Monday, 31 October 2016

जळगाव जिल्हा भाजपतील सोयीची साठमारी ...

जिल्ह्यातील नगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या जिल्हा नेत्यांनी सोयीचे राजकारण आरंभले आहे. राज्यस्तरावर भाजप-शिवसेना युती होणार अशी घोषणा झाल्यानंतरही भाजपच्या जिल्हा पुढाऱ्यांनी स्वबळाचा अहंकार कुरवाळत सवतेसुभे निर्माण केले आहेत. या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष हे शहरातील मतदारांच्या सार्वत्रिक मतदानातून निवडून येतील. त्यामुळे सर्वच विधानसभा क्षेत्रात नगराध्यक्ष निवडणूक म्हणजे आगामी निवडणुकांची लिटमस चाचणी ठरणार आहे. मात्र या निवडणुकांनी जिल्हा भाजपत राजकीय साठमारीचा खेळ सुरु केला आहे. विरोधकांना सोडून जिल्हा नेते आपल्याच लोकांना बडवून काढत आहेत.

जळगाव जिल्हा भाजपमध्ये सध्या सर्वजण सोयीचे राजकारण करीत आहेत. याचे कारण जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आणि जळगाव शहर जिल्हाध्यक्ष यांचे स्वतःचे अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांमध्ये फारसे स्थान नाही. या दोघांनी सोय आणि मतलब पाहून स्वतःचाच स्वार्थ साधला आहे. तो कसा ? तरच ग्रामीण अध्यक्षांनी पत्नीला आमदारकी मिळवून दिली. ती कोणाच्या आशीर्वादाने मिळाली ? हे समोरची व्यक्ती पाहून सांगितले जाते. स्वतः जिल्हाध्यक्षांनी जिल्हास्तरावरील सहकारी संस्थांमध्ये पदे मिळवून घेतली. जळगाव शहर जिल्हाध्यक्षांनी पत्नीला नगरसेवक बनवून घेतले. जिल्हास्तरावरील सहकारी संस्थेत स्वतःला पद मिळवून घेतले. अशा प्रकारे ग्रामीण व जळगाव शहर जिल्हाध्यक्षांनी आपापल्या घरात पक्ष बळकट केला. मात्र, तालुकास्तरावर नेत्यांना आपल्याच घरात पक्षबळकट करायला परवानगी नाही. तेथे विरोधकांच्या घरात पद किंवा उमेदवारी देवून पक्ष बळकट केला जातोय.

कोणत्याही राजकीय पक्षात पुढाऱ्यांची गणिते पक्षाच्या लाभापेक्षा स्वतः, कुटुंब , मित्र-लाभार्थिंचे कोंडाळे, उंबरठ्यावरील स्पर्धक यांच्यासाठी पहिल्या पसंतीचे असते. त्यानंतर पक्षातील निष्ठावंतांना विचारात घेतले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा बँक व जिल्हा दूध संघाच्या निवडणुकांमध्ये पक्ष विरहित राजकारणाचा नारा देत स्वतः, कुटुंब व गोताळ्याची सोय करुन घेण्यात आली होती. मात्र, आता नगर पालिकांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर आणि चिन्हावर लढणार हा सोयीचा की सवतासुभ्याचा निर्णय घेवून पक्षातल्या अनेकांच्या स्थानिक राजकारणाची गोची केली आहे.

ज्या प्रमाणे जिल्हा स्तरावरील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत साखळी करुन पदांची वाटणी करुन घेण्याचा अधिकार जिल्हा नेत्यांनी वापरला होता, त्याच न्यायाने पालिका स्तरांवर स्थानिक नेत्यांना त्यांचे सवतेसुभे सांभाळायला स्वातंत्र्य द्यायला हवे होते. भाजपअंतर्गत जिल्हास्तरावर जसे माजी व आजी मंत्र्यांचे गट तट आहेत, या गटातील कार्यकर्ते जसे जिल्हा बैठकीत भांडतात तसेच आणि त्याच न्यायाने स्थानिक पातळीवरही गट तट असून त्यांचेही आपापसात भांडण आहेच. अगदी उदाहरण द्यायचे तर अमळनेरमध्ये माजी नगराध्यक्ष अनिल भाईदास पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यातून विस्तव जात नाही. चाळीसगावमध्ये आमदार उन्मेष पाटील व माजी आमदार साहेबराव घोडे यांचे परस्परांशी जमत नाही. अशा वेळी तेथील पालिका निवडणुकीत या मंडळींना तंगडीत तंगडी घालण्याचा आग्रह जिल्हा नेत्यांनी कशासाठी करावा ?

जिल्हा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या जामनेर दौऱ्यावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत भाजप जिल्हाध्यक्षात नाही. जिल्हाध्यक्षांच्या सौभाग्यवतींना ज्या मुख्यमंत्र्यांमुळे आमदारकी मिळाली त्यांना जिल्हा नेत्याला आजीजीने विचारावे लागते, भाऊ जामनेरला जावू का ? हे सारे माध्यमांतून टीपले जाते. नंतर माना खाली घालून दबक्या पावलाने जामनेरच्या कार्यक्रमात हजेरी लावली जाते, हे सर्व प्रकार जळगाव जिल्ह्यातील जनता बघत आहे. हे सारे प्रकार पक्षांतर्गत घडवून आणणारी मंडळी कोणत्या नैतिकतेने आणि शहाजोगपणे साहेबराव घोडे व अनिल पाटील यांना पक्षनिष्ठा शिकवत आहेत ?

घोडे आणि पाटील यांना पक्षातून निलंबित करणाऱ्या जिल्हा नेत्यांनी इतर पालिकांच्या निवडणुकीत कोणती भुषणावह कामगिरी केली आहे ? पारोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उंबरठ्यावरील करण पवार यांना भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. हे पवार कोण ? तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. सावद्यातही काय घडले ? पक्षाशी निष्ठा ठेवून असलेल्या राजेंद्र चौधरींना डावलून काँग्रेसच्या उंबरठ्यावरील पंकज चौधरींच्या पारड्यात उमेदवारी टाकली गेली. ही दोन उदाहरणे पक्षातील निष्ठावंतांसाठी काय संदेश देतात ?

पक्षातील जिल्हा नेत्यांनी स्वबळाची सोय पाहताना पाचोरा येथे काँग्रेस उमेदवार अविनाश भालेराव यांना पाठींबा दिला आहे. तेथे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पंडीतराव शिंदे गटाशी जुळवून घेतले आहे. चोपड्यात भाजपने राष्ट्रवादी व मनसेशी जुळवून घेतले आहे. म्हणजेच पारोळा, सावदा, पाचोरा व चोपडा येथे भाजपच्या स्थानिक नेत्यांना कोणाशीही जुळवून घ्यायला जिल्हानेत्यांनी पाठींबा दिला आहे पण साहेबराव घोडे व अनिल पाटील यांना तसे करायला परवानगी नाही. त्यांनी सोयीचे राजकारण करायचे ठरविले तर त्यांना पक्षातून तडकाफडकी निलंबित केले गेले. जिल्हास्तरावरील राजकारणात जिल्हा नेते हे स्वतः, कुटूंब व गोतावळ्याचेच भले करीत असतील तर घोडे व पाटील यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला यात त्यांचे चुकले कुठे ?

जळगाव जिल्हा भाजपत सध्या साठमारी सुरु आहे. आता साठमारी म्हणजे काय ? हे खान्देशी भाजपला समजून सांगावे लागेल. साठमारी हा कोल्हापूर भागातला संस्थानिकाच्या समोर करमणुकीसाठी खेळला जाणारा देशी मर्दानी खेळाचा एक प्रकार होता. माजलेल्या हत्तीला मैदानात मोकळा सोडून त्याला डिवचण्याचा वा चिडविण्याचा हा एक खेळ असतो. मस्तवाल हत्तीशी झुंज देण्याचा हा साहसी खेळ मानला जातो. या खेळात हत्तीशी झुंजणारा जो मल्ल वा खेळाडू असतो, त्याला साठमार, साठमाऱ्या किंवा साठ्या असे म्हणतात. बऱ्याच वेळा साठमारी करणारे हत्तीला मारायचा प्रयत्न करतात पण हत्तीतर बाजूला जातो साठमारे एकमेकालाच बदडून घेतात. असाच खेळ जिल्हा भाजपत रंगला आहे.

3 comments:

  1. तिवारी सर,
    अगदी तंतोतंत वास्तव व भाजपाच्या जिल्हा ते राज्य पातळीच्या लोकांनी आत्मपरीक्षण करावे असेच आहे.

    ReplyDelete
  2. मानगये बॉस एक नंबर

    ReplyDelete
  3. True, Dilip ji.One day these persons will shatter all dreams of poor Modiji.

    ReplyDelete