Friday 28 October 2016

मुखवटा आणि चेहऱ्यातला संघर्ष ...

टाटा उद्योग समुहाचा चेहरा आजही टाटा परिवारातील अर्ध्वयू रतन टाटा हेच आहेत. परंपरा, विश्वास, प्रगती आणि राष्ट्रहित या मुल्यांची जोपासना करीत टाटा समुह गेल्या १४८ वर्षांत जगभरात विस्तारला. रतन टाटांच्या नंतर कोण ? हा प्रश्न निकाली काढताना सायरस मिस्री यांना टाटांचे वारस नेमले गेले. मात्र, अवघ्या ४ वर्षानंतर सायरस यांना वारसा पदावरुन पायउतार करण्यात आले. या मागील अनेक कारणे हळूहळू समोर येत आहेत. मुख्य कारण मुखवटा आणि चेहरा यांच्यातील संघर्ष हेच आहे, हेही स्पष्ट होत आहे. कार्पोरेट क्षेत्राचा खरा चेहरा हा संचालकांचे आपापसातील वर्तन, त्यांची कर्मचाऱ्यांशी वागणूक आणि लाभार्थी, ग्राहक तथा हिचिंतकांशी व्यवहार यावर ओळखला जातो. मात्र, बड्या उद्योग समुहात दिसणारे चेहरे आणि दाखवायचे मुखवटेही अनेक असतात. अशावेळी टाटांचा मूळ चेहरा आणि सायरस यांचा मुखवटा यांच्यात संघर्ष होतो. त्याचीच ही कारणमिमांसा ...  

टाटा उद्योग समुहातील घडोमोडी समजून घेण्यापूर्वी टाटा गृप किंवा टाटा सन्स याविषयी ढोबळ रचना समजून घ्यायला हवी. टाटा गृपमध्ये किमान १०० वर विविध कंपन्या आहेत. त्यातील २९ कंपन्या या आंतराष्ट्रीय शेअर बाजाराच्या यादीवर आहेत. या सर्व गृपचा एकूण महसूल सरासरी १०० बिलीयन डॉलरच्यावर आहे. टाटा गृपमध्ये सर्वाधिक नफा मिळविणाऱ्या कंपन्या टाटा कन्सल्टटन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील या आहेत. जवळपास ७५ टक्के महसूल व नफा याच कंपन्यांच्या माध्यमातून येतो. याशिवाय, टाटा इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टटन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा टेले सर्व्हिसेसे, इंडियन होटेल्स, टाटा ग्लोबल बेव्हरेज आणि टाटा केमिकल्स आदी मीठापासून तर मोटार निर्मिती करणाऱ्या कंपन्याही आहेत.

टाटा गृप किंवा टाटा उद्योग समुह म्हणजे कंपनी कायद्याच्या भाषेत टाटा सन्स ही मुख्य कंपनी आहे. मात्र, या टाटा सन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी टाटा विश्वस्त मंडळ आहे. या विश्वस्त मंडळात सर दोराबजी टाटा विश्वस्त मंडळ आणि सर रतन टाटा विश्वस्त मंडळ यांचे संयुक्त संचालक मंडळ आहे. त्यालाच टाटा विश्वस्त मंडळ म्हटले जाते. या दोन्ही विश्वस्त मंडळात सर जमशेदजी टाटा यांच्या लांबच्या व जवळच्या नात्यातील मंडळी संचालक आहेत. विश्वस्त मंडळाकडे टाटा गृपचे ६६ टक्के भाग भांडवल आहे. त्यामुळे टाटा सन्स किंवा गृपमध्ये कोणाला अध्यक्ष करायचे याच्या पासून तेथे संचालक कोण असतील, गृपच्या मालकी, मालमत्ता, संपादन, विक्री वगैरे विषयक अधिकार टाटा विश्वस्त मंडळाकडेच आहेत. याचा अर्थ टाटा विश्वस्त मंडळाच्या रुपाने टाटा कुटुंबियांची टाटा गृपवर मालकी म्हणून मजबूत पकड आहे.

याच विश्वस्त मंडळाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी गृपचे तेव्हाचे वयोवृद्ध अध्यक्ष रतन टाटा यांचा वारस शोधण्यासाठी मोहिम राबवून टाटा गृपमधील संचालक सायरस मिस्री यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती. सायरस यांच्या माहितीनुसार, ते अध्यक्ष व्हायला तयार नव्हते. पण स्वतः रतन टाटा यांनी विनंती केली आणि त्यांनी ते पद स्वीकारले. चार वर्षांपूर्वी विश्वस्त मंडळाच्या या निर्णयाचे जगभरातील उद्योग क्षेत्रातून स्वागत झाले होते. आता त्याच विश्वस्त मंडळाने अध्यक्ष पदावरून सायरस मिस्री यांना पायउतार करुन उद्योग जगतात खळबळ उडवून दिली आहे. सायरस यांच्या चार वर्षांच्या काळात टाटा गृपची उलाढाल १०७ बिलीयन डॉलर्स वरुन १०३ बिलीयन डॉलवर घसरली असा मुख्य आक्षेप आहे. सायरस यांना टाटा गृपच्या अध्यक्षपदावरुन का पायउतार व्हावे लागले हे समजून घेताना त्यांचा उद्योग जगतातील वारसा, प्रवास व टाटा उद्योग समुहातील प्रवेश व नंतरची कार्यपद्धती याची माहिती घ्यावी लागेल.

कोण आहेत सायरस मिस्री ?

सायरस मिस्त्री हे डिसेंबर २०१२ ते ऑक्टोबर २०१६ अशी ४ वर्षे टाटा गृपचे अध्यक्ष होते. या गृपचे ते सहावे मात्र टाटा परिवाराच्या बाहेरील व गेल्या ८० वर्षांतील दुसरे अध्यक्ष होते. टाटा परिवाराबाहेरील पहिले अध्यक्ष नौरोजी सकलतवाला होते. टाटा विश्वस्त मंडळाने एकमताने सायरस यांची टाटा गृपचे भावी अध्यक्ष म्हणून सन २०१२ च्या मध्यावधीत निवड केली होती. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये सायरस यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. सायरस यांची टाटा गृपच्या अध्यक्षपदी निवड होण्यामागे तीन महत्वाची कारणे होती. त्यात पहिले म्हणजे, सायरस यांचे आडनाव मिस्री असले तरी ते टाटा परिवारीतील दूरचे नातेवाईक आहेत. दुसरे कारण म्हणजे त्यांचे वडील पल्लोनजी मिस्री यांच्या उद्योग समुहाकडे टाटा गृपचे १८.५ टक्के भागभांडवल आहे. तिसरे कारण म्हणजे, सायरस हे टाटा गृपमध्ये संचालक म्हणून आधीपासून कार्यरत होते.

सायरस मिस्री यांचा जन्म दि. २ जुलै १९६८ ला मुंबईतील पारशी परिवारात झाला. त्यांचे वडील पल्लोनजी हे भारतातील गर्भ श्रीमंत समजले जातात. त्याचा जगभरात बांधकाम विकसक म्हणून मोठा व्याप आहे. सायरस यांची आई पास्ती पेरिन दुबाश या आयर्लण्डच्या आहेत. त्यामुळे पल्लोनजी यांनीही आयरिश नागरिकत्व स्वीकारले. मात्र, विवाहानंतरही पल्लोनजी व पास्ती यांनी भारतातच स्थायिक व्हायचे ठरविले. पल्लोनजी यांचे लहान बंधू शपूर हेही आयरिश नागरिक असून त्यांची पत्नी बेहरोजे याही आयरिश आहेत. पल्लोनजी यांना दोन बहिणी आहेत. त्यापैकी लैला यांचा विवाह लंडनमधील आर्थिक पुरवठा सल्लागार रुस्तम जहांगिर यांच्याशी झाला आहे. दुसरी बहिण अलू यांचा विवाह टाटा परिवारातील नोएल टाटा यांच्याशी झाला. नोएल टाटा हे टाटा गृपचे आताचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत.

सायरस यांचा विवाह रोहिका छगला यांच्याशी झालेला आहे. प्रसिद्ध विधिज्ञ इकबाल छगला यांच्या त्या कन्या असून. सर्वोच्च न्यायालयाचे माजी ज्युरी एम. सी. छगला हे त्यांचे आजोबा होत. सायरस व रोहिका यांना दोन मुले फिरोज आणि जहान आहेत. सायरस मिस्री हे भारतीय नागरिक असले तरी स्वतःला जागतिक नागरिक म्हणून घेतात. सायरस यांचे शिक्षण मुंबईत ख्रिस्ती शाळेत झाले. नंतर त्यांनी लंडन येथे अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी व व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर ते शपूरजी पल्लोनजी गृपचे व्यवस्थापकिय संचालक झाले. टाटा गृपमध्ये पल्लोनजी गृपचे भागभांडवल असल्यामुळे पल्लोनजी हे टाटा गृपमध्ये संचालक होते. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सायरस हे दि. १ सप्टेंबर २००६ पासून टाटा गृपचे संचालक झाले. मात्र, त्यापूर्वी टाटा गृपमधील टाटा एलक्सी लिमीटेडट मध्ये ते १९९० ते २००९ दरम्यान संचालक होते. सन २०१२ मध्ये त्यांची टाटा गृपचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे टाटा इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टटन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा टेले सर्व्हिसेसे, इंडियन होटेल्स, टाटा ग्लोबल बेव्हरेज आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांचेही अध्यक्षपद चालून आले. टाटा गृपचे अध्यक्ष झाल्यानंतर सायरस यांचा उल्लेख जगभरातील उद्योग व्यापार क्षेत्रात, अत्यंत महत्त्वपूर्ण उद्योगपती म्हणून झाला. भारत, ब्रिटन व आयर्लण्डमध्ये त्यांचे वजन वाढले.

सायरस यांचे आजोबा शपूरजी यांनी १९३० मध्ये टाटा गृपच्या मूळ कंपनी टाटा सन्समध्ये भागभांडवल गुंतवले. टाटा गृपचे १८.५ टक्के भागभांडवल दुसऱ्या परिवाराकडे असलेले शपूरजी हे एकमेव भागभांडवलधारक आहेत.

सायरस मिस्री यांना पायउतार का केले गेले ?

टाटा गृपच्या अध्यक्षपदाची सूत्रे रतन टाटा यांनी आपले वारस म्हणून जेव्हा सायरस यांच्याकडे सोपविली तेव्हा टाटा उद्योग समुहाचा उद्याचा युवा चेहरा असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. मात्र, अवघ्या चार वर्षांत सायरस यांना अध्यक्षपदावरून पाय उतार करण्यासारखे काय घडले ? याची संपूर्ण उद्योग जगताला आणि टाटा गृपमध्ये गुंतवणूक असलेल्या भागभांडवलदारांना उत्सुकता आहे. त्याची वेगवेगळी कारण मिमांसा माध्यमांमधून सुरू आहे. मात्र, व्यापार-उद्योग क्षेत्रातील अनेक माध्यमातून सायरस यांचे रतन टाटांशी झालेले मतभेद, टाटा गृपमधील काही कंपन्यांची घसरलेली आर्थिक पत, सायरस यांनी व्यवस्थापनात सुरू केलेले अनपेक्षीत बदल आणि टाटा गृपमधील तोट्यातील कंपन्या विक्रीसाठी उचललेले पाऊल ही चार कारणे प्रामुख्याने सांगितली जातात.

सायरस यांना अध्यक्षपदावरुन पायउतार करण्याचा निर्णय टाटा विश्वस्त मंडळाने घेतल्यानंतर तो निर्णय सायरस यांना पोहचविण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळाचे संचालक व हार्वर्ड बिझीनेस स्कूलचे डीन नितीन नेहरिया यांना सोपविण्यात आली. नेहरिया यांनी तब्बल दोन तास सायरस यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या विरोधात निर्णय का घेतला याची कारणमिमांसा त्यांना सांगितली. 


सायरस यांना पायउतार करण्यामागे असलेल्या कारणांचा धांडोळा घेतला तर इतरही काही बाबी समोर येतात. कार्पोरेट क्षेत्रातील मूलभूत तत्व आणि नियमांना मुरड घालण्याचा प्रयत्न सायरस यांच्याकडून जसा झालेला दिसतो तसा तो टाटा विश्वस्त मंडळाच्या आडून रतन टाटींनीही केलेला दिसतो. ज्या तत्त्व व नियमांचे पालन करण्याच्या अपेक्षेने टाटा विश्वस्त मंडळाने सायरस यांना अध्यक्षपद दिले त्याच टाटा विश्वस्त मंडळाने काही तत्त्वे गुंडाळून कठोर, कटू निर्णय घेत सायरस यांना पायउतार केले. अर्थात, आधुनिकीकरण किंवा काळानुरूप बदल करण्याची गरज पाहून जेव्हा कामकाज केले जाते तेव्हा त्या निर्णय प्रक्रियेला पारंपरिक विरोध होतो किंवा इतरांना ते आवडत नाही. अखेर ज्याच्या हाती सत्ता असते ते आपला निर्णायक हक्क वापरून सर्वाधिकार असलेल्या व बलशाली वाटणाऱ्या व्यक्तिसही दूर हटवतात. हा कारर्पोरेट क्षेत्रातला संभाव्य धोका सर्वच क्षेत्रात कायम असतो. तसा तो, टाटा विश्वस्त मंडळाने सायरस यांच्या बाबात वापरला. मात्र, सायरस यांनी या निर्णयाच्या विरोधात आपलीही बाजू मांडणे सुरू केले आहे. त्यामुळेच टाटा गृपच्या अनेक व्यवस्था व प्रतिष्ठांना धक्का पोहचणे शक्य आहे.

रतन टाटा यांनी सायरस यांच्या हातात टाटा गृपची सूत्रे देताना त्यांना उद्याचे भविष्य म्हटले होते. पण, सायरस यांना पायउतार करताना टाटा विश्वस्त मंळाने  प्रतिक्रिया दिली आहे की, सायरस यांना दूर हटविण्याचा निर्णय हा योग्य वेळी केलेली योग्य कृती असून टाटा गृपच्या दीर्घ कालीन भवितव्यासाठी ती करणे भाग होते.

टाटा पॉवरच्या सौरउर्जा व उर्जा प्रकल्पांच्या १.४ बिलीयन डॉलरच्या मालमत्ता संपादनाविषयी सायरस यांनी परस्पर व्यवहार केल्याचा प्रकार घडला आहे. हा व्यवहार करताना टाटा गृपवर नियंत्रण असलेल्या टाटा विश्वस्त मंडळाला विश्वासात घेतले नाही, असा सायरस यांच्यावर आक्षेप आहे. टाटा गृपच्या कोणत्याही कंपनीच्या मालमत्ता व इतर हक्क संदर्भात व्यवहार करताना टाटा विश्वस्त मंडळाची ना हरकत  घेणे आवश्यक असते. अशा व्यवहारांसाठी टाटा ट्रस्टची एक सर्वोच्च समिती आहे. त्यात टाटा गृपचे संचालक अमित चंद्रा, आर. व्यंकटरमण, नोशीर सूनावाला यांचा समावेश आहे.

सायरस यांनी टाटा गृपचे अध्यक्ष म्हणून सर्वोच्च व्यवस्थापनात परस्पर बदल करण्याचीही प्रयत्न केला. हे करताना त्यांचा हेतू व्यवस्थापनात युवा व नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा होता. सायरस यांनी जीसीई (द क्रिएशन ऑफ द गृप एक्झीकेटीव्ह कौन्सिल) ची स्थापना केली होती. यात डॉ. मुकुंद राजन व हरिश भट यांचा समावेश होता. त्यांना जादा अधिकार दिलेले होते. त्यामुळे टाटा गृपमधीस ज्येष्ठ व अनुभवी मंडळी नाराज होती. स्वतः रतन टाटा यांना ही नवी व्यवस्था आवडली नव्हती. ही कौन्सिल म्हणजे टाटा सन्समधील जुन्या कार्यकारी अधिकाऱ्यांना बाजुला सारण्यासाठी समांतर शक्ती यंत्रणा होती असे मानले गेले. सायरस यांन पायउतार करताना जीसीईमधील मधू कन्नान, एनएस राजन, निर्माल्य कुमार यांनाही टाटा गृपच्या बाहेरील रस्ता दाखविण्यात आला.

जापनिय टेलेकॉम ऑपरेटर कंपनी एनटीटी डोकोमोशी केलेला सुरक्षित गुंतवणूक व ग्राहक मिळवून देण्याचा करार पाळण्यात टाटा टेलेकॉमला अपयश आले. टाटा स्टीलचा परदेशातील व्यवसाय घसरला व ती कंपनी तोट्यात गेली. ब्रिटन आणि युकेतील स्टील व्यवसाय कंपनी सांभाळू शकली नाही. तेथील उद्योग गुंडळण्याची तयारी सायरस मिस्री यांनी केली. टाटा मोटर्सचा भाग असलेल्या जगॉवर लॅण्ड रोव्हर प्रकल्पातही व्यावसायिक प्रश्न निर्माण झाले. लॅण्ड रोव्हरला व्यवसाय गमावण्याची वेळ आली. असेही इतर आक्षेप सायरस यांच्या विषयी चर्चेत आहेत. टाटा गृपच्या अध्यक्षपदी सायरस यांची निवड करताना टाटा विश्वस्त मंडळाने त्यांच्याकडून भविष्यातील विस्ताराविषयी दूरदृष्टीची अपेक्षा ठेवली होती. परंतु गेल्या चारवर्षांत याच मूळ हेतूपासून सायरस भरकटले असाही निष्कर्ष टाटा विश्वस्त मंडळाने काढला आहे.


सायरस यांच्या विषयी नाराज झालेल्या टाटा विश्वस्त मंडळाचा विस्तारही मध्यंतरी करण्यात आला. सायरस यांना कोणतीही कल्पना न देता टाटा विश्वस्त मंडळात संचालक म्हणून पिरामल एन्टर प्राईजेसचे अध्यक्ष अजय पिरामल, टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन व अमित चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली. भविष्यात विश्वस्त मंडळाला कठोर, कटू व कडक निर्णय घेणे साध्य व्हावे म्हणूनच या मान्यवरांना टाटा विश्वस्त मंडळात घेतले गेले असे आता लक्षात येत आहे. सायरस यांनी टाटा गृपच्या इंडीयन हॉटेल्स या कंपनीच्या काही मालमत्तांचीही विक्री करण्याची निर्णय घेतला होता.

अशा अनेक कारणांमुळे सायरस यांच्या विषयी टाटा विश्वस्त मंडळात नाराजी वाढत गेली. काही महिन्यांपूर्वीच सायरस यांना पायउतार करण्याचा निर्णय झालेला होता. मात्र, तसे केल्यानंतर निर्माण होणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन अखेरीस विश्वस्त मंडळाने सायरस यांना पदावरुन दूर केले. या निर्णयासाठी टाटा गृपची खास बैठक झाली. तीला इशात हुसेन आणि फरीदा खंबाटा हे संचालक अनुपस्थित होते. सायरस उपस्थित होते. त्यांनीच स्वतःच्या बाजूने एकमेव मतदान केले. उर्वरित संचालकांनी पायउतारच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर जगभरातील उद्योग जगताला महत्त्वपूर्ण व धक्कादायक बातमी समजली.

सायरस यांनी टाटा गृपचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेताना टाटा विश्वस्त मंडळाला विश्वासात घेतले नाही हा जसा आरोप आहे तसेच त्यांच्या अनेक निर्णयांविषयी टाटा विश्वस्त मंडळात मतभेद होते. ते दूर करण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्नही सायरस यांनी केला नाही. आता सायरस म्हणत आहेत की, अध्यक्ष पदावरुन पायउतार करताना मलाही बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही. या निर्णयामुळे माझी अप्रतिष्ठा तर झालीच मात्र टाटा गृपसह रतन टाटा यांचीही अप्रतिष्ठा झाली.

सायरस मिस्री यांना टाटा गृपच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याच्या निर्णयाच्या विरोधात शपूर पल्लोनजी गृप विरोध करेल का, कोर्ट कचेऱ्या होतील का ? अशी एक शंका उद्योग व व्यापार जगात आहे. या मागील कारण असे की, शपूर पल्लोनजी गृपचे १८.५ टक्के भाग भांडवल टाटा गृपमध्ये आहे. मात्र, सायरस यांना पायउतार करताना सर्व कायदेशीर बाबींचा विचार टाटा विश्वस्त मंडळाने केला आहे. त्यामुळे शपूर पल्लोनजी गृप तसे काही करणार नाही असेही सांगण्यात येत होते. दुसरीकडे, आम्ही तूर्त काहीही करीत नसून परिस्थितीचे निरिक्षण करीत असल्याचा खुलासा शपूर पल्लोनजी गृपने केला आहे.

अशा घडामोडीत सायरस यांनी उद्योगांच्या भागभांडवलावर नियंत्रण असलेल्या मुंबई स्टॉक एक्सचेंजला लिहीलेले ५ पानी पत्र माध्यमांच्या हाती आले आहे. त्यात त्यांनी सुस्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, टाटा गृप हा काही पारंपरिक बाबींमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत येवू शकतो. टाटा गृपमध्ये सायरस यांनी काही निर्णय एकाकी घेतले या टाटा विश्वस्त मंडळाच्या आक्षेपावर भाष्य करताना सायरस यांनी म्हटले आहे की, टाटा गृपचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अनेक निर्णय हे मला न सांगता किंवा विश्वासात न घेता घेतले जात असल्याचे माझ्या लक्षात आले होते. त्यातील काही निर्णय हे टाटा गृपला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

सायरस यांना पायउतार करुन टाटा गृपची सूत्रे स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ९ पानी पत्र लिहीले आहे. त्यातही टाटा गृपने सायरस यांच्या पायउतारचा निर्णय का घेतला याची कारणे कळविली आहेत. त्यातील अधिकृत तपशील समोर आलेला नाही. मात्र, वरील प्रमाणे असलेल्या चर्चेतील काही आक्षेप त्यात समाविष्ट असू शकतात. हाच  मुद्दा लक्षात घेवून सायरस यांनीही संबंधित यंत्रणेला पत्र लिहून टाटा गृपमधील काही अंतर्गत घडामोडींची आणि आर्थिक व्यवस्थेची माहिती दिली आहे. त्यातील मुद्देही दुर्लक्षून चालणार नाही. सायरस हे पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची शक्यता आहेच.

कसे कसे घडत गेले अविश्वास व संघर्षाचे नाट्य ?

रतन टाटांनी आपला अध्यक्षपदाचा वारसा सायरस यांच्याकडे सोपविताना म्हटले होते की, तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करा. स्वतंत्रपणे काम करा. याचा जाहिरपणे अर्थ असा होता की, टाटांचा चेहरा सोडून तुम्ही तुमचा चेहरा निर्माण करा. पण, हा सारा भाग त्यावेळी बाह्य प्रचार व दिखाव्याचा होता असे आता सायसर यांचे म्हणणे आहे. कारण त्यांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, मी केवळ नामधारी अध्यक्ष असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणजेच सायरस हे स्वतः मुखवटा ठरल्याचे सांगत आहेत.

सायरस यांना पदावरून पायउतार करताना टाटा विश्वस्त मंडळाचा आक्षेप आहे की, सायरस यांनी काही व्यवहार परस्पर केले. त्यासाठी विश्वस्त मंडळाची परवानगी घेतली नाही. यावर सायरस यांचे म्हणणे असे आहे की, विश्वस्त मंडळही काही निर्णय परस्पर घेत होते. टाटा गृपचे अध्यक्ष म्हणून त्यांनाही विश्वासात घेतले गेले जात नव्हते. सायरस असे थेट म्हणतात की, रतन टाटा हेच गृपच्या कारभारात हस्तक्षेप करीत होते. टाटा गृपचे काही आर्थिक व्यवहार हे परस्पर केले जात. अध्यक्ष म्हणून केवळ माझ्या सह्या घेतल्या जात, असेही ते सांगत आहेत. म्हणजे, टाटांनी सायरस यांना दिलेला स्वतःची ओळख तयार करा हा सल्ला तसा दिखावूच होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर निवृत्तीच्या मार्गावर निघालेल्या रतन टाटांना उद्योगातील साम्राज्य व अधिकारांचा मोह काही सुटला नाही.

सायरस यांच्या कार्यकाळात टाटा गृपटी उलाढाल १०७ बिलीयन वरुन १०३ बिलीयन झाली असे सांगण्यात येत असेल तरी सायरस यांनी दावा केला आहे की, टाटा गृपच्या काही कंपन्यांच्या आताच्या व्यवहारामुळे हा गृप आर्थिक अडचणीत येवू शकतो. त्यातून भविष्यात गुंतवणुकदारांचे नुकसान होवू शकते.

टाटा गृपचा नुकसानीत असलेला युरोपमधील टाटा स्टील प्रकल्प विक्रीवरून रतन टाटा व सायरस यांच्यात थेट मतभेद झाले होते. येथेच मुखवटा व चेहरा यांच्यात संघर्ष उभा राहिला. रतन टाटांचे म्हणणे असे  होते की, सायरस यांनी टाटा गृपचा जागतिक विस्तार करणे अपेक्षित होते. उलटपक्षी सायरस हे नुकसानीचे कारण दाखवून टाटा गृपच्या कंपन्या विक्री करीत होते. मात्र, याचे खंडन करताना सायरस म्हणतात, टाटांचा वारसा घेताना मला कल्पना नव्हती की मी किती समस्या शिरावर घेत आहे. कारण, मी केवळ नामधारी ठरलो आहे, हे नंतर मला लक्षात आले. हा मुद्दा स्पष्ट करताना सायरस यांनी इशारा दिला आहे की, टाटा गृपमधील पाच कंपन्या लाभहीन व नुकसान करणाऱ्या आहेत. त्यातून टाटा गृपचे किमान १.१८ ट्रिलियन रुपयांचे  म्हणजे १८ अरब डॉलरचे नुकसान होवू शकते. युरोपमधील टाटा स्टीलचे प्रकल्प व त्यातील विदेशी गुंतवणुकीचे कर्ज, न चालणारे हॉटेल्स प्रकल्प, केनियातील रसायन प्रकल्प व व्यापार आणि टेलिकॉम व्यापारीतील नुकसान या गोष्टी धोकादायक असल्याचे सायरस यांचे म्हणणे आहे.

टाटा डोकोमो व्यवहारात टाटा गृप भारतात विदेशी गुंतवणूक सुरक्षीत ठेवू शकला नाही. डोकोमोसाठी अपेक्षित ग्राहक मिळवू शकला नाही. त्यामुळे टाटा गृपला १.२ मिलीयन डॉलरची भरपाई द्यावी लागत आहे. या प्रकरणात शिष्टाई करण्यासाठी रतन टाटा भारतातील जपानच्या राजदुताला भेटले होते. मात्र, सायरस यांच्या भूमिकेमुळे तेथे तडजोड होवू शकली नाही. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. याशिवाय टाटा पॉवरने खनिज कोळसा उत्पादनाच्या तुलनेत कमी किंमतीत त्याची विक्री केली आहे. याच विषयावरुन टाटा पॉवर आणि संबंधित खाण मालकांमध्ये वादविवाद निर्माण झाले आहेत. जगातील सर्वांत स्वस्त कार असलेला टाटा नॅनो प्रकल्पही तोट्याचाच असल्याचे सायरस म्हणतात. फक्त रतन टाटांचा ड्रिम प्रोजक्ट म्हणून किती दिवस कंपनी यात नुकसान सहन करेल असा सायरस यांचा प्रश्न आहे. नागरी विमान वाहतूक प्रकल्पातही टाटा गृप नुकसानीत आहे. रतन टाटा यांनी एअर एशिया इंडियाची स्थापना करताना मलेशिया एअर एशिया सोबत टाय-अप करायला सांगितले होते. मात्र, तो सौदाही घाट्याचाच आहे. सायरस यांनी यापुढे जावून असेही म्हटले आहे की, एअर एशिया इंडियाच्या सौद्यात लेन-देनचा म्हणजे भ्रष्ट व्यवहारही झालेला आहे. सायरस हा दावा करीत असताना डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी बाहेरील बाजुने आरोप केला आहे की, एअर एशिया इंडियाच्या व्यवहारात टाटा गृपने २२ कोटी रुपयांची लाच मागील काँग्रेस आघाडी सरकारला दिली आहे.

सायरस मिस्री यांना पायउतार करताना टाटा गृप कडून होणारी चर्चा आणि आता सायरस मिस्री यांनी केलेला पलटवार पाहता एक गोष्ट लक्षात येते की, सायरस यांचा मुखवटा उद्धट, मनमानी करणारा, परस्पर निर्णय घेणारा, हवी तेथे सही न करणारा, उलट प्रश्न विचारणारा असल्याची प्रतिमा टाटा विश्वस्त मंडळाने माध्यमांमध्ये उभी केली आहे. दुसरीकडे सायरस यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडताना, मी कसा मुखवटा होतो आणि मला कामाचे स्वातंत्र्य नव्हते ही बाबही मांडली आहे.

रतन टाटा हे आजही टाटा गृपचा चेहरा आहेत. सायरस हे मुखवटा होते. चेहरा आणि मुखवट्यात नंतर संघर्ष होत गेला. तो एवढा वाढला की व्यक्तीगत व कौटुंबिक पातळीवरही टाटा व मिस्री गृप दुरावले आहेत. एकदा रतन टाटा व सायरस हे लंडनहून मुंबईला विमानातून सोबत आले मात्र, दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले. एवढेच नाही तर परस्परांकडे कटाक्ष टाकणे सुद्धा टाळले. दुसरे उदाहरण असे की, शपूरजी पल्लोनजी यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमातही रतन टाटांची अनुपस्थिती होती.

सायरस यांच्याविषयीर आक्षेप नोंदविताना टाटा गृप म्हणतो की, रतन टाटा व सायरस यांच्यात नितीमुल्ये, दूरदृष्टी आणि प्रगतीची दिशा यात मतभिन्नता होती. सायरस यांची नेमणूक करताना त्यांच्याकडून पुढील ५ वर्षांचा विकासात्मक आराखडा मागण्यात आला होता. तो त्यांनी सविस्तरपणे दिला नाही. त्यामुळे टाटा गृपची पुढील वाटचाल व भवितव्य सायरस यांच्या हाती सुरक्षित नसल्यामुळेच त्यांना पायउतार केले. सायरस मात्र, आज टाटा गृप धोक्याच्या वळणावर असल्याचे म्हणत आहेत.

सायरस यांनी असाही दावा केला आहे की, मी स्वतः आजही आयरिश नागरिक आहे. टाटा गृपचे अध्यक्षपद मिळाल्यानंतरही त्या नागरिकत्ववर मी पाणी सोडले नाही. बहुधा त्यामुळेही टाटा विश्वस्त मंडळ माझ्यावर नाराज असावे. सायरस यांचा हा दावा जगभरातील पारशी समाजात टाटांविषयी नाराजी निर्माण करण्याचे भविष्यातील कारण होवू शकतो.

सारयस यांच्या विषयी टाटा गृपमध्ये दबक्या आवाजात अशीही चर्चा आहे की, सायरस यांनी नव्या प्रकल्पांची बांधकामे देताना शपूरजी पल्लोनजी गृपवर मेहरनजर ठेवली. असे करताना त्यांनी टाटा विश्वस्त मंडळाची अधिकाधीक नाराजी ओढवून घेतली. सायरस यांच्या पायउतार होण्याची कारणे कोणतीही असली तरी कार्पोरेट क्षेत्रातील अनेक गोष्टी शिकविणाऱ्या या सर्व घटना आहेत. जी मंडळी आपल्याला सर्वोच्च पदावर बसवते, त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या अपेक्षा आणि कंपनीच्या हेतू सिद्धीत समन्वय व लवचिकपणा हा असलाच पाहिजे. तो नसेल तर त्याचा सायरस होतो. रतन टाटा हे चेहरा आहेत आणि सायरस यांनी मुखवटा होण्याचे बहुधा नाकारले म्हणूनच सायरस यांना टाटा म्हणावे लागण्याची वेळ आली. हे प्रकरण भविष्यात अजून वेगवेगळी वळणे घेण्याची शक्यता आहे. पल्लोनजी गृप जगभरात काय करु शकते याचा अंदाज आज तरी बांधता येणार नाही.

No comments:

Post a Comment