींनी तेथे जाण्यापासून आपले चेहरे लपविले होते. काही जण अर्धवट खुले चेहरे घेवून पोहचले होते.  महाजन तेव्हाही तेथेच होते व आजही तेथेच आहे. त्यांच्या सोबत नेहमी असणारेही आज सोबतच आहे. मग आता भाजप उमेदवाराच्या विजयानंतर फरपट कोणाची होत आहे ? पक्षांतर्गत वाद-विवाद चव्हाट्यावर आणताना जेव्हा महाजन यांची जाणुन बुजून गोची केली जाते त्यानंतर अशा प्रकारच्या उसन्या फोटोत समावण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्यांना समाजात दुतोंडी म्हणतो हे लक्षात घ्यावे. जळगाव जिल्हा भाजपची ही शोकांतिका आहे.

मुख्यमंत्री जामनेरला आले त्याचवेळी चंदुलाल पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाला होता. या दौऱ्या प्रसंगी जळगाव विमानतळावरील विश्रामगृहात काही मान्यवरांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीपासून दूर ठेवण्याचा बालिशपणा एका मान्यवरांने केला होता. हे संदर्भ कसे विसरता येतील ? उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी गिरीशभाऊ व गुलाबभू यांनी शिष्टाई केल्यामुळे प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली. चंदुलाल पटेल यांच्या विरोधात विरोधी पक्षांचा एकही उमेदवार राहिला नाही. म्हणजेच, चंदुलाल पटेल सर्व पक्षीय उमेदवार ठरले. अशा सर्व पक्षीय उमेदवाराच्या विजयात भाजपचे इतर पदाधिकारी आता हसून सहभागी होतात, या हास्यामागे विशाद आहे की बदलत्या काळातील काही वेगळे संकेत आहेत ?

विधान परिषदेसाठी जगवानींचा खांदा पालट करुन पटेल यांच्या उमेदवारीचा निर्णय भाजपसह बाहेरील इतर मंडळींनाही आवडला होता. जगवानी नाहीत यातच अर्धी निवडणूक भाजपने जिंकली होती. पण, अपक्ष ऍड. विजय पाटील यांच्या उमेदवारीमुळे थोडी रंगत आली. ऍड. विजय पाटील रिंगणात नसते तर इतरांना हिशोबात गुंडाळता आले असते. तसे झाले नाही.

ऍड. विजय पाटील यांच्या उमेदवारी आडून उलट फेरची शक्यता चर्चेत आली. परंतू केवळ गठ्ठा मतदान आहे म्हणून काही घडू शकते अशी आशा बाळगणे चुकीचे ठरले आहे. ऍड. विजय पाटील यांचे बंधू तथा जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याही राजकिय प्रभावाला काही मर्यादा आहेत. ज्या पद्धतीने गणित मांडले जात होते, त्यात संशयाच्या फटी अनेक होत्या. त्यामुळे पटेल यांना ४२१ आणि ऍड. विजय पाटील यांना ९० मते मिळालीत हा विरोध पुरेसा आहे. ३४ अवैध मतांचाही वेगळा इशारा आहेच. अर्थात, निवडणूक संपल्यामुळे आता या मागील गणितही विस्कटले आहे. पटेल यांचा विजय कसा झाला ? हाही विषय आता महत्त्वाचा नाही कारण, जो जिता वही सिकंदर असतो.

पटेल यांच्या विजयामुळे महाजन यांच्या सर्व समावेशक राजकारणाचा अधिकृत श्रीगणेशा झाला आहे. भाजपतील एक मोठा गट आजही महाजन यांना आपला नेता मानत नाही. जे सोबती आहेत ते लपून छपून आहेत. अशाही वातावरणात महाजन यांनी आपले राजकारण सर्वांशी जुळवून घेणारे असल्याचे सिद्ध केले आहे. महाजन-गुलाबभू आणि सुरेशदादांच्या त्रिकुटामुळे जिल्हातील विकास पर्वाला नवे वळण मिळू शकते.

पटेल यांच्या आमदारकिच्या कार्यपद्धतीलाही सिद्ध व्हावे लागेल. जळगावचे विधान परिषद आमदार म्हणजे कोणाचे तरी ताटा खालचे मांजर असा इतिहास राहिला आहे. मॅनेज करणारा व हवे ते पुरवणारा आमदार असेही शेलके शेरे काही जण मारतात. पटेल यांना अशी ओळख बदलावी लागेल. आमदार म्हणून मिळणारा निधी हा आपल्या मोकळ्या भूखंडातील नागरी सुविधांवर खर्च करणे पटेल यांनी टाळावे लागेल. मागील घाणेरडा इतिहास जाणून बुजून पुसून टाकावा लागेल. महाजन यांनीही यासाठी पटेल यांना स्वातंत्र्य द्यावे.

पटेल यांचा विजय जळगाव जिल्ह्यातील राजकारणाला सर्व समावेशक राजकारणाकडे नेणारा आहे. सर्व पक्षीय असे गोंडस नाव देवून विशिष्ट लोकांचे कोंडोळे तयार करण्यापेक्षा हा सर्व समावेशक राजकारणाचा पायंडा विधायक व विश्वासार्ह आहे. थ्री जी म्हणजे, दरबारी, दहशत आणि दरडावण्याचे राजकारण संपविण्याची एक चांगली संधी महाजन-गुलाबभू व सुरेशदादांना यानिमित्त मिळाली आहे.

 महाजन-गुलाबभू व सुरेशदादा यांच्या सर्व समावेश राजकारणाचा फॉर्म्यूला जिल्हासाठी लाभदायी ठरतो आहे. हा फेरबदल लक्षात घेवून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद आता गिरीश महाजन यांच्याकडे दिले गेले पाहिजे. पटेल यांच्या विजयामुळे हसमुख चेहरे एकत्र घेवून आलेली मंडळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जावून यासाठी साकडे घालेला का ? याच विषयावर जळगावकरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात ...

1 comment:

  1. खूप रोकठोक विश्लेषण...

    ReplyDelete