Sunday, 13 November 2016

व्यापारातील भविष्यकार !!

कार्पोरेट कल्चरचे शिक्षण देणारे बोर्डरुम नावाचे एक पुस्तक आहे. त्याचे वाचन साधारणतः १५/१६ वर्षांपूर्वी अकोला येथे असताना मी केले होते. त्या पुस्तकातील बाजारपेठ (मार्केट), विपणन (मार्केटींग), ग्राहक आणि त्यांच्या सवयी (कस्टमर हैबीट), प्रतिष्ठान-संस्था  (कंपनी) आणि समुह कार्य (टीमवर्क) हे विषय मी झपाटल्यागत वाचले होते. बाजारपेठ आणि व्यापार याचा जुजबी परिचय झाला होता. फारसे काही समजले नव्हते. विषयाची कार्यपध्दती (थीअरी) समजली. प्रात्यक्षिक (प्रैक्टीकल) समजून घ्यायला जागा नव्हती.


अकोल्याहून जळगावात परत आलो ते दैनिकाचा संपादक म्हणून. त्यामुळे समाजातील विविध क्षेत्रातील लोकांशी जनसंपर्क वाढविणे आवश्यक झाले. बाजारातही संपादक म्हणून ओळख असावी लागते, हा गुरुमंत्र मला व्यवस्थापकाने दिला. मी जळगावच्या बाजारात व्यापारी, दुकानदारांच्यासोबत संपर्क वाढवला. जळगावच्या बाजारपेठेत अनेक प्रतिष्ठाने ही पीढीजात व्यवसाय व व्यापारात टीकून आहेत. त्यांचा अनुभव व कामकाजातला चढउतार हा विद्यापीठातील शिक्षणासारखा आहे. त्यापैकी काहींनी व्यवसाय आणि व्यापारात अंगिकारलेली धोरणे, तत्वे ही बोर्डरुम पुस्तकातील व्याख्या व स्पष्टीकरणापेक्षा वेगळ्या आहेत.

व्यापारातील प्रात्यक्षिक शिकण्याचा पहिलाच अनुभव नवजीवन सुपर शॉपचे संचालक अनिलभाई कांकरिया यांच्याकडे मला आला. बहुधा तो काळ अमेरिकेतल्या मंदीचा होता. भारतावरही त्याचे सावट होते. मराठी माध्यमे मंदी (रिसेशन) च्या बातम्या चेकाळल्यागत छापत होती. जगाची मंदी गावाशी जोडण्याचा शहाणपणा स्थानिक बातमीदार करीत होते. वाहन विक्री ठप्प, सोने बाजारात मंदी, दाणाबाजार ओस, किराणा दुकानात शुकशुकाट असे शिर्षक असलेल्या बातम्या सर्वच दैनिकात  आलटून पालटून असत.

याच वातावरणात नवरात्र तोंडावर होती. नंतर दिवाळी होती. अनिल जोशी व मी जनसंपर्कातून जाहिराती मागायला बाजारात फिरत होतो. अर्थात, धंदेपाणी नसल्याने नन्नाचाच पाढा असे. एकदा भर दुपारी अनिलभाईंकडे गेलो. जाहिरातीचा विषय निघाला. अनिलभाईंनी १०/१२ पेपर समोर टाकून म्हटले, तुम्ही तर छापता आहात मंदी म्हणून. मग आम्ही जाहिराती कशा द्यायच्या ? जळगावचे २०/२५ व्यापारी मिळून आम्ही जळगाव शॉपिंग फेस्टीवल साजरा करतोय. ग्राहकांना आकर्षून घ्यावे म्हणून किंमतीत सवलती देतोय. वातावरण निर्मिती करतोय आणि तुम्ही पेपरवाले सर्व काही मंदीत घालता आहात ! शब्द संयमाचे होते पण स्वर नाराजीचा होता. अनिलभाईंनी त्या दिवशी चहा सुध्दा दिला नाही.

आम्ही नवजीवनच्या पायऱ्या उतरत असताना नवजीवनसमोर लावलेल्या जळगाव शॉपिंग फेस्टीवलच्या कमानी दिसल्या. गंमत होती. जेव्हा पायऱ्या चढलो तेव्हा त्या कमानी दिसल्या नाहीत पण अनिलभाईंनी कान टोचल्यानंतर सारे दिसायला लागले. जळगाव शॉपिंग फेस्टीवल ही जळगावच्या व्यापाऱ्यांची भन्नाट कल्पना होती. काही व्यापारी साखळीने एकत्र येवून मंदीशी लढत होते. यात ग्राहकांना सवलतीचे कुपन देवून किंमतीत सूट दिली होती. जिल्ह्यातून ग्राहक आले तर त्यांच्या प्रवासाचे व जळगावात खाण्याचे पैसे वाचावेत असा विचार होता. जोशी आणि माझे डोळे उघडले. दुसऱ्या दिवशी जळगाव शॉपिंग फेस्टीवलची बातमी दैनिकाच्या प्रथम पृष्ठावर फोटोसह ८ कॉलमात होती. याचा योग्य परिणाम झाला. दुपारी अनिलभाईंनी पुन्हा बोलावले. चहाही दिला आणि अनिलला जाहिराती मिळाल्या. त्यानंतर जळगाव शॉपिंग फेस्टीवलचे प्रचारक म्हणूनच बातम्या दिला. बाजारपेठ नंतर गजबजली आणि मरगळही संपली. बोर्डरुम पुस्तकात अशा प्रकारचे संदर्भ कुठे होते ? जळगावच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येवून मार्केटींगचा नवा मंत्र जन्माला घातला.

याच काळात दैनिकाच्या मुख्य कार्यालयात पुणे किंवा मुंबईला प्रशिक्षणाला जावे लागे. तेव्हा बंगळुरु, मुंबई आणि पुण्यात मॉल कल्चरचा प्रारंभ झाला होता. मुंबईतील मॉल बघितले होते. मात्र, तेथ खरेदीची हिंमत केली नव्हती. अनिलभाईंशी एकदा मॉल विषयावर बोललो. मॉलमधील खरेदी विश्वासाची वाटत नाही, असे सहज म्हणालो. दुसऱ्या दिवशी रोटरी क्लबचे मॉल विषयावर भाषणाचे आमंत्रण हातात आले. अवघड स्थिती झाली. मॉल पाहिले आहेत, तेथे गेलो आहे पण खरेदीचा अनुभव नसताना काय बोलायचे ? हा प्रश्न होता. अनिलभाई म्हणाले, मॉलमधील खरेदी तुम्हाला विश्वासाची का वाटत नाही यावर बोला आणि मॉल भविष्यात टीकतील का हे सांगा. भाषणाचा विषय मिळाला. नंतर काही इतर ठिकाणचे संदर्भ वाचून भाषण तयार केले.

भारतीय दुकानदाराशी ग्राहक हा पीढीजात जोडला जातो. त्यामुळे त्याचे नाते दुकानदाराशीच आणि तेथील कर्मचाऱ्यांशी कायम असते हा पारंपरिक निष्कर्ष सांगत मी विषय मांडला की, मॉल कल्चरला पारंपरिक सेवेतील सुधारणा व गुणवत्ताच रोखून धरेल. सहकार किंवा गृपने एकत्र येणारे दुकानदार साखळी करत विस्तारतील. तेव्हा उपस्थितांवर भाषणाचा काय परिणाम झाला माहित नाही, पण मी मांडलेले गृहितक बहुधा बरोबर होते असे आज मला वाटते. अगदी जळगावचा विचार केला तर विशाल मेगा मार्टचा पसारा आवरला. बीग बाजार मर्यादीत आहे. डी मार्ट ठराविक खरेदीसाठी आहे. त्या तुलनेत अनिलभाईंचे नवजीवन सुपर शॉप महाबळ व बहिणाबाई जवळ विस्तारले. अलिकडे मानराजजवळ नवजीवन मेगा मार्ट सुरू झाला आहे. किराणा दुकानाचे सुपर शॉप आणि सुपर शॉपचे मेगा मार्ट होणे यासाठी व्यापारातील भविष्य जाणून घेण्याची दूरदृष्टी हवीच. ती कांकरिया परिवारात आहे.

अनिलभाईंशी अलिकडे खुप गप्पा होतात. एके दिवशी ते म्हणाले, मी एमजे कॉलेजला होतो तेव्हाचा किस्सा आहे. सरांनी व्यापारातील नवी संकल्पना (इनोव्हेटीव्ह आयडीया) या विषयावर प्रकल्प करायला सांगितले. भविष्यात प्लास्टीक बैगमध्ये ताज्या भाज्या पैकींग करून विक्रीची संकल्पना मांडली. रोज रस्त्यावर किंवा चौकात ताजी भाजी मिळत असताना माझी पैकींगमधील भाजीची कल्पना मित्रांना हास्यास्पद वाटली. पण, सरांनी माझी पाठ थोपटली. माझी ही संकल्पना नवजीवनमध्ये मी कार्यान्वित केली. नवजीवनमध्ये पैकींगमध्ये ताज्या भाज्या देणे सुरु केले. आज मोठ्या महानगरांमध्ये कापलेल्या भाज्यांचे पैकींग घर पोहच दिले जात आहे. तसा ग्राहकवर्ग निर्माण झाला आहे. अनिलभाई पुढे म्हणाले, याचा ग्राहकाला फायदा होतो. जेव्हा बाजारात १०० रुपये किलो कांदा होता तेव्हा नवजीवनमध्ये किलोचा भाव ६० रूपये होता. काही दिवसांपूर्वी लिलाव बंद झाल्यानंतर भाज्या कडाडल्या. भेंडी ६० रुपये किलो झाली. नवजीवनमध्ये किलोचा भाव ३० रुपयेच होता.
अनिलभाईंनी सुपर शॉपच्या व्यवसायात अनेक बदल घडविले आहेत. नव्या संकल्पनांचे ते पायोनियर आहेत. प्लास्टीक बैगेत भाज्या विका सांगणारे अनिलभाई नऊ महिन्यांपूर्वी मला म्हणाले, तुम्ही चांगले लिहीता. तुम्ही चांगले शब्द विका. त्याची अनेकांना गरज आहे. त्यायाच सल्ल्यातून सोशल मीडिया सोल्युशन या सेवेचा जन्म झाला.

आज अनिलभाईंचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !!


No comments:

Post a Comment