Friday, 14 October 2016

सच्चा आणि अच्छा मित्र कैलासअप्पा !

काही माणसांची मैत्री का होते ? या प्रश्नाचे नेमके उत्तर कधीकधी देता येत नाही. मैत्रीतले नाते पाण्यासारखे नितळ आणि पारदर्शी असले की, मैत्री सुध्दा एकमेकात गुंतल्यासारखी होते. कैलासअप्पा सोनवणे यांच्याशी माझी मैत्री अशीच आहे. एकमेकात गुंतलेली. एकमेकांविषयी जिव्हाळा व आदर असलेली. म्हणून कैलासअप्पाचा उल्लेख एकेरी केला आहे.

मला वर्ष आठवत नाही. पण कैलासअप्पा जळगाव मनपात स्थायी समिती सभापती असण्याचा योग जुळून आला होता. खान्देश विकास आघाडीचे बहुमत असूनही कैलासअप्पा सभापती होता. मी तेव्हा अकोल्यात दै. सकाळचा प्रमुख होतो. जळगावशी शनिवार, रविवार संपर्क होता. घराजवळ कच्ची नाली चोकप झाल्याची तक्रार घेवून मी कैलासअप्पाकडे गेलो. तक्रार अर्ज देवून आणि जुजबी बोलून निघून आलो. काम होईलच याची शाश्वती नव्हती. दुसऱ्या  दिवशी अकोल्यास परत गेलो. संध्याकाळी बायकोचा फोन आला. ती म्हणाली, मनपाच्या लोकांनी नाली साफ केली. कैलासअप्पाने काम दाखवले होते. नंतर जळगावला जेव्हा परत आलो तेव्हा कैलासअप्पाचे आभार मानायला खास भेटलो. मला वाटते आमची ओळख व मैत्री येथून सुरु झाली.

एक प्रसंग असाच आठवणीतला. जिल्हा बँक निवडणूक होती. कैलासअप्पा उमेदवार होता. समोर सुरेशदादा जैन होते. कैलासअप्पा नाथाभाऊंच्या पैनलमधून होता. कैलासआप्पाने सुरेशदादांच्या बरोबरीने अर्थव्यवहार करुन "टफ फाईट" निर्माण केली होती. जि. प. विद्यानिकेतनमध्ये मतदान केंद्र होते. मतदान सुरु असताना कैलासअप्पा व आम्ही काही मंडळी गप्पा करीत  गेटजवळ थांबलो होतो. तेथे सुरेशदादा आले. कैलासअप्पांनी नम्रतेने नमस्कार म्हटले आणि सुरेशदादांचा पारा चढला. त्यांनी कैलासअप्पाला सुनावले. येथे उभा राहून मतदारांना दमदाटी करतो का ? सुरेशदादा इतर बरेच काही बोलले. कैलासअप्पा मात्र हसून नाही नाही करीत होते. अखेर वाद निवळला. सुरेशदादा अवघ्या तीन मतांनी निवडून आले. कैलासअप्पा मला आव्हान देतो ही, बाब सुरेशदादांनी मनाला लावून घेतली. त्यावर्षी वाळूचा ठेका सुरेशदादांनी घेतला आणि जळगावकरांना वर्षभर वाळू मोफत दिली. कारण, कैलासअप्पाचा वाळूचा ठेका होता. त्यातून खुप पैसा कमावून कैलासअप्पा मोठा झाला असा सुरेशदादांचा अंदाज होता.

जळगावचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. के. डी. पाटील यांचा राजकीय बळी घेण्याचा दोष कैलासअप्पावर जातो. भाजपतील सुंदोपसुंदीच्या राजकारणात डेली बाजार वसुलीच्या ठेक्यासाठी डॉ. पाटील यांनी लाच मागितल्याचा गेम तेव्हा कैलासअप्पाचा खांदा वापरून रचला गेला. कैलासअप्पाचे संबंधित नेत्यांशी नातेही नंतर तेवढे विश्वासाचे राहिले नाही. भाजपतही कैलासअप्पाची अवस्था आज उपरे अशीच आहे. बहुधा ती पक्षाविषयी धरसोड वृत्तीने. नंतर मनपाची निवडणूकही कैलासअप्पाने स्वतंत्र पैनल करून लढविली.

जळगावच्या स्टेडियमवर मुलींच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा नारायण खडके यांनी घेतली होती. देशभरातून संघ आले होते. या स्पर्धेच्या ठिकाणी कैलासअप्पा पहिल्या दिवसापासून असायचा. खेळाडू मुलींना प्रोत्साहन द्यायचा. खिशात असतील तेवढ्या रकमेचे रोख बक्षीस विजेत्या मुलींना द्यायचा. 

जळगाव येथे सैराट चित्रपटाचे प्रदर्शन झाले. सैराटचा शेवट अॉनर किलींगचा होता. मात्र, समाजाला सकारात्मक संदेश देण्यासाठी कैलासअप्पाच्या "जळगाव महानगरपालिका" या व्हाट्सॲप गृपतर्फे आम्ही जळगावातील प्रेम विवाहितांचा सत्कार घडवून आणला. हा कार्यक्रम एवढा चर्चेत आला की दिग्दर्शक नागनाथ मंजुळेने त्या उल्लेख नंतरच्या काही मुलाखतीत केला. कैलासअप्पाने गृपमधील १०० जणांना सैराट चित्रपट दाखवायला नेले होते.

कैलासअप्पावर काही जुने व काही नवे आक्षेप आहेत. काही पिढीजातही आहेत. कैलासअप्पाने आपल्या स्वभावातून आणि व्यावहारिक तडजोडीतून काही गोष्टी जाणिवपूर्वक बदलल्या. दुश्मनी निभावण्यापेक्षा मैत्रीचे पर्व कैलासअप्पाने सुरु केले. सहृदयता हाही कैलासअप्पाचा एक गुण आहे. काश्मीरमध्ये उरी येथे सैनिक तळावर दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्यांच्या कुटुंबियांना कैलासअप्पाने मनपाच्या सभांचे मानधन जवळपास साडेतीन लाख रुपये मदत म्हणून दिले.

एक आठवण सांगायला हवी. जळगावात दै. देशदूतमध्ये असताना शहरातील अनेक डॉन मंडळींच्या संपर्कात मी असायचो. आजही जळगावच्या भल्याभल्या डॉन मंडळीत मी सहज उठबस करू शकतो. अगदी त्यांच्या विरोधात लिहून सुध्दा. कारण १९८९ पासून अनेकांचा इतिहास माझा तोंडपाठ आहे. कोण कोणत्या इमारतीत बसून एकच बीडी पार्टनर म्हणून ओढायचे, कोण भंगार चोरी करायचे, कोण रेल्वेचा कोळसा चोरायचे, कोण क्लब-सट्टा चालवायचे, कोणाच्या इमारतीत मुजरा चालायचा, कोणाच्या लॉजमध्ये लफड्यासाठी खोली मिळायची, कोण आपल्याच जातभाई तथा नपा कर्मचाऱ्यांना  व्याजाने पैसे द्यायचा, कोण गटारीचे ठेके घेत घेत बिल्डर झाला, मजूर सोसायटींच्या कमिशनवर कोण पुढे गेला, कोणाचा भाऊ दंगलसाठी बोळे पेटवायचा असा अनेकांचा काळा इतिहास मेंदुच्या कप्प्यात फिट्ट आहे. 

सांगायचा मुद्दा हा की, एका प्रकरणात कैलासअप्पा आरोपी होता. कोर्टात तारखा सुरु होत्या. तडीपार असलेला कैलासअप्पा आपल्या कोंडाळ्यात कोर्टात यायचा. मित्रांच्या उठबसमधून मला माहिती मिळाली होती. मी कैलासअप्पाला मोबाईलवरून सांगितले. न्यायालयात येताना काळजी घे. तिसऱ्या दिवशी कोर्टाच्या आवारात कैलासअप्पावर हल्ला झाला. कैलासअप्पा बचावला. तडीपार असल्याने कैलासअप्पा तेव्हा फर्दापूरला मुक्कामी होता. दर दिवशी मोबाईल सीम बदलायचा. घटनेनंतर कैलासअप्पाने मोबाईलवर संपर्क करून माझे आभार मानले.

पुरुषोत्तम करंडक आर्थिक अडचणीमुळे होणार नाही असे चर्चेत आल्यानंतर कैलासअप्पा मदत जाहीर करणारा पहिला मित्र होता. गरजुंना शक्य ती मदत करण्याचे त्याचे काम अव्याहत सुरु असते. राजकारणी व समाजकारणी माणसाची सार्वजनिक शिस्त कधीकधी बिघडते. कैलासअप्पाची सुध्दा बिघडते. मात्र, वहिनी सौ. भारती या स्थिती नियंत्रणात आणतात.

कैलासअप्पा हा असा माझा मित्र आहे. मैत्री करताना मी सुध्दा मित्र जसा आहे तसा स्वीकारला आहे. कैलासअप्पावरील आक्षेपांचा उल्लेख करीत काही जणांनी मला खिजवायचा प्रयत्न केला. पण, तरीही कैलासअप्पा हा मित्र म्हणून मला प्रियच आहेत. कारण मैत्री पाण्यासारखी नितळ व पारदर्शी असेल तर आपण म्हणू शकतो ...

पानी रे पानी ... तेरा रंग कैसा ...
जिस मे मिला ... उसके जैसा ...


कैलासअप्पाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा !!!

No comments:

Post a Comment