गेली २६ वर्षे वृत्तपत्र माध्यमात विविध पदांवर काम करीत होतो. सात महिन्यांपासून वृत्तपत्राच्या संपादकिय कामकाजातून बाजुला झालो आहे. सोशल मीडियाशी संबंधित विविध पर्यायी माध्यमांचा वापर करीत पत्रकार म्हणून लिखाण सुरु ठेवले आहे. सकाळ, देशदूत व तरुण भारत या वृत्तपत्रांमध्ये फोटोग्राफर, बातमीदार, उपसंपादक, सहयोगी, सहाय्यक तथा मुख्यसंपादक म्हणून काम केले. या वृत्तपत्रांमधून सातत्याने लिखाण करीत आलो. सकाळमधील दखल हे सदर देशदूत व तरुण भारतमध्येही नियमितपणे लिहीले. सकाळमधील लेखांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट वाडमय निर्मितीचा पुरस्कारही मिळाला. खान्देशातील अनेक संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात संपादक म्हणूनही गेलो. वृत्तपत्राचा संपादक असलेली ओळख तेव्हा विशिष्ट परिघातच होती. वृत्तपत्रातून लेख लिहीताना संस्थात्मक धोरणाच्या आणि काही व्यावसायिक हितसंबधांच्या मर्यादा पाळाव्या लागत. कितीही तटस्थपणे आणि सत्य लिहायचे म्हटले तरी लेखणीचे स्वातंत्र्य आकसून जात असे.
मात्र, गेल्या ७/८ महिन्यांपासून स्वतःच्या कामाचे स्वरुप व्यावसायिक केल्यानंतर लेखणीवर असलेल्या अनेक मर्यादा गळून पडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत राजकीय घटना झपाट्याने घडून त्यामागील कारणांची मिमांसा करण्याची संधी एबीपी माझा, टीव्ही ९, महाराष्ट्र वन आदी चैनलवरुन मिळाली. एकनाथराव खडसेंच्या राजीनाम्यानंतर एबीपी माझावरील संपादकांचे पैनल डिस्कशन आणि सुरेश जैन यांची कारागृहातून वापसीनंतर महाराष्ट्र वन वरील चर्चा या दोन कार्यक्रमांनी परखड बोलणारा पत्रकार म्हणून ओळख मिळवून दिली. वृत्तपत्रांच्या पानांवर रकानेच्या रकाने भरुन लिहून सुध्दा जी ओळख तयार होवू शकली नाही ती चैनलवरील चर्चेतून मिळाली.
गेल्या ७/८ महिन्यांत मी फेसबुक आणि ब्लॉगरवरूनही सातत्याने लेखन सुरु ठेवले आहे. वृत्तपत्रातील लेखांचा वाचकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसे. पण, फेसबुक किंवा ब्लॉगरवरील लेखाला झपाट्याने प्रतिसाद मिळतो. तो सुध्दा अनुकूल, प्रतिकूल, आवड दर्शविणारा, आवडले नाही हेही सांगणारा आणि शब्दांतून कौतुक करणारा सुध्दा. समाजातील मान्यवर मंडळी जेथे कुठे भेटतील ती म्हणतात, आम्ही तुमचा ब्लॉग आवर्जून वाचतो. हे ऐकून आनंद होतोच पण आपली लेखणी नेहमी तटस्थ व परखड असावी याची वारंवार जाणिवही होत जाते. येथे एक मुद्दा मुद्दाम सांगायला हवा. पत्रकार म्हणून वावरताना मला कधीही कुठेही बसायची सवय जडली नाही आणि लोकांच्या सदिच्छांशिवाय कोणाकडून काहीही घेतले नाही. म्हणूनच लेखणीतून उमटणारे शब्द आता अधिक परखड, वास्तव उतरत आहेत.
या प्रवासात अगदी अलिकडचे आठवणीतील ४ प्रसंग आहेत. ते सांगायला हवेच. त्यातील दोन माझ्या लेखणीला दोष लावताना थेट मलाच शहाणपण शिकवणारे होते. बरे शहाणपण शिकवणारी मंडळी कोण तर ज्यांच्यावर काहीना काही बालंट असल्याचा दोष लागला आहे अशी मंडळी. इतर दोघे युवा पीढीचे प्रतिनिधी आणि केवळ माझ्या लिखाणावर, परखड बोलण्यावर प्रेम करणारी.
पत्रकार म्हणून लेखन करताना एखाद्या राजकीय व्यक्तिविषयी आणि त्याच्या कार्याविषयी सुसंगत मांडणी करीत अनुकूल अथवा प्रतिकूल मत व्यक्त केले जाते. त्यात घटना, वर्तणूक याचा तार्किक संबंध असतो. अशा लेखनावर प्रतिक्रिया नक्कीच अपेक्षित असतात. त्या सुध्दा अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकतात. लेखातील आशयाची तर्कशुध्द चिकित्सा कोणी केली तर त्यातही वावगे वाटत नाही. पण, अलिकडे काही अती हुशार मंडळी लेखातील आशयांवर आपले म्हणणे मांडताना लेखकाची जात शोधणे आणि लेखकाला शहाणपणा शिकवणे हे काम करु लागली आहेत. म्हणजे कसे तर, एखाद्या मान्यवरावर टीकात्मक लिहीले तर त्याला बहुजन ठरवून लेखकाची अल्पसंख्य जात शोधून लेखकालाच सल्ले देणारे बाजारबुणगे उभे राहतात. लेखातील आशय किंवा मत तर्कसंगतीने न खोडता लेखकाला सल्ला देण्याचे उपद्व्याप काही मंडळी करतात. हे सल्ले सोशल मीडियात जाहिरपणे देतात. लेखकाच्या लेखणीला दोष लावतात. असा दोष लावणाऱ्यांनी बहुतांश वेळा लेख बारकाव्याने वाचलेला नसतोच. मात्र, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले की पुन्हा शहाजोग सारखे म्हणतात की, तुम्ही चीडू नका !
सध्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधीत आशयाचा लेख ब्लॉगवर व्हायरल झाल्यानंतर जळगावमधील एका गैस एजन्सी चालकाने माझ्या लेखावर सुपारी घेवून लिहील्याचा उल्लेख केला होता. आता हे एजन्सी चालक बुजुर्ग आहेत. ते आयपीएस किंवा युपीएस होवू शकले असते. कोण्या बड्या कंपनीतही होते. त्यामुळे आपल्या हुशारी व विद्वत्तेवर त्यांना अभिमान आहे. मनपात आपल्याला स्वीकृत सदस्य करा असा आग्रही त्यांनी खाविआच्या नेत्यांना केला होता. या मान्यवरांची गैस एजन्सी काही वर्षांपूर्वी काही आरोपांनी बंदही झाली होती. असा इतिहास असलेली ही व्यक्ती सोशल मीडियात माझ्या लेखणीला सुपारी घेवून लिहील्याचा दोष लावते. जेव्हा त्यांचा हा इतिहास उगळला तर त्यांची पळताभुई झाली. अर्थात, ईच्छा नसताना त्यांना त्यांचा इतिहास सांगावा लागला.
असाच प्रकार अलिकडचा. देवेंद्र फडणवीस, खडसे, छगन भुजबळ व सुरेश जैन यांच्या विषयी तर्कसंगत मांडणी करून लेख व्हायरल केला. त्यात घटनांचे सुस्पष्ट उल्लेख करीत मत मांडले. त्यावर प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. फडणवीसांचे काय बरोबर, काय चूक हे न सांगता फडणवीस यांच्या जातीला धरून काहींनी बचाव केला. यातच एका गाव पुढाऱ्यांने नेहमी प्रमाणे लेख न वाचता थेट मला शहाणपण शिकवत तुमची लेखणी दुसराच कोणी चालवतोय असा थेट उल्लेख करुन टाकला. आता हा सल्ला देणारा कोण ? तर या गाव पुढाऱ्यांने आपल्या मुलीचे वय लपवून तिला १७ व्या वर्षी सरपंच केल्याचा गवगवा केला होता. नंतर त्यामुलीवर पद सोडण्याची नामुष्की ओढवली. सत्तेसाठी जात, वय चोरणारी माणस माझ्या स्वतंत्र लेखणीला दोष लावणार असतील तर मी काय सभ्य शब्दांचा संग्रह घेवून उत्तर देणे अपेक्षित आहे ?
अर्थात, सोशल मीडियात हा प्रकार चालायचाच. तेथे कोणतेही बंधन नाही. जेव्हा आपण दुसऱ्यावर लिहतो तेव्हा तिसरा कोणीतरी आपल्यावर लिहीणार हे अपेक्षित आहेच. मी त्याची फार पर्वा करीत नाही. जसे दोन उदाहरण खोचक व मनस्ताप देणारी आहेत तशी दोन उदाहरणे आनंद देणारी व आपण आपले लिहीत राहवे सांगाणारी आहेत.
दोन दिवसांपूर्वी दादावाडीजवळ रात्री चाट खात असताना एक महाविद्यालयीन तरुण सारखा माझ्याकडे पाहत होता. मी सुध्दा अस्वस्थ झालो. त्याने अचानक विचारले, काका तुम्ही पत्रकार आहात का ? आजकाल कोणी पत्रकार म्हटले की अंगावर पाल पडल्याप्रमाणे वाटते. मी नाही म्हणालो. तो गोंधळलेला दिसला. बायकोने त्याला विचारले, कारे कशासाठी विचारतो. तो म्हणाला, मी यांना टीव्हीवर पाहिले आहे, सुरेश जैन वापसी प्रकरणावर बेधडक बोलत होते. म्हणून माझ्या लक्षात राहीले. हे ऐकून मी सुखावलो. त्याला म्हटले, तो मीच. तो खुश झाला. पुन्हा म्हणाला, तुम्ही खुप सडेतोड बोललात. मला आवडले. नंतर तो बराचवेळ बोलला.
दुसरा एक किस्सा कालचा. गाडी सर्व्हिसिंगसाठी मानराज पार्कमध्ये गेलो होतो. सर्व्हिसिंगची वेळ सुपरवायझरने पाळली नव्हती. मी खुप चिडलेला होतो. काऊंटरवर मालक आल्याची चौकशी करीत असताना एक युवक आला आणि म्हणाला, तुम्ही दिलीप तिवारी आहात ना ? मी त्याच्याकडे बघत म्हटले, हो. तो मीच. माझा होकार ऐकून तो झटकन खाली वाकला. त्याने पायाला हात लावून नमस्कार केला. मला काहीच समजले काही. काऊंटरवरील मुलगीही आश्चर्याने बघायला लागली. नमस्कार करुन तो म्हणाला, सर मी कावळे. रायसोनीत एमबीए करतोय. मी फेसबुकवर तुमचा मित्र आहे. तुमचे ब्लॉग रोज वाचतो. मला ते आवडतात. तुम्ही फार परखड लिहीता. ते वाचून मालाही माहिती होते. कसे लिहावे हे मी त्यातून शिकतोय ... असे बरेच बोलला. मी पुन्हा सुखावलो. गाडी सर्व्हिसिंगला झालेला उशीर विसरलो. त्याची विचारपूस केली. त्याला मोबाईल नंबर दिला. म्हणालो, तुला कधीही काहीही विचारायचे असेल तर फोन कर. तो सुध्दा आनंदून गेला.
ही चार उदाहरणे अलिकडची आहेत. चारही माझ्या लेखनाशी संबधित. दोन जणांचा पूर्वोतिहास उगाळलेला आणि दोघांचे आयुष्य घडण्याच्या मार्गावर. अशावेळी ग्रह दुषित असलेल्यांचा विचार न करता नव्या पीढीसाठी आपण आपले परखड, तटस्थ, वास्तव लेखन सुरुच ठेवावे असा माझा निश्चिय अधिकच दृढ होतो. लेखणी आणखी फार्मात येते. जेव्हा आपण कोणाचेही लाभार्थी, पंटर असत नाही तेव्हा लेखणीला कशाचेही भय, भीड, मूर्वत असत नाही. ती एक टाकी कागदावर धावत असते ... तीचा मूलमंत्र असतो ... मला भय नाही शस्त्रांचे ... भीती आहे केवळ शब्दांची ... आम्हा घरी शब्दांचीच शस्त्रे ... शब्दांचेच संस्कार ... !!!
No comments:
Post a Comment