Monday 12 September 2016

कनेक्टींग जनरेशन्स !!!

चि. रोहितला भेटायला मी आणि सौ. सरोज पुण्याला गेलो होतो. रोहित आणि त्याच्या मित्रांचा दीड दिवसाचा सहवास लाभला. हे दीड दिवस स्मृतींच्या पानांवर धम्माल आठवणी कोरून गेले. पन्नाशीच्या उंबरठ्यावरील आम्ही दोघे आणि युवावस्थेच्या उंबरठ्यावरील रोहीत, त्याचा मित्र श्रेय, मैत्रिणी आरजू, मोना आणि भूमिका असा आमच्या एकत्रित सहवासाचा आणि सौ. सरोजच्या वाढदिवसांचा धम्माल दिवस आमच्यासाठी कनेक्टींग जनरेशन्सचा होता. दोन पिढ्यांमधील जनरेशन गैपवर नाक मुरडणाऱ्या मंडळींनी कनेक्टींग जनरेशन्स ही संकल्पना समजून घ्यायला हवी.  

रोहित दीडवर्षे झाले पुण्यात व्हीआयएमला शिकतोय. जळगाव कल्चर घेवून रोहित पुण्यात गेला आणि आता तो पुण्यात रुळतोय. त्याच्या प्रथम वर्गाच्या ॲडमिशनपासून तोच त्याचे सर्व व्यवहार सांभाळतोय. फ्लॅट पाहण्यापासून तर कॉलेजच्या फी साठी बार्गेनिंग करण्यापासून. रोहित आणि त्याचा मित्र परिवार मोठा आहे. रोहितच्या स्वभावामुळे आणि त्याच्यावरील विश्वासामुळे त्याला अनेक मैत्रिणी आहेत. जळगाव येथे एमजेतही त्याचा असाच मित्र परिवार होता.

पुण्यातही त्याच्या जिवाभावाचे अनेक मित्र आहेत. मैत्रिणीही तशाच आहेत. फेसबुकवरील काही फोटोंवरून त्याच्या मित्रमैत्रिणींची कल्पना होती. अनेक मुलांच्या घोळक्यात दिसणाऱ्या त्याच्या मैत्रिणींविषयी आम्ही कधीही खोदून-खोदून रोहितला विचारले नाही. तसा तो सुध्दा आम्हाला एकूण एक गोष्ट सांगतो. त्यामुळे रोहितचे मम्मी-पप्पा येणार म्हटल्यावर आमच्या भेटी गाठींचे नियोजन मित्र मैत्रिणींनी करुन टाकले. कनेक्टींग जनरेशन्स हे असे सुरु झाले.

रोहितचा रुम पार्टनर श्रेय. त्याच्या सोलापूर येथील घरी रोहित १३ दिवस राहून आलाय. दोघांच्या सवयी जवळपास सारख्या. दोघे आधी मित्र झाले नंतर पार्टनर. मी आणि सौ. सरोज पुण्यात पोहचल्यानंतर बिबेवाडी भागात मुलांच्या फ्लॅटवर पोहचण्याचा सोपास्कार मोठा गमतीशीर होता. अस्सल पुणेकरांची ओळख करुन देणारा. आम्ही नगर रस्त्यावरुन बिबेवाडी विचारत जात होतो. हा रस्ता बिबेवाडीकडे जातो ना ? असे चौकात दोघा-तिघांना विचारल्यावर पुणेकरांचे उत्तर लक्षात राहिले. उत्तर देणारे म्हणत, हो हा रस्ता बिबेवाडीकडेच जातो. पण तुम्हाला कुठे जायचयं ? दोन तीन चौकातला उत्तराचा अनुभव घेवून प्रश्न बदलला. नंतर विचारले, आम्हाला बिबेवाडीकडे जायचे आहे ? हा रस्ता कुठे जातो ? त्याच्यावर उत्तर आले, जा की हा रस्ताही बिबेवाडीकडेच जातो.

रोहितच्या मित्रांनी रात्रीचे नियोजन केले होते. अंकल म्हणजे मी रोहितच्या फ्लॅटवर झोपणार आणि ऑन्टीला मुली त्यांच्या फ्लॅटवर घेवून गेल्या. का तर म्हणे, ऑन्टीशी गप्पा करायच्या होत्या. सौ. सरोज आनंदाने गेली. मी गप्पा न करताच झोपलो कारण ५०० किमी गाडी पळवून थकलो होतो. कनेक्टींग जनरेशन्सचे हे पुढील पाऊल होते. सौ. सरोजला मुलींच्या फ्लॅटवर गेल्यानंतर त्यांचे राहणीमान समजले. मुली सुद्धा मुलांच्या एवढ्याच समस्या बाळगून राहतात पण त्या जास्त समजुदार असतात, असे निरीक्षण तीने नोंदवले. दुसरीकडे दुसरा दिवस कसा घालवायचा याचे नियोजन श्रेयने केले होते.

दुसरा दिवस थोडा धक्कादायक सुरू झाला. सकाळी ८ च्या दरम्यान सौ. सरोजसह मुली फ्लॅटवर आल्या. रोहितने लगेचच मम्मीला हॅपी बर्थ डे म्हटले. खर सांगतो तेव्हा सौ. सरोजचा वाढदिवस आज आहे, हे मी विसरलो होतो. रोहितच्या सोबत इतर चौघांनीही पटापट सौ. सरोजला वीश करीत हॅपी बर्थ डे म्हटले. मुलांनी पायाला हात लावून नमस्कार केला. मी हे सारे तटस्थपणे पाहात होतो. आजय काल हाय, बाय च्या संस्कृतीत नमस्कार करणारी ही मुले मला अचंबित करीत होती. मी सुद्धा सौ. सरोजला वीश केले. नंतर आजचा दिवस कुठे जायचे याचा निर्णय श्रेयने जाहिर केला. मुला-मुलींनी मिळून लोणावळ्याला जायचे ठरविले होते. आम्ही सुद्धा लगेच होकार दिला. कनेक्टींग जनरेशन्स मधील नमस्कारासंबंधीचे माझे निरीक्षण जनरेशन गॅप भरुन काढणारे होते.

साडे नऊच्या सुमारास आम्ही लोणावळाकडे निघालो. चारचाकी वाहन घेवून पुण्यात शिरणे आणि तेथून बाहेर पडणे हे सध्या अग्नीदिव्य आहे. आमची कालची अवस्था मी सांगितली. तशीच अवस्था लोणावळाकडे जाताना होती. तरी सुद्धा मुलांना अनेक शॉर्टकट माहित होते. कनेक्टींग जनरेशन्सचा गाडीतील प्रवास अगदीच झक्कास झाला.

आदल्या दिवशी जळगाव-औरंगाबाद प्रवासात आम्ही मुकेश, किशोर, रफी, लता, जगजितसिंग, कुमार सानू, अनुराधा पौडवाल यांना ऐकत आला होतो. गाणी मला ऐकायला आवडतात. एखाद-दुसरी ओळ पाठ असते. पण, मुलांच्या गाण्यांच्या फर्माइश नव्या गाण्यांच्या होत्या. श्रेय, मोना, भूमिका, आरजू यांना आवडणारी गाणी खास मोबाईलचा ट्रॅक घेवून गाडीच्या टेपवर वाजवण्यात येत होती. मला गायक वगैरे माहित असण्याचे कारण नव्हते. मुले मात्र, अख्खे गाणे म्हणत होते. मी कौतुकाने ऐकत होते. त्याचवेळी सौ. सरोजच्या शाळेतील सहकारी मंडळी तिला मोबाईलवर वीश करीत होते. मुले-मुली ऐकमेकांची थट्टा करीत होते. एकमेकांच्या तक्रारी करीत होते. रोहित व श्रेय आम्हाला चिडवतात, अशी आपलेपणाची तक्रारही मुली करीत होत्या. कोणी म्हणत होते मी शांत आहे, कोणी म्हणत होते मी शार्प आहे. त्याचवेळी इतरांच्या सवयींची फोलखोलही मुले-मुली करीत होत्या. गाडीतील प्रवास हा खुपच आनंदायी होता.

मुला-मुलींच्या एकत्रित राहण्याचे काही धोके निश्चित आहेत. पालकांनी त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. पण, मुला-मुलींनी विश्वासाने व परस्पराविषयीच्या आदराने एकत्र राहण्यालाही निश्चित महत्त्व आहे. रोहितला १० वी, १२ वी पासून एमजे त अनेक मैत्रिणी होत्या. आम्ही पालक म्हणून कधीही त्याच्या या मैत्रीत शंका घेण्याचे काम केले नाही. रोहितच्या जळगावच्या दोन-तीन मैत्रिणी आजही त्याच्याशी उत्तमपणे संपर्कात आहेत. पुण्यातील या मैत्रिणी क्या भाई, कैसे भाई, हा भाई असा रोहितचा आणि श्रेयचा उल्लेख करीत होत्या. मुलींचा आणि मुलांचा एकमेकांवरील असलेला हा विश्वास मला मनातून सुखावत होता. रोहितच्या सभ्य असण्याची ती एक टेस्ट होती. श्रेयचे आणि त्याचे गुण अशा स्वभावातच जमले म्हणून ते सोबत राहत आहेत.

गाडी लोणावळ्याकडे धावत होती. लोणावळा जवळ आल्यावर मुलींना नास्ता करायला आम्ही थांबलो. तेथे पावसाला सुरवात झाली आणि लोणावळाचा खरा माहौल तयार झाला. मुले आनंदून गेली. तेथून पुढे आम्ही पॉइंट पाहायला निघालो.

पहिला पाईंट पुलाचा होता. लायन पॉइंटकडे जाताना मोठा पूल लागतो. दोन्ही बाजुला डोंगर, तलावाचे हिरवेशार पाणी. वर पावसाचे ढग, धुंद वातावरण. मुलांनी पटापट उतरून फोटोसेशन सुरू केले. आजकाल मोबाइल कॅमेरामुळे आयुष्याचा प्रत्येक क्षण डिजिटली कैद करुन ठेवण्याची सोय झाली आहे. मुले तसेच करीत होते. कोणीतरी या स्पॉटचे नाव विचारले. मुले म्हणाली ऑन दी स्पॉट. खरे नाव कोणालाच माहित नव्हते.

त्यानंतर वळणावळणाचा घाट चढत आम्ही लायन पॉईंटकडे निघालो. दुतर्फा पर्यटकांच्या गाड्याच गाड्या. एकमेकाला चिटकून चालणाऱ्या. बाहेर कधी पाऊस कधी धुके. मुले पुरेपूर आनंद घेत होती. मोनाने मागील डिकीचे झाकण उघडायला लावले. त्यांना जास्त मजा येत होती. अखेर आम्ही लायन पॉइंटला पोहचलो. पोरांनी झटपट उतरून नेहमीचे फोटोसेशन सुरू केले. गंमत होती. सेल्फिच्या पोज एवढ्या फटाफट घेत की, हा दिसत नाही, तो दिसत नाही असे सांगावे लागत नव्हते. चेहरे एकआड एक कसे ठेवावेत याचा त्यांना सराव झालेला होता. प्रिंट मीडियात मी फोटोग्राफर होतो. माणसांना फोटोसाठी सेट करणे किती अवघड होते, याचा अनुभव मला होता. पण, मोबाईल कॅमेराने फोटोग्राफीची दुनियाच बदलून टाकली. माझे आणि सौ. सरोजचेही फोटो काढले गेले. गृप फोटो काढले. मुला-मुलींना मी रॅलिंगवर बसवून फोटो काढले. महात्मा गाधींच्या तीन माकडांची आठवण करणारी पोज मुलींना देवून फोटो काढले. तो सर्वांना आवडला. कनेक्टींग जनरेशन्शमध्ये एकत्रित मुला-मुलींच्या या सहजीवनाचे मला कौतुक वाटत होते.

मुलांना आपण एकत्रित कुटूंब, टीम बिल्डींग, टीम वर्क वगैरे गोष्टी शिकवतो. परंतु त्यांना तसे एकत्रित राहता येईल असे वातावरण तयार करीत नाहीत. संशयाचे वातावरण मुलांची मैत्री गढूळ करुन टाकते. मला तसे काही जाणवले नाही. आरजू जेव्हा गवत फुलांचे फोटो काढू लागली तेव्हा ती मला अगदी लहान मुलगी वाटली. तीचा निरागसपणा दिसत होता. खोड्याळ रोहितने ते फूलच उपटून टाकले.

तेथून पुढचा प्रवास भुशी डॅमकडे होता. लोणावळ्यातील सर्वाधिक लोकप्रिय, पर्यंटकांची गर्दी असलेला हा स्पॉट. गाडी पार्क करुन १५-२० मिनिटे चालत आत जावे लागते. दगडी भींत बांधून तलाव तयार केला आहे. तलावातील पाणी पूर्णतः भरले की, त्यातील जादाचे पाणी भिंतीच्या कपारीतून वाहून निघेल अशी व्यवस्था आहे. पाणी वाहून जाताना तेथेही दगडांच्या पायऱ्या आहेत. अगदी वॉटर फॉल चा इफेक्ट. त्या पायऱ्यांवर बसा, लोळा, एकमेकांवर उडवा. मुले आणि सौ. सरोज पायऱ्याकडे गेल्या. मी पाण्यापासून लांब राहिलो. कपडे भीजू नये म्हणून.

मुले-मुली तब्बल दोन तास त्या पाण्यात खेळत होते. मनसोक्त फोटो काढत होते. मी जवळच्या हॉटेलात बसून गंमत बघत होतो. कडेकडेन जावून सौ. सरोजचे दोन-तीन फोटो काढले.मुलांनी गरमा गरम भाजलेला मका कणीस व चना उसळचा स्वाद घेतला.मी जेथे बसलो होतो त्या हॉटेलात टीव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिकेतील दोघे-तिघे कलांवत येवून गेले. अखेर दोन तासांनी मुले बाहेर आली. पूर्णतः भिजलेली. चहा-कॉफी घेवून आम्ही पुन्हा गाडीकडे निघालो. जवळपास ४ वाजत आले होते. पाण्यात धम्माल केल्यामुळे थोडे थकलेही होते. आता कोणताही स्पॉट पाहायचा नव्हता. तेथून परतीचा प्रवास होता. सारेजण गाडीत बसून परत निघालो पुण्याकडे. गाडीत खुप गप्पा झाल्या. आरजुने स्वतःच्या वेगवेगळ्या ठिकाणी पडण्याचे किस्से सांगितले.


सायंकाळी पुण्याहून परत निघताना मुला-मुलींनी केक आणला. सौ. सरोजला कापायला लावला. हैपी बर्थ डे झाले. आम्ही दोघे मुलांचा निरोप घेवून निघालो. रोहीत आणि भूमिकाने मोबाईलवर जीपीआरएस सुरु करुन आमची गाडी शहराबाहेर काढून दिली. दोघे मोटारसायकलवर १५/२० किलोमीटर आले. औरंगाबादला लहान भाऊ अरविंद असतो. त्याचा मुलगा यशने बडी मम्माला वीश करण्यासाठी केक आणला होता. आम्ही रात्री उशीरा औरंगाबादला पोहचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेथे केक कापण्यात आला. तेथून आम्ही जळगावला परतलो. कनेक्टींग जनरेशन्सचा प्रवास यशच्या आग्रहाने पूर्ण झाला.

3 comments: