Friday 21 October 2016

मालक आणि सहकारी एक अनोखे नाते

जगभरात औद्योगिकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर उद्योजक व कामगारांचे, मालक व नोकराचे नाते अस्तित्वात आले आहे. बदलत्या काळाने या नात्याला भांडवलदार तथा शोषक आणि कामगार, मजूर तथा शोषणग्रस्त असेही रुप दिले.  जगभरातील नोकरदार हा आजही असंतुष्ट, अस्वस्थ असून काम करुन घेणारी यंत्रणा त्याचे शोषण करते किंवा त्याला कामाच्या श्रमाचा मोबदला कमी देते अशी तक्रार जवळपास सर्वांची आहे. भारतात सरकारी व निमसरकारी सेवेतील कर्मचारी तथा कर्मचाऱ्यांचे संघटन आहे. त्यांना त्याच्या बळावर सहावा वेतन आयोग लागू करून सातवा वेतन आयोग स्वीकारण्याची स्थिती निर्माण करता येते. विधीमंडळ किंवा संसदीय मंडळात जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी असलेले नेतेही स्वतःचे वेतन वाढवून घेतात. 

मात्र, लहान, मोठ्या सेवा, उद्योग व्यापार, व्यवसायात आजही असंघटीत असलेल्या कुशल, अकुशल कर्मचारी, कामगार तथा मजुरांना किमान वेतन मिळतच असेल याची शाश्वती नाही. खासगी सेवा, व्यवसायातील असंघटीत मजूर, कामगार, कर्मचारी, रोजंदार यांची अवस्था वाईट आहे. कायदे अनेक असले तरी त्यानुसार कार्यवाहीची शाश्वती नाही. तसे करायला कोणीही वाली नाही. अशा व्यवस्थेत काम करणारी मंडळी मालकाच्या भरोसेच काम करीत असते. अशा मंडळींच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबियांचा परवड होते. अशी अनेक उदाहरणे आहे.

मालक आणि नोकराच्या नाते संबंधात कृतिशीलतेतून एक अनोखे नाते निर्माण करण्याचे उदाहरण जळगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील ज्येष्ठ दीपकराव घाणेकर यांनी घालून दिला आहे. दुकानात काम करणाऱ्या एक नोकराला त्याच्या हयातीत आणि त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला घाणेकरांनी दिलेली माणुसकीची व आर्थिक मदत ही डोळ्यांत माणसुकीचे अश्रू आणणारी आहे. येथे एक गोष्ट स्पष्ट करु या. ती म्हणजे, घाणेकर यांनी आपल्या दुकानातील या नोकराला किंवा कर्मचाऱ्याला कधीही या शब्दांप्रमाणे वागविले नाही. घाणेकर त्याला म्हणत, अरे तू आणि मी एकत्र काम करतो. त्यामुळे मी तुझा सहकारी आहे. याच विचारांनी घाणेकरांनी त्या सहकाऱ्याला वागविले, वाढविले.

ही कहाणी आहे स्व. सूर्यकांत एकनाथ हरणे याची. तो गुरुगोविंद शाखेचा स्वयंसेवक होता. घाणेकर यांच्या  दुकानात काम करीत असे. जिल्हा रुग्णालयात संघ परिवाराने सुरू केलेल्या सेवालयात अन्नपूर्णा योजनेचे काम तो पाहत असे. त्याला ओळखीची मंडळी पिंटू म्हणत. जवळपास वर्षभरापूर्वी त्याचे अकाली निधन झाले. घाणेकरांच्या दुकानातून विविध मूर्ती खरेदीसाठी जाण्याचा ज्यांचा संबंध आला असेल ती मंडळी पिंटूला ओळखायची. उंचपुरा, सावळा, मजबूत बांध्याचा व कपाळावर टीळा लावणारा पिंटू सर्वांचे हसमूख स्वागत करायचा. माझा आणि त्याचा अनेकवेळा संपर्क आला. माझ्याकडे असलेल्या बुद्ध, शिवराय, आंबेडकर, विवेकानंद, ज्ञानेश्वर, परशुराम आदी मूर्ती मी घाणेकरांकडूनच आणल्या आहेत. त्यामुळे पिंटूचा आणि माझा अनेकवेळा संवाद झाला.

पिंटू हा घाणेकरांकडे गरजेतून आला. पंधरा वर्षांपूर्वी. तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे बालपण गुन्हेगारीच्या वळणावर गेले. पिंटूने सातवीत शाळा सोडली. काही काळ मोठ्या बहिणीने सांभाळले. वडील व्यसनी होते. घरात पैशांची चणचण होती. बहिण सासरी गेल्यावर दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. हाताला रोजगार हवा म्हणून मिळेल ते काम स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. वडिलांना पिंटू जगतो कसे याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते.

अखेर पिंटूचे पाऊले काम मागत सट्टयाच्या पेढीवर गेली. तेथे कोणालाही काम मिळते. तसे पिंटूला मिळाले. ती जागाच अशी की तेथे इतरही व्यसने चालून येतात. आपण कुसंगतीत जातोय हे समजत नाही. या काळात त्याचे लग्नही झाले. सट्ट्याची पेढी म्हणजे पोलिसांची कमाईची जागा. त्यांना कागदोपत्री काही केसेस दाखवाव्या लागतात. सट्टापेढीचा मालकच आपल्या काही लोकांना पकडून देतो. थातुरमातूर कारवाईनंतर नंतर पुन्हा धंदा बिनबोभाट सुरू असतो. पिंटूबाबत एकदा असेच घडले. मालकाने सांगितले, पोलिसांच्या सोबत जा. पिंटूने जायला नकार दिला. तेथे मालकाशी वाद झाला. त्यामुळे ते काम सुटले. पुन्हा हात बेरोजगार झाले.

 पिंटूच्या आयुष्यात हे नवे वळण ठरले. एका खासगी दुकानात तो कामाला लागला. त्यानंतर कधीतरी पिंटू महात्मा गांधी मार्केटसमोरील घाणेकर यांच्या दुकानात काम मागायला आला. त्यावेळी घाणेकरांकडे काम होते. कारण त्यांचा दुकानातला सहकारी कै. शिवराम सपकाळे हा वार्धक्यामुळे काम करु शकत नव्हता. त्यांनी पिंटूला त्याचा पूर्व इतिहास न विचारता कामावर घेतले. तेथून नंतरच्या प्रवासात पिंटूचे आयुष्य बदलून गेले.

घाणेकर यांचा मित्र परिवार संघ संस्कारातला आहे. अशाच मंडळींचे त्यांच्याकडे जाणे-येणे असते. त्याच्या सहवासात व त्यांच्या गोष्टी ऐकून पिंटू हळहळू बदलला. व्यसने सुटली आणि कामाविषयी श्रमाची जिद्द, नव्या विचारांची जिज्ञासा, स्वतःला तसे करण्याची तळमळ पिंटूला आतून व बाहेरुन बदलून गेली. दुकानात मूर्ती किंवा इतर काही खरेदीस येणाऱ्या ग्राहकाशी पिंटू बोलू लागला. त्यात त्याला लवकर कौशल्य प्राप्त झाले. संघ कार्यकर्ते, प्रचारक यांच्याशी तो बोलू लागला. त्यांच्या सहवासाचा चांगला परिणाम पिंटूच्या स्वभावात दिसू लागला. त्याच्या कुटुंबावरही याचा चांगलाच परिणाम झाला. घर सुसंस्कृत असावे याची काळजी पिंटू घेवू लागला.संघ प्रचारकांना तो घरी जेवायला न्यायला लागला.

पिंटूला एक अनोखा शौक होता. तो खाण्याचा शौकीन होता. नवनवीन पदार्थ करण्यासाठी तो त्याच्या पत्नी नंदिनीला आग्रह धरायचा. नवे पदार्थ खाण्यासाठी तो मित्रपरिवाराला घरी बोलवायचा. यासाठी तो खिशाला न परवडतील असे कार्यक्रम आयोजित करायचा. पिंटू कुटुंबवत्सल होता. बाहेर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ अगर भोजनाचे निमंत्रण असल्यास तो सर्व कुटुंबीयासह उपस्थित असायचा.

लहानपणी आपण अनुभवलेले दारिद्र्य आपल्या कुटुंबातील इतरांना अनुभवावे लागू नये अशी काळजी तो घेत असे. त्याला एक मोठी मुलगी  मोहिनी, तिच्यावर तो अतिशय प्रेम करायचा. मोहिनीचा जन्म झाल्यानंतर त्याचे दारिद्र्य दूर झाले असा त्याचा समज होता. लहान मुलाचे नाव ललित उर्फ दादू. असा त्याचा चौकोनी परिवार होता. पिंटूचे अनेक मित्र झाले. त्यात सामान्य भाजी विक्रेत्या पासून व्यापारी, डॉक्टर, वकील यांचा समावेश होता.

संघ परिवाराने जिल्हा रुग्णालयात अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली. या योजनेत पिंटूचे योगदान फार मोठे होते. या योजनेचा तो ब्राण्ड ऍम्बेसीडर होता. या योजनेत गरजू  रुग्णांना सकाळचे भोजन दिले जाते पण पिंटू काहींना घरुन संध्याकाळचे भोजनही देत असे. अशा प्रकारे सामाजिक व व्यक्तिगत काम करीत असताना पिंटूने स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. त्याचे वजन वाजवीपेक्षा जास्त वाढले. वेळोवेळी सूचना देऊनही तो दुर्लक्ष करीत असे. प्रकृतीकडे दुर्लक्षाचा परिणाम अखेर झाला. दि. १९ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री नऊ वाजता पिंटूचे हृदयविकाराने अचानक निधन झाले. तेव्हा त्याचे वय अवघे ३२ वर्षे होते. पिंटूच्या कुटुंबासाठी हा फार मोठा आघात होता. पिंटूची पत्नी नंदिनीला या परिस्थितीतून बाहेर काढणे हे आव्हानच होते. नंदिनी पुढे मुलांच्या भविष्याचा विचार होता. त्यामुळे तिची अवस्था केविलवाणी झाली होती.

पिंटूची हा प्रवास तसा मालक आणि नोकर (सहकारी) असा होता. या नात्यापलिकडील सद्भावाचे नाते घाणेकर यांनी जपले होते. त्यांनी पिंटूच्या काही एलआयसी पॉलीसी काढल्या होत्या. त्याची काही रक्कम त्याला मिळाली. घाणेकर कुटुंबीयांनी यासोबत निर्णय घेतला की, पिंटूच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून  त्यांना ५ लाख रुपये द्यावेत. शिवाय, पिंटूला देत असलेला मासिक पगार किमान वर्षभर नंदिनीला द्यावा. घाणेकरांनी केलेही तसेच. श्वास घेण्याच्या या काळात नंदिनी स्वतःच्या पायावर उभी राहिली.

घाणेकरांनी हा संवेदनशिल विषय सोशल मीडियीत फेसबुकवर व्हायरल केला. मालक-नोकर या नात्याला वेगळा संदर्भ देणारी ही कहाणी वाचून आशा फाऊंशनने घाणेकरांच्या कलाम वृत्तीला सलाम केला. मी सुद्धा या विषयाने भारवलो. २७ वर्षे नोकरी करताना व्यवस्थापन आणि कर्मचारी म्हणून मिळालेल्या वागणुकीचे अनेक संदर्भ झर्कन समोरुन गेले. घाणेकरांनी घालून दिलेला हा अनोखा मार्ग खरच अनुकरणीय आहे.

(या लेखातील संदर्भ दीपकराव घाणेकर यांच्या लेखातून घेतले आहेत.)

1 comment:

  1. DiLip bhau Tiwari ji...
    Lekh khup chaan mahiti dili aahe.
    Mi swatah pintu bhau ani Dipakrao yanna olakhato...
    Pintu bhau Mehnati hota tyacha sobat suddha mi kam kelele aahe ..
    Dipakravanni je kele te ase kam mi kothehi aiknyat aalele nahi..
    Dipakrav salute to u..
    Dilip bhau aapan khup chaan mahiti dili aahet. Tumche pan manapasun abhar manto...

    ~Rahul Suryawanshi.

    ReplyDelete