Sunday, 6 November 2016

आतेभावाचे नाते हळव्या मैत्रिचे ...

तुमच्या घरात किती खोल्या आहेत आणि तुम्हाला त्यात सुख व समाधानाने राहायला किती जागा आहे यावर माणसाची श्रीमंती ठरत नाही. तुम्हाला किती मित्र आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही किती मोकळेपणाने बोलू शकता यावरच माणसाचे ऐश्वर्य ठरते. अशा प्रकारचे मित्र मला भरपूर आहेत. अनेकांशी मी अत्यंत खुलेपणाने बोलू शकतो. यात मित्रांच्या गोताळ्यात माझा एक सख्खा आणि सच्चा नातेवाईक आहे. तो म्हणजे पारोळा निवासी तथा विमा विकास अधिकारी असलेला आतेभाऊ मिलींद मिसर. मिलींद नात्याने आतेभाऊ आहे पण सहवासातून आम्ही मित्र आहोत. एकमेकांविषयी मोकळेपणे बोलायच्या आम्ही एकमेकांच्या जागा आहोत. आयुष्याच्या वळणावरील अनेक कटू व गोड आठवणी आम्ही एकमेकांना सांगितल्या आहेत आणि त्या व्यक्तिगत स्वरुपातच जपल्या आहेत. त्याचा गावभर कधी बभ्रा केला नाही.

मिलींद आज (दि. ७ नोव्हेंबरला) वयाची पन्नाशी पूर्ण करतोय. मी त्याच्या मागे ९ महिने आहे. मिलींद याच उंबरठ्यावर सासराही होणार आहे. डॉक्टर असलेल्या मोठ्या कन्येचा याच  महिन्यात विवाह आहे. दुसरी कन्याही डॉक्टर होते आहे. खऱ्या अर्थाने मिलींद कुटुंब वत्सल झाला आहे. आज मिलींदला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना निघून गेलेल्या काळातील अनेक प्रसंग काल परवा झालेल्या घटनांसारखे डोळ्यांसमोर येतात. मिलींदच्या आणि माझ्या दोन वर्षांच्या सहवासातील खुप सारे किस्से समोर येतात. मिलींद आणि मी नातेवाईक. मिलींद आणि मी भाऊ. मिलींद आणि मी कट्टर दुश्मन. मिलींद आणि मी अधीरतेने अबोला सोडणारे. आमचे नाते अशा हळव्या मैत्रिचे.

मिलींद ब्रिलीयंट होता. दहावीत नाशिक बोर्डाच्या यादीत त्याचे नाव झळकले होते. भडगाव हे माझे आणि त्याचे मामाचे गाव. उन्हाळ्याच्या सुटीत मिलींद मामाच्या गावी यायचा. सकाळी आलेला मिलींद आईच्या आठवणीने हळवा होवून सायंकाळीच परत जायचा. कधीकधी मुक्कामी राहीलाच तर आम्ही मुले गिराणानदीवर भर दुपारी पोहायला जायचो. पारोळ्याजवळ नदी नसल्याने मिलींदला भडगावच्या नदीचे आकर्षण असे. भर दुपारी तापलेल्या वाळूत पाय पोळत. मग दोन टॉवेल घेवून जायचे. एक एक पुढे टाकत त्यावरून चालत पात्राजवळ पोहचायचे. मनसोक्त तासभर पोहायचे. परतीचा प्रवास तसाच. मात्र, शनिमंदिराजवळ आल्यानंतर तेथील भुरी माती हातापायाला चोपडायची. नदीवर पोहून आल्याचा संशय घरी कोणाला नको म्हणून असे करायचे. प्रकाशकाकाच्या रागावण्याला घाबरून असे करायचो. आतेभाऊ म्हणून माझी मिलींदशी अशी गट्टी फू होती.

मिलींदचा दोन वर्षांचा सहवास मला अनपेक्षितपणे लाभला. दहावीत ८७ टक्के गुण मिळाल्यानंतर अकरावी व बारावी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी मिलींदने भडगावला प्रवेश घेतला. तो आणि मी एका वर्गात बसायला लागलो. आमच्या आयुष्यातील ते दोन वर्ष आजही विसरता विसरत नाही. खूपच मजेत आणि आनंदात आम्ही राहीलो. मी बारावी नापास झालो. तर मिलींद मेरिट हरवून केवळ उत्तीर्ण झाला. शिक्षणाची अपेक्षित दिशा तशी चुकलीच. पण ते अपयश कुरवाळत किंवा त्याचा दोष लावून आम्ही जगलो नाही. नव्या दिशा स्वीकारत पुढे गेलो. नंतरही जे शिकलो त्या क्षेत्रात काम केले नाही. पण जे केले तेथे टॉपला होतो. अपयशाबाबत आम्हाला पालक कधीही बोलले नाहीत ही विशेष नोंद.

मिलींद आणि मी बारावीला अभ्यासच केला नाही. आम्ही चित्रपटांच्या नादी लागलो होतो. अभ्यास टाळून आम्ही रात्री दुसरा शो पाहायला जायचो. दाराची वरची कडी बाहेरून हात घालून लावायचो. लाईट सुरू ठेवायचो, इतरांना वाटावे आम्ही अभ्यास करतोय. आमची ही चोरी लहान काकूने अनेक दा पकडली होती. पण काकूने भांडा फोडला नाही. मैत्रिण अभ्यास करते का ? हे पाहायला आम्ही रात्री बेरात्री तिच्या गल्लीत भटकायचो.

अकरावी आणि बारावी आम्ही मजेत घालवली. आम्हाला खूप मित्र होते. भांडणारे व लावालावी कराणारे. पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावरील हळव्या प्रसंगातून मिलींद गेला. मी अशा विषयात आजोबांना टरकून होतो. दोघांना मैत्रिणी होत्याच. आकर्षणही होते. पण मी मात्र त्याला या विषयासाठी साथ देणारा नव्हतो. मी मैत्रिणींना चिडवायचो. मिलींदचा तो दुखरा कप्पा होता. गंमत अशी होती की तो मला तसे सांगायचा नाही व मी ते समजून घेत नव्हतो. अशा विषयावरून वाद होत. काही चलाख मित्र वादात ठिणगी टाकत. मग माझा व मिलींदचा अबोला असे. फूटबॉलच्या मैदानावर शत्रूत्व असे. अबोला पंधरा दिवस चाले. एकदा हा अबोला सोडायला मी मिलींदला पोस्टाने पत्र पाठवले होते.

मिलींद आणि माझी श्रीमंतीची कल्पना भन्नाट होती. कॉलेजला शिकताना आम्ही मामा, काकांचे उधारी खाते पाहायचो. चहाच्या टपरीवर उधारीची डायरी असणे हे आम्हाला भारी वाटायचे. मग आम्ही सुध्दा गावातील भोईच्या "विसावा" हॉटेलवर डायरी सुरु केली होती. मिलींदला वडीलांकडून पैसे मिळत व मला आजोबा देत. आमच्या उधारीचे वेड अॉमलेटच्या गाडीपर्यंत गेले. बस स्थानकाबाहेरील "असगर अॉमलेट" गाडीवरही आमची उधारी असे. तेव्हा बोरसे हे दुधाची भट्टी लावत. तेथे रात्री आठ वाजता आम्ही जायचो. गरम दूध पीत भांडण मिटवायचो. आमच्यातील नाते गळून पडले आणि आम्ही मित्र झालो.

जाहिरात कला विषयाच्या बीएफए या अभ्यासक्रमास मी औरंगाबाद स्कूल अॉफ आर्टला पहिला आलो होतो. तेव्हा तेथील डीनने मला फेलोशिप नाकारली. मिलींद मला मुंबईला थेट मंत्रालयात घेवून गेला. कमलकिशोर कदम शिक्षणमंत्री होते. त्यांना भेटलो, नंतर मीच पाठपुरावा केला नाही कारण मी प्रेस फोटोरिपोर्टरची नोकरी स्वीकारली. मिलींद सिव्हील इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असून विमाच्या प्रांतात गेला. तेथे रमला व टॉपवर पोहचला.

मिलींदच्या लग्नाच्यावेळीही आमच्यात कशावरून तरी अबोला होता. कुठलाशा कारणावरून मिलींदने माझे ऐकले नव्हते. म्हणून मी नाराज होतो, पण त्याचा फोन आला आणि मी धावतपळत पारोळ्यात आलो. माझ्या लग्नात मिलींदने मोठा भाऊ म्हणून पारंपरिक विधी पार पाडले होते. नंतरच्या अनेक कौटुंबिक व अडचणीच्या काळात आम्ही सोबत येत गेलो. एकमेकांविषयीचे अनेक विषय आम्ही दोघांनी परस्परांना सांगितले, समजून घेतले आणि मदतही केली. माझी पत्नी सौ. सरोजला बीएडच्या ॲडमिशनसाठी ५ हजार रुपये डोनेश द्यायचे होते. ते मिलींदने दिले. अर्थात, मी नंतर परत केले.

कौटुंबिक अनेक विषयांवर आम्ही आजही एकमेकांशी मोकळेपणाने बोलतो. मला त्याचा मानसिक आधार आहे. मी स्वभावाने खमक्या आहे. पण काही विषय माणसाला कमकूवत करतात. अशावेळी मिलींदशी संवाद करुन मी तणावमुक्त होतो. मिलींदने आयुष्याचे अनेक रंग अनुभवले. पारोळा पालिका राजकारणात आई तथा माझी आत्या नगरसेवक व नंतर पाणी पुरवठा सभापती झाली. मिलींद विमा विकास अधिकाऱ्यांच्या संघटनेचा पहिल्यांदा अध्यक्ष झाला. नंतर लक्षात आले की अधिकार सरचिटणीसला असतात म्हणून सरचिटणीस झाला. या पदावर असताना तो भारतभर फिरतोय व परदेशातही जावून आला. विमा संघटनेच्या कामकाजातून तो कौन्सिलर व ट्रेनरही झाला आहे. मिलींदने प्लॉट पाडून ते विक्रीही केले, त्यात तो रमला नाही. तेथील उफराटे व्यवहार त्याला पचले नाहीत. मिलींद व मी दोघे सा. धरणी (धरणगाव) चे पहिले वार्ताहर होतो. मिलींद व मी सोबत कविता पाडल्या. अगदी ट ला फ लावून. पण मजेशीर बाब अशी की जळगाव आकाशवाणीवर आमचे काव्य वाचनही झाले. मिलींद जनशक्तिचा पत्रकार होता. मी पत्रकारिताच पेशा निवडला.

आयुष्याच्या वळणावरील अनेक आडवळणाच्या आठवणी आहेत. काही खूप कटू तर काही अत्यानंदाच्या. अनेक विषय फारसे चर्चा न करता आम्ही समजून घेतो. जेव्हा दोघे भेटतो तेव्हा आम्ही आमच्याशी संबंधित विषयांवर बोलतो. आता मुला मुलींचे विषय असतात. आम्ही चर्चा करतो. एकमेकांचे मत लादत नाही. आमची चर्चा आम्ही इतरांमध्ये पसरवत नाही. प्रश्न विचारतो पण जाब विचारत नाही. एकमेकांच्या सवयी माहिती आहेत. त्याला क्रॉस करीत नाही. होकार व नकारावर आम्ही ठाम असतो, कोणाचीही भीड किंवा मूर्वत न ठेवता.

मिलींद एका बाबतीत भाग्यवान आहे, त्याच्या घरात त्याच्या आई वडीलांना जागा आहे. दोघांच्या आरोग्याच्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या असूनही दोघेही मिलींद सोबत आहेत. माणसाला पालकांचा सहवास, सदीच्छा आणि आशीर्वाद जोपर्यंत मिळतात तो पर्यंत नियती त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. तसे नियतीने मिलींदला भरभरून दिले आहे.

५० व्या वाढदिवशी मिलींदचे अभिष्टचिंतन. भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा !! ५१ व्या वर्षी मिलींद आजोबा झालेला असेल ... साला काळ फारच भुर्कन उडून जातोय का ???

(संपवता संपवता - मिलींदचा सल्ला ऐकून मी साखर खाणे सोडले. माझ्या आयुष्यात गोड वागणाऱ्या मिलींदला शब्द ऐकून मी साखर सोडली)




No comments:

Post a Comment