Monday, 17 October 2016

भाजपतील “दबक्या पाऊलांची” माणसं !!

जळगाव जिल्ह्यात इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत पक्षीय बल व पदांच्या संख्येत भाजप कागदावर बळकट आहे. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणता येईल अशी स्थिती अजुनही आहे. दोन खासदार, विधानसभेचे ५ आमदार, विधान परिषदेचे २ आमदार असून जिल्हा परिषद, अनेक पंचायत समित्या, नगर पालिका यासह जिल्हा सहकारी बँक, दूध संघ, बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यात फोफावलेला भाजप लक्षात घेवून राज्याच्या मंत्रीमंडळात जळगाव जिल्ह्यातून एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांना मंत्रीपदे मिळाली होती. यात खडसेंकडे १२ मंत्रालयांचा तर महाजनांकडे १ मंत्रालयाचा भार होता. महसूल, कृषि, राज्य उत्पादन शुल्क व जलसंपदा अशा वजनदार व मालदार खात्यांचा भार खडसे व महाजनांकडे होता. म्हणजेच जिल्ह्यातील मतदारांनी भाजपला जे भरभरुन दिले त्या बदल्यात पक्षानेही या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्री रुपाने भरभरुन दिले होते.
मंत्रिपदाच्या अशिष्ट वापरासंदर्भातील अपरिहार्य स्थिती आणि भरपूर टीका ओढवून घेतल्यामुळे खडसेंनी स्वतःच मंत्रिपद सोडले. अर्थात, अपरिहार्यतेची पारदर्शक चौकशी होवून आपले निर्दोषत्व सिध्द होईल व पुन्हा मंत्रीपद मिळेल अशी खडसे व त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे. पण, या संधि काळात (म्हणजे धड दिवस नाही व धड रात्र नाही) खडसेंचे पक्षात खच्चिकरण सुरु असल्याचा दावा स्वतः खडसे व त्यांचे कार्यकर्ते करु लागले आहेत. खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील पक्षांतर्गत मतभेद टोकाला गेले असून कार्यकर्ते व पदाधिकारी खडसे विरुद्ध महाजन अशा गटांमध्ये विभागले आहेत.

भाजपच्या जिल्हा बैठकांमध्ये खडसे आणि महाजन समर्थक एकमेकांवर धावून जात आहेत. पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला कुलूप ठोकण्यापर्यंत वाद विकोपाला गेले आहेत. जळगाव जिल्हा भाजपत ही यादवी माजली आहे. भाजप हाच भाजपचा शत्रू झाला आहे. आपली कन्या म्हणून ज्या अधिकाऱ्यांना खडसेंनी मंत्रीपदाचे संरक्षण दिले, त्याच अधिकाऱ्यांकडून सरकारी प्रोटोकॉल शिकण्याची वेळ खडसेंवर आली आहे. अशी ही भयंकर यादवी पुराणातील काही संदर्भ ताजे करणारी आहे.भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. भारतीय वेद, पुराणे, देवादिके यांच्यावर भाजपची श्रध्दा आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा भाजपतील यादवी समजून सांगताना पुराणातील संदर्भ वापरावे लागतील. देवादिके मानायची तर स्वर्ग, नर्क, पृथ्वी आणि पाताळ याचे अस्तित्व मान्य करावे लागते. स्वर्ग म्हणजे देवांचा राजा इंद्र याचे साम्राज्य. सर्व देव त्याच्या अधिनस्त काम करणारे. पुराणातील कागदपत्र पाहिले तर विष्णूपेक्षा इंद्राचा बायोडेटा तसा हलका. विष्णूने दशावतार घेतले. इंद्राचा एकही अवतार नाही. तरी सुध्दा इंद्र राजा झाला आणि त्याच्या दरबारात विष्णू एक देव. पण, विष्णूने कधीही इंद्राला "आजचा बच्चा" म्हटल्याचे वाचनात येत नाही. विष्णुच्या रुपातील रामाने व कृष्णाने मनुष्यरुपात अनेक उपदेश केले पण, मला देवांचा राजा व्हायचे असे कधी म्हटले नाही. जेव्हा रावणाची भानगड निर्माण झाली तेव्हा विष्णू रामाच्या अवतारात आले आणि जेव्हा जरासंध, कंस व कौरवांच्या निःपाताची वेळ आली तेव्हा कृष्णावतार झाला. म्हणजे इंद्रलोकावर संकट आले तेव्हा विष्णूने त्या संकटाचे निर्दालन केले. मात्र, “मला स्वर्गाचा राजा करा म्हणून कुठेही प्रतिक्रिया दिल्या नाहीत किंवा त्यांच्या सोबतच्या वानरसेनेने अथवा गोपालकांनी कशाही प्रकारे उधम मचवला नाही. इंद्र आणि विष्णूची ही केमिस्ट्री अशा प्रकारे मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांच्या उदाहरणासाठी फिट्ट बसते. मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचे शल्य बाळगून आणि नंतर मंत्रीपद गमावल्याचे दुःख कुरवाळत खडसेंची स्थिती अवघड होत चालली आहे.

इंद्र आणि विष्णू यांच्यातही अंतर्गत सुंदोपसुंदी आहेच. दोघेही देवलोकाचे घटक. तरी सुध्दा आपापसात सामर्थ्य आजमावण्याची दोघांची सुप्त ईच्छा. विष्णूने कृष्णावतार घेतल्यानंतर गोपालकांना इंद्राच्या ऐवजी गोवर्धन पर्वताला देव म्हणा असे सांगितले. एक प्रकारे इंद्राला धुत्कारण्याचाच हा प्रकार. मग, कोपलेल्या इंद्राने संतापाचा पाऊस पाडला. तेव्हा कृष्णाने शांतपणे गोवर्धन करंगळीवर उचलला. थयथयाट केला नाही किंवा गोपालकांनी धुडघूस घातला नाही. फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात जिल्हा बैठकीत गोंधळाचे काहीही कारण नव्हते. शांतपणे एका वाक्यात बोलून संबंधितांना जाणीव करून देता आली असती. संयमाचा व अविचल गोवर्धनच आपत्तीकाळात कामाला येतो. आपली समस्या सोडवायला गोवर्धन हाती असला की मग केवळ करंगळी एवढीच ताकद पुरेशी असते. प्रत्येकवेळी मनगटातला व तोंडातला जोर दाखवायची गरज नसते.

जळगाव जिल्हा भाजपसाठी पुराणातील अजून एक संदर्भ महत्वाचा आहे. तो म्हणजे थेट यादवी होण्याचा. यादवी म्हणजे कृष्णाच्या कुळाने आपापसात लढाई करून ओढवून घेतलेला सर्वनाश. याला आत्मघातही म्हणता येईल. कृष्ण हा देवाचा मानवी अवतार होता पण तो सुध्दा यादवी रोखू शकला नाही. राजकारणी माणसाला दोन प्रकारच्या यादवीचे सतत भय असते. पहिले म्हणजे स्व पक्षात होणारी यादवी, दुसरी म्हणजे स्व कुळात होणारी यादवी. राजकीय यादवी सत्ता व पदासाठी तर कुळातील यादवी वारसा, पद आणि संपत्तीसाठी असते.  जळगाव जिल्हा भाजपतील सध्याचे वातावरण राजकीय यादवीचे आहे.

कोणत्याही प्रकारची यादवी ही इतरांच्या त्रास, दुःख, यातना यातून निर्माण होते. कोणाला तरी अगोदर दिलेल्या, सतावलेल्या कृत्यातून शिव्या, शाप उद्गारले जातात. नंतर ते शब्द वास्तवाला घेवून सामोरे येतात. कुरुक्षेत्रावरील युद्धात कृष्णाने पांडवांचा पक्ष घेतला. पांडवांच्या विजयासाठी आणि कौरवांच्या पराभवासाठी कृष्णाने सारे काही केले. पण, या कृत्याने कौरवांची माता गांधारी दुखावलेली होती. पांडव विजयी होवून हस्तिनापुरात गेले तेव्हा दुःखावेगात गांधारीने कृष्णाला शाप दिला, तू कौरव कुळाचा नाश घडवून आणलास, आता तुझे कूळही आपापसात भांडून नाश पावेल. त्रासाचे अजून एक उपकथानक आहे. यादव कुळातील काही युवकांनी तप करणाऱ्या ऋषी दुर्वासा यांना त्रास दिला होता. तेव्हा संतप्त ऋषिंनी यादव कुळाचा नाश होईल असा शाप दिला होता. झालेही तसेच. कृष्णाच्या समोर यादव कुळाचा नाश झाला. यादव कुळाने मदीरेच्या नशेत एकमेकाला ठार मारले. अशा प्रकारच्या यादवीत कृष्णाने पूत्र प्रद्युम्न व मित्र सात्यकी यांना गमावले.

वेद, पुराण हा धार्मिक आधार मानणाऱ्या भाजपत आज महाभारतातील सत्ता व पदाची यादवी माजली आहे. या यादवीमागे भुतकाळातील काही शाप, उपःशाप असू शकतात. आम्हाला अशी वागणूक का दिली ? हा जाब विचारणाऱ्या मंडळींनी कधीकाळी इतरांना असेच वागविले असेल का ? याचा विचार करायला हवा.

आर्य चाणक्य एका प्रसंगात चंद्रगुप्ताला म्हणतो, आपल्या मागे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पाऊलाचा आवाज हा स्पष्टपणे ऐकू आला पाहिजे. जी मंडळी आपल्या मागे दबक्या पाऊलांनी चालते त्यांच्या निष्ठेत खोट किंवा शंका असते. अशा दबक्या पाऊलांच्या लोकांना प्रथम हाकलून लावले पाहिजे. प्रश्न ऐवढाच आहे, भाजपतील दबक्या पाऊलांची माणसं ओळखावी कशी ??? अशी माणसं भविष्यात कोणत्या कुळाचा नाश घडवून आणू शकते हे येणारा काळच दाखवून देईल.

1 comment:

  1. इंद्र आणि विष्णू चा दृष्टांत चपखल

    ReplyDelete