सध्या गणेशोत्सव सुरू आहे.
नागरिकांसाठी गणेश स्थापना मंडपातील “देखावे” पाहण्याचे दिवस आहेत. दुसऱ्या बाजुला कार्यकर्ते आणि
समर्थकांचे “दिखाव्या”चे दिवस आहेत. जामीनावर कारागृहाच्या बाहेर आलेल्या
नेत्याच्या स्वागताला शेकडो समर्थक जमतात आणि नागरिकांना संदेश देतात की, आमचे आजही नेत्यावर प्रेम आहे. हा सुद्धा दिखावा करावा लागतो.
विविध आरोपांच्या (कथित) फैरी झाडणाऱ्या माध्यमांवर नेते तोंडसुख घेणारी टीका करतात
मात्र, त्याच माध्यमांना नेत्याच्या वाढदिवसांच्या पेड
पुरवण्या देवून आमचे आमच्या नेत्यावर प्रेम आहे, असाही दिखावा करावा लागतो. म्हणूनच
दिवस देखावे आणि दिखाव्यांचे आहेत.
अधुन मधून राज्याचे
जलसंपदामंत्री जळगाव शहर व जिल्ह्यात असतात. त्यांचेही काही फोटो त्यांचे समर्थक
व्हायरल करीत असतात. तसा एखादा फोटो आला की आठवण होते, अरे खरेच की गिरीशभाऊ
सुद्धा मंत्री आहेत. गिरीशभाऊंचे समर्थक थोडे जास्त उताविळ आहेत. गिरीशभाऊंना अडचण
निर्माण करतील असेच फोटो ते व्हायरल करतात. म्हणजे कसे, तर बुलेट चालवणारे
गिरीशभाऊ, टपरीवर पान घेताना गिरीशभाऊ, कमरेला पिस्तुल लावलेले गिरीशभाऊ, रथाच्या
मिरवणुकीत लेझिम खेळताना गिरीशभाऊ, हिंदू संत संमेलनाच्या मिरवणुकीत ठेका धरणारे
गिरीशभाऊ. असे काही बाही फोटो व्हायरल होतात.
दोन दिवसांपूर्वी गिरीशभाऊ
सुरेशदादांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले. तेथे योगायोगाने जिल्ह्यातील
दुसरे राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबभू होते. दोघांच्या मधोमध महापौर नितीन
लढ्ढा हसमुख होते. आता हाही फोटो गिरीशभाऊंच्या प्रेमी समर्थकाने व्हायरल केला. त्यानंतर
काय झाले तर, भाजपच्याच काही कार्यकर्त्यांच्या पोटात दुखले. त्यांनी या फोटोतील
मंडळींचा उल्लेख “कौरव” म्हणून केला. कोणाला तरी कृष्णाची उपमा दिली. आता
ते कोण हे सांगायची गरज आहे का ? पण अशा
प्रकारे आपल्रयाच पक्षाच्या मंत्र्यांवर खवचट कमेंट करण्याची ही प्रवृत्ती
सुद्धा दिखावा आहे. तो माजी मंत्र्यांवरील निष्ठा दाखविण्यासाठी आहे. असो, भाजपतील
ही सुंदोपसुंदी पक्षाची बेअब्रू करणारी व पक्षांतर्गत वादविवादाची लक्तरे वेशीवर टांगणारी
आहेत.
भाजपतील दुखी मंडळींना
रामायणाची आठवण करुन द्यायला हवी. आपला पक्ष सोडून जो दुसऱ्या पक्षाला किंवा शत्रू
पक्षाला मदत करतो, त्याला “बिभीषण” म्हटले जाते. उलटपक्षी महाभारतात पूत्रप्रेमाने
आंधळा धृतराष्ट्र आहे. त्यामुळे महाभारताचे संदर्भ जपून वापरा.
गिरीशभाऊंचे काल दोन फोटो
व्हायरल झाले. पहिला होता मास्टर डान्सर
तनय मल्हाराच्या स्वागताचा. तेथे गिरीशभाऊ म्हणाले, मला पण नाचायची ईच्छा होते. हेही
खरे आहे म्हणा. गिरीशभाऊ आणि वाजा याचे बहुधा नाते असावे. पण, गिरीशभाऊंना कडवटपणे
सांगायला हवे की, गिरीशभाऊ तुम्ही आता सत्तेत आहात. मंत्री आहात. किती दिवस
जनतेसोबत रस्त्यावर नाचणार ? जरा
आपले मंत्री पदाचे अधिकार वापरा आणि जिल्ह्याच्या प्रशासनाला तुमच्या तालावर
नाचवायला शिका. जिल्ह्यातील अधिकारी तुमचे ऐकतात असे एखादे कृत्य दिसू द्या.
मध्यंतरी जिल्हाधिकारी
रुबल अग्रवाल यांनी तहसील कार्यालयांच्या परिसरातील सेतू केंद्र बंद करण्याचे आदेश
दिले होते. राज्य सरकारचे कोणतेही आदेश नसताना ही केंद्रे बंद करण्यात आली. त्यावेळी
शाळा, महाविद्यालयात प्रवेशाचा काळ होता. विविध प्रमाणपत्रे, दाखले यासाठी पालकांची
व विद्यार्थ्यांची ससेहोलपट सुरू झाली. ही गर्दी एक खिडकी योजनेच्या ठेकेदाराकडे
वळली. तेथे जादा शुल्क आकारणी व विलंबाच्या तक्रारी सुरू झाल्या. काही केंद्र
चालकांनी हा विषय गिरीशभाऊंना मुंबईत सांगितला तसेच जळगाव दौऱ्यातही सांगितला. गिरीशभाऊंनी
जिल्हाधिकाऱ्यांना फोनही केले. मात्र, झाले काय ? तर
जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. गिरीशभाऊ असे असेल तर आपण नाचायचे
का प्रशासनाला नाचवायचे ? ते
तुमचे तुम्हीच ठरवा.
गिरीशभाऊंचा दुसरा फोटोही
व्हायरल झालेला आहे. महाराजस्व अभियानांतर्गत लोहारा येथे बेबाबाई भिल या वृद्धेस
गिरीशभाऊ यांनी स्वतः जावून शिधापत्रिका दिली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या
शांताराम भिल यांनाही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना दिली जाणारी पिवळी
शिधापत्रिका गिरीशभाऊंनी दिली. रुखमाबाई यशवंत खरे (वय ८५) यांनी
तेथेच गिरीशभाऊंना सांगितले की, वृद्धापकाळ योजनेत मानधनाचे माझे प्रकरण गेले आहे.
मात्र, मला लाभ भेटत नाही. मग अवघ्या १० मिनिटात त्या महिलेस वृद्धपकाळ योजनेत मानधन मंजूर झाले. खरे तर
गिरीशभाऊंची ही कार्यतत्परता पाहून जनतेने नाचायला हवे. अवघ्या १० मिनिटात मंजुरी
म्हणजे, मोदींना अपेक्षित असलेले अच्छे दिनच.
मध्यंतरी विधानसभेत पाचोऱ्याचे
आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला केली होती की, जळगाव जिल्ह्यात ५५ टक्के
केशरी कार्डधारकांना धान्यांचा पुरवठा होत नाही. मग हे धान्य जाते कुठे ? तेव्हा आमदार
असलेले व आता राज्यमंत्री असलेले गुलाबभू
यांनीही
या विषयावरील चर्चेत सहभागी होताना आरोप केला होती की, जिल्ह्यात पुरेसे रेशन
कार्डच उपलब्ध नाहीत. कधीतरी सभागृहात झालेल्या या चर्चेतील वास्तव आज बदलले आहे
का ? हे गिरीशभाऊ व गुलाबभू एकदा तपासा. दोघे मिळून महसूलच एक बैठक
तर घ्या. भले त्यासाठी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांना आग्रह करा. अलिकडे
शाळांच्या पोषण आहारातील गैरव्यवहाराचा विषय गाजतो आहे.
गिरीशभाऊ जळगाव जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ९७७ अंतोदय योजनेतील व २
लाख १५ हजार ६२३ बीपीएल योजनेतील असे ३ लाख ५२
हजार ६०० कार्डधारक आहेत. त्यांना
वाटपासाठी गहू ३,०६४ क्विंटल २ रुपये प्रती किलो प्रमाणे, ज्वारी १२,८४८ क्विंटल १ रुपये प्रती
किलो प्रमाणे, मका १२,८४८
क्विंटल १ रुपये प्रती किलो प्रमाणे
असे धान्य उपलब्ध होते. रेशनवर तांदुळ
तांदूळ ३ रुपये व ९ रुपये ६० पैसे प्रती किलो प्रमाणे, गहू २ रुपये व ७ रुपये
२० पैसे प्रती किलो प्रमाणे, साखर १३ रुपये ५० पैसे
प्रती किलो प्रमाणे उपलब्ध असते, असे सरकारी कागदपत्र सांगतात. गिरीशभाऊ खरेच हे
साहित्य उपलब्ध असते का ? त्याचा दर्जा खाण्यालायक असतो का ? ते लाभार्थी घेतात का ? खुल्या बाजारात यापेक्षा स्वस्त भावात वस्तू मिळतात का ?
या प्रश्नांचाही मगोवा एकदा गिरीशभाऊ व
गुलाबभू मिळून घ्याच.
जिल्ह्यात सुमारे ९ लाख ४६
हजार ७७६ रेशनकार्डधारक आहेत. भुसावळमध्ये ९० हजार बोगस रेशनकार्ड आढळल्याची
तक्रार होती. नाथाभाऊ महसूलमंत्री असताना त्यांनी भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्यात
बोगल रेशनकार्ड धारकांचे रॅकेट असल्याची मुद्दा मांडला होता. त्यावर कार्यवाही
सुद्धा सुरू झाली होती. किमान या विषयांचा पाठपुरावा तर करा गिरीशभाऊ व गुलाबभू.
राज्यातील जनतेने परिवर्तनाच्या
अपेक्षेने राज्यात भाजप, शिवसेनेला कौल दिली होता. गिरीशभाऊ तुम्हाला मंत्रीपद खुप
प्रतिक्षेने मिळाले आहे. आणि गुलाबभू तुम्हाला मंत्रीपद “शिक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले” या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या अवस्थेत मिळाले आहे. त्यामुळे ते
जास्तीत जास्त जिल्ह्याच्या विकासासाठी वापरा. लोकांनी तुमच्या मिरवणुकांमध्ये
नाचले पाहिजे, प्रशासनाने तुमच्या तालावर नाचले पाहिजे अशी काही तरी वेळ आणा, हीच
अपेक्षा व्यक्त करून हा कडू विषय थांबवतो.
No comments:
Post a Comment