Tuesday 4 October 2016

कारभारी देवेंद्र यांच्या मापात पाप ... !!!

नाशिक येथे ओबीसी समाजाने मोर्चा काढून माजी उपमुख्यमंत्री तथा माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची कारागृहातून सुटका कराण्याच्या मागणीचा राज्य सरकारवर दबाव निर्माण केला आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोळ केल्याचा भुजबळ यांच्यावर आरोप आहे. भुजबळांवर हा आरोप केंद्र सरकारची यंत्रणा ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने केला असून त्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल आहे. भुजबळांवरील सर्व आरोपांची माहिती व त्यातील गांभीर्य लक्षात घेवून उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही भुजबळांना गेल्या दीड वर्षात जामीन दिलेला नाही. अशा पध्दतीने कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात संशयित आरोपी असलेल्या भुजबळांची कारागृहातून सुटका करण्यासाठी ओबीसींच्या नावाने मोर्चा काढून झुंडशाहीचा काळा अध्याय लोकशाहीच्या नावावर लिहीला गेला आहे.

 मंबई बॉम्बस्फोटातील शिक्षा झालेला आरोपी याकूब मेमनच्या जनाजात सहभागी होण्यासाठी केली जाणारी झुंडशाही आणि साक्षी पुराव्यांची तपासणी केल्यानंतर न्याय व्यवस्था भुजबळांना जामीन देत नसताना, भुजबळांच्या मुक्तीसाठी केली जाणारी झुंडशाही यात समाजाची बदलणारी मानसिकता एका खालच्या स्तरावर आल्याचे दिसून येते. दोन्ही प्रसंग वेगवेगळे असले तरी अनैतिक व गुन्हेगारी दोष असलेल्या व्यक्तिमत्वांच्या समर्थनार्थ लोकांचे एकत्र येवून शक्तिप्रदर्शन करणे हे क्लेषकारक आहे.

यापेक्षाही अधिक क्लेषदायी वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. ओबीसींच्या नावाने नाशिकमध्ये निघालेल्या मोर्चानंतर फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, भुजबळांच्या मुक्ततेसाठी सरकार प्रयत्न करेल, भुजबळ आजारी आहेत. त्यावर न्यायालयास विचार करायला लावू. भुजबळांच्या विरोधात राजकीय आकसाने कारवाई झाली असेल तर त्याची चौकशी करु.

भुजबळ ज्या राजकीय पक्षाचे नेते आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती (सर्वेसर्वा या अर्थाने) शरद पवार हे फडणवीस यांचा उल्लेख राज्याचे कारभारी म्हणून करतात. छत्रपती शिवरायांच्या नावाने राज्य करणारे पेशवे स्वतःला राजे न संबोधता छत्रपतींचा कारभारी म्हणत. तोच खोचक संदर्भ घेवून पवार हे फडणवीसांना राज्याचे कारभारी म्हणतात. अशा या कारभारीने एका संशयित आरोपीच्या मुक्तीसाठी सरकार प्रयत्न करेल असे जाहीरपणे सांगणे म्हणजे मतांच्या राजकारणासाठी आपण किती लाचार झालेलो आहोत हे दाखवून दिल्याचा लाजिरवाणा प्रकार आहे. कारभारी फडणवीस यांना लाखोंच्या संख्येत राज्यभर निघणारे मराठा समाजाचे मोर्चे दिसत नाहीत का ? त्यांच्या मागण्यांवर फडणवीस तडकाफडकी बोलत नाहीत. पण, ओबीसींच्या नावाने होणाऱ्या झुंडशाहीची दखल घेत फडणवीस बोलतात. तपास यंत्रणा, कायदा व न्यायव्यवस्था यावर प्रभाव टाकेल किंवा त्यांची प्रतिमा बिघडू शकेल असे वक्तव्य करतात, याचाच खेद वाटतो.

भुजबळ सध्या कशासाठी कारागृहात आहेत ? तर दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधकामाचे कंत्राटात ठेकेदाराला देताना त्यांनी स्वतः आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप छगन भुजबळ, त्यांचे चिरंजिव पंकज आणि पुतण्या समीर यांच्यावर आहे. याशिवाय मुंबईतील कलिना विद्यापीठ भूखंड घोटाळा, अंधेरी आरटीओ, मुंबई-नाशिक टोल रोड, नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड हौसिंग प्रकल्पसारख्या ९ विविध प्रकल्पात भुजबळांनी जवळच्या नातेवाईकांना कंत्राट देऊन सुमारे ८७० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी भुजबळ यांच्यावर हवाला आणि मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गुन्हे पोलीस, सीबीआय आणि ईडी या यंत्रणांच्या तपासाच्या चाळणीतून तसेच भुजबळांशी संबंधित ७० ठिकाणी छापे घालून, तेथे चौकशी करून दाखल झालेले आहेत. अशा कारवाई मागे केवळ राजकीय आकस असण्याचा मुद्दा कारभारी फडणवीस कसा काय जाहीरपणे मांडू शकतात ? किंवा त्यावर संशय व्यक्त करु शकतात ?

जर भुजबळ यांच्या विरोधात राजकीय आकसाने कारवाई झाली असे कोणी म्हणत असेल तर भुजबळ विरोधात तक्रारी केल्या कोणी हेही समोर आले पाहीजे. काय आहे त्याचा इतिहास ? छगन भुजबळ आणि माजी पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे यांच्या चौकशीची मागणी करणारा अर्ज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रदेश सरचिटणीस या नात्याने दि. ३१ जुलै २०१२ रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास शाखेकडे दाखल केला होता. या तक्रारींच्या पुष्टीसाठी काही टिपणे, सरकारी अहवाल, शासकीय खात्यांची काही निरीक्षणे आदी पाच खोके भरतील एवढी कागदपत्रेही त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन सहआयुक्त हिमांशु रॉय यांच्याकडे सादर केली होती. बेनामी कंपन्यांच्या नावाने आपल्या कुटुंबीयांनाच कंत्राटांचे वाटप करणे, सरकारी भूखंड गिळंकृत करणे, बेकायदा रितीने शेतजमिनींचा वापर आपल्या कंपन्यांसाठी करणे, सरकारी जमिनी आपल्या कंपन्या, संस्थांसाठी वापरता याव्यात यासाठी चलाखीने वळविणे, सरकारी कंत्राटदारांकडून अवाजवी रीतीने देणग्या उकळणे आदी मुद्यांचा या तक्रारीत समावेश होता. म्हणजेच, आपणच मागणी केलेल्या प्रकरणात भुजबळ गोवले गेले असल्याचे कारभारी फडणवीस यांना माहित आहे. तरीही ते म्हणत आहेत की, भुजबळांना जर कोणी आकसाने अडकवले असेल तर त्याचा शोध घेवू.

फडणवीसांची ही प्रवृत्ती पेशव्यांची काकू तथा राघोबादादांची पत्नी आनंदीबाई यांचीच आहे. आनंदीबाईने एका लेखी फतव्यात नारायणरावला धरावे च्या ऐवजी नारायणरावला मारावे असे करुन त्याचा बळी घेतला होता. या घटनेची चौकशी करणारेही नाना फडणवीस होते. योगायोगाने आताही कारभारी फडणवीस असून भुजबळांचा राजकीय बळी दिल्याची चर्चा आहे. म्हणजेच आताचे कारभारी फडणवीस हे आनंदीबाईंच्या प्रवृत्तीचे आणि नाना फडणवीसांच्या वृत्तीचेच आहेत, असे म्हणता येईल. म्हणूनच कारभारी देवेंद्र फडणवीसांच्या मापात पाप आहे.

फडणवीस यांच्या मापातील पापाची अजून दोन उदाहरणे आहेत. त्यातील पहिले हे शिवसेनानेते सुरेशदादा जैन यांच्याशी संबधित आहे. जैन हे घरकुल घोटाळ्याच्या आरोपात सुमारे साडे चार वर्षे कारागृहात होते. त्यातील जवळपास दोनवर्षे ही कारभारी फडणवीस यांच्या काळातील आहेत. जैन यांनाही कारागृहात डांबून ठेवल्याचा आरोप होत होता. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनी मिळून जैन यांना कारागृहात डांबले असे सांगण्यात येत असे. जैन यांच्या अटकेनंतर त्यांच्या काही समर्थकांनी सुद्धा जळगावात मोर्चा काढून नंतर जिल्हा रुग्णालयात धुडघूस घातला होता. फडणवीसांना कारभारीपदाचा टीळा लागल्यानंतर सत्तेची गर्मी टिकवायला पहिली साथ राष्ट्रवादीचे छत्रपती पवार यांनी दिली होती. त्यावेळी झालेल्या राजकिय उपकाराची परत फेड बहुधा फडणवीस हे भुजबळांविषयी सहानुभूती दाखवून करीत असावेत. राज्यातील सत्तेचा टेकू शिवसेनेचा असताना आणि जैन हे शिवसेनेचे नेते असताना कारभारी फडणवीस यांनी कधीही जैन यांना कारागृहातून काढण्याविषयी सहानुभूतीपूर्वक वक्तव्य केल्याचे वाचनात आलेले नाही. कारभारी फडणवीसांच्या मापात पाप आहे ते या ठिकाणी. कारागृहात असताना जैन सुध्दा आजारी होते. त्यांची प्रकृती खालावली होती. हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागली. पण, तेव्हा फडणवीसांच्या समोर अल्पसंख्याकांचा मोर्चा निघाला नाही म्हणून जैनांविषयी फडणवीसांना दया आली नाही.

कारभारी फडणवीस हे आता एकनाथराव खडसे यांच्याविषयी सुध्दा मापात पाप करीत आहेत. खडसे यांच्या पत्नी तथा महानंदच्या चेअरमन सौ. मंदाताई यांनी भोसरी (जि. पुणे) येथील एमआयडीसीत भूखंड खरेदी केल्याचा विषय चौकशीत आहे. हा भूखंड अवैधरित्या व खडसे यांच्या महसूल मंत्रीपदाचे वलय वापरुन खरेदी केल्याचा आरोप आहे. हा आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी करीत खडसेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.  त्यानंतर भोसरी भूखंड खरेदी प्रकरणाची चौकशी माजी न्यायाधिशांच्या एक समिती सदस्याकडून तीन महिन्यांत करु असे कारभारी फडणवीस यांनी विधी मंडळ सभागृहात सांगितले होते. त्यानंतर समितीची रचना करता करता तीन महिने गेले. आता समितीला तीन महिने मुदत वाढ दिली आहे. कारभारी फडणवीस यांनी विधी मंडळ सभागृहात किंवा भाजपच्या संघटनात्मक कार्यक्रमात बोलताना खडसेंना सर्व प्रकारच्या आरोपात क्लिनचीट दिली आहे. मात्र, खडसेंच्या मंत्रिमंडळातील वापसीचा विषय पत्रकारांनी विचारला तर फडणवीस म्हणतात, हा निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह घेतील.

खडसे प्रकरण व भुजबळ प्रकरणात कारभारी फडणवीस मापात पाप कसे करतात ? हे लक्षात येते. भुजबळांवर आरोप करीत पोलिसांना फाईल दिली कोणी तर ती फडणवीस यांनी. परिणाम काय झाला तर भुजबळ कारागृहात गेले. आता फडणवीस काय म्हणतात, सरकार भुजबळांना सोडवायला प्रयत्न करेल. खडसेंवर बेछूट आरोप कोणी केले तर आपच्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी. त्यांनी आरोपांची फाईल कोणाला दिली तर ती फडणवीसांकडे, फडणवीसांनी ती फाईल कोणाला दाखविली तर मोदी, शहांना. आरोपांच्या चौकशीचा काळ कोणी ठरवला तर तो फडणवीसांनी. मात्र, तसे घडलेले नाही. भुजबळांना न्यायालय जामीन देत नसताना फडणवीस म्हणतात, भुजबळांना सरकार सोडवायचा प्रयत्न करेल. नेमलेली समिती खडसेंची चौकशी करीत नसताना फडणवीस स्वतः क्लिनचीट देवून म्हणतात, खडसेंचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

या अशा मापातील पापामुळे फडणवीस यांनी जनतेसमोर स्वतःची प्रतिमा डोक्यात एक, ओठात दोन आणि पोटात तीन असे कावेबाज विचार असलेला नेता म्हणून स्वतःच निर्माण केली आहे. असे वागणे म्हणजे आनंदीबाई, राघोबादादा व नाना फडणवीसांच्या पाताळयंत्री प्रवृत्ती व वृत्तीचा अर्क असल्याचे जाणवते. फडणवीस या आडनावाने आणि वर्तनाने पेशव्यांच्या काळातील शह काटशहचे काळे पर्व पुन्हा लिहीले जाते की काय अशी शंका घेणारी स्थिती आहे.

मापात पाप हा शब्द प्रयोग एकत्र दारु पिणारी मित्र मंडळी करतात. बाटलीतील दारु ग्लासात पेग म्हणून ओतताना प्रत्येकाचा पेग सारखा भरला जाईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. कमी जास्त पेग भरुन मापात पाप करयाचे नाही, अशी जाणीव दारु पिण्यापूर्वी शुद्धीत असलेल्या प्रत्येकाला असते. दारु पिल्यानंतर माणूस खरे बोलत असला तरी तो नशापाणी करुन बोलत असतो, असे मानले जाते. म्हणूनच कारभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडून राजकारणातही मापात पाप होवू नये अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. कारण, पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस होते तसेच न्यायदान करणारे रामशास्त्री प्रभुणेही होते.

1 comment: