Monday 14 November 2016

बनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान

(कृपया लेख जरुर वाचा. मात्र संपूर्ण लेख कॉपीपेस्ट करु नका. इतरांना लेखाची लिंक पाठवा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ९ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून भारतीय चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या. या निर्णयाचे अनेक बरे-वाईट परिणाम सर्वत्र दिसत असून भारतीय नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे हे निश्चित. परंतु, सर्वांत लक्षवेधी परिणाम हा भारत-पाकिस्तान सीमेवर दिसत असून नोटा रद्दच्या निर्णयानंतर सीमेपलिकडून भारतात होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानी सैनिक करीत असलेला अंदाधुंद गोळीबार पूर्णतः थांबला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरात कुठेही सैन्यदलांच्या विरोधात असंतोषाच्या घटना नाहीत. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या भारतीय चलनातील बनावट नोटा घेवून आता कोण मरायला भारतात घुसखोरी करेल? किंवा जम्मू-काश्मीरात बनावट नोटा घेवून कोण दगड फेकेल?   या मागील कुटनिती समजून घ्यायला बनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान याचा संबंध समजून घ्यावा लागेल. 

भारतीय रिझर्व बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या वापरात असलेल्या चलनाचे मूल्य १७,५४,००० कोटी रुपये आहे. यात रद्द झालेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे मूल्य ४५ टक्के होते. तसेच रद्द झालेल्या १००० रुपयांच्या नोटांचे मूल्य ३९ टक्के होते. म्हणजेच एकूण चलन मूल्याच्या तुलनेत ८४ टक्के चलन रद्द करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.  उरलेल्या १६ टक्के चलन मूल्यात अद्यापही १० आणि १०० च्या नोटा ५३ टक्के आहेत. त्यानंतर नाणी, १, ५ व ५० रुपयांच्या नोटा ४७ टक्के वापरात आहे.

आता प्रत्यक्ष नोटा रद्द केल्याच्या भाषेत बघितले तर दि. ९ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याने एकूण १७,५४,००० कोटी रुपये चलन मूल्यातून ६,३२,६०० कोटी रुपये चलन मूल्य रद्द झाले आहे. त्याची जागा भरुन काढण्यासाठी २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात येत आहेत. ही सगळी आकडेवारी पाहता रद्द नोटा वित्तीय संस्थांकडून परत घेणे व अर्थ व्यवस्थेत २००० रुपयांच्या नोटा स्थापित करणे हे जगातील वित्तीय क्षेत्रातील विश्व विक्रमी आव्हान आहे.

सन २०१५-१६ च्या दरम्यान भारतीय रिझर्व बँकेच्या असे लक्षात आले की, भारतीय राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांमध्ये ६ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा झाला आहे. त्यात ४ लाख रुपये हे बनावट ५०० व १००० रुपयांच्या नोटे स्वरुपात आहेत. त्यामुळे भारतीय रिझर्व बँक ही ५०० रुपयांच्या नव्या नोटा छापण्याचा व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा विचार करीत होती. याचवेळी असेही लक्षात आले की, १०० रुपयांच्या नोटांचे क्रमांक आता २ लाख आकडेवारीपर्यंत पोहचले आहेत. त्याच आकडेवारीत नव्या नोटा छापणे अडचणीचे ठरु शकते.

दुसरीकडे भारतीय सैन्यदलाने सर्जिकल स्ट्राईक करीत पाकव्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तेथे ठार मारलेल्या दहशतवाद्यांकडे ५०० व १००० रुपयांच्या भारतीय मूल्याच्या बनावट नोटा आढळल्या. या कारवाई नंतर चवताळलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमेवर रोज अंदाधुंद गोळीबार करीत दहशतवाद्यांची घुसखेरी वाढवायचा प्रयत्न सुरू केला. अशा प्रकारच्या कारवाईला प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यदलांनी पुन्हा काही दहशतवादी सीमेलगत ठार मारले. त्यांच्या मृतदेहांवरील कपड्यातूनही ५०० व १००० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या.

 भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तानने बनावट भारतीय चलनांचे सरकारी छापखाने पंजाब व बलुचिस्तान भागात सुरू केले आहेत. फेक इंडियन करन्सी नेटवर्क (एफआयसीएन) नावानेच त्यांची साखळी काम करते. पाकिस्तानमधील सरकारी छापखान्यातच बनावट भारतीय चलन छापले जाते, याचा पुराव्यानिशी भंडाफोड भारतीय गुप्तचर संघटना आयबी तथा रॉ ने यापूर्वी केला आहे. पाकिस्तान मधील चलनी नोटा छपाईसाठी लागणारा कागद व त्याची शाई याची किती तरी जास्त खरेदी पाकिस्तान सरकार करीत असते. याचा ताळमेळ लावला की, बनावट भारतीय चलन हे पाकिस्तानच्या सरकारी छापखान्यात छापले जाते या तर्काला वास्तवाची बळकटी मिळते.

या तर्काला असाही आधार आहे की, भारतीय नोटांसाठी कागद हा इंग्लंडहून व छपाई शाई जर्मनीहून येत होती. ज्या इंग्लिश व  जर्मन कंपन्या यासाठी भारतास तंत्रज्ञान पुरवत होत्या, त्याच कंपन्या तोच कागद व शाई पाकिस्तानला ही पुरवित होत्या. त्यामुळे भारतीय चलनातील नोटांचे बनावट डिझाईन तयार करून नोटांची छपाई पाकिस्तानी सरकारी छापखान्यात सहज होत होती. याविषय भारतीय गुप्तचर संस्थांनी सविस्तर अहवाल केला आहे. आता नव्या नोटांचे तंत्रज्ञान कॉपी करायला पाकिस्तानला बराच कालावधी लागेल. कारण आता पुरवठादार, कागद व शाई बदललेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी दोन वेळा नोटबंदी चा प्रस्ताव काँग्रेस आघाडी सरकारला दिलाहोता. मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग इच्छा असूनही रिस्की निर्णय घेऊ शकले नव्हते. 
(कृपया लेख जरुर वाचा. मात्र संपूर्ण लेख कॉपीपेस्ट करु नका. इतरांना लेखाची लिंक पाठवा)

भारतीय अर्थव्यवस्थेत बनावट नोटा घुसवण्याचा पाकिस्तानचा काळा डाव आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, असे म्हणता येईल. कारण, भारतीय रिझर्व बँकेचा अहवाल आहे की, भारतीय चलनात १० लाख रुपयांच्या नोटांमध्ये किमान २५० नोटा बनावट आढळतात. आयबी व रॉ या संघटनांच्या सूचनेवरुन बनावट नोटांच्या विषयावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर असेही आढळून आले की, जप्त केलेल्या एकूण बनावट नोटांपैकी ४३ टक्के नोटा या नवीदिल्ली व उत्तरप्रदेशमध्ये आढळल्या आहेत. म्हणजेच पाकिस्तानने तयार केलेल्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी भारताच्या राजधानीत व जवळच्या राज्यात नेटवर्क तयार झाले होते. याचाच अर्थ बनावट नोटा घेवून राजधानी परिसरात दहशतवाद्यांचा वावर वाढत होता. दिल्लीवर सतत दहशतवादाचे सावट त्यामुळेत असे. हेच वास्तव अस्वस्थ करणारे व चिंताजनक होते. भारतीय रिझर्व बँकेची एक आकडेवारी असेही सांगते की, पाकिस्तानात तयार होणाऱ्या भारतीय चलनातील बनावट नोटा दरवर्षी ७० कोटी रुपयांच्या मूल्यात देशभर पसरत होत्या. अंदाज असा आहे की, अशा प्रकारे भारतीय चलनात सुमारे ४०० कोटी रुपये मूल्यांच्या बनावट नोटा वापरात होत्या. यातील जवळपास २०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा या १००० रुपयांच्या होत्या. शिवाय, १०० व ५०० च्याही बनावट नोटा अद्यापही वापरात आहेतच.

भारतीय अर्थव्यवस्थेत बनावट नोटा घुसवण्याचा दुहेरी फायदा पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआय घेत होती. बनावट नोटा तयार करण्याचा खर्च हा दहशतवादी संघटनांना जगभरातून होणाऱ्या आर्थिक मदतीतून वसूल केला जातो. त्यातून जवळपास ५०० कोटी रुपये आयएसआयने कमावले आहेत. दुसरा फायदा होता की, भारतात घातपात किंवा दहशतवादी कारवाईसाठी घुसणाऱ्यांना भारतीय चलन म्हणून बनावट नोटा दिल्या जात. भारतीय सैनिकांच्या गोळीबारात असे दहशतवादी मारले गेले तरी पाकिस्तानचे फारसे आर्थिक नुकसान होत नसे. घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी जिवंत राहिला तर ते घातपाती कारवाया किंवा हेरगिरी करता कामी येत असे. मिळालेल्या माहितीनुसार १००, ५०० आणि १००० रुपयांची बनावट नोट तयार केल्यानंतर ती दहशतवादी संघटनांकडे हस्तांतरित करताना आयएसआयला ४० ते ५० टक्के नफा होत असे. भारतीय रिझर्व बँक जेव्हा १००० रुपयांची नोट छापते तेव्हा त्यावर २९ रुपये खर्च होतो. मात्र ती नोट अर्थ व्यवहारात जाताना त्याचे सरासरी मूल्य ३५० ते ४०० रुपये असते. विविध सरकारी देणी व घेणी याचा हिशोब करुन अंतिमतः त्या नोटेचे मूल्य १००० रुपये होते. मात्र, पाकिस्तानात तयार होणारी १००० रुपयांची बनावट नोट ३० ते ३५ रुपयांत तयार होते. तिच्यावर देण्या-घेण्याचे मूल्य शून्य असते. त्यामुळे त्या एका बनावट नोटचे मूल्य थेट १००० रुपये असते. त्या बदल्यात आयएसआय दहशतवादी संघटनांकडून ३५० ते ४०० रुपये घेते. सन २०१० पासून आयएसआयने भारतात जवळपास १,६०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा घुसवल्या असून त्यातून जवळपास ५०० कोटी नेट नफा कमावला आहे.

आयएसआय ही संघटना बनावट नोटा केवळ दहशतवाद्यांना किंवा घुसखोरांनाच देते असे नाही. या बनावट नोटांच्या बळावर जम्मू-काश्मीरात पर्यायी अर्थ व्यवस्थाच उभी राहिली आहे. तेथील युवा वर्गाला या बनावट नोटांचे भारतीय चलन म्हणून अमिष दाखवले जाते. त्या बदल्यात जम्मू-काश्मीला अस्वस्थ, धुसमूसता ठेवण्याचा गनिमी कावा वापरला जातो. बनावट नोटांचे जम्मू-काश्मीरातील हे अर्थशास्त्रही समजून घेणे आवश्यक आहे.

जम्मू-काश्मीरात युवकांमध्ये अशिक्षीत, कमी शिक्षीत याचे प्रमाण जास्त आहे. त्यातून तेथे बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अशा युवकांना जम्मू-काश्मीर मुक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिक व्हा आणि वेतन घ्या अशी योजनाच आयएसआय ही संघटना फुटीरतावादी नेत्यांच्या नेटवर्कमधून चालवते. त्या बदल्यात फुटीरतावादी नेत्यांना व त्यांनी गोळा केलेल्या बेरोजगार युवकांना बनावट नोटाच दिल्या जातात. जम्मू-काश्मीरातील युवकांना घातपात करण्यात धाडस दिसते. जन्मभूमिसाठी काही तरी नविन करीत असल्याची विकृत भावना त्यांच्यात निर्माण होते. बनवाट नोटांपायी ते दहशतवादी होण्यास प्रवृत्त होतात.

स्थानिक युवकांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर अस्थिर करण्याचे दर सुद्धा ठरलेले आहेत. भारतीय सैन्यदलावर दगड फेकण्यासाठी प्रतिदिन १०० ते ५०० रुपये दिले जातात. भारतीय सैन्यदलाचे शस्त्र हिसकावल्यास ५०० रुपये बोनस असतो.  भारतीय सैन्य दलावर हातबॉम्ब फेकण्याचा दर प्रति बॉम्ब १००० रुपये आहे. अशा प्रकारची कृत्ये युवकांकडून करुन घेण्यासाठी फुटीरतावादी नेते सईद गिलानी, यासिन मलिक, शेख याकूब यांचे नेटवर्क वापरले जाते, असा संशय आहे. घातपाती कारवाया करणाऱ्या युवकांना प्रतिदिन वेतन लगेच रोखीने दिले जाते. त्यासाठी ५०० व १००० च्या नोटा वापरल्या जातात. अर्थात, त्या पाकिस्तानातून आलेल्या बनावट नोटा असतात.

भारतात बनावट नोटा पाठविण्याच्या जागा नेपाळ, भूतान व बांगलादेश मधून आहेत. तेथून पाकिस्तान हेच मूळ असलेल्या बनावट कंपन्यांच्या नावाने हवाला मार्फत व्यवहार होतात. याशिवाय गॅस सिलींडरच्या रिकाम्या टाक्यांमधूनही बनावट नोटांची देवाण घेवाण होते.

पाकिस्तानातून येणाऱ्या बनावट नोटांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर दहशतवाद पसरवला जात असल्याचे काही पुराव्यारुन आढळून येते. भारतात सध्या चार वेगवगळ्या प्रकारे दहशतवादी कृत्ये होताना दिसतात. त्यात केंद्र सरकार विरोधी दहशतवाद, जातीय-धार्मिक कलहातून दहशतवाद, डाव्या विचारसरणीचा दहशतवाद आणि ड्रग माफियांच्या टोळ्यांचा दहशतवाद याचा समावेश आहे. या दहशतवादाची पाळेमुळे बिहार, दिल्ली, उत्तरप्रदेश, मणिपूर, नागालैंड, आसाम, मिझोरम, कर्नाटक, आंध्र, तामीळनाडूसह महाराष्ट्रात विस्तारली आहेत. देशभरात होणाऱ्या घातपाती कृत्यात सहभागी दहशतवाद्यांना पाकिस्तानात तयार झालेल्या बनावट नोटांचा पुरवठा झाल्याचे आढळून आले आहे

(कृपया लेख जरुर वाचा. मात्र संपूर्ण लेख कॉपीपेस्ट करु नका. इतरांना लेखाची लिंक पाठवा)
 


एका जुन्या आकडेवारीनुसार (सन २०१२) भारतात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे ८०० गट (सेल) कार्यरत आहेत. देशातील सुमारे ६०८ जिल्ह्यापैकी २०५ जिल्ह्यांमध्ये दहशतवादी, नक्षलवादी घातपाती कारवाया सुरू असतात. यात दरवर्षी सरासरी १५ हजार निरपराध नागरिकांचा बळी जातो.

अशा प्रकारे देशासमोरील अदृश्य संकट म्हणून उभा असलेला बनावट नोटांचा प्रश्न निकाली काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचे, त्यांची पुरवठादार आयएसआयचे, जम्मू-काश्मीरातील फुटीरतावाद्यांचे कंबरडे मोडले आहे. यातून सावरण्यास संबंधितांना किमान ६ महिने लागतील. तोपर्यंत मोदींनी स्व संरक्षणाचा नवा पावित्रा शोधून काढलेला असेल. हे वास्तव लक्षात घेता, देशातील सर्व प्रकारच्या गद्दारांना ठेचून काढण्यासाठी नोटा बदलांचा वापरलेला गनिमी कावा काय वाईट आहे? आपल्या घरात किटक मारण्यासाठी विषासारख्या औषधाची फवारणी करताना आपण नाका-तोंडाला रुमाल बांधतो. काही वेळा उग्र दर्पाचा आपल्याला त्रासही होतो. पण, अंतिम साध्य हे घर किटक मुक्त करणे हेच असते, त्यासाठी आपण सारे सहन करतो ना?  मोदी व त्यांच्या सरकारने नोटा बंदीचे शस्त्र वापरून देशांतर्गत किटक फवारणी केली आहे. थोडावेळ आपणही बँकांच्या रांगांमध्ये उभे राहून त्रास सहन केला तर देशहितच साध्य होणार आहे.

बनावट नोटांचे केंद्र मालदा आणि मुर्शिदाबाद 

भारतीय अर्थव्यवस्थेत बनावट नोटा घुसविण्यासाठी भारत पाकिस्तान, बांगलादेश व नेपाळ लगतच्या सीमावर्ती भागातून साखळी तयार झाली आहे. कुख्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय चलनातील खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देते. हा व्यवहार दोन प्रकारे होतो. जास्त प्रमाणात नोटा घुसवायच्या असतील तर ३०/३५ हजार खऱ्या नोटा घेवून १ लाखांच्या बनावाट नोटा दिल्या जातात. व्यवहार मर्यादीत असेल तर एका खऱ्या नोटेच्या बदल्यात दोन बनावट नोटा दिल्या जातात.

या व्यवहारांचे कुप्रसिध्द केंद्र पश्चिम बंगालमधील मालदा व मुर्शिदाबाद जिल्हे आहेत. मालदा हे मुस्लिम बहुल आहे. तेथे जिहादींना लपायला जागा मिळते. तसेच व्यवहार मुर्शिदाबादमध्ये होतात. पश्चिम बंगालला लागून बिहारचा पूर्व आणि पश्चिम चम्पारण्य जिल्हा आहे. या जिल्ह्यात नेपाळमधून बनावट नोटा येतात. बनावट नोटांच्या व्यवहारात आयएसआय सोबत लश्कर ए तोयबा, बंगलादेशी जिहादी गट हरकत उल जिहाद ए इस्लामी (हूजी) यांचा सहभाग असतो. बनावट नोटांची साखळी महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, आंध्रप्रदेश मध्येही कार्यरत आहे. कोलकाताच्या एका उपनगरात बनावट नोटा घुसवाणारा एक एजंट पकडला गेला. त्याने पोलिसांना सांगीतले की, कोलकाता महानगरात बनावट नोटांचे ६० एजंट आहेत. यावरून बनावट नोटांची पाळेमूळे किती खोलवर रुजली आहेत, याचा अंदाज यावा.


 (लेखक मोदी भक्त नाही किंवा मोदी विरोधीही नाही. बनावट नोटा या विषयांवर अलिकडे इंग्रजी वृत्तपत्रात आलेली विविध प्रकारची माहिती वाचून हा लेख जास्तीत जास्त सोप्या भाषेत वाचकांना विषय समजावून देण्यासाठी लिहीला आहे.)


1 comment:

  1. साहेब ज्या लोकांना नोट बंदीचा त्रास होतोय ते लोक अप्रत्यक्ष पणे दहशतवादाला समर्थन देताय असेच आहे का?

    ReplyDelete