Sunday 30 October 2016

युवर प्रॉब्लेम्स अर्जन्ट सोल्युशनची भोंदूगिरी !!

कोणत्याही अडचणी, प्रश्न, समस्यांमुळे माणसं परेशान असतात. घरगुती, कौटुंबिक, नातेसंबंधातील किंवा मित्र परिवारातील अथवा नोकरी, उद्योग, व्यवसाय यासह व्यापारातील काही विषय अडथळे घेवून उभे राहतात. अशा स्थितीत मानसिक, शारिरीक ताण तणाव निर्माण होतो. आर्थिक दबाव सुध्दा मानगुटावर बसतो. ही अवस्था अस्वस्थ तथा बैचेन करणारी असते. मनातले सांगायला कोणीही जवळचा नसेल तर अबोल, निश्चल न निःशब्द अवस्था अधिकच एकाकी करते. आणि मग प्रयत्न सुरु होतो समस्या, प्रश्न सोडविण्याचा नव्या तथा अघोरी मार्गांचा.

समुपदेशन, मानसोपचार या पध्दती आजही लोकांना वेडेपणावर उपचार करणाऱ्या पध्दती वाटतात. एखाद्या समुपदेशकाकडे जाणे म्हणजे वेडेपणा घालवण्यासाठी उपचार करुन घेणे असे अनेकांना वाटते. मग दोनच पर्याय उरतात. एकतर देवाविकांच्या दर्शनासाठी मंदिर दर मंदिर भटकणे किंवा बाबा, बुवा, पीर, हकीम यांच्या दरबारात हजेरी लावणे. आपल्या समस्या, प्रश्न दुसऱ्यासमोर मांडून स्वतः तणावमुक्त होण्याचाही मानसोपचार आहे. समुपदेशक तसेच करतात. फक्त ते भगव्या, काळ्या अथवा हिरव्या कफन्या घालत नाही आणि धूरही करीत नाहीत. वास्तवात भाकड, भोंदू, भुक्कड, भानगडखोर बाबांचे पेव अशाच लोकांच्या समस्या सोडविण्याच्या फसव्या प्रचार प्रसारामुळे वाढले आहे.

परवा जळगावहून सारंगखेडा येथे बसने गेलो. जवळपास चार पाच वर्षांनी बसमध्ये बसलो. माझ्या समोरच्या काचेवर एका बाबा कासमीचे स्टीकर लावलेले होते. "युवर प्रॉब्लेम अर्जंट सोल्युशन" असे शिर्षक होते. बाबाचे नाव व कंसात अजमेरवाले लिहीलेले होते. बाबाशी बोलायला दोन मोबाईलनंबार होते. तुमचे प्रश्न काय तर वशीकरण, जादूटोणा, करनी, मूठ मारणी, भूत पिच्छास, प्रॉपर्टी भानगड, कोर्ट केस, नोकरीत अडचण, व्यापार उद्योगात खोट, प्रेमात हार, नवरा किंवा बायकोचा प्रियकर, प्रेमी कडून फसवणूक, गुप्तधन अशा २०/२२ प्रश्न किंवा समस्या असलेल्यांनी बाबाला कॉल करा. बाबा तीन दिवसात तो प्रश्न सोडवेल असा दावा होता. याच बसमध्ये अशाच प्रकारे बाबा मौलवी, बाबा शास्त्री यांचेही जुने स्टीकर लावलेले दिसले. प्रश्न व समस्या जवळपास त्याच मात्र बाबांचे दावे वेगवेगळे होते. बाबा कासमी तीन दिवसात प्रश्न सोडवतात तर बाबा मौलवी केवळ ७ तासात प्रभाव दाखवतात. तुमच्या सवतीला किंवा बायकोच्या प्रियकराला अवघ्या ७ तासात तडपताना पाहा, असे मौलवी बाबा सांगतो. या पैकी एकाने  स्वतःला गोल्डमेडालीस्टही म्हणून घेतले आहे. ते कशासाठी याचा उल्लेख मात्र नाही.

हे सारे करमणूक करणारे असल्याने वाचत होतो. शेजारी एक प्रवासी होते. आनंदा गोसावी. ४५ शीतील वय असावे. पाळधीजवळ झुरखेडा येथे पानटपरी चालवतात. त्यांनीही ते वाचले आणि मला म्हणाले, पाहा हे मुस्लिम बाबा, फकीर असेच फसवतात. तीन दिवसात हा प्रश्न सोडवत असेल तर देशातील सारे प्रश्न हाच सोडवून टाकेल. मला त्यांची गंमत वाटली. मी हसून म्हटले असेल त्याच्याकडे दैवीशक्ती. त्यावर ते मला म्हणाले, अशी कुठे शक्ती असते का ? पण हे फसवायचेच काम करतात आणि आपले लोक फसतात. मी या मताशी १००% सहमत होतो. त्यानंतर गोसावी म्हणाले, हे भामटे बाबा लोकही आता इंग्रजीत प्रचार करतात. मी जुनी ७ वी शिकलो. तेव्हा आम्हाला इंग्रजी होते. म्हणून मी वाचू शकतो.  मला त्यांचे कौतुक वाटले. मी म्हटले तुमचे इंग्रजी चांगले आहे. तर ते म्हणाले, आमचे गुरुजी मारून मारून इंग्रजी तयार करायचे. आताचा १०वीचा मुलगा हे वाचू शकत नाही व वाचले तर त्याला समजणार नाही. मी खळखळून हसलो. तेवढ्यात पाळधी आले. गोसावी उतरायला उठले व मला म्हणाले, या झुरखेड्याला. आमच्याकडे जागृत मंदिर आहे. दर्शन करून काहीही मागा इच्छा पुरी होईल. १५ मिनिटापूर्वी बाबा कासमीच्या चमत्काराला भंपक म्हणणारे गोसावी जागृत मंदिरात मला बोलवत होते. कसनूस हसून मी हो म्हटले व निरोप घेतला.

बाबा कासमी काही डोक्यातून जाईना. मी पारोळास्थानकावर लघुशंकेला गेलो. तर तेथील स्वच्छतागृहात अनेक बाबांचे स्टीकर आधीच लागलेले होते. नंतर हाच अनुभव धुळे स्थानकातील स्वच्छतागृहातही आला. महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायदा संमत केला आहे. त्यात अंधश्रध्दांचा प्रचार प्रसारावरही बंदी आहे. असे असताना बसमध्ये किंवा सार्वजनिक  स्वच्छतागृहात बाबा, मौलवींचे स्टीकर लागतात कसे ? हा प्रश्न मला पडला. सर्वांत धक्कादायक म्हणजे एस. टी. महामंडळाच्या अनेक बसमध्ये असे स्टीकर दिसतात.

भोंदू बाबा, मौलवींनी यापूर्वी अनेकांच्या आर्थिक, मालमत्ताविषयक फसवणूक किंवा लैंगिक शोषण केल्याचे प्रकार उघड झाले आहे. कोणत्याही व्यक्तिच्या आयुष्यात असलेला व्यक्तिगत अथवा कौटुंबिक किंवा व्यवहार विषयक प्रश्न कोणताही चमत्कार सोडवू शकत नाही. जगातल्या कोणत्याही मनुष्य किंवा प्राण्यात कोणत्याही प्रकारची दैवी शक्ती नाही. पण, असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवणारा उच्चभ्रू, अती श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि सामान्य समाज घटक मोठ्या संख्येत आहे. म्हणूनच बाबा, बुवा व मौलवींचे फावते हा अनुभव आहे.

बाबा, बुवा, मौलवींकडे जाणारा समाज सर्व जाती धर्मातला व सर्व प्रकारच्या आर्थिक घटकातला असतो. जेवढी श्रीमंती किंवा जेवढे दारिद्रय तेवढ्या जास्त समस्या, प्रश्न समाजाचे असतात. भक्तांच्या दर्जावरुन बाबा, मौलवींचा दर्जाही ठरतो. भक्त उच्च शिक्षीत असतात तसे ठार निरक्षरही असतात. यात कोणाला जागेची, कोणाला पैशांची, काहींना मुलाबाळांची, बहुतेकांना  आजाराची चिंता असते. आपली काळजी, चिंता, समस्या मौलवी-बुवांना सांगायला ही माणसे तयार असतात. बाबा आपल्याला उत्तर देईल, मार्ग दाखवेल असे भक्तांना वाटते.  स्वतःच्या कर्तृत्वावरील आत्मविश्वास हरवलेले, कुटुंब किंवा मित्र-भागिदारापासून खंतावलेले, जगणे नको झालेले लोक बुवा-बाबांच्या नादी लागतात. बाबांद्वारे दिले जाणारे धागेदोरे, गंडे, उदी, अंगारे-धुपारे, अंगठ्या यात मानसिक आधार शोधला जातो. यात आर्थिक व वेळेची फसवणूक होत असल्याचे लक्षात येत नाही. बहुतेकवेळा गुन्हेगारी प्रकारही भक्तांच्या हातून घडविले जातात.

माणसांच्या समोर असलेले कोणतेही प्रश्न केवळ आणि केवळ दोनच प्रकारच्या कृतीतून सुटतात. पहिली कृती म्हणजे आपली अडचण व प्रश्न इतरांना सांगा. दुसरी कृती म्हणजे ती इतरांच्या सोबत, सहकार्याने सोडवायचा स्वतः प्रयत्न करा. अशा प्रकारच्या व्यवस्थेत समुपदेशकांचे मार्गदर्शन सहाय्यिभूत ठरते. एखाद्या विषयावर समुपदेशकांकडे जाण्यात कमीपणा असू नये.  कोणत्याही बाबा, बुवा, मौलवीकडे जावून फसवणूक करुन घेण्यापेक्षा समुपदेशकाकडील मार्गदर्शन उपयुक्त ठरते.

बाबा, बुवांच्या कर्मकांडावर कबीराने अनेक कवानातून प्रहार केले आहेत. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनीही कीर्तन प्रवचनातून ढोंगी बाबांना आणि त्यांच्या नादी लागलेल्या समाजाला शब्दांनी फटकारले आहे. कबीराच्या उपदेशाचा अर्थ कवी मंगेश पाडगावकर मराठीतून समजून सांगताना म्हणतात,
तुझ्या अंतरी आहे स्वामी, बाहेर कशा शोधावे?
डोळ्यांवरचा पडदा हटता, कबिर म्हणे दर्शन व्हावे
अंतरात गुरू असताना बाहेर कशाला त्याचा शोध घ्यायचा हा प्रश्न प्राचीन काळातील कबीराला पडला, पण आधुनिक काळात सुशिक्षित लोकांना पडत, हेच आपणा सर्वांचे दुर्दैव आहे.

2 comments: