Friday 16 September 2016

धावण्यासह जगणे शिकवणारा माणूस ... !!

सोशल मीडिया सोल्युशन इनेशिएटीव्ह ...

कधी कधी कामाच्या गडबडीत काही माणसांविषयी लिहायचे असूनही लिहायचे राहून जाते. आज काल माझे असेच होत आहे. दुसऱ्यांसाठी लेखन करायचे ठरविल्यापासून इतर माणसांमधील चांगुलपणा जास्त ठळकपणे दिसायला लागला आहे. दैनिकाचा संपादक असलेला माणूस स्वतःच्याच लेखन प्रेमात पडतो. आम्ही लिहू तेच समाजाचे चित्र असा सुलेमानी किड्याचा भ्रम त्याच्या डोक्यात असतो. पूर्वी लोक केवळ दैनिके वाचत. त्यामुळे बातम्या किंवा लेखांची दुनिया दैनिकाच्या पानांपुरतीच होती. ती सुध्दा २४ तास उशिराची. नंतर आली आकाशवाणी. बातमी कानावर पडायला लागली. नंतर आला टीव्ही. थेट बातमी दिसायला लागली. आता आला सोशल मीडिया आणि मोबाईल. ४८ तास आपण खिशात बातम्या बाळगतो. अशा स्पर्धेच्या व आव्हानात्मक काळात दैनिकांचे संपादक जाहिरातीचा धंदा आणि पेपरचा कागदोपत्री खप वाढवाच्या कामात गुंतले आहेत. दैनिकांचे संपादक इव्हेंट मैनेजर आणि व्यवस्थापक वसुली अधिकारी झाले आहेत. त्यामुळे समाजातील चांगुलपणा आणि चांगली माणसं यांच्याविषयी लिहणार कोण ? हा खरा प्रश्न आहे. 

माझ्या सारख्याने माध्यमाचा मार्ग बदलला. कामाचे स्वरूप थोडे बदलले. दैनिकाचा संपादक असताना इतरांमधील चांगुलपणा टीपायचो. आता सोशल मीडिया हैण्डलर म्हणून काम करताना इतरांसाठीच लिहायला लागलोय. डोक्यात भिनलेला संपादकाचा सुलेमानी किडा काढून फेकलाय. पुरताच दूरवर. आज ज्यांच्या विषयी लिहायचे त्याला प्रारंभ करण्यापूर्वी मुद्दाम एवढे प्रास्ताविक केले. ते गरजेचे होते. कारण मी माझा मार्ग बदलत असताना याच माणसाने मलाही पाठबळ दिले आहे. माझ्या कल्पनेला सपोर्ट केला आहे. 

किरण बच्छाव. यांच्याविषयी आज लिहायचे आहे. त्यांची ओळख जळगावच्या टू व्हीलर, फोर व्हीलर अॉटो क्षेत्रातील बेताज बादशहा म्हणून सहज करता येईल.चार बड्या कंपन्यांचे  ते अधिकृत डिलर आहेत. याला जोडून बिल्डर व्यवसायातही आहेत. सोलर सिस्टिममध्येही काम करीत आहेत. विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी आहेत. असा हा उमदा व युवक माणूस मला भावतो तो रनर म्हणून. जळगावचा मैरेथॉन रनर म्हणून.

किरणदादा अशी त्यांची अलिकडची ओळख. याशिवाय अजून एक ओळख आहे. ते उत्तम हौशी फोटोग्राफर आहेत. दरवर्षी दिवाळी ग्रिटींग कार्ड हे त्यांच्या एका फोटोचेच तयार केलेले असते. निसर्ग चित्रणासाठी परदेश पर्यटनही ते करतात. आम्ही आग्रह करुन त्यांची छायाचित्रे एका प्रदर्शनात वापरली. 

व्यवसायाचा व्याप मोठा असल्यामुळे समाजातल्या अनेक प्रकारच्या घटकांमध्ये त्यांचा परियच उत्तमपणे आहे. अशा प्रकारे सारे काही सुरळीत जुळून आलेले असताना किरणदादांना आवड निर्माण झाली ती धावायची. सुरुवातीला आरोग्यासाठी धावण्याचा प्रयत्न होता. नंतर मैथॉनसाठी रनर व्हायचा निश्चय झाला. त्याचा सराव करता करता जळगावात काही मित्रांच्या सोबतीने जळगाव रनर क्लब सुरु झाला. मला किरणदादांचे वेगळेपण यात जाणवते.

त्यांच्या पहिल्या मैरेथॉन तयारी बाबत ते माझ्याशी बोलले होते. धावण्याचा सराव केवळ एक दिशेला, एका रस्त्यावर, एकाच प्रकारचूया वळणांचा, एकाच सपाटीचा, एकाच वातावरणात करायचा नसतो, हे मला किरणदादांनी सांगितले. खरे तर हे सूत्र माणसाच्या कोणत्याही काम व कार्याला लागू आहे. बहुधा यशस्वी होण्याचाच हा मंत्र आहे. एकाच प्रकारे एक काम करू नका. किरणदादांनी धावण्याच्या सरावातील धोके स्पष्ट करताना शरीराचे अवयव व स्नायुंना होणार सराव, सवय याविषयी माहिती दिली. अशा प्रकारच्या सवयीत एखादा बदल झाला की स्नायू कसे फ्रिज होतात हेही सांगितले. धावण्यासाठी शरीरातील ऊर्जा आणि पाणी कशी टीकवावी याची ही माहिती दिली. 

किरणदादा जे सांगतात त्याच पध्दतीने त्यांनी सराव करून भारतातील सर्वांत अवघड लेह लदाख ही मैरेथॉन नुकतीच पूर्ण केली. समुद्र सपाटीपासून १८,५०० उंचीवरील ही २१ किलोमीटरची अर्ध मैरेथॉन त्यांनी २ तास ४५ मिनीटात पूर्ण केली. त्यांच्या सोबत त्यांचे मित्र मिलींद राठी यांनीही ही मैरेथॉन पूर्ण केली. खरे तर बच्छाव व राठी हे दोघे एकमेकांचे बुस्टर डोस होते. म्हणूनच अनेक अडचणींवर मात करून दोघे जण टार्गेट पूर्ण करू शकले. 

मला अपेक्षा आहे या दोघांचा अनुभव समाजात जास्तीत जास्त पोहचण्याची. समाज, मंडळे, क्लब यांनी अशा लढवय्यांना व्याख्यान व मार्गदर्शनासाठी बोलवावे. शाळा- महाविद्यालयांच्या कार्यक्रमात नाकर्त्या, नाकारलेल्या पुढाऱ्यांना बोलविण्यापेक्षा बच्छाव, राठी यांची व्याख्याने व्हावीत. जेणेकरून मुला-मुलींना जगण्याचा व संघर्षातून यशस्वी कसे होता येते याचे कौन्सिलींग होईल. बच्छाव आणि राठी यांनाही विनंती आहे, आपण आपल्या रनर होण्याच्या प्रवासाची चित्रफित, फोटोफित किंवा पॉवरपाइंट प्रेझेंटेशन जरुर बनवा. मुला-मुलींना जास्तीत जास्त दाखवा. बहुधा तुमच्या या प्रयत्नातून भावी पीढी तावून सलाखून उभी राहील. जामनेरच्या एका शाळेने त्यांना रनर म्हणून व्याख्यानाला बोलावले होते. त्यांनाही त्याचा आनंद झाला होता. असेच इतरांना आनंद देणारे काम वेगळ्या वाटेवरील मंडळींनी करावे.
किरणदादा आपल्या भावी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा.


(मोबाईल नंबर 9422773311)

1 comment:

  1. Great going Kiran Dada! Keep inspiring people this way! Wish you all the best!

    ReplyDelete