माझे जवळचे मित्र डॉ. राधेशाम चौधरी यांचा आज वाढदिवस आहे. गेले ६/७ महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. राजकारणाचा उंबरठा ओलांडण्याचा प्रयत्न डॉक्टरसाहेब करीत आहेत. एक सज्जन आणि सहृदयी माणूस म्हणून मी डॉक्टरांना ओळखतो. ते आधी पासून काँग्रेसचे काम करतात. अनेक प्रकारच्या पक्ष कार्यात, उपक्रमात व आंदोलनात डॉक्टर सहभागी आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी होण्याची संधी त्याना साधता आलेली नाही. म्हणून अजुनही ते राजकीय उंबरठ्यावर आहेत. जळगाव मनपात प्रवेश करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न फारच थोड्या फरकाने हुकला. नंतर अडचणीच्या काळात पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरासाठी उमेदवारी दिली गेली. पराभव दिसत असून डॉक्टर लढले. पक्षाच्या चिन्हामुळे त्यांचे नाव घराघरात पोहचले.
डॉक्टर संवेदनशिल आहेत. संवेदनेसोबत अभ्यासू आहेत. जेथे अभ्यासासह वेदना असते तेथे समाजासाठी सतत काही तरी करण्याची धडपड असते. जळगाव शहरासाठी विकासाचे नवे प्रस्ताव मार्गी लागावेत या सह नागरी मुलभूत प्रश्न सुटावेत याकरिता डॉक्टर धडपड करीत असतात. अगदी लहान लहान प्रश्न घेवून डॉक्टर लढत असतात.
जळगाव शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. शहरात संपूर्ण मरगळ आलेली होती. अशा परिस्थितीत डॉक्टर शहराचे पदाधिकारी झाले. हे तसे आव्हान होते. तरी सुध्दा डॉक्टरांनी सूत्रे स्वीकारली आणि पक्ष सावरायचे काम ते करीत आहेत. पक्षाच्या पहिल्या फळीत नेतृत्वाची संधी मिळाल्यापासून डॉक्टर जळगावकरांच्या हितासाठी काहीना काही ॲक्टीव्हीटी करीत आहेत. एक गोष्ट मात्र नक्की की, डॉक्टरांनी पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर संबंध सुधारले आहेत. पक्षाची सार्वत्रिक भूमिका जेथे चुकली तेथे त्यांनी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधीजींपासून पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाणांना पत्रे लिहीली आहेत. एखाद दोन प्रकरणात पक्षाने नंतर भूमिका बदलली आहे. राज्यस्तर पक्ष संघटनेत डॉक्टरांचा आवाज ऐकला जातो हे नक्की.
राजकारणात असले तरी समाजकारण व जनतेच्या विकास कामात पक्षाचे बूट बाजुला काढण्याचा समंजसपणा डॉक्टरांमध्ये आहे. जळगाव मनपाने लोकसहभागातून केलेल्या मेहरुण तलावाच्या खोलीकरण कामाचे डॉक्टर कौतुक करतात. सुरेशदादांनी वाघुर जलवाहिनी टाकण्याचे काम केले म्हणून जळगावचा पाणी प्रश्न सुटला असे स्पष्टपणे डॉक्टर म्हणतात. जळगावच्या विकासासाठी एकनाथराव खडसे आणि गुलाबराव पाटील यांनी एकत्र यावे असे जाहिर आवाहन डॉक्टर करतात. पक्षाभिनवेष हा बाजुला काढण्याची तटस्थता सुध्दा डॉक्टरांकडे आहे. याच हेतूने ते जळगाव फर्स्ट हे पक्ष विरहीत संघटन चालवतात. या संघटनला युवा वर्गाचा उत्तम प्रतिसाद आहे.
डॉक्टर शहरातील गाळ्यांचा प्रश्न मांडतात. मोकाट कुत्र्यांचा बदोबस्त करा म्हणतात. रस्त्यांचा व गाळ्यांचा प्रश्न न्यायालयात नेतात. जि. प. शिक्षकांचे वेतन वेळेत द्या म्हणतात. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये जावून तेथील समस्या मांडतात. निधी न देणाऱ्या सरकारवर टीका करतात, अगदीच वेळ आली तर नाकर्त्या अधिकाऱ्यांना जिल्हा सोडून जा म्हणतात. डॉक्टरांच्या अंगी काँग्रेसी चळवळ आहे मात्र दिखावूपणाची वळवळ नाही.
डॉक्टरांचे आणि माझे नाते काका पुतण्याचे आहे. अगदी चारचौघात ते मला काका म्हणतात. मी त्यांना तसे करायला नाही म्हणतो. पण त्यांनी हे नाते जपले आहे. त्यांचे एक काका प्रा. रमेश चौधरीसर (चोपडा) आहेत. सकाळ बातमीदार असल्यापासून ते माझे मित्र. त्यांच्या नात्यातून डॉक्टरही मला काका म्हणतात. त्यांच्या राजकीय विषयांमध्ये कधीकधी ते मला सल्ला विचारतात. अपवादात्मक स्थितीत माझे मत वेगळे असले तर डॉक्टर माझा मान ठेवतात. मला यात त्यांची सहृदयता दिसते.
आज डॉक्टरांचा वाढदिवस आहे. दोन वर्षानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची डॉक्टर तयारी करीत आहेत. त्यांच्या या तयारीला मी वाढदिवसासह शुभेच्छा देतो. मुंबई दूर भासत असली तरी डॉक्टर आपल्या स्वभाव व आपलेपणातून मुंबईसाठीचे सैन्य जमवू शकतात. भाजपतील अंतर्गत संघर्ष सुरुच राहिला तर डॉक्टरांना गनिमांची रसद मिळू शकते. अशा राजकीय स्थितीत डॉक्टर नक्कीच लाभ उठवू शकतात.
त्यांना पुन्हा शुभेच्छा देवून थांबतो.
No comments:
Post a Comment