Monday 26 September 2016

दानशूर जळगावकरांची गरज आहे ...

आजची सकाळ भांबाळून टाकणारी ठरली. वृत्तपत्रात एकीकडे मास्टर डान्सर तनय मल्हारा च्या आगमनासाठी केलेल्या तयारीची बातमी होती तर दुसरीकडे परिवर्तन संस्थेने पुरुषोत्तम करंडक महोत्सव गुंडाळल्याची बातमी होती. एका बातमीत आनंद तर दुसरीत गोंधळ अशी ही भांबाळून टाकणारी स्थिती.  

तनयच्या आगमनासाठी काल रात्री मी एक पोस्ट टाकली. त्यात तनयच्या विजेता होण्याची प्रक्रिया ही जळगावकरांना समुह संवाद आणि समुह सहभाग यांची उत्तमपणे जाणिव करुन देणारे आहे, असे मत मी मांडले आहे. लोकसहभाग हा शब्द आता गुळगुळीत झाला आहे. लोकसहभाग म्हटला की सर्व जनतेकडून अपेक्षा निर्माण होतात. त्याला कोणीही आक्षेप घेवू शकतो. समुह म्हणजे, एका विचारांच्या व एका कृतीशी संबंधित ठराविक लोकांचे एकत्र येणे. असे एकत्र येणे ही सक्ती नसते. त्यात ऐच्छीक भाव असतो. म्हणून यापुढे लोकसहभागाला पर्याय म्हणून समुह सहभाग असा शब्द वापरायचे मी ठरविले आहे.
जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राला अलिकडे चांगले दिवस आले आहेत. कलाकारांमध्ये भींती असल्या तरी प्रत्येकाचा परिघ हा विस्तारतो आहे. अगदी राज्यस्तरावर दखल घेण्याएवढा. येथे पुन्हा नाव घेत नाही. कारण एखाद्याचे चुकून राहिले की माझ्या लेखनाला विशिष्ट गटाचा शिक्का बसायचा. मुद्दा हा की, जळगावकर आता सुसंस्कारित व सांस्कृतिक दृष्ट्या अधिक प्रगल्भ झाले आहेत. त्यात अनेक संस्थांसह दानशुरांचा सिंहाचा वाटा आहे.

पूर्वीच्या काळीराजे, महाराजे यांच्याच दातृत्वावर कलांवत मोठे होत. ज्याच्या दरबारात कलांवत जास्त तेवढा तो राजा सुसंस्कारी समजला जात असे. सुदैवाने जळगाव शहरातील अनेक दानशुरांनी किंवा संस्थांनी हा वारसा जपला आहे. दाता किंवा प्रायोजक मिळत नाही म्हणून जळगावात कोणता कार्यक्रम झाला नाही असे आजपर्यंत झालेले नाही. तसेच होणारही नाही. हा इतिहास आणि भविष्य माझ्या लेखणीला माहित आहे. म्हणूनच परिवर्तनचे प्रणेते शंभूअण्णा पाटील यांनी पुरुषोत्तम करंडक महोत्सव बंद करण्याचे जाहिरपणे मांडले यात मला वावगे काही वाटत नाही. मागील वर्षी त्यांनी या भावना बोलून दाखविल्या होत्या. शंभूण्णांनी कोणताही अविर्भाव व्यक्त न करता आपले सामाजिक दुखणे मांडले. ताकाला जावून भांडे न लपवता, त्यांनी महोत्सवात आयोजनातील खर्चाची बाजू ठळकपणे सांगितली. मला त्यांचा हा स्पष्ट बोलण्याचा गुण भावतो.

शंभूअण्णांना काही लोक बामणी विचारांचा सुधारक म्हणतात तर काही लोक छुपा मराठा विचारांचा पुरोगामी म्हणतात. दोन्ही बाजुंनी शंभूअण्णांसारखी माणसं बदडली जातात. कारण ती सर्वांची असली तरी ती विशिष्ट लोकांच्या ताटा खालची नसतात. शंभूअण्णा हा माझ्यासाठी खरा जळगावकर आहे. त्यांचा व्यवसाय, राजकिय पक्ष, विचारधारा याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही. कारण तो खरा जळगावकर आहे.

मध्यंतरी जळगाव शहरातील नकारात्मक विषयांवर मी खुप बोलत असे व लिहत असे. त्यात हिंदुत्ववादी प्रवाहात काही काळ होतो. त्यामुळे जळगावकडे विशिष्ट नजरेतून पाहण्याचा दृष्टीदोषही झाला होता. एके दिवशी मी आणि शंभूण्णा जळगावच्या पॉझिटीव्ह व निगेटीव्ह बाबींवर बोलतो होता. माझा पक्ष निगेटीव्ह होता. जळगाव सुंदर कसे ? हा विषय होता. मी सुविधांवर बोलतो होतो आणि शंभूअण्णा माणसांवर बोलत होते. मी गटारी, रस्ते, पाणी, सफाई आदी विषयांवर घसरलो होतो. शंभूण्णा स्व. भवरलालजी, ना. धों. महानोर, ऍड. उज्ज्वल निकम, भालचंद्र पाटील, गुलाबराव देवकर आदींच्या चांगुलपणावर बोलत होते. सुविधा चांगल्या असतील तर शहर सुंदर हा माझा दावा होता. शंभूअण्णा म्हणत होते, माणसं चांगली असतील तर शहर सुंदर.

या चर्चेनंतर बराच काळ गेला. हळूहळू मला वाटायला लागले की, आपण ज्या समाजात वावरतो तेथील माणसे चांगली असावीत. ती चांगली असली की समाजही चांगला होत जातो. सोयी-सुविधा या कधीही पैसा लावून आणता येतात. पण चांगली माणसं आणणार कोठून ? आज जळगावच्या राजकारणावर चर्चा करीत असताना आम्ही आमची नेते मंडळी बदनाम करुन ठेवली आहे. मी अत्यंत जबाबदारीने लिहतोय की, आम्ही आमची नेते मंडळी बदनाम केली आहे. त्यात घरकूलसाठी सुरेशदादा जैन आहेत. गुलाबराव देवकर आहेत. अपवाद वगळता कथित आरोपांसाठी एकनाथराव खडसे सुद्धा त्यात आहेत. अगदी गिरीश महाजन व गुलाबराव पाटील आहेत. आपण बदनाम केली म्हणजे, काही वेळा हितचिंतकांसाठी तर काहीवेळा परिवारासाठी या मंडळींना दोष लावण्याची वेळ आपल्यातीलच कोणी आणली. कोणत्याही क्षेत्रात माणसे तयार होण्याचा  काळ किमान अर्ध शतकाचा असतो. पण, माणसांच्या बदनामीसाठी काही क्षण पुरे असतात. हाच धागा पकडून मला शंभूअण्णांचे माणसं चांगली तर शहर चांगले हा विचार पटतो.

पुरुषोत्तम करंडक महोत्सव बंद झाल्याची चर्चा मी भलतीकडेच नेल्याचे वाचणाऱ्यांना वाटू शकते. पण तसे नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की, जी व्यक्ती जळगावकरांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवते त्या व्यक्तिच्या सांस्कृतिक महोत्सवासाठी किती जळगावकर चांगुलपणा दाखविणार आहेत ? येथे खुप काही लाखो रुपयांच्या चांगुलपणाची अपेक्षा नाही. आहे ती केवळ पाच लाख रुपयांची. तो चांगुलपणाही केवळ एका व्यक्तीकडून नको. कारण आता आपण समुह संवाद आणि समुह सहभाग याचे महत्त्व ओळखले आहे. अशावेळी जळगावातील किमान १० हजार लोकांनी शक्य ती आर्थिक मदत द्यायचा निश्चय  केला तर अवघ्या दोन दिवसात ५ लाख रुपये उभे करणे अशक्य नाही. समाजातील ज्या समुहाला हा विचार पटतो त्यांच्याकडून प्रत्येकी किमान एक हजार रुपये गोळा करता येतील. अशा प्रकारे गोळा केलेल्या निधीतून होणारा पुरुषोत्तम करंडक हा समुह सहभागाचा परिपाक असेल. म्हणूनच आज जळगाव शहरातील दानशुरांना आवाहन केले आहे.

ही पोस्ट आपण वाचा. त्याची लिंक इतरांना पाठवा. देशात, राज्यात किंवा देशाबाहेर जे जे दानशूर जळगावकर आहेत, त्यांना किमान एक हजार रुपये देण्याची विनंती करा. अर्थात, कोणी जर जास्त रक्कम देत असेल तर ती स्वीकारली जाईल.


जळगावकरांना हा विचार पटतो आहे, त्यांच्या मनाला रुचतो आहे, ते कृती  करायला तयार आहेत असे वाटले तर आवर्जून फोन करा ... 

९५५२५८५०८८

No comments:

Post a Comment