![]() |
ब्लॅक आऊट वर्धापनदिनाचा केक कापताना मान्यवर |
बहुतांश कुटुंबाचे आजुबाजूच्या
दोन व समोरच्या एका अशा तीन शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद किंवा नाते असत नाही,
हा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र, जळगावच्या “महाराष्ट्र बँक कॉलनी”
परिसरातील रहिवाशांनी रोज अर्धा तास “ब्लॅक
आऊट”च्या काळात एकत्र येवून आपली कॉलनी
व लगतच्या रहिवाशांमध्ये जिव्हाळा व आनंद निर्माण करुन दाखवला आहे. म्हणूनच, “ब्लॅक आऊट अच्छा है,” असे म्हणावेसे वाटत आहे.
![]() |
कॉलनीतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग |
महाबळ परिसरात “महाराष्ट्र बँक कॉलनी” आहे. ती “एमबी
कॉलनी” म्हणून ओळखली जाते. तेथील आणि
इतर ठिकाणच्या काही अशा २१० कुटुंबांनी गेले वर्षभर “ब्लॅक आऊट” हा
अभिनव उपक्रम राबविला आहे. “ब्लॅक
आऊट” म्हणजे काय, तर कॉलनी परिसरातील सर्व
कुटुंब रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान आपल्या घरातील सर्व वीज पुरवठा बंद करतात.
केवळ फ्रिजचा वीज पुरवठा सुरू असतो. अशा प्रकारे “ब्लॅक आऊट” केल्यानंतर
ही मंडळी कॉलनी परिसरातील मंदिराच्या प्रांगणात गोळा होते.
मुले, महिला आणि पुरूष असे
सर्वजण मिळून एकमेकांशी गप्पा करतात. यातून ओळखी वाढतात. ओळख परिचयात रुपांतरीत
होते. परिचय नंतर मैत्रीत बदलते. त्यानंतर गप्पांमधून एकमेकांच्या आनंदाच्या,
अडचणीच्या गोष्टी शेअर होतात. हळूहळू सण-उत्सव एकत्र साजरे होतात. इतरांचे
सण-उत्सव कळतात, समजतात. मुलामुलींना इतरांशी मैत्री करण्याची सवय लागते. टाव्ही
आणि संगणकीय बैठ्या खेळांपासून मुले लांब जावून पारंपरिक खेळांकडे वळतात. टीव्ही
वरील सासू-सुनांच्या वाद विवादाच्या त्याच त्या मालिका न बघता महिला कॉलनीतील इतर महिलांशी
संवाद साधतात. एकमेकींच्या सासू-सुना मोकळेपणाने बोलतात. हळूहळू सर्वांचे वाढदिवस,
लग्नाचे वाढदिवस आणि आनंदाचे प्रसंग साजरे होवू लागतात. गप्पांचा ओघ नंतर सामाजिक
कार्य, सांस्कृतिक कार्य याकडे वळतो. गणेशोत्सव एकत्रित साजरा होतो. आरोग्यासाठी
योगा येतो. खाण्यापिण्यावर मार्गदर्शन करणारे येतात. हळूहळून कॉलनीतील भिंती मोडून
मनामनातील नाते जोडत कॉलनी एक परिवार होवून जाते. असा हा अवघ्या एक वर्षाचा प्रवास
थक्क करणारा आहे.
![]() |
कॉलनीतील सर्व रहिवासी |
“एमबी कॉलनी”त हे सारे गेल्या वर्षभरात घडून आले आहे. असे घडत
असल्याचे कोणालाही सांगितले तर ऐकणारा म्हणेल, नको थापा मारू. पण “एमबी कॉलनी”त
सामाजिक व समुह जीवनाचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. मी स्वतः हे सारे पाहून व
रहिवाशांच्या तोंडून त्यांचे अनुभव ऐकून आलो आहे. तेथील कुटुंबे आपले अनुभव मांडत
असताना मी स्वतः आमचे कुटूंब व आमचे शेजारी या विषयावर मनातल्या मनात मैत्री
संबंधांची पडताळणी केली. तेव्हा लक्षात आले की, आपण शेजाऱ्यांना समजून न घेता
त्यांच्या विषयी गैरसमज बाळगूनच जगत असतो.
“एमबी कॉलनी”तील रहिवाशांनी “ब्लॅक आऊट”चा
पहिला वर्धापनदिन दि. २ ऑक्टोबरला साजरा केला. महावितरणचे मुख्य अभियंता जे. एम.
पारधी प्रमुख पाहुणे होते. पारधी यांच्याच मार्गदर्शनाखाली वर्षभरापूर्वी वीज बचत
करण्याची शपथ कॉलनीतील रहिवाशांनी घेतली होती. ती शपथ रहिवाशांनी कृतीत आणून
दाखविली. कार्यक्रमास मी सुद्धा उपस्थित होतो. वर्धापनदिन आहे म्हटल्यावर केकही
कापण्यात आला. परिसरातील नगरसेविका सौ. अश्विनी देशमुख, त्यांचे पती विनोद देशमुख
आणि इतरांच्या पुढाकाराने गेले वर्षभर राबविलेल्या “ब्लॅक आऊट”च्या
उपक्रमाचा वर्धापनदिन आणि अनुभव कथन असा छोटेखानी कार्यक्रम होता.
“ब्लॅक आऊट”चा निष्कर्ष काढताना सांगण्यात आले की, ऊर्जा बचत
हे राष्ट्रीय कार्य आहे हे लक्षात घेवून “एमबी
कॉलनी”तील रहिवाशांनी दि. २ ऑक्टोबर २०१५
पासून ब्लॅक आऊट सुरू केले. रोज केवळ अर्धातास वीज वापर बंद अशी साधी सोपी कल्पना आहे.
याला विरोध झाला नाही. ज्यांना सहभागी व्हायचे ते झाले. वर्षभरात किमान ७५ हजारावर
युनीट वीज वाचली. म्हणजे जवळपास साडे चार लाख रुपयांची वीज इतरांसाठी वापरली गेली.
दुसऱ्या अर्थाने, कॉलनीतील रहिवांशांचे वीज बिल एवढ्या रकमेने कमी झाले. राष्ट्रीय
कार्यातून व्यक्तिगत बचतही साध्य झाली. “ब्लॅक
आऊट” काळात एकत्र आलेल्या रहिवाशांनी
काय केले, तर त्याचा तपशील वर सविस्तर लिहीलेला आहे.
![]() |
परसबाग प्रकल्पाची पाहणी |
“एमबी कॉलनी”तील पुरूष, महिला आणि मुलांनी आपापले अनुभव
सांगितले. रहिवाशांच्या एकत्र येण्यामुळे सामुहिकरित्या कॉलनीचे काही प्रश्न कसे
सुटले आणि नवे उपक्रम कसे सुरू झाले याचाही उहापोह झाला. रहिवासी आरोग्यावर विचार
करायला लागले. त्यातून योगा वर्ग सुरू झाले. परसबाग किंवा टेरेस भाजीपाला
निर्मितीवर चर्चा होवू लागली. गणेशोत्सवाच्या काळातील निर्माल्य गोळा करुन मंदिराच्या
परिसरात कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रयोग झाला. हे सारे ऐकताना गंमत वाटत होती.
एखाद्या कॉलनीचे प्रश्न तेथील रहिवासी एकत्र आल्यानंतर कसे सुटू शकतात याचे हे
चालते बोलते उदाहरण होते. अखेर मला राहवले नाही. मी विनोद देशमुख यांना म्हटले, या
कॉलनीत एखादे घर भाडोत्री मिळत असेल तर मी कुटुंबासह येथे राहायला येतो. कारण, या
शिवाय दुसऱ्या शब्दांत मी प्रतिक्रिया देवूच शकत नव्हतो.
“एमबी कॉलनी”तील “ब्लॅक
आऊट” या सामाजिक प्रयोगाविषयी खुप
काही लिहिण्यासारखे आहे. ते एकाच वेळी लिहीले तर इतरांना वाचण्यासाठी “अजिर्ण”
होवू शकते. त्यामुळे तेथील रहिवाशांना विनंती केली की, तुमच्या या “ब्लॅक आऊट”
प्रयोगाने कोणाला काय दिले याचे एकदा आपापसात लेखी सर्वेक्षण करा. लेखी उत्तरातून
वेगवेगळे निष्कर्ष काढता येतात. तसा प्रयत्न करा. म्हणजे, हा प्रयोग केवळ भावनिक न
राहता सैद्धांतिक व संशोधनात्मक पातळीवर इतरांसाठी मार्गदर्शन ठरु शकेल. तशी
जबाबदारी विनोद देशमुख यांनी स्वीकारली आहे.
(विनोद देशमुख यांच्याशी
संपर्कसाठी मोबाईल क्रमांक 9422774041)
No comments:
Post a Comment